अभावग्रस्तांचं खाणं

माझ्या बहिणीला स्वेच्छानिवृत्ती घ्यायची होती. पण निर्णय होत नव्हता. तर माझे मेहुणे म्हणाले, “मीठभाताला काही कमी तर पडणार नाही, मग झालं तर!”  ते असं म्हणाले असले तरी मध्यमवर्गाला अगदी मीठभात खाऊन रहायची पाळी सहसा येत नसते. पण शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या अभावग्रस्तांना तर त्यातलं मीठही कधी कधी मिळायची पंचाईत असते.  खेडेगांवातल्या गरीब शेतकऱ्यांच्या बायका शेळ्या, कोंबड्या पाळून गावच्या किंवा तालुक्याच्या आठवडे बाजारात शेळ्या, कोंबड्या, अंडी विकून मीठमिरचीची सोय करतात. पण आदिवासी आणि गावकुसाबाहेरच्या आयाबायांना तर तेही करता येत नाही. अर्थात काही आदिवासी जमाती मीठही खात नाहीत.

खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या एका वाहिनीवर एका कार्यक्रमात पाहिलं होतं. एक मुलगी आदिवासी पाड्यात गेली होती. तिथल्या एका घरातल्या बाईला हाक मारून म्हणाली, “मग काय केलंस आज ताई जेवायला?” ग्रामीण भागातल्या लोकांच्या जिव्हाळ्याने त्या बाईने म्हटलं, “जेवशील का आमच्याबरोबर?  ये तर मग.” त्या बाईने खेकडे पकडले होते. ते तिने साफ करायला घेतले. तोवर चुलीवर भात रटरटत होता. गरमागरम वाफाळलेला भात झाल्यावर तिने पानात ते नीट केलेले खेकडे ठेवले आणि त्यांच्यावर गरमागरम भात टाकला. मुलीला म्हणाली, “घे. खा.” त्या मुलीला कॅमेऱ्यासमोर तरी तो चाखून फार चांगला लागतोय म्हणावं लागलं. मला ते पाहून आठवलं की जपानमध्ये नाश्त्यासाठी अशाच प्रकारे गरमागरम भातावर अंडं फोडून ते खायला देतात. पण ग्रामीण भागातल्या बायका कोंबड्या पाळत असल्या तरी अंडी खाणं त्यांच्या नशिबात नसतं. ती बरेचदा घरातल्या पुरूषांच्या पोटात जातात. संध्या नरे पवार यांनी ‘तिची भाकरी कोणी चोरली?” या आपल्या पुस्तकात ग्रामीण बायकांना “मटणाचे तुकडे कोणाच्या ताटात जातात?”  हा प्रश्न विचारल्यावर आलेलं उत्तर आठवलं. “तुकडे पुरूषांच्या आणि मुलग्यांच्या ताटात जातात. बायका उरलेले तुकडे आणि रस्सा खातात.” याच पुस्तकात त्यांनी नोंदवल्याप्रमाणे सोयाबीन खरं तर बायकांसाठी चांगलं, पण ते पिकवणाऱ्या बायका ते खात नाहीत, विकतात. दूध तर बायकांचं लहानपणापासूनच बंद होतं हेही निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. पूर्वी शेतात घरच्या वापरासाठी धान्य, भाज्या, डाळी लावले जाई. पण बागायती पिकांचा बोलबाला झाला आणि लोक एक छोटा चौकोनही भाजी लावण्यासाठी मोकळा सोडेनासे झाले. त्यामुळे थोडंफार पोषण होत असे त्यापासूनही बायकामुली वंचित झाल्या. कारण विकत आणलेल्या डाळी, भाज्याही कर्त्या पुरूषांच्या आणि मुलग्यांच्या खाऊन झाल्यावर उरल्यासुरल्या तर घरातल्या  बायकामुलींच्या वाट्याला येतात.

