सहोदर

काही वेळा आपण दुसऱ्यांकडे पाहून अंदाज बांधत असतो. जसं की ही घरेलू दिसणारी बाई बहुधा भाजी घ्यायला चाललीय, ही कोपऱ्यातली बाई बहुधा सरकारी कार्यालयात कारकून असावी. ती कलकत्ता साडी नेसलेली, भांगात सिंदूर भरलेली बाई बहुधा बंगाली शिक्षिका असावी, ती खिडकीजवळ बसलेली जयपुरी प्रिंटचा सलवार कमीझ घातलेली, गोरीपान, सुखवस्तू दिसणारी मुलगी बहुधा पार्ल्याला उतरणार (क्लेम लावायला हवा जागेसाठी) इ.इ. कधी ते थोडेफार बरोबर निघतात तर कधी सपशेल फसगत होते.

एकदा माझंही असंच झालं. तेव्हा मी बँकेच्या ग्रंथसंग्रहालयात काम करीत होते. आमचे बरेचसे वरिष्ठ नवनवीन पुस्तकं, लेख वाचून स्वतःचं आमच्या क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत ठेवीत. त्यात काही अर्थतज्ज्ञही असत आमच्या डॉ.माधव दातारांसारखे. त्यांना संदर्भ शोधून देण्याचं काम आम्ही आनंदाने करीत असू. एकदा असाच एक सावळा, उंच, देखणा, कुरळ्या केसांचा तरूण काही संदर्भ शोधत होता. त्याला ते मिळाले नाहीत. तो गेल्यावर काही मिनिटातच मला त्याला हव्या असलेल्या विषयाच्या संदर्भात काही सापडलं. पण मी काही त्याला ओळखत नव्हते. तेव्हा मी माझ्या सहकारी मैत्रिणीला बेला लाहिरी चौधरीला म्हटलं, “अगं, तो मघा इथं एक बंगाली मुलगा उभा होता ना, त्याचं नाव आणि इंटरकॉम नंबर सांग ना, त्याला हवा असलेला एक लेख सापडलाय मला.” तर ती हसून म्हणाली, “अगं तो ना, तो बंगाली नाहीय जन्मानं. त्याचं नाव राघवन पुत्रन्. तमिळीयन आहे.”  “पण त्याचे उच्चार, बोलण्याची पद्धत, हातवारे यावरून तर मला तो बंगाली वाटला.” तर ती म्हणाली, “नाही, तुझं बरोबर आहे तसं. तो खरं तर अर्धा काय पुरा बंगालीच आहे. Born and brought up in Kolkata. त्याचं लग्नही बंगाली मुलीशी झालंय.”

मला एकदम प्रा.सुहास गोळे यांच्या मेहुण्याबद्दल चंदर सांगायचा ते आठवलं. प्रा.गोळ्यांनी एका चिनी महिलेशी लग्न केलं होतं. पण ते कुटुंब वाढलं होतं कोल्हापुरात. त्यामुळे त्यांचा चिनी मेहुणा अस्सल कोल्हापुरकरांसारखे कपडे घालून वावरत असे आणि कोल्हापुरात बोलतात तसं, “आमचं दाजी काय करायल्यात काय माहीत” असं बोलायचा म्हणे.

असाच आमचा एक मेनन नावाचा मित्र. वाढला डोंबिवलीत. आता डोंबिवलीत, पार्ल्यात बालपण गेलेले लोक जवळपास पुणेकरांसारखेच. तो अगदी अस्सल मराठीत बोलतो. इतकंच काय शिव्याही मराठीत देतो. त्याला मल्याळी बोलता येत असावं. पण इतक्या वर्षात तो कधीही मल्याळी बोलतांना आढळला नाही. तो एकतर मराठी, बंबैय्या हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो. त्याने लग्नही आमच्या एका मराठी मैत्रिणीशी केलं. गंमत अशी की ही मैत्रीण लोकांना मल्याळी वाटत असे. त्यातून आडनाव मेनन म्हटल्यावर लोक तिच्याशी मल्याळीतच बोलू पहात.

