मुंबई लोकलमधले किस्से

जवळपास पंचेचाळीस वर्षं मी मुंबईच्या तिन्ही रेल्वेमार्गांवर प्रवास केला. गर्दी वाढायला लागल्यावर अशक्य झाल्यावर प्रथम वर्गात, त्याआधी दुसऱ्या वर्गात. या काळात अनेक अनुभव आले, काही मजेशीर, काही करूण.

अठरापगडजणींचे माझे बरेच वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वेगवेगळे गट होते. ती सगळी आपापल्या परीने वेगवेगळी विश्वं होती प्रेमाची, लाडाकोडाची, हेव्यादाव्याची, सत्तासंघर्षाची.

सत्तेचा संघर्ष फलाटावरच सुरू होई. चालत्या गाडीत उडी मारण्यासाठी प्रत्येकाची जागा ठरलेली असे. त्या जागेवर कुणा नव्या व्यक्तीने अतिक्रमण केलं की फार जळजळीत कटाक्ष टाकून तिला ढकललं जाई. गाडी पकडतांना काहीही आधारासाठी धरत बायका. कुणाची वेणी, कुणाचा बुचडा, कुणाच्या पर्सचा पट्टा, कुणाचा पदर, कुणाची ओढणी, एकदा एकीने जीवाच्या आकांताने लटकतांना माझ्या कुर्त्याचा मानेकडचा भाग पकडला आणि तो फाटला. बसायची, उभं रहायची आपापली जागा बळकावेपर्यंत कुणी काही करीत नसे. ते आपलं ध्रुवपद प्राप्त झाल्यावर भांडणाला तोंड फुटे. समोरचा माणूस हा बाहेरून मुंबईत आलेला आहे असाच मुंबईकरांचा पक्का समज असल्याने भांडणाला सुरूवात हिंदी, इंग्रजीत होई (मेरे आंगपर पड्या ना तुम, फिर?  Mind your tongue..) मग हळूहळू लोक आपल्या ‘मायबोलीवर’ येत. पुढचा सत्तासंघर्ष अर्थातच वेगवेगळ्या गटांमध्ये ‘चुकून’ बसलेल्या किंवा उभ्या राहिलेल्या लोकांवरून होई. ‘नववी सीट’ ‘चौथी सीट’ हे तर भांडणाचे हक्काचे विषय. पण एका प्रसंगात मात्र त्यांची प्रतिक्रिया एकमेकींसारखीच असे. ते म्हणजे डब्यात झुरळ, उंदीर किंवा तत्सम प्राणी आल्यावर सगळ्याजणी इतक्या कष्टाने मिळवलेली जागा सोडून चक्क पळत सुटत किंवा बाकावर उभ्या रहात. एकदा तर साप असल्याची अफवा निघाली पण प्रत्यक्षात निघाला बेडूक. कधी कधी तर एक माकडवाली डब्यात चढत असे. तिचं माकड तिच्या हातातून निसटून डब्यात उच्छाद मांडी. एकदा जरा मानसिक रित्या आजारी असलेल्या एक बाई डब्यातल्या फळीवरची प्रत्येक पर्स ओढून, “ही माझी पर्स”, “ही पण माझी पर्स” असं बडबडत पर्सेस ओढायला लागल्या, तेव्हा काही सेकंदांच्या आत प्रत्येक बाईने आपापली पर्स नेमकी काढून घेतली, शेजारी बसलेल्या बायकांनाही मदत केली आणि फळी कधी नव्हे ती रिकामी झाली. असे प्रसंग घडून गेल्यावर मात्र बायका पुन्हा भांडणं करायला मोकळ्या होत.

असं असलं तरी वेळप्रसंगी याच बायका एक होऊन अनोळखी बायकांना मदत करीत. एखादीला चक्कर आली तर अख्खा बाक खाली केला जाई, कुणी तिला वर्तमानपत्राने वारा घाली, कुणी पाण्याची बाटली काढून पाणी शिंपडी, तर कुणी पर्समधून शोधून चॉकलेट देई. एकदा माझ्याकडचा बॅटरीवर चालणारा खेळण्यातल्या पंख्यासारखा दिसणारा छोटा पंखा अशा वेळी कामी आला. आपल्या ओढण्यांचा चारी बाजूंनी आडोसा करून अचानक उद्भवलेली बाळंतपणंही निगुतीने पार पाडीत बायका. एकदा जीन्स, टीशर्ट असा पेहराव करून एक तरूण मुलगी आमच्या डब्यात चढली. तिला नोकरीसाठी मुलाखतीला जायचं होतं आणि साडी नेसता येत नव्हती. पण मुलाखतीला जातांना साडी नेसावी असं तिला कुणीतरी सांगितलं असावं. सगळा जामानिमा तिने पिशवीतून आणला होता. आम्हाला तिने साडी नेसवायची विनंती केली. मग काय, ओढण्यांचा आडोसा करून तिला साडी नेसवण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडला. 