पर्जन्यछायेच्या प्रदेशातल्या आमच्या गावी साधारण आठदहा एकराची शेती असलेल्या शेतकऱ्यांवरही दुष्काळात कण्या भरडून खायची वेळ येई. पण गावकुसाबाहेरच्या अभावग्रस्तांना तर बरेचदा कण्याच भरडून खाव्या लागतात. त्या कण्यांमध्ये असलंच घरात थोडं दूधदुभतं (बकरीचं) तर थोडं ताक, मीठ, मिरची तर टाकायचं नाहीतर नुसत्याच कण्या उकडून खायच्या.  दुष्काळात एका बाईला कण्या फारशा मिळाल्या नाहीत. मग घरातल्या पोराबाळांना कुठे काय मिळेल ते पहायला सांगितलं. तर थोडा चिंचेचा पाला, सुकलेली उंबरं, कुठेतरी राहिलेले चुकार भुईमूगाचे दाणे असं काही काही मिळालं. ते सगळं तिने त्या कण्या उकडतांना त्यात टाकलं होतं. हे असंच कुठेतरी वाचलेलं. जे काही मिळेल त्यात भागवायचा बायकांचा नेहमीच प्रयत्न असतो.

पुरवणीला यावं म्हणून, तसंच आधीच कमी आहे त्यात वाया जाऊ नये म्हणून काही काही फंडे असतात. जसं की पाणी जास्त टाकायचं, तरीही चव रहावी म्हणून थोडं तिखट, मीठ जास्तीचं घालायचं. पिठलं होण्याइतकं पुरेसं चण्याचं पीठ नसलं तर त्यात ज्वारीचं पीठ घालायचं. माझ्या ओळखीच्या एक बाई मासे घोळवलेलं तांदळाचं पीठ वाया जाऊ नये म्हणून त्यात पाणी घालून त्याचा घावन काढीत ( अर्थातच हा घावन त्या आपल्या मुलीला न देता लाडक्या मुलाला देत). भेंडीची देठं आणि टोकं यांची किंवा शिराळ्याच्या सालींची चटणी करणं हेही यातलेच प्रकार.

‘मास्तरांची सावली’ या कृष्णाबाई नारायण सुर्वे यांच्या पुस्तकात यांनी कोंड्याचा मांडा करणाऱ्या अशा अभावग्रस्त बायकांची अशीच एक पाककृती दिली आहे. “गुजराती शाळेतल्या शिक्षिका शाळेत येतांना दुपारीच भाजी घेऊन शाळेत यायच्या. कधी चवळीच्या शेंगा, कधी तुरीच्या किंवा मटारच्या शेंगा..मी माझी शाळेतली झाडलोटीची वगैरे कामं आटोपली की मधल्या फावल्या वेळेत त्यांना शेंगा मोडून द्यायची. मटारीचे, तुरीचे दाणे सोलून द्यायची. मी मनात विचार करायची, “कृष्णाबाई, तुझ्यासारखीच या बायांची अवस्था आहे, संध्याकाळी घरी जातील केव्हा, भाज्या निवडतील केव्हा.”  त्यांनी थँक्यू म्हटलं की मला बरं वाटायचं. त्यांना मदत करण्यामागे माझाही एक हेतू असायचा. रोज रोज भाज्या घेण्याइतकी माझी काही ऐपत नव्हती. मी त्या मटारीचे दाणे काढून दिले की शेंगांच्या साली एका पिशवीत भरून घ्यायची आणि घरी आणायची. त्या सालींचे बाजूचे दोर आणि वरचा पातळ पापुद्रा काढला की आत जी हिरवीकंच पातळ साल उरायची त्याची चिरून भाजी करायची. ओली मिरची, कांदा, खोबरं घालून भाजी केली की अगदी पापडीच्या शेंगासारखी भाजी लागायची.” अशा प्रकारे काहीही खाण्याजोगं मिळत असेल ते खाऊन दिवस ढकलायचा एकच विचार अभावग्रस्तांच्या मनात असतो.

