अर्थहीन, ढोंगी वर्तमानावर कल्पित भविष्यकाळाच्या चष्म्यातून तिरकस भाष्य करणाऱ्या “कोसला”तल्या पांडुरंगापासून ते भूतकाळाचे उत्खनन करून हिंदू संस्कृतीच्या सगळ्या चांगल्यावाईट गोष्टींचा पसारा ही “जगण्याची समृद्ध अडगळ” आहे असं मानणाऱ्या ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ मधल्या खंडेरावापर्यंतचा प्रवास भालचंद्र नेमाडेंच्या कादंबऱ्यांच्या नायकाने केला आहे. ‘हिंदू’चे उरलेले भागही येऊ घातले आहेत. त्या निमित्ताने ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत आढळणाऱ्या, नेमाडेंनी ज्याची गेली काही दशके सतत पाठराखण केली त्या देशीवादाच्या सूत्रांचा आढावा व कादंबरीचे विश्लेषण हा या लेखाचा हेतू आहे. त्या दृष्टीने, वाचकांना कदाचित परिचित असला तरी सूत्ररूपाने देशीवाद म्हणजे काय हे सुरूवातीला मांडणे योग्य ठरेल.
नेमाडे यांनी देशीवादाची मांडणी करताना ज्यांची साक्ष काढली आहे त्या राल्फ लिंटन यांनी देशीवादाशी संबंधित विविध अर्थच्छटांच्या सर्वसाधारण विभाजकावर आधारलेली आणि समाधानकारक ठरू शकेल अशी देशीवादाची जी व्याख्या केली आहे ती अशी : “एखाद्या समाजातील सदस्यांनी त्यांच्या संस्कृतीच्या निवडक पैलूंचे पुनरूज्जीवन करण्याचा वा त्यांना चिरस्थायित्व देण्याचा जाणीवपूर्वक व संघटितपणे केलेला प्रयत्न” म्हणजे देशीवाद होय (राल्फ लिंटन, देशीवादी चळवळी, भाषांतरः शुभांगी थोरात, अनुष्टुभ्, मार्च-एप्रिल, १९९६, पृ. १५).
स्वतः नेमाडे यांनी मांडलेल्या देशीवादाचे स्वरूपही पहाण्याजोगे आहे. त्यातले पहिले तत्त्व हे की प्रत्येक समूहाची स्वतःची अशी देशी संस्कृती असते. दुसरे हे की ज्या गोष्टी समाजाची मूळ संरचना वाढविण्यासाठी आवश्यक असतात, अशाच परक्या गोष्टींना देशीपणात स्थान मिळते. आपली देशी संस्कृती छेदून त्या पलीकडच्या आंतरदेशीय महाव्यवस्थेत जाण्याची उलटी प्रक्रिया ही साहित्याची मूलभूत गरज नाही. त्यांच्या मते देशीपणाच्या संकल्पनेत स्थितिशीलत्व अबाधित राखणारी स्वाभाविक अवस्था हा अर्थ अभिप्रेत असतो. ही संकल्पना गुणात्मक नसून ते एक सामान्य आणि अपरिहार्य तत्त्व मानले पाहिजे. कारण देशीपणाचे तत्त्व विशिष्ट संस्कृतीने निर्मिलेल्या बऱ्यावाईट, लहानमोठया सर्व प्रकारच्या कृतिंमध्ये प्रगट झालेले दिसते. शेवटी देशी असणे म्हणजे एकंदर भूमितत्त्वाचे भान, त्यातील सर्व जाती, वंशांचे समूह, संप्रदाय, धर्म, परंपरा, स्थलकालाचे उभेआडवे छेद या सर्वांसकट येणारे एकजिनसीपणाचे भान होय. देशीपणाच्या स्वयंपूर्णतेचे देशीवाद हे बाह्यवर्ती रूप आहे (भालचंद्र नेमाडे, टीकास्वयंवर, १९९०, पृ ७८-९२).
