लहानपणची एक आठवण. मुंबईतल्या त्या काळच्या सर्वच कोकणी माणसांप्रमाणे वडील गांवच्या लोकांच्या इथल्या संघटनांच्या बैठकांना, नात्यागोत्यातल्या समारंभाना जात. (बहुधा आईच्या तगाद्यामुळे जात असावेत. नंतर त्यांनी ते बंद केलं.) अशा वेळी मी त्यांच्यासोबत कधी गेले तर माझ्याकडे पाहूनच लोक ओळखून विचारीत “दादाचा चेडू?”. एव्हढं दिसण्यातलं साम्य सोडलं तर दुसरं काही असल्यास मला वाटतं तेही इतरांनाच अधिक कळत असेल. पुढे आमच्या बँकेच्या खाजगीकरणाच्या विरोधातल्या सभेत मी भाषण केलं. ते आमच्या राघवन् साहेबांना आवडलं. ते ऐकत असतांना त्यांच्या शेजारी असलेल्या त्यांच्या मित्राने त्यांना म्हटलं, “अहो बरोबर आहे. ती कोणाची मुलगी आहे माहीत आहे का?” त्यांना अर्थातच ठाऊक नव्हतं. फार मोठे नसले तरी वडील कार्यकर्ते होते. लालबाग सारख्या कामगार भागात स्वस्त धान्य दुकान, मुख्य म्हणजे एक मोठं वाचनालय, मंत्रालयाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट सोसायटी इ. सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. साने गुरूजी कथामाला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयसारख्या साहित्याशी संबंधित व इतर अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे ते पदाधिकारी होते. अभ्युदयनगरातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना रहायला दिलेल्या जागा त्यांना मालकी तत्त्वावर मिळाव्या म्हणून त्यांनी फार दिवस लढा दिला. (त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार फार अल्प असत. त्यामुळे बचत करून घर घेण्याची त्यांची क्षमता नसे. माझा सुरूवातीचा पगार वडिलांच्या निवृत्तीच्या वेळच्या पगाराइतका होता यावरून कल्पना यावी.) मी शिकत असतांना सुरू झालेली लढाई आम्हा सर्व मुलींची लग्नं झाली तरी चालू होती. शेवटी १९८३ च्या आसपास कधीतरी दोन इमारती सरकारी कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर मिळाल्या. परंतु दरवेळी जागा खाली करायची नोटीस सर्वात आधी आमच्यावर बजावली जाई व सर्व सामान घराबाहेर काढल्यावर पोलीस ताबा घेणार अशा वेळी वडील स्टे ऑर्डर फडकावित येत व सर्व सामान पुन्हा घरात ठेवावे लागे.
वडिलांच्या लहानपणाविषयी दोनच गोष्टी त्यांच्याकडून ऐकून माहीत होत्या. एक म्हणजे त्यांनी मालवणात एका नाटकात स्त्रीभूमिका केली होती. दुसरे म्हणजे भुताखेतांवर विश्वास नसल्याने ती नाहीत हे सिद्ध करायला ते रात्री स्मशानात जात. घरी नसल्याचं घरच्यांना कळू नये म्हणून भावाच्या पायाला दोरी बांधून ती खाली सोडून मागच्या दाराने जात. परत आल्यावर दोरी ओढीत मग भाऊ त्यांना घरात घेई. आणखी एक गोष्ट म्हणजे आईवडिलांचा प्रेमविवाह होता व ते सायकलने मालवणातल्या रस्त्यावर आईची वाट अडवित असत.