कोकणात पेजभात खाऊन रहाणारे तर बरेच लोक असतील (यासोबत मिळालाच एखादा भाजलेला बांगडा किंवा बोंबिल तर त्यांना पंचपक्वान्न मिळाल्याचा आनंद होतो). नागली किंवा नाचणीची भाकर आणि कुळथाचं पिठलं हे सर्वसामान्य कोकणी माणसाला सहज उपलब्ध असलेलं खाद्य. याशिवाय कोकमाचं सार आणि भातही. इथे मुंबईत आपण नारळाचं दूध घातलेली सोलकढी पितो तशी कोकणातही ती पितात. पण कित्येक ठिकाणी नारळ हे पैशांसाठी विकले जातात आणि कोकमाचा फक्त आगळ (रस) घेऊन त्यात मीठमिरची घालून सार केलं जातं. नाचणीचे उकडलेले गोळे (यांना मुद्दे म्हणतात) हा तर कर्नाटकातल्या बऱ्याच गोरगरीबांच्या पोटाला मोठा आधार असतो. नागलीप्रमाणे वरीचे उंडे हाही असाच एक प्रकार. सावे हे तृणधान्यही असंच खाल्लं जातं( आमच्या लहानपणी गावाहून धोतराच्या किंवा जुन्या लुगड्याच्या तुकड्यात बांधून उकडे तांदूळ, कुळीथपीठ आणि साव्याचं पीठ -मालवणीत त्याला सायाचं पीठ म्हणतात- कुणाच्या तरी हाती पाठवलं जाई). हुलगे किंवा कुळथाचं माडगं, ज्वारी किंवा इतर कुठल्या धान्याची आंबील अशा आणि इतरही काही पदार्थांवर दिवस काढले जातात. दक्षिणेत उरलेल्या शिळ्या भातात पाणी घालून तो रात्रभर झाकून ठेवून सकाळी खाल्ला जातो. तर उत्तरेत भाजलेले चणे आणि जंव दळून केलेला सत्तू पाण्यात कालवून खातात. बिहारमध्ये दहीचुडा. माझी कारवारकडची एक मैत्रीण सांगत होती की तिच्या घरी फणस फार पिकत. घरी वापरून उरलेले फणस ते स्वस्तात विकत असत. गावातली ओढगस्त असलेली कुटुंबं ते फणस घेऊन जात. कारण फणस खाल्ला की भूक लागत नाही. मग एका फणसावर अख्ख्या कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण होऊन जाई. शिवाय आठळ्या असत. या आठळ्या नुसत्या मीठ घालून उकडून खाता येत. काही ठिकाणी आठळ्या वाळवून त्यांचं पीठ करून तेही वापरलं जातं. आंब्याच्या कोयीही भाजून खाल्ल्या जातात.  वेगवेगळ्या प्रकारचे कंद उपलब्ध असतात. आमच्या वडिलांची मामी गावाहून येतांना पोतंभर कणकं आणि करांदे घेऊन येई. करांदे जरा कडवट असतात त्यामुळे ते उकडतांना दोनतीनदा पाणी काढून टाकावं लागतं. पण कणकं चांगली लागतात. अशा प्रकारचे कंद हे अभावग्रस्तांना निसर्गात सहज उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात सहज उपलब्ध असलेली अळिंबी. पण ती मात्र जपून नीट ओळखून खावी लागते कारण काही जाती विषारी असतात. पण जंगल हे ज्यांचं घर आहे अशा आदिवासींना त्या बरोबर ओळखता येतात.

