
ही आहे खारी भाजी. या भाजीत मीठाचा अंश असल्याने पानं खारट लागतात, म्हणून तिला खारी भाजी म्हणतात. तिचं मोरस भाजी असंही नाव आहे. गुजराती बायका जया पार्वतीचं व्रत आषाढात करतात. या व्रतात मीठ खायचं नसतं. त्यामुळे ही नैसर्गिक मीठ अंगचंच असलेली भाजी , दही, पीठात घालून त्याचे पोळे करून या बायका खातात. काही त्याचे गोटे करून तळूनही खातात. हे व्रत आषाढात असतं त्यामुळे या व्रताचे दहाबारा दिवस ही भाजी गुजराती लोकांची वस्ती असलेल्या पश्चिम उपनगरांमध्ये सर्रास मिळते. या भाजीची भजी करतात असंही मी टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या पुरवणीत वाचलं (पाककृती दिली नव्हती, पण आपण इतर कुठल्याही भाजीची भजी करतो तशी करता येतील).
आपल्याला काही व्रत करायचं नाही. त्यामुळे आपण हवं ते घालू शकतो. दोन वाटी पीठासाठी भाजीचा एक वाटा पुरेसा होतो. (ही भाजी वाट्यावर मिळते, जुडी किंवा वजनावर नाही.) आधी भाजी साफ करून घ्यावी, तिला माती लागलेली असते. ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि बारीक चिरून घ्यावी. मग ती थोडी कुस्करुन घ्यावी म्हणजे भाजीतलं मीठ पदार्थात मिसळायला मदत होते आणि ती थोडी मऊही पडते. मग दोन वाट्या गव्हाच्या पीठात प्रत्येकी दोन छोटे चमचे रवा आणि चण्याचं पीठ घालावं म्हणजे पोळे चिकट होणार नाहीत. मग त्या पीठात आवडीनुसार बारीक चिरलेली किंवा भरड वाटलेली हिरवी मिरची किंवा लाल तिखट, अर्धा चमचा हळदपूड, अर्धा इंच बारीक लांबट चिरलेलं आलं, आवडत असल्यास बारीक चिरलेला लसूण, अर्धा चमचा जिरं, दोन चिमटी हिंगपूड घालावी. मीठ भाजीत अंगचं असलं तरी पोळे करतांना ते अळणी लागतात म्हणून अर्धा चमचा मीठ घालावं. या मिश्रणात चिरून, कुस्करून ठेवलेली भाजी, अर्धी वाटी दही घालावं. मग पोळे काढायला सरसरीत पीठ लागेल त्याचा अंदाज घेऊन पाणी घालावं. तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल सोडून पोळे भाजून घ्यावे. आवडीप्रमाणे दही, लोणचं, टमाटूचा सॉस, हिरवी चटणी यापैकी कशाही सोबत हादडावे.