आता प्रथम “हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ” या कादंबरीचे कथासूत्र आणि इतर बाबी पाहू. सिंधू नदीच्या तीरावर आपल्या चमूसह उत्खनन करणारा पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यासक खंडेराव विठ्ठल. वडील मृत्यूशय्येवर असल्याची तार मिळाल्याने आपलं काम तसंच टाकून त्याला आपल्या गावी मोरगावला जावं लागतं. मोरगावला जायच्या आधीही त्याच्या मनात दरक्षणी मोरगाव आहेच. तिथल्या एका बलुची मजुरणीचं एक वर्षाचं लहान मूल मरतं, तेव्हा ती म्हणते, “कुदरतचा होता. कुदरतला सुपूर्दगी केली” मोरगावची एक बाईही असंच म्हणाली होती याची खंडेरावला आठवण येते. असं मोरगाव त्याच्या आत वसलेलं आहे. प्रवासात तो त्या आत वसलेल्या मोरगावाचं मनातल्या मनात उत्खनन करीत रहातो. त्याचं लहानपण, घरच्यांच्या विरोधात बंड करीत त्यांना निरर्थक वाटणारं शिक्षण घेतांनाचं आयुष्य असं सगळं आत्मचरित्र त्याच्या नजरेसमोर येत रहातं. घरी पोचल्यावर वडील त्याच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतात. आता वडीलांनी मागे सोडलेल्या त्यांच्या, आत्यांच्या, चुलत्यांच्या, भावाच्या मालमत्तेचा वारस- “केवळ वंशवृक्षपारंबी मी” असा तो उरला आहे. आता खंडेराव पर्यायांच्या शोधात आहे. पण तो त्याच्या हाती आहे का आणि नसल्यास का नाही.
हा नायक पुरातत्वशास्त्रात पीएचडी करणारा संशोधक असल्याने विद्वानच. शिवाय कुठल्याही काळात भ्रमण करू शकणारा असा सोयीचा आहे. तो हडप्पासंस्कृतीच्या काळाचं दर्शन आपल्या स्वप्नातून घडवू शकतो. मध्ययुगातही जाऊ शकतो आणि आधुनिक काळातला तर तो आहेच.
तसंच मोरगावही. बाहेरून आलेले सगळे गावाच्या समाजात वेगवेगळ्या प्रकारे सामावून जातात. रोटीबेटी व्यवहारात अंतर राखून, विरोध बाळगूनही सर्व प्रकारचे संबंध प्रेमाने जोपासून आपापलं अस्तित्व सांभाळून अठरापगड जाती पिढ्यान् पिढ्या एकोप्याने आणि ‘डौलाने’ रहातात. “लोकांचे स्मरण ज्या कोणत्या युगापर्यंत मागे जाई, तेव्हापासून एकमेकांचं अगत्य पडून ब्राह्मण, कुणबी, वाणी, अलुतेबलुते, फिरते, परदेशी – सगळे एकजीव झालेले होते.” (पृ.क्र.११०). खरं संरक्षण गावगाड्यातल्या सगळ्या प्रकारच्या जाती-जमातींच्या राहण्याच्या व्यूहामुळंच. गावाबाहेरचा महारवाडा, मांगवाडा आणि चांभारवाडा या वस्त्या म्हणजे जणू गावाच्या रक्षणासाठी जिवंत खंदकच. कंजारभाट, पारधी, डोंबारी इ.ना तर खास गावाबाहेरच्या मैदानात उघड्यावर राहण्याचा ‘खास दर्जा’ होता. असं हे मोरगाव म्हणजे जणू हजारो वर्षांची हिंदू संस्कृतीच.