कंदांप्रमाणेच पावसाळ्यात उगवणाऱ्या असंख्य रानभाज्याही सहज उपलब्ध होतात. –  कुर्डू, टाकळा, भुईआवळा, पाथ्री, कुत्तरमाठ, तेलपाट,  राजगिरा, घोळ (ही तर कुठेही आणि हिवाळ्यातही मिळते), शेवग्याचा पाला, वाघाटं, कोरला, कुळू, शतावरी. सतीश काळसेकरांनी एके ठिकाणी लिहिलं होतं की ते काश्मीरला गेले असतांना नावाडी तिथेच तळ्यात उगवणारा कसलासा पाला उकडून भाताबरोबर खात. अंबाडीची भाजी दक्षिणेत फार खाल्ली जाते. तिथे तिला गोंगुरा म्हणतात. तिचा लोणच्यासारखा टिकणारा पदार्थ करून तोही भातासोबत खाल्ला जातो. पाल्यासोबतच वेगवेगळी फुलं जसं की भोकराची फुलं, मोहाची फुलं, शेवग्याची आणि हादग्याची फुलं हीसुद्धा खाल्ली जातात. मोहाची फुलं वाळवून त्यांची पूड करून ती साठवली जाते आणि भाकरीत घालून खाल्ली जाते. केळीचं आणि शेवग्याचं झाड हे तर गोरगरीबांसाठी कल्पवृक्षच. त्यांचे जवळपास सगळे भाग खाल्ले जातात. जसे केळी कच्ची आणि पिकलेली दोन्ही खाल्ली जातात, तसं केळफूलही भाजीसाठी वापरलं जातं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीतल्या प्रदेशातही. पालघर पट्ट्यात चिरलेलं केळफूल तांदळाच्या पिठात घालून त्याच्या भाकरी केल्या जातात. केळीच्या खुंटाचीही भाजी केली जाते (ही भाजी मूतखड्यावरचं एक उत्तम औषध मानलं जातं). त्यावरून आठवलं कोकणात खाल्ले जाणारे काही पदार्थ हे देशावरच्या सुपीक जमीन बाळगणाऱ्या लोकांसाठी कदान्न असतं. माझं लग्न झाल्यावर मला भुट्टा खायला आवडतो हे कळल्यावर माझी सासू म्हणाली ते तर आम्ही बैलांना घालतो. केळफूलं तर तिथे टाकूनच देतात. असंच उर्मिला पवार यांनी ‘आयदान’मध्ये सांगितलेला प्रसंग आहे तो आठवला. त्यांच्या आईने त्या सासरी जातांना त्यांच्यातर्फे सासरच्यांना भेट म्हणून मुळ्ये (मोठ्या आकाराचे शिंपले) दिले. नवऱ्याच्या आग्रहाखातर दोघं वाटेत एका लॉजमध्ये गेली. तिथून निघतांना मुळ्यांची पिशवी तिथेच राहिली तर नवरा म्हणाला नाहीतरी आमच्याकडे कोण खाणार ते मुळ्ये. पण कोकणात गरीब लोक मुळ्ये नुसते उकडूनही खातात.

आमच्या लहानपणी भीक मागून जगणाऱ्या लोकांना त्यांनी आणलेल्या एकाच पातेल्यात वेगवेगळ्या घरच्या वेगवेगळ्या डाळी, कालवणं मिळत, तसंच त्यांच्या झोळीत वेगवेगळ्या घरच्या शिळ्या चपात्या, भाकरी, डोसे, भात जमा होत असे. पुलाखालच्या किंवा रेल्वे फलाटावरच्या त्यांच्या तात्पुरत्या घरात ते हे सगळं एकत्र उकळ आणून खातांना दिसत. त्याचा आंबूस वास पसरलेला असे. शाहू पाटोळे यांनीही त्यांच्या ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ या पुस्तकात सणासुदीला हक्काच्या वतनाच्या घरातून मिळणाऱ्या पुरणपोळ्या, गुळवणी, कुरडया, भजी, भात यासारखे नाशिवंत पदार्थ आठ दिवस टिकवून खाण्यासाठी भोकं बुजवलेल्या मडक्यात मंद आगीवर ते एकत्र शिजवून केल्या जाणाऱ्या आंबुरा या पदार्थाची कृती दिली आहे.

