नक्की ठाऊक नाही पण हरतालिकेला भावाने बहीणीच्या घरी शहाळी अन् केळी घेऊन जायची आणि ती खाऊन तिने उपास करायचा असा काहीतरी कोकणात प्रघात असावा. कारण आईला एकही सख्खं भावंड नसलं तरी मोठे मामा (वसंत आंगणे), शिरीमामा (श्रीधर आंगणे), शिवबामामा (शिवाजी चव्हाण), रघुमामा (रघुनाथ परब) हे सर्व आईचे मामे, मावसभाऊ शहाळी व केळी घेऊन येत व आईपेक्षाही आम्हा मुलांची चंगळ होई. एकूणच कोकणातला माणूस नातेवाईकांना धरून रहाणारा. त्यातही त्याकाळी मामे, मावस इ. भेदभाव फारसा नसावा. त्यामुळे येजा चालूच असे. माझी धाकटी बहीण निलीमा तर मोठ्या मामांना दत्तक दिल्यासारखी त्यांच्याकडे रहायला होती. त्या मामेभावंडांशी आजही तिचे सख्ख्या भावंडांसारखेच संबंध आहेत.
आमचे शिरीमामा म्हणजे एक वल्ली. त्यांच्या लहानपणचा एक किस्सा सगळे जमल्यावर हमखास सांगितला जाई. लहानपणी ते नात्यातल्या एका लग्नात गेले होते. त्याकाळी मालवणी माणसांच्या लग्नात वडे, काळ्या वाटाण्यांची उसळ नि सोजी म्हणजे तांदळाची खीर हाच बेत असे. तर त्या लग्नात सोजी चांगली झाल्याने संपली. मामांनी वाढणाऱ्याला एक-दोनदा सांगूनही सोजी काही येईना. मग ह्या छोट्या मुलाने रागाने “मिस्टर, सोजी वाढा.” असं म्हटल्यावर सगळे चमकले. बरं पोरगं नवऱ्यामुलाकडचं. मग काय भातामध्ये गूळ, दूध, खोबरं असं काहीबाही घालून सोजी म्हणून वाढलं. शिरीमामांना दशावताराची फार आवड. परेलच्या मैदानात दशावताराचे खेळ आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असे.
शिवबामामा नाकीडोळी रेखीव, रंग पक्का आणि केस मात्र ऐन तारूण्यात पांढरे झालेले (केस अकाली पिकण्याचा हा वारसा माझ्याकडेही आलाय). ही एकूणच रंगसंगति त्यांना मात्र शोभून दिसे. हे मामा जवळच रहात. सुंदर, प्रेमळ आणि माझंच नाव धारण करणारी शुभांगीमामी मला फार आवडे. त्यामुळे बहुधा त्यांच्याच घरी माझा मामेभाऊ प्रशांतला खेळवित माझा मुक्काम कायम असे. शिवबामामा दत्ता सामंतांचे कार्यकर्ते होते. एकदा त्यांच्यावरही हल्ला झाला. त्यातून ते वाचले. मामीच्या दीर्घ आजारपणात नोकरी अन् कार्यकर्तेगिरी संभाळून तिची सेवा करून तिन्ही मुलांचं त्यांनी आईच्या मायेने जे संगोपन केलं त्याला तोड नाही.
माझ्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी पहिल्यांदा रघुमामांमुळे घडल्या. रघुमामा चित्रकलेचे शिक्षक. फक्त आंगठा असलेल्या हाताने ते सुंदर चित्रं काढीत. लहानपणीच कवितेचा नाद लागलेल्या सहावीतल्या भाचीसाठी त्यांनी भेट म्हणून केशवसुतांच्या कवितांचं पुस्तक आणलं. माझ्या आवडीचं आणि पूर्णपणे माझ्या मालकीचं ते पहिलं पुस्तक. त्या पुस्तकाचं गारूड पुढे बरीच वर्षं माझ्या मनावर होतं. क्रिकेटचं वेड आम्हा मुलींना फार. तेही फक्त मागच्या मैदानावरचे सामने पाहून आणि आकाशवाणीवरचं समालोचन ऐकून. तेव्हा मामांनी खराखुरा सामना दाखवायला आम्हाला ब्रेबॉर्न स्टेडियमवर नेलं. शेष भारत विरूद्ध मुंबई असा सामना होता तो. त्या सामन्यात सोलकर आणि पतौडीने घेतलेले अप्रतिम झेल अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहेत.
अजून एक मामा होते बबनमामा (अधटराव). हे नात्यागोत्यातले नव्हते. मानलेले होते. नोकरीनिमित्त इंदौरसारख्या लांबच्या शहरात त्यांना रहावं लागे. आई मला त्यांना पत्र लिहायला सांगे. मायना (ती.मामांस शिरसाष्टांग नमस्कार इ.) आणि थोडाफार मजकूर म्हणजे प्रकृतीची काळजी घ्यावी, खाण्यापिण्याची हयगय करू नये व. आई सांगत असे. बाकीचा मजकूर मी माझ्या मनाने भरत असे. काय लिहित असे ते आठवत नाही. पण उत्तरादाखल येणाऱ्या पत्रातला मजकूर इतका प्रचंड एकटेपणाच्या भावनेने भरलेला असे की आजही गलबलून येतं आणि आई मला का ती पत्रं लिहायला सांगत असे ते कळतं.
कालौघात, संसाराच्या धबडग्यात या सर्वांशी लग्नकार्यात भेटण्याव्यतिरिक्त फारसा संबंध उरला नाही. मोठे मामा जायच्या काही काळ आधी मामेबहिणीच्या घरी आम्ही दोघं त्यांना भेटायला गेलो. तेव्हा ते म्हणाले,”आता तुझ्याकडे बघून वच्छीताईचा भास होतो.” खरं तर मी वडीलांसारखी दिसते. केस, उंची, बांधा यामुळे त्यांना तसं वाटलं असावं. पण मला मात्र ते ऐकून फार बरं वाटलं. ( आपल्या आईसारखं दिसायची सुप्त इच्छा असते की काय कोण जाणे). आताच्या मुलांना आईवडीलांच्या मित्रांच्या रूपात असे मामा भेटतही असतील. पण आमची मात्र फार चंगळ होती त्याबाबतीत हे खरं.