माझ्या स्वतःच्या बाबतीतही हे बरेचदा घडतं. खरं तर मला मुंबईत राहिल्याने गुजराती चांगली बोलता, वाचता येते. कोकणीही समजते. माझ्या एका बंगाली शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार माझं बंगाली हस्ताक्षर तर बंगाली लोकांपेक्षाही चांगलं होतं. दाक्षिणात्य भाषा मात्र प्रयत्न करूनही शिकता आल्या नाहीत. पण सर्वसाधारण अनुभव असा की माझा सावळा रंग, मोठे डोळे, कुरळे केस आणि सहसा उभी टिकली लावायची पद्धत यामुळे असेल पण लोकांना मी दाक्षिणात्य वाटते. आमच्या बँकेतल्या एक दाक्षिणात्य उच्चपदस्थाने एकदा मला विचारलं होतं, “Madam, are you a South Indian?” हा अनुभव मी बरेचदा घेतलाय. आमच्या चालायला जायच्या रस्त्यावर एक मल्याळी जोडपं (मला त्यांच्याकडे पाहून ते मल्याळी असावेत असं वाटायचं ते खरं निघालं) नेहमी समोरून येई. ते आमच्याकडे पाहून हसत, आम्ही त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करीत असू. एक दिवस त्या बाई मला थांबवून मल्याळीत काहीतरी विचारायला लागल्या. मला काही ओ का ठो कळेना. शेवटी मी त्यांना सांगून टाकलं त्या काय बोलताहेत ते मला कळत नाही. मग त्या म्हणाल्या मला वाटलं तुम्ही मल्याळी आहात. नंतर अर्थात मी मल्याळी नसले तरी आमची मैत्री झाली.

कधी कधी आपण जन्मलो, वाढलो एके ठिकाणी आणि नंतरच्या आयुष्यातला बराचसा भाग अगदी वेगळ्याच प्रदेशात घालवला की रहातो त्या गावच्यासारखे होऊन जातो. असं नेहमीच होईल किंवा होईलच असं नाही. काही परदेशस्थ भारतीय नाही का परदेशी गेले तरी जेवणाखाण्याच्या भारतीय सवयी, सणवार, जातीपाती घट्ट पकडून ठेवतात. अर्थात हेही खरं की एरवी एकमेकांना दुष्मन समजणारे भारतीय आणि पाकिस्तानी परदेशात गेले की पाकिस्तानी लोकांना भारतीय आणि भारतीयांना पाकिस्तानी आपले वाटू लागतात. कधी कधी काही लोकांना आपल्या लोकांपासून दूर आल्यामुळे इतकं एकटं वाटतं की त्यांना  जिथे ते रहातात त्या लोकांमध्ये मिसळून जायला जमतही नाही. आमचे एक मानलेले मामा होते. ते नोकरीनिमित्ताने इंदूरला होते बरीच वर्षं, पण त्यांच्या पत्रांतून कायम एकटेपणाचा सूर असे. आई माझ्याकडून त्यांना पत्र लिहवून घेई त्यात तिने त्यांना बरेचदा सांगितलेलं असे आजूबाजूच्या लोकांत मिसळत जा, नवे मित्र बनवा. पण त्यांनी ते केलं असेल असं वाटत नसे त्यांच्या पत्रांवरून. त्यामुळे आपल्या प्रदेशापासून दूर गेल्यावर प्रत्येकाला आपल्या स्वभावानुसार वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. आमच्या मुलांच्या बाबतीही काहीसं असंच घडलं.

आमची दोन्ही मुलं बंगलोरात शिक्षणानिमित्ताने राहिली. पण दोघांच्याही बाबतीत वेगळं घडलं. मुलगा आयआयएससीसारख्या उच्चभ्रू संस्थेत शिकला. त्यांच्या संकुलात सगळ्या गोष्टींची सोय असे. त्यामुळे बाहेर शहरात भटकायला गेलं तरच स्थानिक लोकांशी संबंध येई. त्यामुळे त्याच्या एकूण वागण्याबोलण्यात, आवडीनिवडीत फारसा फरक पडला नाही. (त्याचा स्वभावही थोडा संकोची आहे म्हणा) अर्थात पूर्वी त्याला न आवडणारे इडलीसारखे काही पदार्थ त्याला आवडू लागले. एकदा आम्ही गेलो होतो ( पालकांना मुलांसोबत रहायची, जेवायची सोय होती तेव्हा) त्यावेळी योगायोगाने तो मेस सांभाळत होता. त्यामुळे नाश्ता, जेवण यांचा बेत ठरवायचं काम त्याच्याकडे होतं. तर त्याने नाश्त्याला आम्हाला आपल्याकडल्या पातोळ्यांसारखाच पण मिरची, जिरं घालून शिजवलेल्या चणाडाळीचं पुरण असलेल्या उकडीच्या करंज्या खाऊ घातल्या होत्या. अशा काही गोष्टी सोडल्या तर तो फार प्रमाणात बदलला नव्हता. त्याचे मित्रमैत्रिणीही सगळ्या गोष्टींना माडी (म्हणजे उदाहरणार्थ क्लीन माडी) लावून तिथल्या लोकांशी बोलत. बाकी त्यांना फारसं कानडी येत नसे. पण आमच्या मुलीच्या बाबतीत मात्र असं घडलं की ती जवळपास दाक्षिणात्यच होऊन गेलीय. ती फार बोलकी, मनमोकळी, माणसांची भुकेली आहे. थोडा कार्यकर्त्याचा पिंड असल्याने असेल कदाचित रोजचे भाजीवाले, रिक्षावाले, त्यांची खोली साफ करणाऱ्या अम्मा या सगळ्यांबरोबर तिचा संवाद चालत असतो. बंगळुरात तुम्ही सार्वजनिक वाहनांनी किंवा रिक्षाने फिरत असाल, रोजचे व्यवहार स्थानिकांशी करीत असाल तर कानडी बोलणं, समजणं उपयोगाचं ठरतं. पण तिने थोडं प्रेमाने, आवडीने ते शिकायला घेतलं. तिथल्या लोकांच्या आवडीनिवडीही तिने नकळत उचलल्यात. तिथली खाद्यसंस्कृती तर तिने इतकी अंगिकारलीय की एकदा मुंबईतल्या फोर्ट भागातल्या ‘टेस्ट ऑफ केरला’ या भोजनालयात आम्ही गेलो होतो तेव्हा तिची जेवण्याची पद्धत पाहून तिथल्या माणसांना खात्रीच पटली ही आपली सहोदर आहे. मग आमच्याकडे दुर्लक्ष करीत ‘अम्मा पायनॅपल पच्चडी’ ‘अम्मा इरीशेरी’ असं करीत त्यांनी आम्हाला न वाढलेल्या सगळ्या खास गोष्टी तिला वाढल्या.