आम्ही गिरणगावात रहात असतांना बरेच लोक घुले नावाचे समुद्रात आढळणारे किडे स्वस्त असत ते उकडून खात. आतला कीडा पीन किंवा टाचणी वापरून ओढून खावा लागे. हे सगळे कीडे काढून घेऊन त्यांचं मसाला घालून दबदबीत कालवणही केलं जाई. आता हा प्रकार कुठे दिसत नाही. कर्नाटकातही भाताच्या शेतात सापडणारे घोंगे असेच उकडून पिनाने काढून खातात. अगदी बारीक, धोतरात पकडता येणाऱ्या कोळंबीच्या छोट्या कोलीम या प्रकाराचंही लोणचं करून ते प्रवासात वापरलं जातं किंवा काहीच मिळालं नाही तर भात, चपाती, भाकर कशाही बरोबर खाल्लं जातं पालघर, डहाणू पट्ट्यात. कोळी बांधवही ही कोलीम नेहमी करून ठेवतात. मांसाहारातले रक्ती, वज्री, भेजा, जीभ असे टाकाऊ पदार्थ जसे ग्रामीण भागातील अभावग्रस्त खात तसेच आमच्या लहानपणी गिरणगावातल्या भंडारी भोजनगृहातही स्वस्त आणि मस्त असे हे पदार्थ गिरणी कामगार खात असत. मेघालयकडचा माझा मित्र सांगत होता की तिथे उंदीरही खाल्ले जातात. महाराष्ट्रातही उंदीर, घोरपड वगैरे प्राणी खाणाऱ्या जमाती आहेत. पण असे टाकाऊ पदार्थही वरचेवर मिळतात असं नाही. अशा वेळी सुकट, सुका बोंबील, बांगडा, वाकट अशा सुक्या माशांचा पोटाला आधार होतो. आदिवासीसुद्धा अशा सुक्या माशांच्या आधारावर पावसाळा ढकलतात. त्यावरून आठवलं. मी वेगवेगळ्या प्रकारचं मस्त सारण असलेल्या कानवल्यांविषयी ऐकलं होतं, तुम्ही ऐकलं असेलच. पण अलीकडेच मी जरा वेगळ्या कानवल्यांविषयी वाचलं. डॉ. कृष्णा भवारी यांच्या ‘इधोस’ या कादंबरीत जुन्नर पट्ट्यातल्या आदिवासींच्या विशेष प्रसंगी खाण्यात येणाऱ्या भुईमूगाच्या कानवल्यांविषयी लिहिलेलं वाचलं. आदिवासी रहातात तो भाग वनसंरक्षण पट्टा म्हणून जाहीर झाल्यावर आदिवासी आपल्या हक्काच्या जंगलापासून तोडला जातो, त्याच्या आयुष्याचा जो विध्वंस होतो तो मांडणारी ही एक चांगली कादंबरी आहे.

गावकुसाबाहेरच्या जमाती, आदिवासी, भूमिहीन मजूर, शहरातील आणि ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखाली असणारे कष्टकरी या सगळ्यांचा हा आहार निसर्गात जे उपलब्ध आहे त्यावर अवलंबून आहे. परंतु आता दिवसेंदिवस बड्या कंपन्यांनी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे त्यांना मिळणाऱ्या अन्नाच्या आणि पाण्याच्या स्त्रोतांवर परिणाम झालाय. तसाच परिणाम बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठी एखाद्या उत्पादनाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातीतून जे समज पसरवले जातात त्यांच्यामुळेही झालाय. जे चित्र उभं केलं जातं ते या वर्गालाही परवडत नसलं तरी आकर्षक आणि हवंहवंसं वाटायला लागलंय. पूर्वी त्यांच्या आहारात नसलेली पांढरी विषं  – मीठ, साखर, मैदा, पाश्चराईज्ड दूध आणि पांढराशुभ्र तांदूळ – ही आता हातपाय पसरत त्यांच्याही आयुष्यात स्थान मिळवायला लागली आहेत. झोपडपट्टीत रहाणाऱ्या मुलालाही अमिताभ बच्चनची जाहिरात पाहून मॅगी खावीशी वाटते. इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवणं हे जसं आपला सामाजिक, आर्थिक  स्तर उंचावण्यासाठी आवश्यक वाटतं तशीच ही आरोग्याला घातक असलेली विविध आकर्षक उत्पादनंही. त्यामुळे आधीच असलेल्या कुपोषणात भर पडतेय. नाचणीच्या सत्वासारख्या कमी खर्चात मुलांना पोषण मिळवून देणाऱ्या आहारापेक्षा साखर आणि कर्बोदकांचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक असलेली तथाकथित पोषक पेये मुलांना दुधातून दिली जातात. याने आधीच खाली असलेल्या खिशावर भार तर पडतोच पण आरोग्यावरही दुष्परिणाम होतात.