अर्थात नेहमी असं चांगलं, मजेशीर काही घडत असे असं नाही. २६ जुलै, २००५ ला मुंबईवर ओढवलेल्या पूर प्रसंगाला तीनचार दिवसच उलटले होते. पावसाचा जोर अजूनही होता आणि त्यामुळे असेल पण गाडीला फार कमी गर्दी होती. अंधेरीला एक राजस्थानी पद्धतीचा पेहराव केलेली बाई दोन लहान मुलींसोबत गाडीत चढली. गाडीत चढल्यापासूनच तिने मुलींना विविध प्रकारची बिस्कीटं, वेफर्स, चॉकलेट्स खायला देऊन त्यांचे लाड करायला सुरूवात केली. पण हे सगळं करतांना तिच्या डोळ्यात पाणी होतं. आजूबाजूच्या बायकांच्या डोळ्यात प्रश्नचिन्हं होतं, पण कुणी तिला काही विचारलं नाही. कारण बहुधा मुंबईत लोक दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसायला जरा घाबरतात. वांद्रे स्थानकात गाडी थांबली. आत्ता गाडी सुटणार इतक्यात आजूबाजूच्या लोकांच्या  लक्षात यायच्या आधी विजेच्या वेगाने ती बाई दोन्ही मुलींना डब्यात सोडून गाडीतून उतरली आणि गाडी तेवढ्यात सुटली. मुली खाण्यात गर्क होत्या. त्यांच्या हे ध्यानात आलं नाही. आम्ही गाडी थांबविण्यासाठी साखळी खेचूनही उपयोग झाला नाही. सुदैवाने दादर स्थानकात रेल्वेच्या दोन महिला पोलीस गाडीत शिरल्या आणि तेव्हाच साखळी का खेचली याची विचारणा करण्यासाठी रेल्वेचे लोक आले. सगळा प्रकार त्यांना सांगितल्यावर त्या दोन्ही मुलींना घेऊन रेल्वे पोलीस निघून गेले. मुंबईसारख्या गडबजलेल्या शहरातल्या गर्दीत आपल्या घरच्यांना नकोशा झालेल्या मुलींना सोडून देणं त्या बाईला सोपं वाटलं असेल किंवा बायकांचा डबा आहे, कुणीतरी काहीतरी सोय करतीलच मुलींची असंही वाटलं असेल. पण डब्यातली प्रत्येक बाई हादरून गेली होती. त्या मुलींचं पुढे काय झालं ठाऊक नाही. डब्यातल्या बायकांना जरी त्या मुलींना पोलीसांकडे सोपवण्याची इच्छा नसली तरी आपण सांभाळ करायला घरी घेऊन गेल्यावर आमच्या मुलींना या बाईने पळवलं असं म्हणत पैसे उकळायला कुणी येऊ शकतं असे अनुभव असल्याने मुंबईतले लोक अशा फंदात सहसा पडत नाहीत. दुसरं म्हणजे पोलीस त्या मुलींच्या खऱ्या आईबापांना शोधून काढतील अशी आशाही असते.

