
कोरोनाच्या भीतीने सगळे घरात बसलेत आमच्यासारखे असंच वाटलं मला. सायटीकामुळे फार वेळ एका स्थितीत रहाता येत नाही. म्हणून आलटून पालटून बसणं, उभं रहाणं चाललंय. तरी आज वेळ काढला जरा खिडकीबाहेर डोकावायला तर सगळं जग होतं तसंच चाललंयसं वाटलं. चंदरच्या भाषेत सांगायचं तर ‘निष्ठावंत’ चालणारे चालत होते, रोज बकऱ्यांना चारायला घेऊन जाणारी, नऊवारी अंजिरी, नारिंगी लुगडं आलटून पालटून नेसणारी बाई चक्क मास्क लावून बकऱ्यांना टेकलत होती. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या मुली नेहमीसारख्या गेल्या आठवड्यात बाळंत झालेल्या कुत्रीच्या पिल्लाला दूध पाजत होत्या, लस टोचत होत्या, लहान मुलं मास्क लावून सायकली दामटवीत होती, रस्त्याच्या टोकाला असलेल्या बागेबाहेर बाईकींवर किंवा झुडूपाआड प्रेमालाप करणारी जोडपी (ती तरी कुठे जाणार बिचारी, भारतात त्यांची काहीच सोय नाही) बाईक दौडवीत चालली होती. घराजवळच्या डी-मार्टमध्ये तर उद्याच्या ‘जनता कर्फ्यू’च्या भयाने मैलभर लांब रांग होती म्हणे आणि तिकडे आलेल्या लोकांच्या गाड्यांनी रस्ता व्यापला होता.
लोकांना एखाद्या दिवशी जरी घरात रहायचं म्हटलं तर कोंडून पडल्यासारखं वाटतं हे खरं. मग जर पुढचे काही दिवस, कदाचित आठवडेही घरातच रहायचं म्हटलं तर अवघड आहे. आता आमचं कसंय की ठीक आहे बुवा चालायला नाही गेलो तर चंदर घरातल्या घरात चालतो, मुलं व्हिडियो कॉल करून गप्पा मारतात, चंदर काहीतरी रहस्यमय वाचत बसतो, मी माझी भाषांतरं करीत बसते, चित्रं काढत बसते, शिवाय टीव्हीही रंगून जाऊन बघते, गेल्याच आठवड्यात काही नियतकालिकं, पुस्तकं आलीत ती अजून वाचून व्हायचीत. घराबाहेर पडलं नाही तरी खिडकीतून सुंदर दृश्य दिसतं, दुपारी उन्ह घरात येतं त्यामुळे त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. रात्री दोघंही स्क्रॅबल खेळत बसतो. तसं सगळ्यांनाच करता येईल असं नाही ना, काय करायचं.