या सगळ्या वंचितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारे वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून व्यवस्थेविरूद्ध लढा देत असतात. त्यांना तर वेळेवर जेवण मिळायचीच भ्रांत. मिलिंद बोकील यांनी संपादित केलेल्या ‘कार्य आणि कार्यकर्ते’ या पुस्तकात अमर हबीब यांनी लिहिलंय ते आठवलं. नामांतर चळवळीच्या काळात मराठवाड्यात दलितांवर हल्ले होताहेत हे वाचल्यावर अस्वस्थ झालेले अमर हबीब जळगावहून औरंगाबादला निघाले. ज्या मित्राकडे उतरले होते त्याच्या घरून चहा पिऊन घाईघाईत निघाले. वाहनं नव्हती, दुकानं बंद होती, चालतच निघाले. त्यांनी लिहिलंय, “सिल्लोडला सगळी दुकाने बंद होती. कुठे काहीच खाले नाही. या निर्मनुष्य रस्त्यावर काय मिळणार? निघताना वासंतीने शबनममध्ये घातलेला ब्रेडचा पुडा होता. काढला अन् एक एक कोरडे स्लाइस चावून खाऊ लागलो. ते छान लागत होते.” मिळेल तो असा घास गोड मानणाऱ्या अशा कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकात उल्का महाजन यांनी त्यांना जेऊ घालणाऱ्या मराठे, चांदे कुटुंबांविषयी सांगता सांगता लिहिलंय, “अशा घरी गेलं, की आम्हाला पूर्ण जेवण म्हणजे चपाती, भाजी, डाळ, भात मिळायचं. नाही तर चपाती म्हणजे क्वचितच मिळायची. खिचडी नाही तर अंडी, पाव अथवा एखादं कालवण आणि भात हेच आमचं नेहमीचं जेवण असायचं.” माझे मित्र अशोक सासवडकर सुरूवातीच्या दिवसात कित्येकदा मिळेल तिथे वडापाव खाऊन रहात. सुरेखा दळवींनीही एकदा कसा बरेच दिवस वरणभातसुद्धा मिळाला नव्हता त्याची आठवण सांगितलीय. मेधाताई तर बहुधा वर्षाचा अर्धाअधिक काळ उपोषणच करीत असतात.

आदिवासींकडून जंगलं हिरावून घेतली जाताहेत.  अजूनही टिकून राहिलेल्या जातीव्यवस्थेतले अन्याय चालूच आहेत. खाणींचं बेफाट तोडकाम होतंय.  डोंगर पोखरले जाताहेत. बेफाम वृक्षतोड होते आहे. नद्यांचे गळे आवळले जाताहेत. मोठमोठ्या कारखान्यांनी नद्यांमध्ये सोडलेली विषारी द्रव्ये पाणी, माती दूषित करताहेत. शेतीविषयक चुकीच्या धोरणांमुळे शेतीव्यवस्था ढासळत चाललीय. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होणारे तपमानातले, पर्जन्यमानातले बदल आणि परिणामी सततचा सुका किंवा ओला दुष्काळ, वाढती महागाई, वाढती बेकारी या सगळ्यांमुळे अभावग्रस्तांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ तर होतच राहील. परंतु त्याचबरोबर आत्ताआत्तापावेतो त्यांना निसर्गात सहज उपलब्ध असलेले अन्नाचे आणि पाण्याचे स्त्रोत नाहीसे होत जातील.

तळागाळातले लोक आणि त्यांच्यासाठी लढणारे कार्यकर्ते यांचं हे कुपोषण मिटेल अशी आशा बाळगायला नजीकच्या काळात तरी वाव दिसत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s