पावसाच्या काळात गाड्या अधूनमधून थांबत, रखडत जाणं सर्वांच्या सवयीचं असलं तरी रोज काही ठराविक ठिकाणी गाड्या का थांबतात, यावर कायम चर्चा चालत. पार्ला-अंधेरीच्या मध्ये एका विशिष्ट ठिकाणी, कांदिवलीला फूड कॉर्पोरेशनच्या गोडाऊनजवळ, चर्चगेटला – माझी मैत्रीण विद्या गिंडे हिच्या भाषेत वानरवेड्याजवळ (वानखेडे स्टेडियमजवळ) गाड्या थांबत त्या बहुधा सिग्नल न मिळाल्यामुळे. पण सकाळी आणि संध्याकाळी विरार जलद गाड्या गोरेगांव स्थानकावर का थांबतात याचं कोडं काही उलगडत नसे. तर्ककुतर्क चालू असत. रेल्वेत काम करणारी आणि रेल्वेतर्फे हॉकी खेळणारी आमची एक पंजावी मैत्रीण म्हणायची, “बंदा चाय पी रिया.”. पण गाडी आपली अडून. पाच मिनिटं गेली तरी थांबलेलीच. मग ती म्हणायची, “बंदा चाय के साथ साथ पकौडे भी खा रिया.” काही बायका म्हणत की इथे बहुधा रेल्वे क्वार्टर्स आहेत, तिथून मोटरमनचा डबा येतोय घरनं, तर काही म्हणत मोटरमनची बायको असेल गाडीत तिला उतरता यावं म्हणून थांबवतात. एकदा अशी गोरेगांवला गाडी थांबल्यावर डब्यातून वाट काढत एक बाई धावत आली आणि उतरायचंय म्हणू लागली. विरार गाडी असूनही बायकांनी चक्क कुरबूर न करता तिला उतरू दिलं. तेवढ्यात गाडी हलली. आम्हाला टाटा करत ती हसत हसत म्हणाली, “तुम्हाला माहीतेय का, मोटरमन माझा नवरा आहे.”

बायकांच्या मनातल्या या पूर्वग्रहांचा अनुभव बरेचदा येई. त्यामुळे कधीकधी वाईट वाटण्याजोगे प्रसंग अनुभवायला मिळत. मी जरा उशिराची – सात वाजल्यानंतरची- एक महिला लोकल पकडत असे. त्या गाडीच्या पहिल्या वर्गाच्या एका विशिष्ट डब्यात एक वयस्कर बाई चढल्या. कपडे उच्च अभिरूची दर्शविणारे, बाई चांगल्या घरातल्या दिसत होत्या. त्या महालक्ष्मी स्थानकाच्या आसपास चढल्याने गाडीत बसायला जागाही होती. पण बायका नाकाला ओढण्या, रूमाल, पदर लावून लांब पळायला लागल्या. कुणी त्या बाईच्या जवळ बसेना. मी एका बाईला विचारल्यावर ती कुजबुजली, “तिच्या अंगाला ना घाण वास येतो, ती महालक्ष्मीला भीक मागते रस्त्यावर.” मी म्हटलं, “काहीतरीच काय? असं असतं तर त्यांना पहिल्या वर्गाचं तिकीट कसं परवडलं असतं?” “अहो, असे लोक काय तिकीट काढून येतात थोडेच. घुसली असेल तिकीटाशिवाय.” कुजबुजत बोललो तरी त्या बाईंच्या कानी पडलं असावं. त्या म्हणाल्या, “फर्स्ट क्लास का पास है मेरे पास। चाहिए तो देख लो।“  मग सगळ्या गप्प बसल्या. पण माझ्या बाजूची परत कुजबुजायला लागली, “बघा आता पर्समधून दहाच्या नोटा काढून लोकांना सुट्टे हवेत का ते विचारील.” आणि खरोखरच त्या बाईंनी तसं केलं. बायकांनी पैसे सुट्टे करून घेतले. त्या बाईंनी बंद्या नोटा पर्समध्ये ठेवल्या. एव्हाना त्यांच्या बाजूच्या मोकळ्या जागेवर बायका नाईलाजाने बसायला लागल्या. त्या बाईंनी बाजूच्या तरूण मुलीला एक ट्रॅव्हल प्लान घ्यायला विनंती केली. त्याचे कागदपत्र दाखवले. मुलीला बहुधा रस असावा. पण आजूबाजूच्या बायका तिला नको घेऊस असं नजरेने खुणावयाला लागल्या. त्या बाई रडवेल्या होऊन सांगायला लागल्या, “लो ना बेटी। ऐसे दस लोग यह प्लान लेंगे तो मेरे बेटे को वहाँ नोकरी मिल जाएगी। फिर मुझे यह सब नहीं करना पडेगा।“ हेही खरं की मुंबईसारख्या शहरात लोकांना फसवणूकीचे बरेच अनुभव येतात त्यामुळे लोकांना अनोळखी व्यक्तीकडून असं काही घेणं नको वाटतं. पण तरीही त्या दिवशी खूप वाईट वाटलं.

