यशवंतराव दाते स्मृती व्याख्यान देण्यासाठी माझ्या नवऱ्याला वर्ध्यात आमंत्रण होतं. त्या निमित्ताने आम्ही तीन दिवस वर्ध्यात होतो. मूळचे विदर्भातले मित्र अविनाश कोल्हे आणि विदर्भातलेच कवी मोहन शिरसाट यांच्यासोबत पहिल्या दिवशी आणि नंतर आयोजक दातेदांपत्य (प्रदीप दाते आणि रंजना दाते), राजेंद्र मुंढे, संजय इंगळे तिगांवकर इ.सोबत वैदर्भी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला वर्ध्यातल्या तीन वेगवेगळ्या भोजनगृहांमध्ये. पहिल्या दिवशी ‘वऱ्हाडी ठाट’ मध्ये झुणका, शेवभाजी, भाकरी आणि वांग्याचं कच्चं भरीत खाल्लं. सोबत दिलेल्या ठेच्यावर घ्यायला छोट्या वाटीत जवसाचं तेल दिलं होतं. कच्चं भरीत प्रथमच खाल्लं. त्यात भाजलेल्या वांग्याच्या गरात पातीचा कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो, मिरची लसणाचा ठेचा, कोथिंबीर असं सगळं घातलेलं होतं. इथलं जेवण थोडं तिखट असलं तरी चवीला बरं होतं.
दुसऱ्या दिवशी आम्ही तिगांवकरांच्या धाब्यावर गेलो. इथले पदार्थ अधिक चविष्ट पण थोडे तिखट होते. इथे पदार्थांचं वैविध्य होतं. गेल्या साली आम्ही एक दिवसासाठी वर्ध्यात आलो असतांना इथे जेवलो होतो. तेव्हा फणसाची मसालेदार रसभाजी खाल्ली होती. यावेळी निवांतपणा असल्याने काय पदार्थ मिळतात, कसे केले जातात हे पाहिलं. बसायला मेज आणि खुर्च्यांची सोय होतीच. पण आपण धाब्यात आहोत याची जाणीव करून देणारी खाटेवर, खाली जमिनीवर बुटक्या बैठ्या मेजाभोवती बसून जेवायचीही सोय होती. बायका चुलीवर स्वैंपाक करीत होत्या. इथेही पातोडी, शेवभाजी, झुणका, ठेचा, कढी, या गोष्टी असल्या तरी काही वेगळ्या गोष्टी होत्या. नामदेवभात असं फळ्यावरच्या पदार्थांच्या यादीत लिहिलेलं दिसलं. तो समोर आल्यावर चाखला तर तांदूळ, तूरडाळ आणि भाज्या यांची मसालेदार खिचडी असावी तसा लागला. छान होता. इथेही वर्ध्यात इतरत्र आढळणारी खवापोळी आणि पुरणपोळी होती. मऊसूत, गोडीला व्यवस्थित, वरून भरपूर तूप अशा या दोन्ही पोळ्या होत्या. रंजनावहिनी म्हणाल्या की इथं तुरीचं अळाणही मिळतं. ते करतांना तुरीचे दाणे उकडून, भाजून वाटले जातात, मग मिरच्या, कांदा, टोमॅटो भाजून त्यांचंही वाटण केलं जातं. जिरंमोहरीच्या फोडणीत हे वाटण, हळद, तिखट, धणेपूड घालून तेल सुटेपर्यंत परतून मग त्यात तुरीचं वाटण घालून एक वाफ द्यायची आणि गरम पाणी, मीठ घालून नीट ढवळून एक उकळ काढली की तय्यार अळाण.

तिसऱ्या दिवशी आम्ही रसोई नावाच्या धाब्यावर गेलो. इथल्या फळ्यावर लिहिल्यानुसार इथले पदार्थ जवळपासच्या नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून घेतलेले धान्य, भाज्या यांचा वापर करून केलेले होते. त्यात आवारातच असलेल्या घाणीवर काढलेल्या तेलाचा वापर केला होता. डेरेदार झाडं असलेलं, प्रशस्त, हिरवंगार, स्वच्छ आवार होतं. साध्या लाकडाची मेजं आणि खुर्च्या वेगवेगळ्या रंगात रंगवलेल्या होत्या. त्यांनी वातावरणात जरा रंग भरला होता. इथलं जेवण दातेसाहेबांच्या शब्दात मुंबईपुण्याकडच्या लोकांना आवडेल असं म्हणजे फारसं तिखट किंवा तेलकट नसलेलं होतं. इथे वडाभात मिळत होता. बाकीचे पदार्थ इतरत्र मिळणारे असले तरी इथे आम्हाला कोहळ्याची बोंडं खायला मिळाली आणि अंबाडीच्या फुलांचं सरबतही इथेच पहिल्यांदा चाखलं. हे सरबत बरंचसं कोकम सरबताची आठवण करून देणारं होतं. तसंच धापोडे नावाचे ज्वारीचे पापडही इथे पहिल्यांदा खाल्ले. संध्याकाळी गाडीत बसायच्या आधी रात्रीच्या जेवणासाठी मऊसूत पोळ्या आणि चविष्ट फ्लॉवरची भाजी बांधून घेता आली.

