

केप टाऊनमधला डिस्ट्रीक्ट सिक्स हा शहराच्या मध्यभागी, बंदराजवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला भाग. केप टाऊन नगरपालिकेच्या सहा जिल्ह्यांचा भाग म्हणून तो डिस्ट्रीक्ट सिक्स या नावाने ओळखला जाई. १९३३ मध्ये गुलामांच्या मुक्तीची सुरूवात झाल्यावर या भागात वहिवाट सुरू झाली. पूर्वाश्रमीचे गुलाम, डच ईस्ट इंडिया कंपनीने आणलेले केप मलाय लोक ज्यात प्रामुख्याने मुस्लीमांचा भरणा होता, काही नेटीव, अगदी मोजके गरीब गोरे लोक आणि भारतीय अशा खालच्या वर्गातल्या लोकांनी ती वस्ती बऱ्यापैकी गजबजलेली होती. आपण जिथे वस्ती करतो तिथे जवळपास पुढच्या कित्येक पिढ्या रहातील असा आपला ‘गैरसमज’ असतो. तिथले लोकही याच समजात आनंदाने रहात होते. पण हा मोक्याचा भाग गोऱ्या सरकारला अशा लोकांच्या ताब्यात राहू द्यायचा नव्हता. तिथे बरीच गुन्हेगारी वाढली आहे. जुगार, दारूचे अड्डे, वेश्याव्यवसाय वाढतो आहे, वेगवेगळ्या वंशाच्या लोकांमधला आपसातला कलह वाढत असल्याने त्यांना वेगळे करणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे ‘विकासा’साठी ही वस्ती नष्ट करून तिथे नव्या, आधुनिक इमारती उभारल्या पाहिजेत ही कारणे दाखवत १९६६ ते १९७० च्या काळात तिथल्या जवळपास ६०,००० नागरिकांना आपल्या चीजवस्तू गोळा करण्याची संधिही न देता तिथून हुसकावून २५ किलोमीटर दूर असलेल्या रेताड, अंधाऱ्या ठिकाणी सोडण्यात आलं. १९६६ मध्ये ‘ग्रुप एरियाज’ कायद्यानुसार ही वस्ती ‘फक्त गोऱ्या लोकांसाठी’ जाहीर करण्यात आली. पुढे २००४ मध्ये नेल्सन मंडेलांनी काही मूळ रहिवाशांना तिथल्या घरांच्या किल्ल्या सुपूर्द केल्या. पण तोवर बरेच मूळ रहिवासी इतस्ततः विखरून स्थायिक झाले होते.




१९९४ साली डिस्ट्रीक्ट सिक्स म्युझियम तयार झालं. क्षितिज आम्हाला हे संग्रहालय पहायला घेऊन गेला. संग्रहालयातल्या तळमजल्यावर मूळ डिस्ट्रिक्ट सिक्सचा नकाशा आहे. तिथे लोकांनी आपली घरं कुठे होती हे दर्शवणाऱ्या चिठ्ठ्या लावल्या आहेत. आपल्याला उखडून टाकल्यावर काय काय ओढवलं याच्या कहाण्या मांडल्या आहेत. तिथून लोकांना हुसकावल्यावर तिथे मागे राहिलेल्या उध्वस्त चीजवस्तू, छायाचित्रं आहेत. पूर्वीच्या डिस्ट्रीक्ट सिक्सचा इतिहास, तिथलं लोकजीवन, तिथलं जॅझ संगीत, त्या संगीताचा इतिहास, तिथल्या लोकांनी आपल्या आयांच्या, आज्यांच्या दिलेल्या पाककृती या सगळ्यातून त्या लोकांविषयी कळतं. तिथे एका नेटीव मुलीचं घर तिच्या दैनंदिनीतल्या नोंदींनुसार उभं केलंय. ते पाहून तर चांगलीच कल्पना येते तिथल्या लोकांच्या आयुष्याची. साहित्यिक, चित्रकार यांनीही डिस्ट्रीक्ट सिक्सचं चित्रण केलंय. पण संग्रहालयातल्या एका खोलीच्या जमिनीवर काही कवी, लेखकांनी आपापल्या कविता फरशीवर कोरल्या आहेत. त्या कवितांमधून, मनोगतांमधून त्यांच्या वेदना आपल्यापर्यंत पोहोचतात.


