आम्ही कुठेही गेलो की तिथल्या आठवडी बाजारात जायला फार आवडतं. अशा ठिकाणी कधी कधी फार वेगळं काही हाती लागतं. माणगांवच्या आठवडी बाजारात एकदा आम्हाला ओल्या काजूच्या टोपल्यांसोबत रानभाज्यांचे कधी न पाहिलेले प्रकार मिळाले होते. जुन्नरच्या आठवडी बाजारात आम्ही लाकडी काथवट शोधली पण नंतर आम्हाला हवी तशी काथवट आळ्याच्या जत्रेतल्या बाजारात मिळाली (हे जत्रेतले बाजारही फार मजेशीर असतात) . मध्ये वर्ध्याला गेलो असतांना तिथल्या आठवडी बाजाराच्या दिवशी तिथेच होतो, म्हणून बाजारात गेलो तर पावलोपावली रांगोळ्यांचे ठेले होते. अशा बाजारात हिंडलं की गावाबद्दल अधिक कळतं. अशीच संधि केप टाऊनमध्ये क्षितिजमुळे मिळाली. तिथेही शनिवारी आणि रविवारी आठवडी बाजार भरतो. जमिनीवर लाकडाचा भुस्सा टाकून तिथे शेतकऱ्यांना ठेले उभारून दिले होते. एका बाजूला खरेदी करून दमल्याभागल्या, भुकेल्या लोकांसाठी खाद्यपदार्थांचे ठेले आणि लोकांना आरामात बसून खाता यावं यासाठी खुर्च्या, मेजं लावली होती. तिथे चक्क शाकाहारीच नव्हे तर दुग्धउत्पादनं न खाणाऱ्या लोकांसाठीही पदार्थ होते. बाजारात तर विविध भाज्या, फळं, मांसाचे प्रकार, अंडी, घरी केलेले पाव, केक, लोणची, मुरांबे, वेगवेगळी रोपटी अशा सगळ्या गोष्टींचे ठेले होते. एका भाजीच्या ठेल्यावर मला चक्क भोपळ्याची फुलं मिळाली. त्यांची आम्ही घरी जाऊन भजी केली (क्षितिजकडे बेसन नव्हतं तर चक्क गव्हाचं पीठ वापरलं). माझ्या आवडत्या फुलांना पाहून तर डोळे निवले अगदी. या बाजारातल्या वस्तूंचे दर शेतकऱ्यांनीच ठरवलेले दिसत होते. (नक्की माहीत नाही). सगळं छान होतं, पण तिथे वर्चस्व गोऱ्या लोकांचं दिसत होतं याचं जरा वाईट वाटलं.