१३ ऑक्टोबर, १९९३ रोजी मुंबईत महिला स्पेशल गाडीला बोरिवली आणि कांदिवलीच्या दरम्यान भीषण अपघात झाला. मी कधी त्या गाडीने प्रवास करीत नसे. पण तीन दिवसांनी एका मित्राच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता. तिला भेट द्यायला एका मैत्रिणीकडे मी एका खेळण्याची ऑर्डर दिली होती. ते घ्यायला गेले आणि ते घेऊन उतरायच्या आत गाडी सुटली. बाकीच्या मैत्रिणी गोरेगांवपर्यंत सोबत होत्या. विरार गाडी असल्याने कांदिवली स्थानक मागे प़डल्यावर मी बाहेर जायला उठले. दरवाजाजवळ यायच्या आधीच डब्यातल्या काही बायका किंचाळत ढकलत आल्या. गाडी मध्येच थांबली होती, तिथे त्यांना उडी मारून उतरायचं होतं. नक्की काय झालं ते कळलं नाही. पण त्यांच्या ढकलाढकलीत नको असतांना आपण पडू या भीतीने मी आत आले. गडबड थंडावल्यावर मी आणि एक मुलगी बाहेर आलो, तेव्हा ती मुलगी किंचाळली, “मॅडम, किती प्रेतं पडलीत पहा.” आम्ही दोघी हादरून आत पळत सुटलो. हळूहळू सगळं कळायला लागलं. पुढल्या कुठल्या तरी डब्यात आग लागली होती आणि गाडी पेट घेईल या भीतीने त्या बायकांनी उड्या मारल्या होत्या. आणि दुर्दैवाने उलट्या बाजूने जाणाऱ्या गाडीखाली येऊन त्या बायका गेल्या होत्या. डब्यात हलकल्लोळ माजला होता. विशेषतः तरूण मुली फार घाबरल्या होत्या. एका मुलीची मोठी बहीण नेहमी पुढच्या डब्यात चढत असे. ती नक्कीच त्या आग लागलेल्या डब्यात असणार आणि तीही गेली असणार या भीतीने ही मुलगी हमसाहमशी रडायला लागली. या सगळ्या मुलींना पाणी पाजून, पाठीवर, डोक्यावर थोपटून शांत करण्याचं काम आमच्यासारख्या जरा प्रौढ बायकांना करावं लागलं. काही काळाने गाडी बोरिवलीच्या फलाटाला लागली. पण नवल म्हणजे कुणी उतरायला तयार होईना . मला कळेना त्या असं का करताहेत. मी त्यांना उतरायला सांगितल्यावर त्या मला म्हणाल्य़ा, “तुम्ही फार शूरपणा दाखवताय ना मघापासून. तुम्हीच उतरा पहिल्या.” मी अर्थात लगेच उतरले. नंतर त्या बायकांना याचं कारण विचारलं. तर त्यांना म्हणे अशी भीती वाटत होती की त्या बायका या दरवाजातून उडी मारल्यामुळे मरण पावल्या, तेव्हा त्यांचे आत्मे दरवाजाजवळ घुटमळत असतील आणि ते उतरणाऱ्या माणसांवर सूड घेतील. मी उतरले आणि मला काही झालं नाही, हे पाहून, खात्री करून मग इतर बायका खाली उतरल्या. जवळच्याच भगवती इस्पितळातली एक तरूण परिचारिका सोबत होती. खरं तर परिचारिकांनी मरण इतक्यांदा पाहिलेलं असतं. पण ती मुलगी इतकी हादरून गेली होती की तिने मला विनंती केली की मी तिला इस्पितळापर्यंत सोबत करावी. मी अर्थातच वाटेत तिला सोडून घरी गेले. पण मानवी स्वभाव आणि अंधश्रद्धा यांचं काय करावं यावर विचार करता करता मी अपघाताच्या धक्क्यातून नकळत थोडी सावरलेही.