खरं तर ते भोजनालय केरळी लोकांचं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश यांच्या एकूण जीवनशैलीत, खाद्यसंस्कृतीत फरक असतील. तरीही ही ‘सहोदर’ असल्याची भावना निर्माण होऊ शकते.

नुसतंच खाणं, पिणं, लेणं यांच्यातल्या साम्यामुळे नाही तर स्वभावातलं साम्य, विचार करण्याच्या पद्धतीतलं साम्य, सारख्या आवडीनिवडी, सारखे गुण, दोष, मर्मस्थळं या आणि अशा कित्येक गोष्टींमुळे ही भावना निर्माण होते. मग आपण म्हणतो हा अगदी माझा सख्खा भाऊ आहे किंवा ही अगदी माझी सख्खी बहीण आहे.

पण मग असेच सख्खे बहीणभावंडं किंवा ज्यांना आपण रोजच्या व्यवहारातल्या संबंधांतून निर्माण झालेल्या नात्यांमधून मावशी, काका, मामू, चाचा म्हणतो त्यांच्याच विरोधात आपण कसे काय उभे रहातो?

मला आठवतंय घाटकोपरला आम्ही रहात होतो. तेव्हा स्वयंपाकाचा गॅस मिळवण्यासाठीच्या यादीत आपला क्रमांक अगदी तळाला असे. वाट पहात बसण्याशिवाय काहीच हातात नसे.  रॉकेलवर चालणाऱ्या स्टोव्हचा वापरच सर्रास होत असे. त्यामुळे स्टोव्ह दुरूस्त करणारा माणूस आयुष्यात फार महत्त्वाचा असे. आमच्या घराजवळ एका मुस्लीम गृहस्थांचं स्टोव्ह दुरूस्त करण्याचं टपरीवजा दुकान होतं. बरेचदा काम पडत असल्याने संबंधातून आलेल्या जिव्हाळ्यातून त्या गृहस्थांना कोणी मामू म्हणे तर कोणी चाचा. तेही सर्वांची कामं प्रेमाने करून देत. पण लवकरच हिंदू-मुस्लीम दंगली उसळल्या आणि त्या दंगलीत त्या गृहस्थांचं दुकान जाळलं तर गेलंच पण तेही मारले गेले. हे करणाऱ्यात जसा गुंडाचा सहभाग होता तसाच त्यांना मामू चाचा म्हणणाऱ्यांचाही हात होता.

कालपरवापर्यंत सहोदर वाटणारे लोक असे एकाएकी पूर्ण परके, अनोळखीच नव्हे तर तिरस्करणीयही का आणि कसे होतात? त्या सगळ्यांशी न मिळणाऱ्या, फटकून रहाणाऱ्या अशा  कुठल्या अस्मिता जागृत होतात आणि कशा?  आपला प्रदेश, आपली संस्कृती, आपली जात, आपला धर्म, आपली भाषा हे सगळं इतकं का खोलवर रूजलेलं असतं आपल्यात की केशवसुतांसारखा ‘प्रदेश साकल्याचा’ धुंडाळायला बाहेर पडलो, त्या नव्या प्रदेशाने आपल्या सीमा विस्तारल्या तरी कुठल्या तरी वेड्या अस्मितेने डोकं वर काढून आपली नवी ओळख, नवे बंध उपटून काढून टाकावेत? शुभांगी थोरात

Photo by fauxels on Pexels.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s