
आमच्या आईला वेगवेगळ्या प्रकारचे मुरांबे, सरबतं करायला आवडत. असंही मालवणी माणसाच्या घरात कोकमाचं सरबत तर असतंच नेहमी. घरचे रातांबे असले की रातांबे अर्धवट चिरून त्यात साखर भरून बरणीत भरून, त्याला दादरा म्हणजे स्वच्छ, मलमलची किंवा सुती कपडा घट्ट गुंडाळून ठेवून ते मुरत ठेवायचं. काही दिवसातच सुंदर लाल रंगाचं नितळ मिश्रण तयार होतं ते योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून त्यात चवीपुरतं मीठ, जिरेपूड घातली की छान सरबत तय्यार. पण आई सहसा लोक करीत नसत अशी सरबतं -जांभळाचं, आवळ्याचं, पिकलेल्या करवंदांचं अशी वेगवेगळी सरबतं करीत असे. मध्यंतरी मी एका नोंदीत वर्ध्याला दाते दांपत्याने आतिथ्यशीलतेने खिलवलेल्या पदार्थात आंबाडीच्या फुलांचं सरबत दाखवलं होतं तेही चविष्ट आणि सुंदर लाल रंगाचं होतं. आता या छायाचित्रात आर जे गौरी पितेय ते पाहून – विशेषतः तिचा चषक पाहून तुम्हाला काही भलत्या शंका यायच्या आधीच सांगते की हे आहे काजूच्या बोंडूचं सरबत. लहानपणी तुरट लागले तरी मीठ, तिखट पेरून काजूचे बोंडू – काजूची फळं- खायला आवडत. काही वर्षांपूर्वी कोकणात गेले होते तेव्हा माझी मोठी बहीण शुभलक्ष्मी सावंत हिने प्रेमाने काजूच्या बोंडूचं सरबत प्यायला तर दिलंच शिवाय ओवीसाठी एक बाटली भरून दिलं. आता ते मुंबईतही काही ठिकाणी मिळतं म्हणा. पण तुम्हाला घरी करायचं असल्यास खास बहिणीने दिलेली पाककृती खाली देत्येय.
काजूच्या बोंडूच्या सरबताची पाककृती
काजूचे बोंडू रात्रभर मीठाच्या पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी ते पाणी काढून टाकून बोंडूच्या फोडी एका डब्यात घालून (डब्यात पाणी न घालता) कुकरमध्ये ठेवून ( कुकरच्या तळाशी नेहमीप्रमाणे पाणी घालावं) एक शिट्टी काढावी. कुकरमधून काढून घेऊन थंड झाल्यावर बोंडूच्या फोडी मिक्सरमधून फिरवून घ्याव्या. त्याचा रस गाळून घ्यावा. एका भांड्यात रसाच्या दीडपट साखर व निम्मे पाणी घेऊन ते उकळून घ्यावे. हा पाक थंड झाल्यावर त्यात बोंडूचा गाळून घेतलेला रस घालावा. यात अन्य काही घालायची गरज नाही.