क

दोन दिवसांपूर्वीच एका मित्राने केप टाऊनमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे आणि १९ एप्रिलपर्यंतच पाणी मिळेल अशी पोस्ट वॉट्स अपवर पाठवली. आम्ही तिथे असतांना तर तसं काही ऐकीवात आलं नव्हतं. तरीही पुन्हा क्षितिजला विचारलं तर तो म्हणाला की ते सगळं जुनंच लोक पुन्हा पाठवताहेत. इथं असं काही नाही.
आपल्या मराठवाड्यासारखं सतत तीन वर्षे पाऊस न पडल्याने २०१७ पासून तिथे पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. त्यावरून धडा घेऊन आता पाण्याचा वापर तिथे सावधपणे होऊ लागला आहे. आम्ही ज्या ‘निवारा आणि न्याहारी’ विश्रांतीगृहात उतरलो होतो, तिथे स्नानगृहात शक्यतो टब न वापरण्याची सूचना तर होतीच. त्याशिवाय आंघोळीचं गरम पाणी यायला थोडा वेळ लागतो, तोवर जे थंड पाणी येतं, ते बादलीत साठवावं असंही सांगितलं होतं. ते बादलीतलं पाणी ते झाडांना घालण्यासाठी, शौचालय स्वच्छ करण्यासाठी वापरत होते. बाहेर फिरायला गेल्यावर स्वच्छतागृहात शौचालयाच्या टाकीला पाणी होतं, पण हात धुण्यासाठी बऱ्याच ठिकाणी नळाला पाणी सोडलेलं नसे. त्याऐवजी हात निर्जंतुक करणारा द्रव वापरासाठी ठेवलेला असे. असं असलं तरी हे नमूद करायला हवं की कुठेही अस्वच्छता आढळली नाही. घरांमध्ये स्वच्छतेचं काम करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाही सगळी आयुधं पुरवलेली दिसली. झाडी प्रचंड प्रमाणात असूनही कुठे पालापाचोळा खाली पडलेला दिसला नाही. आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे हे जाणवलं. अर्थात आम्ही सर्वसाधारणपणे प्रवासी फिरतात अशा ठिकाणी गेलो होतो. एकदा जॅझ संगीत ऐकायला गुग्ज भागात गेलो होतो. तिथेही गलिच्छपणा आढळला नाही. पण एतद्देशीयांच्या अशा गरीब वस्त्या ‘अनधिकृत’ मानल्या गेल्याने तिथल्या लोकांना नियमित पाणीपुरवठा होतच नाही म्हणे. तरीही ते कसं काय आपलं पाणी मिळवत असतील काय जाणे.
