आमच्या लहानपणी चाळीत शेजारी एक सातारकडच्या बाई विचारीत “ जीवलं का?” आम्हाला ते जिवलगा ऐकू येई. आम्ही म्हणायचो या जिवलगाबद्दल आपल्याला का विचारताहेत. पण नंतर कळलं की तुमचं जेवून झालं का अशा अर्थी त्या जेवलात का असं विचारताहेत.
मालवणीत “चाय खल्लीस?” असं चहा प्यायलात का अशा अर्थी विचारतात हे मला माहीत आहे (बंगाल्यांच्या जोल खाबे सारखं मालवणी चहा खातात). पण वास्तव्य मुंबईत झाल्याने आणि नंतर एका घाट्याशी लग्न केल्याने मालवणीच्या माझ्या ज्ञानाला मर्यादा आहेत. त्यामुळे मालवणीत जेवलात का या अर्थी काय काय विचारलं जातं हे मला फारसं ठाऊक नाही.
परवा चंदरचा आणि माझ्या पुतण्याचा जेवलास का या अर्थी संवाद झाला. त्यातून जुन्नर भागातले याबाबतीतले वाक्प्रयोग सापडले. “भाकर खाल्लीस का?” हे आपलं साधसुधं, सरळ. पण विचारणाराच्या मूडप्रमाणे आणि परिस्थितीतल्या बदलानुसार “गिळलंस का ?”, “ऱ्याटं गिळायला कसा येऊन बसतो”, “गुणरोक खायला फुडं आन कामाला मागं”, “रेचकलं?”, “खदाडलं?”, “हादाडलं?” असं काय काय सापडलं. मग मरण पावणे याला वेगवेगळे शब्द शोधले. मेला, गचाकला, वर गेला, वारला, पोहोचला, निधन पावला, मरण पावला, मृत्यू झाला, स्वर्गवाशी झाला, निर्वाण झालं, अंत झाला. मी म्हटलं,”पण तुम्ही हल्ली आपल्याकडे चलनात असलेला शब्द विसरलात. तो म्हणजे ऑफ झाला.” शेवटी चंदर म्हणाला,”असो, सगळे इथेच राहोत.”