विद्वान नायकाच्या आणि इतर पात्रांच्या द्वारे कादंबरीच्या निवेदकाने वेगवेगळ्या जातीजमातीधर्माच्या, वंशाच्या लोकांच्या रितीभाती, गाणीबजावणी, रूढीपरंपरा, सणवार, म्हणी वाक्प्रचार, कथा दंतकथा, विश्वास अंधविश्वास, अंतर्गत आणि बाह्य जगाशी सत्तासंघर्ष असा ‘हिंदू संस्कृती’चा एक बारीकसारीक तपशिलांनी गच्च भरलेला असा विशाल पट उभा केला आहे. वर दाखवलेल्या कथासूत्रासाठी हा पट फार प्रमाणाबाहेर मोठा आहे. तो अनेक किस्से, कहाण्यांनी भरलेला आहे. लेखकाचे भाषेवरचे प्रभुत्व आणि गोष्टी सांगण्याचे कौशल्य यामुळे वाचक भारावून जाऊन त्यात रंगून जात असला तरी त्यांचं कथानकात प्रयोजन काय हा प्रश्न उभा रहातोच. त्या सगळ्यांतून नायकाला एका विशिष्ट निर्णयापर्यंत आणलं जातं आहे. त्या सगळ्या कथनांसोबत काही मांडलं जातं आहे. ते काय आहे?
या सगळ्या कथनातला घटनाक्रम एका घटनेतून दुसरी- दुसरीतून तिसरी अशा क्रमाने नेत नाही. विस्कळीत स्वप्नासारख्या घटना. त्यातून नायकाची विस्कळीत मनस्थिती दिसेल, पण घटनाक्रमाला पुढे नेणारं काही येत नाही. कादंबरीच्या सुरूवातीला खंडेरावने स्वप्नात सादर केलेल्या शोधनिबंधासारखे घटनांचे अर्थही त्याला वाटतील तसे आहेत. उदाहरणार्थ त्याची युरोपियन सहकारी मंडी ही किती आत्मनिर्भर, नवऱ्याला सोडून दिलेली इ. सांगतांना लैंगिकदृष्ट्या या बायका लहानपणापासूनच ‘मोकाट’ असल्याने पुढे भीड रहात नाही, व्यभिचाराची शक्यताही यात गृहीत धरलेली असते, हा शोध खंडेरावाला कसा काय लागतो हे उकलत नाही. (गाडीत दिसलेली नटवी तरूणी स्त्रीमुक्तीशी संबंधित असावी असंही त्याला वाटतं). किंवा सततच्या दुष्काळांमुळे ह्या उपखंडाखालच्या भूगर्भातला पाण्याचा साठोवा आटत गेला. शूद्रही वाढले. दहाव्या अकराव्या शतकापासून अस्पृश्यता संस्था म्हणून पक्की झाली असं खंडेराव/निवेदक कोणत्या संशोधनाच्या बळावर म्हणतो हे कळत नाही.
