एका खडूस समीक्षकाची हजामत

आजकाल टीव्हीवर बघतांना ओळखीच्याच सिताऱ्यांचे चेहरे बदललेले दिसताहेत. सुंदर दिसणाऱ्या तारका कोरोनावर प्रतिक्रिया देतांना फार सामान्य दिसायला लागल्यात. डोईवर केसांची काळीशार झुल्पं बाळगणाऱ्या अभिनेत्यांच्या केसांचे खरे रंग दिसायला लागलेत. सगळ्यांचीच पंचाईत झालीय. माझ्या नवऱ्याचीही एक वेगळी पंचाईत झाली. एरवी त्याच्या खांद्यापर्यंत रूळणारे कुरळे केस तो अधूनमधून कापत असतो. कोरोनाचा कहर सुरू व्हायच्या आधीच तो म्हणत होता केस कापायला हवेत. पण थोडी कामाची गडबड, थोडा कंटाळा असं करता करता राहून गेलं खरं. नंतर मग शक्यच होईना बाहेर पडणं. मग माझ्यामागे टुमणं लावीत बसला, केस कापायला मदत कर ना.

मी केस या एका बाबतीत फार संवेदनशील आहे. माझे लांबसडक केसही मला कापायचे नव्हते. पण एकत्र कुटुंबाच्या रगाड्यात त्यांची निगा राखणं शक्य होईना, मग चंदर मागेच लागला म्हणून कापून टाकले. पण त्याचं मला कायम दुःख होई आणि संधी मिळताच मी ते वाढवत असे. क्षितिज आणि ओवीचे केसही ती दोघं तान्ही असतांना कापायचा धीर मला होत नसे. त्यामुळे चंदरनेच त्यांचं जावळ कमी केलं होतं. माझ्या एका सहकारी मैत्रिणीच्या केसांचा लांबलचक, भरगच्च शेपटा धावत्या लोकलमध्ये आम्हा कुणालाच काय खुद्द तिलाही न कळू देता कुणीतरी अल्लाद कापून नेला तेव्हा तिच्यापेक्षा मीच अधिक हळहळले.

बरं, या आधी कधी कुणाचे केस कापले नाहीत. त्यामुळे आपल्याला जमेल की नाही याची मला शंका यायला लागली. पण कित्येक गोष्टी आपण निरीक्षणातून शिकत जातो, नाही का? माझ्या लहानपणी घरी खेकडे आणले की मी फार लांब पळत असे. ते साफ करण्याचं काम आईवडील करीत ते मात्र मी नीट लक्ष लावून पहात असे. लग्न होईपर्यंत मी खेकड्यांना कधी हातही लावला नव्हता. पण लग्नानंतर एक दिवस सासूबाई पातेलंभर खेकडे पुढ्यात ठेवून म्हणाल्या, “तुझ्या माह्यारी करतात जणू, तुला येतच असन. कर तूच.” मग काय लहानपणी पाहून गिरवलेले धडे आठवत धडाधड उरकलं न् काय.

आत्ताही तसंच झालं. मेरीच्या पार्लरमध्ये केलेलं निरीक्षण कामी आलं. मेरी ही खरं तर माझी शेजारीण. पण आमच्या गृहनिर्माण संस्थेतलं तिचं घर तिने भाड्याने देऊन टाकलंय. ती चिनी असली तरी गेल्या चारपाच पिढ्या मुंबईत घालवल्याने ती आता पक्की भारतीय झालीय. सर्वसाधारणपणे भारतीय नागरीक असलेले चिनी ठराविकच व्यवसाय करतांना दिसतात. चिनी पुरुष एक तर हॉटेल व्यावसायिक असतात किंवा डेंटिस्ट आणि बायका सहसा ब्यूटी पार्लर चालवतात. हे आपलं माझं निरीक्षण. काहीशी स्थूल, दिसायला सुंदर असणारी मेरी स्वभावाने फार आनंदी. मी आणि ओवी केस कापण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही सौंदर्योपचार करून घेत नाही हे माहीत असल्याने आम्ही गेलो की ती खुणेनेच पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास असं सांगत असे. तिची गिऱ्हाईकं ही वर्षानुवर्षे तिच्याकडे जाणारी असत. त्यांना तिच्याकडूनच केस कापून हवे असत. त्यासाठी थांबायची त्यांची तयारी असे. सगळ्यांच्या कुटुंबांविषयी तिला ठाऊक असे. त्यांच्या मुलांच्या शाळा, तिथले शिक्षक, एकूण शिक्षणव्यवस्था, रोजच्या आयुष्यातल्या अडचणी अशा असंख्य गप्पा आणि सोबत सौंदर्यासाठीच्या युक्त्या. मेरीच्या कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असला तरी तिच्या पार्लरमध्ये तिच्या मदतनीसांनी लावलेली हिंदू देवतांची छायाचित्रं, मूर्त्याही असत. खास पोर्सलीनमधल्या शोभेच्या वस्तूंनी सजावट केलेली असे. मला गंमत येई ती तिथल्या आरशात आमच्या मागच्या आरशामुळे दिसणारी सहासात प्रतिबिंब न्याहाळण्यात. मेरीच्या हालचालीही इतक्या देखण्या असत की केस कापणाऱ्या मेरीला मी बराच वेळ पहात बसे.

ते निरीक्षण चंदरचे केस कापतांना कामी आलं. ती कसे लांब केस कापायच्या आधी सरळ करुन घेऊन कंगवा सरळ उभा धरून केस कापते, मग बारीक करीत आणल्यावर उलट्या कंगव्याने पकडून कसे कापते, कानाजवळचे केस कापतांना कसा तिरपा कंगवा पकडते. अगदी बारीक केस कापतांना काय काळजी घेते, शेवटी मानेवरचे राहिलेले केस उडवतांना कसा नाजूक वस्तरा चालवते हे सगळं आठवत मी चंदरचे केस कापले आणि मुलांना छायाचित्रासकट कळवून टाकलं, “एका खडूस समीक्षकाची एका कवयित्रीने केली हजामत.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s