ते सध्या काय करीत असतील?

आमच्या कट्ट्यावर एक पंचेचाळीशीची पोरगेलीशी दिसणारी बाई येत असे. सुरुवातीला ती काही बोलत नसे. हळूहळू ती बोलायला लागल्यावर कळलं की लग्नानंतर काही वर्षातच तिच्या नवऱ्याला दारुचं व्यसन असल्याने तिच्या वडीलांनी त्याला चोप दिला तेव्हा तो घाबरून आपलं मालकीचं घर सोडून पळून गेला. त्यानंतर तिच्या भावाने तिचं हे घर (तिची सही घेऊन) भाड्याने दिलं. त्या भाड्यातून तो तिच्या आणि तिच्या एकुलत्या मुलाच्या उपजीविकेचा आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवतो. पण ती दुसऱ्या भावाच्या घरी रहाते. या भावाची बायको तिला घरी थारा देत नाही. आपल्या नणंदेचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून की ती नकोशी आहे म्हणून नक्की कशासाठी ते माहीत नाही, पण तिने तिला एक कठोर दिनक्रम आखून दिलाय. अर्थात हे काही मला तिच्याकडून कळलं नाही . तिच्या भावाच्या इमारतीत रहाणाऱ्या मैत्रिणींकडून कळलं. तर तो दिनक्रम असा – सकाळी घरातली कामं, आंघोळ वगैरे आटोपून चर्चमध्ये सात वाजता जायचं, तिथे साडेदहापर्यंत थांबायचं. मग घरी आल्यावर भावजय तिला जेवणाच्या वेळेपर्यंत दर वेळी वेगवेगळ्या गोष्टी आणायच्या निमित्ताने बाहेर पाठवते. जेवण आटोपलं की तिने बाहेर पडून संध्याकाळी साडेसहापर्यंत बाहेर रहायचं. या काळात तिने फक्त चालत रहायचं, कुठेही थांबायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही. आमच्या काही मैत्रिणी तिला म्हणाल्या अगं तू आमच्याशी बोललीस तर आम्ही थोडंच तिला सांगणार आहोत. यावर तिचं म्हणणं हे की भावजय सांगते की तिची माणसं नणंदेवर लक्ष ठेवून असतात, त्यामुळे ती कुणाशी बोलते, काय बोलते, कुठे जाते हे सगळं तिला कळतं. त्यामुळे पाय दुखले तरी ती सतत चालत रहाते. घरी गेल्यावर अर्थात सकाळच्या सारखंच रात्रीपर्यंत तिला वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर धाडलं जातं. मला आपलं वाटायचं की ही तिची भावजय खडूस म्हातारी असणार. तर एकदा मला मैत्रिणींनी ती आमच्या बाकाजवळून जात असतांना दाखवली. मला धक्काच बसला, कारण ती पस्तीशीची तरुणी होती. तिच्यासोबत तिची दत्तक मुलगी होती. इतकी तरुण आणि एकादी मुलगी दत्तक घेणारी बाई असं वागू शकते यावर माझा विश्वासच बसेना.

आमच्या एका जेष्ठ मैत्रिणीची भावजयही अशीच. आमच्यासमोर गोड वागते, तरीही कधी कधी तिचं पितळ उघडं पडतं. शिवाय शेजाऱ्यापाजाऱ्यांकडूनही कळलंय की भावजयीच्या जाचाने ती सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडते ती दिवसभर कुठल्यातरी पायरीवर, बाकावर बसून संध्याकाळी काळोख पडतांना घरी परतते.

आमच्या परिसरातले एक म्हातारे गृहस्थ सकाळ संध्याकाळ बाकावर बसून असतात. मग कळलं की आधीही ते बायकोसह बाकावर बसलेले असत. पण आता ते प्रमाण अधिक वाढलंय, कारण त्यांचं दुकान त्यांची बायको वारल्यावर मुलाने ताब्यात घेतलं आणि त्यांना घरातली माणसंच बाहेर पाठवतात.

आता या लोकांविषयी कुठून तरी खरं खोटं काहीतरी कळतं. पण मी अशी कित्येक माणसं पाहिलीत जी अगदी पिशवीत खायचे पदार्थ, पाण्याची बाटली, टोपी वगैरे जवळ बाळगून एखाद्या झाडाखाली, बंद दुकानाच्या पायरीवर, मॉलच्या कठड्यावर, बागेतल्या किंवा जेष्ठ नागरिकांसाठी नगरपालिकेने बांधलेल्या बाकांवर दिवसभर बसून असतात. यात बायका कमी आढळल्या तरी त्या असतात हे विशेष. (बायका घरातलं काम करायला उपयोगी पडतात, त्यामुळे नकोशा होती नाहीत बहुधा). त्यातल्या काहींच्या घरी कुणीही नसेल, एकटं रहायचं भय वाटत असेल. थोडीफार हालचाल, जाग आजूबाजूला आहे अशा वातावरणात त्यांना कदाचित अधिक सुरक्षित वाटत असेल, पण वृद्धाश्रमात जावंसं वाटत नसेल (जे काही व्हायचं ते आपल्या घरात व्हावं असंही वाटत असतं).

काहींची घरंही इतकी छोटी असतात (याचा अनुभव मलाही आहे), शिवाय इतक्या चिमुकल्या घरांमध्ये माणसंही इतकी असतात की एका वेळी घरातली सगळी माणसं घरात मावूच शकत नाहीत. ती सगळीच कष्ट करणारी असल्याने कायम कामात असतात. शिवाय रात्री सगळे घरातच झोपतात असं नाही, त्यातले काही बाहेर कुठे रस्त्यावर, दुकानाच्या पायरीवर झोपतात. अशा माणसांना चोवीस तास घरात एकत्र रहावं लागलं तर हातपाय बांधूनच बसावं लागेल आणि तरीही कदाचित जागा पुरणार नाही अशी स्थिती असते.

आता टाळेबंदीच्या काळात हे सगळे काय करीत असतील?

2 thoughts on “ते सध्या काय करीत असतील?

  1. ही फार गंभीर सामाजिक समस्या आहे. तिकडे महानगरांसह इकडच्या छोट्या छोट्या गावांमधली ही.
    वय वाढलं. शरीर थकलं की माणसं नको होतात घरच्यांना. माझं तर अजूनही एक वेगळंच निरीक्षण आहे. स्त्रिया मुलं मोठी झाली की आपल्या सूना, जावाई, नातवंडे यांच्यात नकळत रममाण होतात. पुरूषांसाठी ते तितकसं सोप्प नसतं. ते एकटे पडण्याची ही सुरूवात असते. स्त्रियांच्या बाबतीत प्रॉब्लेम तेव्हाच होतो जेव्हा कुटुंबातील अधिकाराचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा. विशेषतः तेव्हा जेव्हा घरात नव्याने आलेली स्त्री घराचा ताबा घेऊ पहाते तेव्हाच. केवळ अशावेळीच जेष्ठ महिलां सफर होतात.
    तितकसं सोप्प नसतं.

    Liked by 1 person

यावर आपले मत नोंदवा