
आमच्या लहानपणी माझी रांगोळीबाबतची पहिली आठवण माझी सर्वात मोठी बहीण शुभलक्ष्मी सावंत (रत्नप्रभा चव्हाण) हिच्यासंदर्भातली. लालबागला आम्ही ज्या चाळीत राहत असू तिथे रांगोळीची स्पर्धा होती. मी त्यावेळी अंदाजे सहा वर्षांची असेन. आमचे एक चुलतचुलते स्मृतीशेष मनोहर चव्हाण हे मूर्तीकार होते. गणेशोत्सवातल्या मोठ्या गणेशमूर्ती करीत आणि रांगोळ्याही काढत. त्या काळात गणेशोत्सवात अशा मूर्तीकारांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनांनाही बरीच गर्दी होत असे. सहसा महान पुरुषांची व्यक्तीचित्रं रेखाटली जात किंवा त्याकाळात युद्धाचं वातावरण असल्याने सीमेवरच्या लढाईचंही चित्र रेखाटलं जाई. अजूनही अशा प्रकारची रंगावली प्रदर्शनं वेळोवेळी आयोजित केली जातात.

त्यापूर्वी मी आजूबाजूच्या बायका ठिपक्यांची रांगोळी काढीत ती पाहिलेली होती. त्यातली भौमितिक आकारांतून साकारलेली शुभचिन्हं, रंगसंगती नेहमीच आकर्षक वाटे. पण या स्पर्धेच्या वेळी बहिणीने मनोहरकाकांनी शिकवलेली रांगोळी काढली होती. ते एक निसर्गदृश्य होतं. मला अजूनही ती रांगोळी आठवते – रांगोळीतला डोंगर, नदी, नदीवरचा पूल हे सगळं आठवतं. माझ्यासाठी रांगोळीतून असं काही निर्माण होऊ शकतं ही एक अद्भुत गोष्ट होती. ती रांगोळी काढायचं तंत्रही वेगळं होतं. त्यात चित्रातल्यासारख्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा निर्माण करता येत होत्या. नंतर माझ्या बहिणींपैकी वनिता साटम (शैलजा) हिनेही ते तंत्र आत्मसात केलं. तिने एकदा काळ्या काठाच्या कलकत्ता साडीतल्या जया भादुडीचं चित्र रांगोळीतून रेखाटलं होतं, ते अजूनही आठवतं. या दोन्ही वडील बहिणींकडून मीही हे सगळं शिकून घेतलं. पुढे कित्येक वर्षं दिवाळीतले चार दिवस रांगोळ्या काढण्यात अत्यंत आनंदात घालवले.

सुरुवातीला आम्ही जुन्या सुती साडीचे छोटे तुकडे करून त्यातून रंग गाळून घेत असू. सहसा दृश्यात एकादी व्यक्ती चितारायची असेल तर कार्डबोर्डवर बाह्याकृती काढून ती कापून तिथे ठेवून मग आजूबाजूचं रंगलेपन केलं जाई. कारण रंग गाळतांना वाऱ्यामुळे तिथे रंग पसरण्याचा धोका असे. सहसा डोळे, ओठ, भुवया हे हातानेच रेखाटले जात असले तरी काही लोक जुन्या बॉलपेनची रिफिल काढून त्यात रंग भरून दाढीचे केस, भुवया रेखाटत असत असंही ऐकलं होतं. रांगोळीत काही मजकुर टाकायचा असेल तर कागदावर प्रथम तो हवा त्या आकारात, ठशात काढून घेऊन पेटत्या उदबत्तीने तो ठसा जाळून मग रांगोळीवर अलगद ठेवून त्यात हवा तो रंग भरला जाई. काळ जात चालला तसतशी नवनवी तंत्र आली तरी हाताने रेखाटणं चालूच राहिलं. सुती कपड्याने रंग गाळण्याऐवजी तोंडावर जाळीचं झाकण असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यातून आता हाताला रंगही न लागू देता सहज रंग भरता येतो. ठिपक्यांच्या रांगोळीला पर्याय म्हणून चाळणीसदृश उपकरणाचा वापर करून सहज पाच मिनिटांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढता येतात. चमचा, काड्या, बांगडी, वाटी अशा विविध उपकरणांचा वापर करुन रांगोळीत वेगवेगळे आकार कसे निर्माण करता येतील या विषयीच्या व्हिडीयोंची यूट्यूबवर भरमार आहे. परंतु या प्रकारच्या रांगोळ्या अजूनही नवं काही करु शकण्याचा अनुभव देतात. कारण तंत्र कितीही पुढे गेलं तरी अशा प्रकारच्या रांगोळ्यामध्ये तुमची कलात्मकता अधिक बहराला येते.

तसं तर रांगोळी तांदळाची ओली पिठी, कोरडं पीठ, डाळी, धान्य, फुलं, पानं, वाळू अशी वेगवेगळी माध्यमं वापरुन काढता येते. काही लोक परातीत किंवा घंगाळात पाण्यावर तेल, कोळशाची पूड घालून तरंगती रांगोळीही फार सुंदर काढतात. त्या सर्व प्रकारात तुम्हाला नवंनवं काही करताच येतं तरीही मी हाताळते तो प्रकार अधिक मुक्त आहे असं वाटतं.