नायक आणि निवेदक हे खरे तर तसे एकच आहेत. कादंबरी सतत वर्तमानकाळ आणि भूतकाळात खेळत रहाते. त्या दृष्टीने हा तृतीयपुरूषी भासणारा निवेदक सोयीचा आहे. कारण इथे नायक लेखकाच्या आधीच्या नायकांसारखा व्यवस्थेला, परंपरेलाच काय पण एकूणच अस्तित्वाला नकार देणारा नसून जी परंपरा, जी व्यवस्था त्यांनी नाकारली तिलाच शरण जायच्या विचारात आहे. त्यासाठी कित्येक वर्षांपासून परंपरेने जे चालत आलं आहे त्याची उदात्तता प्रस्थापित करायची आहे. मग पुन्हा वर्तमानात यायचं आहे. पहिल्या भागात संशोधन करतांनाचे अनुभव मांडतांना खंडेरावाच्या स्वप्नातून प्राचीन संस्कृती, मग पुन्हा वर्तमानातले तपशील, पुन्हा अली या सहकाऱ्याबरोबर जातांना मधून मधून झोपेत लहानपणापासूनचे आयुष्य, मधूनच जागे होत आजूबाजूचे वास्तव अशा रितीने पहिल्या भागाच्या शेवटी खंडेरावाच्या समोरचे महत्त्वाचे नैतिक द्वंद्व मांडले जाते. त्यानंतर निवेदकाच्या तोंडून दुसऱ्या भागात ऐतिहासिक काळातील मोरगावच्या निमित्ताने पेंढाऱ्यांची लूटालूट, होळकर, पेशवे, सातपुड्यातील भिल्ल, कोरकू, मग इंग्रज अंमल,स्वातंत्र्याचा संग्राम (त्यात खंडूचा हुनाकाका शहीद झालेला), त्यानंतर एकदम सात पिढ्या ओलांडून नजीकच्या भूतकाळातल्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या खेड्यातला कुणब्याचा – म्हणजे खरं तर सधन शेतकऱ्याचा बारदाना, त्याच्या ‘जीवावर’ जगणारे अलुतेबलुते, कुटुंबव्यवस्थेच्या आधाराने जगणाऱ्या सोनावहिनीसारख्या राबराब राबणाऱ्या, ‘नवरा तो नवरा, घर ते घर’ असं मानणाऱ्या बायका, दुष्काळ, रेशनचं धान्य असं सगळं दाखवून झाल्यावर हा भाग संपतो. मग तिथून खंडेरावाच्या शैक्षणिक आयुष्याचा तपशील येतो. त्यात बडोद्याच्या ओरिएंटल इनस्टिट्यूटमध्ये खंडेराव शिकायला आल्यावर भूतकाळात जाण्यासाठी योगायोगाने दूरचे नातलग निघालेल्या धनजीभाईंच्या म्हाताऱ्या आईचे निमित्त होते आणि आजोबांनी बांधलेल्या जुन्या वाड्याच्या मिषाने खंडेरावाच्या द्वंद्वात पारडं कुठे झुकणार याचे संकेत मिळत जातात. इथं खंडू म्हणतो, “तुम्ही कितीही नवं व्हायचा प्रयत्न केला, तरी आधीचं सगळं संपूर्ण नष्ट करता येत नाही. ते नाहीसं होत नाही. आमच्या आत्ताच्या वाड्यात भिंती नव्या विटांच्या झाल्या, पण जुन्या पद्धतीची चोरकपाटं, भंडाऱ्या, त्यांच्यात चोरकप्पे..हे सगळं आहेच.” (पृष्ठ २७३) यातच पुढे सेप्टिक संडास आधुनिक करायला लागल्यापासून डास यायला लागले हे सांगत खंडू स्वतःला सांगतो, “मॉडर्न या शब्दाचा अर्थ भावडूनं मला सांगितला होता : कुरूप. आणि खंडू, अल्ट्रामॉडर्न इतकं कुरूप काही नाही.”(पृष्ठ २७५) इथून पुढे ज्या वडिलांना विरोध केला त्यांची समर्थ कुटुंबप्रमुख म्हणून प्रतिमा उभी करण्यात आली आहे. पुन्हा वर्तमानकाळात येण्यासाठी निवेदक “खंडेराव तुझं सगळं निराशाजन्य चाललेलं आहे. आठवणीसुद्धा निरूत्साही..