
आपली ओली शेवही मला आवडते तसेच दाक्षिणात्य इडीअप्पम्. तरुणपणात मालती कारवारकरांची भक्त असलेल्या आईकडून शिकले होते की धान्य आणि प्रथिनाचा स्त्रोत आणि भाज्या या सर्वांचा वाटा ज्या पदार्थात असतो तो आरोग्याला अधिक उत्तम. शिवाय तेल, तूपावर हात थोडा कमीच असलेला बरा. त्यामुळे दोनएक वर्षांपूर्वी चण्याच्या डाळीच्या पीठापासून केली जाणारी ओली शेव आणि कोकणात तसंच दक्षिणेकडील राज्यात लोकप्रिय असलेल्या तांदळाच्या शेवया यांचं मिश्रण असलेला हा नवीन पदार्थ केला. ज्यांना तांदूळ वर्ज्य असतील ते यात तांदळाऐवजी नाचणी, बाजरी वापरु शकतील.
ओल्या शेवेचं पीठ करतांना प्रथम पाणी उकळत ठेवावं. त्यात उकड काढतांना जसं आपण थोडं तेल घालतो तसं घालावं. परातीत बेसन (चणाडाळपीठ) घेऊन त्यात हळदपूड, लाल तिखट, मीठ, धणेजिरेपूड, लिंबाचा रस किंवा फेटलेलं दही घालून मिश्रण नीट एकत्र करावं. मी थोडी हिंगाची पूडही घातली. मग गरम पाणी थोडं थोडं करत घालून थोडं सैलसर पीठ मळून तो गोळा बाजूला ठेवावा. (जेव्हा ओली शेवच करायची असते तेव्हा हा गोळा शेवेच्या साच्यात घालून, शेव पाडली जाते आणि तिच्यावर राई, हिंग, जिरे, कढीपत्ता यांची फोडणी घालून खवलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरुन वाढलं जातं.)
मग एका परातीत तांदळाचं किंवा नाचणीचं पीठ घेऊन त्यात चवीपुरतं मीठ घालून उकळलेलं (किंचित तेल घातलेलं) पाणी थोडं थोडं घालून काट्याच्या सहाय्याने मिश्रण एकत्र करावं, मग ते किंचित तेलाचा हात लावून मळून घ्यावं.

इडलीपात्रात पाणी घेऊन त्यात इडलीचा साचा प्रत्येक खळग्याला किचिंत तेलाचं बोट लावून तयार ठेवावा. मग प्रथम तांदळाचं किंवा नाचणीचं उकड काढलेलं पीठ शेवेच्या साच्याला आतून थोडं तेल लावून भरावं, त्याची शेव इडलीच्या साच्यात प्रत्येक खळग्यात घालून घ्यावी. मग आपल्या आवडीचं सारण घालून घ्यावं. मी दोन प्रकारची सारणं वापरली -एक कोथिंबीरीच्या हिरव्या चटणीचं, ज्यात पालक वाटून घालता येईल- दुसरं माझ्या लेकीने बंगळुरुहून आणलेल्या कडले बेलेचं (ही एक प्रकारची चटणी असते जिच्यात चणाडाळ, उडीदडाळ, कढीपत्ता, खोबरं हे सर्व भाजून घेऊन हळदपूड, मिरच्या, मीठ या सगळ्या मिश्रणाची पूड असते). ज्यांना गोड आवडतं ते मोदकाचं किंवा इतर कुठलंही गोड सारण घालू शकतात. मग वरुन बेसनाची उकड शेवेच्या पात्रात घालून तिचा एक थर द्यायचा. शेवेच्या साच्यात दोन्ही उकडी थोड्या थोड्या घालूनही हा पदार्थ करता येतो. साच्यात थोडं पीठ उरलं तर त्याच्या हाताने थापून दोन पुऱ्या करुन मध्ये सारण भरुन त्याच्या कडा बंद कराव्या म्हणजे उरलेलं पीठ आणि सारण वाया न जाता त्याची भरलेली निवगरी करता येईल. हे सर्व इडलीपात्रात ठेवून पंधरा ते वीस मिनिटं वाफ काढावी. बाहेर काढल्यावर आवडीप्रमाणे वरुन फोडणी देऊन किंवा तूप घालून,खोबरं कोथिंबीर पेरून वाढावी. शक्यतो गरमागरम खावी. आधीच करून ठेवलेली खायची झाल्यास ओल्या नारळाचं दूध वापरून केलेला कुठलाही रस्सा वरून ओतून खावी.