साधारण बारा वर्षांपूर्वी कार्यालयात एका महत्त्वाच्या कामासाठी चार पाच महिने एक तामिळी, एक झारखंडकडचा आणि मूळची राजस्थानची, पण वैज्ञानिक असलेले वडील विक्रम साराभाईंसोबत काम करीत म्हणून केरळात बरीच वर्ष काढून अस्खलित मल्याळी बोलणारी एक गोड मुलगी असे चारही जण एकाच मोठ्या केबिनमध्ये सकाळी नऊ ते रात्री दहा साडेदहापर्यंत अडकून पडलेले असायचो. खरं तर आम्हाला सूपपासून ते गोडाच्या पदार्थांपर्यंत सगळं जेवण मिळण्याची सोय होती. पण त्यासाठी अधिकारी भोजनकक्षात जाण्याइतकाही वेळ नसे. म्हणून जागेवरच बसून घरून आणलेलं खात असू. तेव्हा हा झारखंडचा मित्र बरेचदा सत्तूचे परोठे घेऊन येई. आज त्या परोठ्यांची आठवण झाली कारण उपलब्ध असलेल्या पदार्थात जमेल ते करायचं असा सध्या खाक्या आहे आणि घरात पटकन् करता येईल म्हणून सत्तूचं पीठ ठेवलेलं होतं.
बिहार, झारखंड अशा उत्तरेकडच्या भागात, ओदिशात सत्तू हे सर्वसामान्यांचं खाणं आहे. सत्तूमध्ये भाजलेल्या डाळी- बहुधा चणाडाळ आणि धान्यं – बहुधा जव किंवा गहू असल्याने प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. उत्तरेकडे उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी सत्तूचं पीठ ताकात मिरची, जिरं घालून किंवा दूधात गूळासह किंवा तसंच खाल्लं जातं. फणीश्वरनाथ रेणूंचे फटेहाल नायक सत्तू पाण्यात घोळून खातांना दिसतात. भाजलेलं पीठ असल्याने दक्षिणेकडे जसं भाजलेलं नाचणीचं पीठ दूधात किंवा ताकात मिसळून प्यायलं जातं तसंच हेही. हे कोरडंसुद्धा खाल्लं जातं. पण ज्यांना थोडे जिभेचे चोचले पुरवायचेत त्यांच्यासाठी सुप्रसिद्ध लिट्टीचोखा हा बिहारी पदार्थ किंवा सत्तूचे परोठे किंवा खीरही करता येते.
आंतरजालावर पाहिलं तर परोठ्याच्या पाककृतीत थोडेफार फरक दिसतात. पीठ तर परोठ्याला घेतो तसंच किंचित मीठ, तूप घालून मळून घ्यायचं नि मुरायला बाजूला ठेवून द्यायचं. सत्तूच्या पीठात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चिमूटभर हिंगपूड, आलंलसूणमिरचीचा ठेचा, ओवा, लिंबाचा रस किंवा आमचूर घालायचं. काही ठिकाणी आवडत असल्यात धण्याजिऱ्याची पूड आणि लाल तिखटही घालावं असं सांगितलंय. तर एके ठिकाणी आंब्याच्या लोणच्याच्या काही फोडी बारीक ठेचून घातल्याने छान लागतं असं म्हटलंय. हे मिश्रण थोडं कोरडं होतं, म्हणून की काय त्यात थोडं मोहरीचं तेल घालावं असंही सांगितलंय, तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्या आवडीचं कुठलंही तेल घाला. हे सारण भरुन नेहमीसारखे परोठे करा आणि दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत गरमागरम खा. मात्र आता सगळेच उपलब्ध पदार्थ जपून वापरायचे असल्याने आणि वजनही वाढू द्यायचं नाही म्हणून तेलातूपाचा वापर जरा बेतानेच करा.