काहीतरी जीवनसन्मुख वाटेल असं आयुष्यात घडलेलं आठव.” असं म्हणतो आणि मग खंडेराव लगेच सुखाने आपल्या लैंगिक अनुभवांच्या आठवणीत शिरतो. रेनी आणि तिच्या प्रेमात पडलेला खंडू, धनगरांच्या संस्कृतीचं चित्रण, धनगर-कुणबी संबंध, गेलेली भावाची बायको ओढून आणण्याचं शास्त्र. यासोबत शैक्षणिक आयुष्य. दुसरीकडे शेतीचे धडे. गावातली आणि कुटुंबातली संस्कृती आणि ज्ञानार्जनाची ओढ यातली ओढाताण, शिक्षणासाठी घर सोडणं. पाचव्या भागात उच्च शिक्षणाचं क्षेत्र, नामांतराची चळवळ, तिथले अनुभव, युनेस्कोच्या स्कॉलरशिपसाठी अर्ज. पाकिस्तानात संशोधनासाठी जाणं. म्हणजे कथन आता जिथे सुरू झालं त्या वर्तमानात येतं. मग पहिल्या भागात जिथे कथकाने कथन खंडित केलं आहे तिथे सहावा आणि शेवटचा भाग सुरू होतो. तो खंडेरावाच्या वडीलांच्या मृत्यूसंबंधातली धार्मिक कार्य, नातेवाईकांचा खंडूवर या सगळ्या कुटुंबाचा, मालमत्तेचा ताबा घेऊन तिची काळजी घेण्यासाठी, लग्न करून पुढे वंश वाढवण्यासाठी वाढत जाणारा दबाव, खंडूच्या विचित्र वागण्याने सैरभैर झालेल्या घरातल्या बायका आणि शेवटी मजुरांच्या हातून घडलेल्या पूजेच्या वेळी झोपलेला खंडू आणि पुन्हा त्याचं ते सुप्रसिद्ध आणि सोयीचं स्वप्न. त्याच्या स्वप्नातल्या पूजेतलं वंशसातत्याचं सूचन. मोहनजोदाडो ते मोरगाव तीन दिवसांचा प्रवास. या प्रवासात ही सगळी (इथे जागेअभावी न मांडता आलेली) कित्येक छोटी छोटी कथनं आक्रमण करीत रहातात. ती घटनाक्रमाशी थेट संबंधित नसली तरी कादंबरीच्या संहितेला एका विशिष्ट दिशेने नेत रहातात. कथकाच्या या गोष्टींचं वाचकांवर गारूड होतं. या मोहजालात वाचकाला गुंगवून ठेवत कथक त्यांना संस्कृतीच्या गल्लीबोळांच्या भूलभुलैय्यातून सोबत नेत जातो. नायकाच्या नव्हे तर इतर पात्रांच्या परिप्रेक्ष्यातून होणारं परंपरेमधल्या बऱ्यावाईट गोष्टींसकटचं श्रेष्ठत्व पुन्हा पुन्हा ठसवलं जातं.
हिंदू संस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडीत अशी ही कथनं कथानकात आणून वर तिसऱ्या परिच्छेदात मांडलेली देशीवादाची सूत्रं कथारूपाने कादंबरीत मांडली गेली आहेत हे लक्षात येतं. कादंबरीचा नायक हा सधन शेतकरी कुटुंबातला आहे. त्याच्या मिषाने सधन शेतकरी कुटुंब, त्याच्यावर अवलंबून असलेला गावगाडा, पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत स्त्रियांना मिळणारे संरक्षण या साऱ्याचे उदात्तीकरण करीत या सगळ्यांमधले शोषणाचे संबंध जरी काही ठिकाणी उघड होत असले तरी त्यासकट ते सगळं कसं चांगले आहे यावर भर दिला जातो आहे. हे सगळं इथलं आहे आणि इथलं आहे म्हणून चांगलं आहे, यावर भर दिला जातो आहे. त्यामुळे आर्य