त्या काळी भावंडं बरीच असत. अंतरही फारसं नसे दोन भावंडात. मोठ्या भावंडांची पुस्तकं, चपला, कपडे धाकट्यांना मिळत. मी तर आठ भावंडातली पाचवी. त्यामुळे हे सर्व माझ्या बाबतीतही घडत असे. त्यात काही वाटतही नसे तेव्हा कुणालाच. पण एकदा शाळेत जाळ्यात अडकलेल्या सिंहाची आणि उंदराची ती सुप्रसिद्ध गोष्ट सांगतांना सिंह ज्या जाळ्यात अडकला ते पारध्याचं जाळं कसं होतं ते सांगतांना गुरूजींनी माझ्या फ्रॉककडे बोट दाखवित म्हटलं, “हिच्या फ्रॉकसारखं होतं ते जाळं”. मुळात छान फिक्कट निळसर रंगाचा नायलॉनचा, पुढे जाळीची लेस असलेला तो फ्रॉक माझ्याकडे येईतोवर त्याची जाळी थोडी अधिकच वाढली असावी कदाचित. नंतर जेव्हा जेव्हा तो फ्रॉक मी घालत असे (आणि त्या काळी एक दांडीवर, एक अंगावर इतकेच कपडे अगदी चांगल्या सुस्थितीतल्या सर्वांच्या कडे असत, त्यामुळे ती वेळ दर दिवसाआड येई) मला ते आठवून शरमल्यासारखं होई. याच्या अगदी उलट घडलं काही वर्षांनी. लांब दांड्याची, छान आभाळी निळ्या रंगाची मोठ्या बहीणीची छत्री तिला छोटी छोटी भोकं पडायला लागल्यावर मला मिळाली. एक दिवस ती छत्री घेऊन मी पावसात रस्त्यावरून जातांना मागून एक बाबा आपल्या मुलाला किंवा मुलीला सांगत होते, “त्या ताईची छत्री काय मस्त चांदण्याची आहे ना?” “बाबा, कुठेयत चांदण्या?” “ते काय निळं आभाळ आणि छोट्या छोट्या चांदण्या.” मला इतकं आवडलं ते नाव. पुढची बरीच वर्षं तिला चांदण्यांची छत्री हेच नाव होतं आणि चांदण्यांनी आभाळ भरून जाईपर्यंत मी ती वापरली.