नुकतंच फेबुवर एका सहकारी मित्राने त्याच्या गांवच्या जत्रेत होणाऱ्या नाटकांविषयी लिहिलं होतं. ते वाचून माझ्या सासरच्या गांवी जत्रेत नाटक सादर करणाऱ्या माझ्या सासऱ्यांची (गणपत भाऊ थोरात) अप्पांची आठवण झाली. माझे वडीलही मालवणात नाटकात काम करीत असत. एकदा त्यांनी स्त्रीभूमिका केल्याचीही आठवण माझी आई सांगत असे. पण ते त्यांच्या तरूणपणात ते गांवी असतांना हे सर्व करीत. अप्पा मात्र त्यांची मुंबईतली फोर्टमधल्या बॉम्बे स्टेशनरी मार्टमधली नोकरी सांभाळून नाटकात काम करीत. अर्थात मी यातलं काहीच पाहिलेलं, अनुभवलेलं नाही. मला माघी पोर्णिमेला साधं गांवी जाणंही माझ्या धकाधकीच्या आयुष्यात जमलं नाही. हे सर्व मी चंदर आणि माझ्या सासुबाईंकडून वेळोवेळी ऐकलेलं.
गांवात माघी पोर्णिमेला जत्रा भरत असे. त्या जत्रेत म्हणजे वर्षातून एकदा गांवातली मंडळी नाटक सादर करीत. पण त्याचे वेध मात्र वर्षभर लागलेले असत. मुंबईत नोकरीच्या निमित्ताने कुठेतरी खानावळी म्हणून रहाणाऱ्या गांवच्या चाकरमान्यांनी ‘मार्तंड नाट्य मंडळ’ या नांवाने एक संस्था स्थापन केली होती. (बहुधा खेडोपाडी अशीच अनेक नाट्यमंडळं असावीत). आबासाहेब आचरेकर, वसंत जाधव अशा ‘भारी’ भाषेत लिहिणाऱ्या नाटककारांची कामगार रंगभूमिवर सादर केली जाणारी ही नाटकं असत. ती फार साहित्यिक मूल्य वगैरे असलेली नाटकं नसत. कामगार रंगभूमिवर सादर होणारी असली तरी कामगारांच्या प्रश्नांशी ही नाटकं निगडीत नव्हती. ऐतिहासिक किंवा इतिहाससदृश पार्श्वभूमि असलेली, तसंच काही सामाजिक आशयाची अशी नाटकं असत. यातली बरीचशी नाटकं कृतक संघर्षाने भरलेली, रंजनपर, साचेबद्ध कथानक असलेली अशी होती. ती करायला साधी आणि सोपी असत. ‘माझं कुंकू’, ‘सख्खे भाऊ, पक्के वैरी’, ‘ऐका हो ऐका’, ‘सरनौबत’ ‘सेनासागर’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘छत्रपती संभाजी’, ‘खुनी सम्राट’ अशा नांवांची ही नाटकं. कधीतरी ‘बेबंदशाही’ सुद्धा सादर केलं होतं. उमाजी नाईक,, वासुदेव बळवंत फडके यांच्यावर लिहिलेली नाटकंही सादर होत.

सुरूवातीच्या काही नाटकांत केलेल्या खलनायकाच्या भूमिका सोडल्यास उंचेपुरे, चांगलं व्यक्तीमत्व लाभलेले अप्पा सहसा नायकाच्या भूमिकेत असत. सरनौबतमध्ये नेताजी, सेनासागरमध्ये संताजी, छत्रपती शिवाजीमध्ये शिवाजी अशा भूमिका ते सहसा करीत.( नायक, उपनायक, खलनायक, विनोदमूर्ती हे कोण असणार हे ठरलेले असे व तसेच होई) सेनासागर नाटकात नागोजी माने संताजीला निःशस्त्र अवस्थेत पूजा करतांना मागून वार करून मारतो हे दृश्य होतं. यात वार केल्यावर अप्पा डोक्याकडचा भाग विंगेत जावा अशा प्रकारे पडले आणि मग नागोजी माने त्यांचे मुंडके कापून ते हातात घेऊन विकट हास्य करतो असं ते दृश्य होतं. प्रेक्षकात बसलेल्या चंदरने आपल्या अप्पाला खरंच मारलं असं समजून भोकांड पसरलं. पुढे वयाच्या आठव्या नवव्य़ा वर्षी त्याने स्वतःही छत्रपती शिवाजी या नाटकात लहानग्या संभाजीची भूमिका केली आणि वाट्याला आलेले पाचसहा संवाद ऐटीत ठोकले. या नाटकाच्या जाहिरातीत त्याच्याविषयी लिहिलं होतं ‘आणि उगवता तारा – हरिश्चंद्र थोरात. पण या उगवत्या ताऱ्याने मात्र ही एकमेव भूमिका करून रंगभूमिकडे पाठ फिरवली. ( त्या ताऱ्याने चमकायचं ठरवलं असतं तर मराठी रंगभूमिचं काय झालं असतं ते माहीत नाही. पण निदान दुर्बोध लिहिणाऱ्या एका खडूस समीक्षकापासून मराठीतले लेखक आणि मराठी साहित्य तरी वाचलं असतं.)