मूळचे पंजाब-हिमाचल-हरयाणामधले आणि इथूनच ते अफगाणिस्तान, उझबेकिस्तानातून युरोपभर पसरले. वंशश्रेष्ठत्वाच्या गंडातून आर्य बाहेरून आल्याचं युरोपीयन विद्वानांनी रूढ केलं आणि हिंदुस्थानातल्या विद्वानांकडे त्यांच्याइतकं पैशाचं पाठबळ नसल्याने ते या गोष्टी ठासून सांगत नाहीत असं यातले विद्वान मांडतांना दिसतात. हजारो वर्षांची इथली कृषिसंस्कृती कशी चांगली आणि आधुनिकीकरण कसं वाईट हे सांगितलं जातंय. कथक (म्हणजे खरं तर खंडूच) खंडेरावाला सांगतो, “खंडेराव, तुझा वारसा केवळ तुझं घरदार जमीनजुमला शेतं शिवारं एवढाच नाही. गेल्या दहा हजार वर्षांपासूच्या कृषिसंस्कृतीचा हा सतत तुझ्यापर्यंत झिरपत आलेला वारसा आहे. तो तुला असा पालीच्या शेपटासारखा खटकन तोडून पुढे जाता येणार नाही…..सगळे रस्ते आपले पाय गिळण्याची वाट पहात असतात – पण तुला वाचवेल तुझी स्वतःची पायवाट. ती तुला कधी सोडून जाणार नाही. कारण तूच ती तयार करतोस. तीच घे. जहाजावरून सोडलेला कावळा जसा परत जहाजावर येतो, जशी वादळी पावसात मुंगी आपल्या पूर्वजांच्या वारूळाकडे लगबगीनं धावत येते.” (पृष्ठ ९४) असं हे पूर्वापार चालत आलेल्या कृषिसंस्कृतीकडे, गावगाड्याकडे परतून येण्याचं आवाहन आहे. या गावगाड्याला “खरं संरक्षण गावगाड्यातल्या सगळ्या प्रकारच्या जाती-जमातींच्या राहण्याच्या व्यूहामुळेच मिळालेलं होतं” (पृष्ठ १०५) अशी त्या गावगाड्याच्या रचनेची भलामण आहे. सधन शेतकरी हा कसा या गावगाड्याचा कणा आहे आणि त्याच्या जीवावर कसं सगळ्या गावाचं, बलुत्यांचं, मजुरांचं, गायी बैल म्हशींचं आणि रानात चोरचिलटे, माकडं, हरणं, पाखरं, किडामुंगी, उंदरासकट सगळ्या प्राण्यांचं पोट भरतं हे सांगितलं जातं आहे. बायकांच्या आयुष्यातलं मुलं जन्माला घालणं, त्यांचं संगोपन करणं याचं गावगाड्यात लहानपणापासून मिळणारं शिक्षण कसं मोलाचं होतं आणि बायका हे करीत आल्याने समाज कसा मजबूत राहिला हे ठासून सांगितलं जातं आहे. “बाकी मुलांना जन्म देणं, संगोपन ही त्याहीपेक्षा पक्की भूमिका आपोआपच वयात येईपर्यंत तयार झालेली असे. हे सगळं नीट कळायच्या आधीच बायकांच्या पदरात पडत असल्यानं समाजाची ही स्थिर बाजू कधीच ढासळली नाही.” असं हिंदू संस्कृतीतल्या बायकांच्या शोषणाचं उदात्तीकरण केलं जातं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यातली उत्तान वर्णनं किंवा संभाषणं ही गावकुसाबाहेरील बायकांच्या बाबतीतली आहेत. ‘गरत्या’ बायांचं श्रेष्ठत्वही यातून ठसवलं जातं आहे. अशाच गावकुसाबाहेरच्या बायकांपैकी एक असलेल्या हरखूशी आपण बंड म्हणून लग्न केलं असतं तर वडीलांनी बंडासकट आपल्याला चिरडून काढलं असतं अशा जाणीवेनं नायक असं बंड कधी करतांना दिसत नाही. गावकुसाबाहेरील विश्वाबाबतही “धंद्यानुसार खालच्या