त्यांचा आम्हाला धाक वाटे व ते आले की आम्ही घाईघाईने रेडियो बंद करीत असू. पण माझ्या बहिणीला विषमज्वर झाला व उलटला तेव्हा चव्वेचाळीस दिवस ते तिला मांडीवर घेऊन बसले होते. आईच्या बाळंतपणात आमची आजी म्हणजे आईची आई स्वैंपाक करी. ती फार सुरेख स्वयंपाक करी. पण सकाळची न्याहारी दुपारच्या जेवणाच्या वेळी व दुपारचे जेवण तीन वाजता या वेगाने होई. पण वडील आम्हाला सांगत की हे आईला सांगू नका. हा सगळा मालवणी माणसाच्या मायेचाच एक आविष्कार असे. ते एक तर बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांच्या बैठकांना जात व उशीरा घरी येत. त्यातून दहा जणांचं खटलं चालवायला महिन्याची दोन्ही टोकं जुळवायला काही कामं करीत त्यामुळेही त्यांना उशीर होई. आम्ही कुणी कितव्या इयत्तेत आहोत हे त्यांच्या लक्षात नसे. पण तरीही ते आपल्या परीने आईच्या आडून आमच्यावर लक्ष ठेवीत. विशेषत: आम्ही काय वाचतोय याकडे त्यांचं लक्ष असे. महादेवशास्त्री जोशांच्या संतकथा, सानेगुरूजींच्या गोष्टी, किशोर असंच वाचायला देत. आई जे वाचीत असे ते आमच्या हाती लागू दिलं जात नसे. चित्रपट पाहणं परवडत नसलं तरी जाण येईतोवर जेव्हा पाहायचा असेल तेव्हा हिरा मोती, छोटा जवान इ. दाखवले जात. (चंदरचे वडील मुंबईत असत नि आमच्या सासूबाई शिकलेल्या नव्हत्या. त्यामुळे पोरगं काही वाचतांना दिसलं तर “वा वा अब्यास करंतय” असं आमच्या सासूबाईंना वाटे. त्याचा फायदा घेऊन त्याने बरंच उभंआडवं वाचन केलं. म्हणून तो समक्षक झाला. वाचनसंस्कार व वाचनसंस्कृती हा मोठा विषय नंतर कधीतरी हाती घेऊ. असो.) घरात बरेच लोक येत जात. घर लहान असल्याने वडिलांचा व त्यांचा संवाद आपसूक कानावर पडे. त्यामुळे वाचनाला कदाचित मर्यादा असल्या तरी सामाजिक प्रश्नांची जाण येत गेली. मुलांशी मैत्री ठेवायची नाही किंवा अमक्यातमक्याशी बोलायचं नाही असं बंधन त्यांनी आमच्यावर कधी घातलं नाही. पण जे कुणी मित्रमैत्रिणी असत त्यांना घरी आणून ओळख करून द्यायला लागे. आईवडील त्यांच्याशी मोकळेपणाने वागत. त्यामुळे त्यांनाही छान वाटे. दुसरं म्हणजे घरात ठराविक वेळेपर्यंत यावं लागे. पण काही कारणाने उशीर होणार असेल तर कुठे जाणार, कधी येणार हे सर्व सांगावं लागे. ही शिस्त ते स्वत:ही पाळत. ही सवय माझ्यात अगदी मुरली आहे.
आमच्या लग्नाला त्यांचा तात्त्विक विरोध नसला तरी त्यांनी आमची जरा परीक्षा बघितलीच. नोंदणी पद्धतीने लग्न करायला त्यांचा प्रथम विरोध होता. पण लग्न झाल्यावर त्यांनी कबूल केलं की हे लग्न त्यांनी काहीही तणाव न घेता मागे बसून आनंद घेतलेलं घरातलं पहिलंच लग्न होतं. मग माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न नोंदणी पद्धतीने झालं. त्यांना चंदरचं फार कौतुक होतं नि त्याची भल्या सकाळी रेडियोवर होणारी पुस्तक परीक्षणं ते कौतुकाने ऐकत. आमच्या प्रसिद्ध झालेल्या लिखाणाची कात्रणं जपून ठेवीत.
शेवटच्या काळात माझा भाऊ आपल्या घरी त्यांना घेऊन जायचा धोशा लावत असला तरी ते हट्टाने आपण झगडून मिळवलेल्या घरातच राहिले. भाऊ आपला संसार बाजूला ठेवून त्यांना बरं नसतांना त्यांच्यासोबत राही. सून सगळं करी. आम्हीही धावत जात असू. पण शेजारीपाजारी व परिचितात त्यांची काळजी वाहणारेही बरेच असत. ते गेले तेव्हाही आपण अंगावर घेतलेली जबाबदारी पार पाडायचा त्यांचा हट्ट होताच. अशा हट्टी वडिलांची मी हट्टी मुलगी.
Top of Form