एखाद्याच्या मालकीची खोली असेल तर तालमी तिथे होत. कधी चाळीच्या दोन्ही बाजूला असलेल्या खोल्यांच्या मधल्या बोळकंडीतही तालमी होत. आपापली कामं उरकून सगळे तालमीला जमत. कामगार रंगभूमिवर काम करणाऱ्या अभिनेत्री स्त्रीभूमिकांसाठी कंत्राटावर आणल्या जात. (सुलोचना खेडकर या आधी तमाशात व नंतर नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्रीही काही नाटकात होत्या.) या स्त्रिया यातल्या बऱ्याच नाटकात काम करीत असल्याने त्यांना तालमीची विशेष गरज नसे. त्या काही ठराविक वेळा तालमी करायच्या करारावर येत. असंही जत्रेत नाटक सादर करायच्या दोन तीन दिवस आधी मंडळी गांवात पोहोचत. तेव्हा तालमीची कसर भरून काढता येईल. घरात ‘ममईची माण्सं’ आल्याने गोडाधोडाचा विशेष स्वयंपाक होई. तो या सर्वांसाठी होई. या स्त्रियांची तान्ही मुलं असली तर त्या तालमीत किंवा प्रयोगात असतांना घरातल्या बायका त्यांना अंगावर पाजत असं सासूबाईंनी सांगितल्याचं आठवतं.
पहिल्या बैठकीत नाटकाची निवड होई. नाटक पक्कं झाल्यावर नाटकाच्या पुस्तकाच्या एका प्रतिमधून आपपाले संवाद फाडून एका चोपडीत (अप्पांचा वहीसाठी शब्द) डकविले जात. याला ‘नाटक फाडणे’ म्हणत. माझे चुलत सासरे (मारूतीराव थोरात) वाचता येत नसल्याने दुसऱ्या कुणाकडून वाचून घेऊन संवाद पाठ करीत. सालाबादप्रमाणे मार्तंड नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे ऐतिहासिक नाट्यकृती..” अशी हँडबिलं छापून गांवात वाटली जात. साईनबोर्ड पेंटरकडून फलक लिहून घेऊन लोक जमत असत अशा चावडीसारख्या ठिकाणी लावले जात. ऐतिहासिक नाटकांचे पोशाख मुंबईहून भाड्याने नेले जात. रंगभूषेसाठी गांवात कुणी माणूस त्यात निष्णात असलेला मिळाला तर ठीक नाहीतर मुंबईहून सोबत आणला जाई. ऐतिहासिक नाटकातल्या महाल, रस्ता, जंगल अशा दृश्यांसाठी वर खेचायचे पडदे रंगवून घेतले जात. औटी नांवाचे राजुरीचे पेंटर ते रंगवित. (नंतर ते पुन्हा वापरण्यासाठी कुणाच्या तरी घरी माळ्यावर जपून ठेवले जात. आमच्या घरीही असे पडदे होते. तशीच नाटकांची असंख्य पुस्तकंही एका पेटीत ठेवलेली होती.) एकाच दिवाणखान्यात घडणाऱ्या सामाजिक नाटकांसाठी ‘बॉक्स’ बनवून घेतला जाई.
जत्रेच्या दिवशी नाटक पहातांना करूण प्रसंगात आयाबाया डोळ्यांना पदर लावीत. झोपाळलेली मुलं हाणामारीच्या प्रसंगी ताडकन् उठून गुडघ्यावर बसून डोळे विस्फारून पहात. लंबेचौडे ‘भारी’ संवाद ऐकतांना पुरूषमंडळी आवेशात येत. नाटक सादर करून ममईवाले परत जात आणि दुसऱ्या नाटकाची तयारी लवकरच सुरू करीत.

नंतर हा वारसा आमच्या घरात माझ्या तिन्ही धाकट्या दीरांनी – रमेश, सुरेश आणि दिलीप यांनी पुढे चालविला. त्यांच्या पिढीने ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘अश्रूंची झाली फुले’ अशी जरा रोमँटिक, शहरी नाटकं निवडली. अप्पांच्या नाटकांची छायाचित्र उपलब्ध नसल्याने माझ्या दीरांनी सादर केलेल्या नाटकांची छायाचित्रंच वर दिलीत. शाळेत वेगवेगळ्या गांवातून आलेले शिक्षकही नाटक सादर करीत. अशाच शिवाजी बारवे या चंदरला वाचनाची, साहित्याची गोडी लावणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या एका नाटकाचंही छायाचित्र आहे. (आता बारवे सर गुणवंत शेतकरी झालेत.)
मला प्रश्न पडतो तो हा की ही शहरात नोकरी करणारी माणसं हा सगळा खटाटोप पदरचे पैसे खर्च करून ( दर महिन्याला आपसात वर्गणी गोळा करून) का करीत असत. एक विरंगुळ्याचं साधन म्हणून? गांवच्या लोकांची करमणूक करून त्यांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी? मुंबईतल्या त्यांच्या एकसुरी आयुष्यात थरार आणण्यासाठी की रंगभूमीच्या प्रेमाखातर? त्यांच्याही मनात त्यांनी पाहिलेल्या नाटकांनी घर केलं होतं का?