असे अपघात, बाँबस्फोट, दंगे, पावसात अडकून पडणं या सगळ्यातून जातांना मात्र मुंबईच्या बायका पुरूषांइतक्याच खंदेपणाने त्या सगळ्याला तोंड देतात. तसंच त्या वाईट अनुभवातच अडकून पडत नाहीत. दुसऱ्या दिवशी आपापल्या कामाला लागतात. वेगवेगळे सणवार साजरे करतात. लग्न ठरलेल्यांची केळवणं, गरोदर मैत्रिणींची डोहाळजेवणं हे सगळं उत्साहात पार पाडतात. आता तर मोबाईलवर सिनेमे बघतात. सेल्फी काढतात, गाणी ऐकतात. गंमत म्हणजे पूर्वी गप्पांचा फड रंगवणारे किंवा गाणी गाऊन लोकांचे कान किटवणारे गट एकाच डब्यात असूनही एकमेकींशी वॉट्स अपवर बोलतात. अर्थात तंत्रज्ञानाच्या विकासाचे काही तोटे होतात. रेल्वेने लोकांना कुठलं स्थानक आहे हे कळावं म्हणून उद्घोषणा करायला सुरूवात केली. आता प्रत्येक स्थानक यायच्या आधी कुठलं स्थानक येणार याची उद्घोषणा केली जाते. एकदा एका तरूणीला – बहुधा घरून आईकडून – फोन आला आणि विचारणा झाली असावी की ती कुठे आहे. त्या मुलीला बहुधा तिच्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत घरी पोहोचायच्या आधी थोडा वेळ घालवायचा असावा. तिने उत्तर दिलं, “मी ना चर्नीरोडला आहे. अजून घरी यायला सव्वातास तरी लागेल किमान.” आणि तिच्या दुर्दैवाने तेव्हढ्यातच फोनवर पलिकडल्या व्यक्तीला ऐकू जाईल एव्हढ्या मोठ्या आवाजात उद्घोषणा झाली, “अगला स्टेशन अंधेरी” आणि त्या मुलीचं भांडं फुटलं. अर्थात तिने नंतर आपला झोप लागल्याने गैरसमज झाल्याचं सांगून सावरून घेतलं. पण डब्यातल्या बायकांची हसून हसून मुरकंडी वळली.

रेल्वेतल्या फिरत्या विक्रेत्यांचंही एक वेगळं जग आहे. घरातून भांडण झाल्याने, इतर काही कारणाने पळून आलेली अल्पवयीन मुलं इथे केसाचे चाप, टिकल्या, पेनं, कात्र्या इथपासून ते खेळणी आणि चक्क पुस्तकांपर्यंत काहीही विकतात. संध्याकाळी घरी परतणाऱ्या बायकांना कधी कधी भाजीच काय पण सोललेली कोळंबी विकणाऱ्या बायकाही असतात. नवरा वारल्यावर अनुकंपा तत्वावर त्याच्या कचेरीत चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून नोकरी मिळालेली आमची एक मैत्रीण एकटीच कमावणारी असल्याने आपल्या आईच्या वसईतल्या मळ्यातली रात्री खुडलेली ताजी भाजी विकायला आणीत असे. सकाळी विरार वसईवरून येणाऱ्या नोकरीपेशा बायकांना फार लवकरची गाडी पकडायला लागते आणि खायला वेळ मिळत नाही. आमच्या विरार गाडीत मधुबेन नांवाच्या गुजराती बाई  रोजच्या नाश्त्याचे आणि उपवासाचे पदार्थ स्टीलच्या डब्यातून आणून विकत. ज्यांना कामावर गेल्यावर खायचे असे त्यांना फार व्यवस्थित बांधून देत. संध्याकाळच्या आमच्या गाडीत गिरगांवला एक खूप वयस्कर बाई थालीपीठं, लाडू, चकल्या असे घरगुती पदार्थ विकत. अर्थात सर्वांकडचे पदार्थ चांगल्या दर्जाचे असत असं नाही, पण मुंबईतल्या कामाच्या आणि प्रवासाच्या आड वेळा सांभाळतांना भुकेपोटी कधी कधी काहीही खावं लागतं. जरा आरोग्याच्या दृष्टीने आणि एरव्हीही जागरूक असलेल्या बायका सोबत घरून आणलेलं खाणं आणि पाणी जवळ बाळगतात. कारण मुंबईतल्या प्रवासात कधी काय प्रसंग येऊन अडकायला लागेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे बऱ्याच बायका खांद्यावर मोठ्या पर्समध्ये गरजेच्या गोष्टी बाळगतात. त्यात डोकेदुखीच्या, तापाच्या गोळ्या, लिमलेटच्या गोळ्या, बामपासून सुईदोरा, नाडी इथपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. काही दिवसांनी अख्खं घर सोबत घेऊन प्रवास करावा लागेल बहुधा असा विनोद करतात बायका. पण त्यांनाही ठाऊक आहे की काही झालं तरी त्या सगळ्या तडजोडी करीत, वाट्टेल ते झालं तरी हा प्रवास कसाही का होईना करीत रहाणार आहेत. त्यांना दुसरा पर्यायच नाही.

            ——————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s