केप टाऊन दैनंदिनी १

दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊन शहरातल्या नऊ दिवसांच्या वास्तव्यात ‘द ओव्हल बेड अँड ब्रेकफास्ट’ हे आमचं दुसरं घर बनलं होतं. क्षितिजचं म्हणजे आमच्या लेकाचं घर जरा लहान आहे म्हणून आणि काही तांत्रिक कारणासाठीही आम्ही इथे रहायचं ठरवलं. शिवाय क्षितिजच्या घरापासून ते चालत तीन मिनिटांच्या अंतरावर होतं. माइक आणि लूइस हे साधारण आमच्याच वयाचं दांपत्य ‘द ओव्हल बेड अँड ब्रेकफास्ट’ त्यांच्या राहत्या बंगल्याच्या उरलेल्या भागात चालवतं. अत्यंत स्वच्छ, प्रशस्त खोल्या, त्यात लुइसने काढलेली चित्रं जागोजागी टांगलेली (लुईस ही हौशी चित्रकार आहे. तिची फुलदाण्यांची चित्र आपल्या बी.प्रभांच्या चित्रांची आठवण करून देतात.) प्रत्येक खोलीबाहेर एक अंगण, अंगणात फुलझाडं लावलेली. बाथरूममध्ये साबण, शांपूसारख्या गोष्टींसोबत गरम पाण्याची पिशवी ठेवलेली पाहून मला फार बरं वाटलं. पण सुदैवाने त्या पिशवीचा वापर करण्याची वेळ आली नाही.

खोलीसमोरच्या अंगणातल्या झाडांवर वेगवेगळे पक्षी किलबिलत असत. नक्षीदार लोखंडी खुर्चीवर बसून शांतपणे एखादं पुस्तक वाचायला इतकी सुंदर जागा सापडणार नाही. पण आम्ही तिथे असतांना पाऊस पडत असल्याने शेवटचे दोन दिवसच हा आनंद उपभोगता आला.

या खोलीत एक निळ्या रंगाची खिडकी दिसली. नंतर कळलं की ती खिडकी नसून एका दरवाज्याचं लाकडावर काढलेलं चित्रं आहे.
माइक आणि लुईस हे एक आतिथ्यशील दांपत्य आहे. न्याहारीला रोज तेच पदार्थ असत. त्यात फार फरक नसे. पण त्यात जे काही मर्यादित वैविध्य असे त्यात आम्ही आपापल्या आवडीनुसार माईकने विचारल्यावर काय हवं ते सांगत असू. मला अंड्याचं वावडं आहे आणि सॉसेजेस आवडत नाहीत. पण माझ्यासारख्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची सिरियल्स जसं की कॉर्नफ्लेक्स, म्युसली असतं. त्यात घालण्यासाठी वेगवेगळी ताजी फळं, सुकामेवा, मध, दही, फ्लेवर्ड योगर्ट, असं सगळं असे. माइक गरम दूध घेऊन येई. लुईसने केलेले ताजे ब्रेड असत. मला क्रझाँ आवडत असल्याने मी सहसा क्रझाँ घेत असे. तिने केलेला बन ( थोडासा आपल्याकडे गुड फ्रायडे नंतर मिळणाऱ्या हॉट क्रॉस बन सारखा दिसणारा) चवीला चांगला असला तरी थोडा कडक असे त्यामुळे तो मी क्वचितच घेई. त्याशिवाय गरम टोस्ट त्यावर लावायला मार्मालेड, दोन प्रकारचे जॅम , लोणी असेच. परतलेले टोमॅटो आणि मश्रूम, पॉरिज हवं असल्यास सांगता येई. मांसाहारी लोकांसाठी अंड्याचे वेगवेगळे प्रकार – ऑम्लेट, स्क्रॅम्बल्ड एग्ज, पोच्ड एग्ज, याव्यतिरिक्त सॉसेजेस हे असतच. गरम कॉफीही तयार असे. हे सगळं होत असतांना आमचा रोजचा कार्यक्रम विचारून दोघंही आम्हाला त्यात मार्गदर्शन करीत असत. तिथे वीज अधून मधून जाते. पण ते नागरिकांना सहसा आधी कळवलं जातं. त्याप्रमाणे ते आम्हाला कळवित. आम्ही सहसा उबरने फिरत असू. पण केप ऑफ गुड होपसारख्या लांबच्या ठिकाणी जायला उबर मिळणं थोडं अवघड होतं. तेव्हा माईकने स्वतःच्या गाडीने कमी खर्चात आम्हाला नेण्याची तयारी दाखवली आणि आमची मोठी सोय झाली. शांतपणे फिरता आलं.

आम्ही फिरून येईपर्यंत त्यांच्या मदतनीसांनी खोली स्वच्छ करून आवरलेली असे. आमच्यासाठी चहाकॉफीचं सामान भरून ठेवलेलं असे. शिवाय सोबत खायला रस्क ( दोनदा भाजलेला, किंचित गोड असा कडक पाव) ठेवलेले असत. मग आम्ही आमच्या कुटुंबाचा आवडता स्क्रॅबलचा खेळ खेळत असू.

आम्ही निघालो तेव्हा माईकने विचारलं , “काय मग घरी जाणार म्हणून फारच खुशीत दिसताय मंडळी.” तेव्हा मी त्याला सांगितलं की या जागेची आम्हाला फार आठवण येईल. ते खरंच होतं.