वरच्या जाती मोहेनजो-दडो पासूनच होत्या…खाऊ द्या कितीक खातील? चोरून लपूनच खातात ना ? एरवी आपल्या टाचेखालीच आहेत ना? महार मांग चांभार – सगळा गाव बिचारे सांभाळतात. अरे, शहरात एक वॉचमन लावला, तर किती पगार द्यावा लागतो? मग हे वाडवडीलांनी लावून दिलं आहे, ते निदान आहे तसं तं चालू ठेवा? चोऱ्या करो, लबाड्या करो, शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना?” असा वाडवडीलांनी घालून दिलेल्या वाटेवर चालण्याचा आग्रह आहे. कानाकोपऱ्यात मिलिटरीसारखे ब्राह्मण जाऊन राहिल्यानं हिंदूधर्म कसा खेडोपाडी जाऊन रूजला आणि बौद्धधर्म कसा शहरी असल्यानं कसा शहरीच राहिला आणि संपला यावर खंडूला प्रबंध लिहायचा आहे. लग्नाच्या जोडीदाराच्या निवडीचं थोतांड किती मर्यादेपर्यंत न्यायचं? डेटिंग करून करून नंतर निम्म्या लोकांनी घटस्फोट घ्यायचे त्यापेक्षा अंतर्पाट फिटपर्यंत एकमेकांना पाहिलेलं नसतं त्यांचे संसार सुखाचे झाले नाहीत? लग्नानंतर प्रेम करता येतं की, असं खंडेरावला वाटतं. खंडेरावाची ही मतं एकाएकी तयार झालेली नाहीत. त्यासाठी त्याचा भूतकाळ काळजीपूर्वक उभा केला गेला आहे. एक विशिष्ट संस्कृती या मातीतली आणि म्हणूनच तिच्यातल्या भल्याबुऱ्या गोष्टींसह चांगली आहे आणि ती टिकली पाहिजे, पुन्हा उभी राहिली पाहिजे आणि वाढली पाहिजे कारण तसं होण्यातच सर्वांचं भलं आहे आणि त्यासाठीच कथक म्हणतो आहे “खंडेराव फक्त गोष्ट सांगत जा राव”. कारण गोष्ट सर्वांनाच एक प्रकारची भूल घालते. ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’मध्ये ही भूल देशीवादाच्या आशयसूत्रांची आहे.
————————————————
लेख चांगला आहे. मात्र भली मोठी लांबलचक वाक्ये लिहिण्याची शैलीमुळे आशय क्लम्झी होऊन जातो. पहिलंच वाक्य सात ओळींचं आणि ४१ शब्दांचं आहे. अशी वाक्ये या माध्यमामध्ये बसत नाहीत.
LikeLike
तुमचं म्हणणं बरोबर आहे. हे चंदरनेही मला सांगितल्यामुळे आता मी बऱ्यापैकी सुधारणा केलीय. हा लेख जुना आहे आणि तो या माध्यमासाठी लिहिला नव्हता. प्रेरक ललकारीच्या अंकाला पन्नास वर्षं पूर्ण झाल्यामुळे गेल्या आठ मार्चला त्यांनी विशेषांक काढला होता, त्यासाठी त्यांनी हा लेख लिहून घेतला होता. सर्व लिखाण एकत्र असावं म्हणून तो इथे टाकलाय
LikeLike
तुमची शैली उलट मला जास्त भावली…😊😊
बाकी लेख सुंदरच झाला आहे!!
LikeLike
धन्यवाद राहुल. हा लेख आपल्या वॉट्स अॅप गटावर टाकला होता दीड वर्षापूर्वी. तुम्ही कदाचित कामात असल्याने वाचला नसेल
LikeLike
फारच मस्त लेख. अगदी मार्मिक निरीक्षणे. मी हिंदू आत्ता निम्मी वाचली आणि मनात हेच उमटत राहील.. अजून एक म्हणजे त्यात सगळे शहरी जीवनाचे आणि modernity चेफायदे घेऊन पुन्हा एक चलाख whining आहे
LikeLike
आभारी आहे
LikeLike