मी काही लिहिलं की अगदी सुरूवातीचे एक दोन दिवस जवळच्या माणसांना दाखवून (आता वॉट्स अॅपवर पाठवून ) त्यांच्या प्रतिक्रिया मागवते. कुणी अनुकूल, कुणी प्रतिकूल प्रतिक्रिया देतं, कुणी काही बदल सुचवतं. कधी कधी असंही होतं की लिहिल्यावर आपलं आपल्यालाच काहीतरी अपुरं आहे असं जाणवतं. मग अर्धवट रंगवून वाट पहात बसलेल्या चित्रफलकासारखी ती कविता, कथा कुठेतरी तळाशी पडून रहाते. कधी जोमाने उसळून नवं काही घेऊन येते, अपुरंपण मिटवून टाकते. पण काही दिवसांनी आपण काही नवं केलंय याचं अप्रुप ओसरतं. कुणाच्या काही प्रतिक्रिया आल्या तरी फरक पडत नाही. हे सगळं कशासाठी? कुठे, कुणापर्यंत पोचणार? हे कुणापर्यंत पोहोचवावं इतकं महत्त्वाचं आहे का? ही अशी ‘स्वतःच्या लेखनाला फालतू समजण्याची गोष्ट’ सुरू होते.
माझं जाऊं द्यात हो. परवा आमचे गुरू , मार्गदर्शक आणि जेष्ठ मित्र प्रा. सुभाष सोमण सर यांना बऱ्याच काळानंतर भेटलो. खूप गप्पा झाल्या. गप्पांच्या ओघात विषय निघाला की सर चांगल्या कविता लिहित. त्यांच्या कविता काही मोजक्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यातलं एक सत्यकथा. आणि त्या काळी सत्यकथेत एखादी कविता छापली गेली की तो कवी थोरच ठरत असे. ते फार वेगाने आणि पुष्कळ लिहित नसत. पण तरीही ज्या काही मोजक्या कविता लिहिल्या त्यांचा संग्रह तर काढला नाहीच पण प्रसिद्धही केल्या नाहीत. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना त्या प्रसिद्ध कराव्या असं कधी मनापासून वाटलं नाही. ते म्हणाले की तसं तर तेंडुलकरांनी ( प्रा. रमेश तेंडुलकर) कुठे कविता फारशा प्रसिद्ध केल्या. त्यांची समीक्षा जितकी प्रकाशित झाली त्या प्रमाणात त्यांच्या कविता त्यांच्या हयातीत प्रकाशित झाल्या नाहीत. तेंडुलकर सरांची कविता खरं तर मोजक्या फटकाऱ्यांनी एखादं चित्र रेखाटावं तशी. तरल. (नंतर त्यांचे चिरंजीव कवी नीतिन तेंडुलकर यांनी सरांच्या कविता प्रकाशित केल्या ) पण ते कवी म्हणून ऐन भरात असण्याच्या काळात तर नाहीच पण तब्बल पन्नास वर्षे कविता लिहूनही त्यांनी त्या प्रकाशित केल्या नाहीत याचं कारण हेच असेल का?
