प्रवासाची शिदोरी

काहींना प्रवास करायला आवडतं काहींना नाही. पण आवडत नसेल त्यांनाही तो चुकत नाही. कामानिमित्त प्रवास करावेच लागतात. पूर्वी लोक व्यापारासाठी नवनवे प्रदेश धुंडाळत. काही पादाक्रांत करायला नवा प्रदेश हवा, आपली सत्ता जगभर हवी म्हणून फिरत. तर काही पोटासाठी देशोधडीला लागत. लक्ष्मीबाई टिळकांच्या विहिणीने बालकवींना सांगितलेल्या गोष्टीतल्या सारखं “य़ेक डोंगुर वलाडंला, दुसरा डोंगुर वलांडला..योक समिंदर वलांडला, दुसरा समिंदर वलांडला.” असाही प्रवास चालत असे. काही लोक गुहेत विश्रांती घेत, काही झाडाखाली, तर पुढच्या काळात मंदिरं, धर्मशाळा रहाण्यासाठी उपलब्ध असत. आपल्या धर्माजातीचा असेल तर पांथस्थाला रहायला पडवीत जागा मिळत असे. दूरवरचे प्रवास हत्ती, घोडा, उंट अशा प्राण्यांच्या पाठीवर बसून तर समुद्रावरचा प्रवास जहाजाने असा करीत. आदीम टोळ्यांमधल्या बायका भटकत प्रवास करीत असाव्यात. पण पुरुषप्रधान कुटुंबासंस्थेच्या उदयानंतर इंग्रज आमदानीपर्यंत बायामाणसं सहसा प्रवास करीत नसत. कुटुंबासोबत तीर्थयात्रा किंवा नात्यागोत्यातल्या समारंभानिमित्ताने केला तरच बायकांच्या नशिबी प्रवास असे आणि तालेवाराच्या घरची असेल तर बाईला पालखी नाहीतर बायका चालतच प्रवास करीत. सोबत कोरडा शिधा घेऊन जिथे विश्रांती घ्यायची तिथेच चूल मांडून स्वैंपाक करीत. आता मात्र प्रवासाची संकल्पनाच बदलून गेलीय. नोकरीसाठीच लोकांना दिवसाचे चारचार तास प्रवास करावा लागतो. हवी त्या प्रकारची वाहनं असतात, त्यात सोयीसुविधा असतात. पण हे सगळं वरच्या वर्गातल्या लोकांसाठी जनसामान्यांचा प्रवास आजही खडतरच असतो म्हणा. पण तरीही मध्यमवर्गाच्या खिशात पैसा असल्याने देशांतर्गत आणि प्रामुख्याने विदेशात प्रवास करण्याची टूम निघालीय.

पूर्वी म्हणे प्रवासाला जातांना भूकलाडू, तहानलाडू किंवा दशम्या करुन सोबत नेत. हे तहानलाडू, भूकलाडू नेमके कसे करतात हे कधी कळलं नाही, पण नुसतंच पोट भरणारे नसावेत. कारण पूर्वीचे प्रवास खडतर असत. पायी चालावं लागे. त्यामुळे पौष्टिक पदार्थ त्यात असावेत बहुधा, जसं की खजूर, शेंगदाणे वगैरे आणि तहानलाडूत काकडी, कलिंगडासारखं काहीतरी तहान भागवणारं असावं असं  मला नेहमी वाटे. आताचे प्रवास इतके खडतर नसतात. काही वेळा तर प्रवास केल्यासारखंही वाटत नाही, पोटातलं पाणीही न हलता अल्लाद प्रवास होतात. तरीही अलीकडे दुरांतोने प्रवास करायच्या आधी एका तरुण मैत्रिणीने स्वानुभवामुळे आवर्जून सांगितलं, पाणीही मिळत नाही, सोबत खाणंपिणं न्या. तर असं अजूनही करावं लागतं. शिवाय कधी पथ्यपाणी असतं. बाहेर- विशेषतः रेल्वेच्या प्रवासात -चांगलं अन्न मिळेल की नाही शंकाच असते, त्यामुळे मी नेहमीच सोबत खायच्याप्यायच्या गोष्टी घेऊन प्रवास करते. आमच्या मुलांना तर लहानपणी प्रवासाच्या उत्सुकतेइतकीच आईने घेतलेली शिदोरी उघडायची उत्सुकता असे. पदार्थ एरवी घरात केले जात असले तरी वेगळ्या अवकाशात ते खाण्यात मजा येत असावी. विमानाच्या प्रवासात कुणी खायला सोबत न्यायची गरजही नसते आणि कुणी नेतही नाही. पण एकदा डॉ.अशोक रानडे यांच्या पत्नीने सांगितलेलं अजून आठवतं. डॉ. रानडे हे जेव्हा पहिल्यांदा परदेशप्रवासाला निघाले तेव्हा विमानप्रवास ही मराठी लोकांसाठी फार नवलाई होती. त्याचे तपशील माहीत नसत. त्यामुळे त्यांच्या आईने प्रवासात खायला शिरा देऊ का असं विचारलं होतं म्हणे. पण आता परदेशप्रवास मध्यमवर्गालाही इतका सवयीचा झालाय की मुंबईहून पुण्याला जावं इतक्या सहजतेने लोक जगभर हिंडत असतात. पण देशांतर्गत छोट्या मोठ्या प्रवासात सोबत खाणं पिणं घेणं सोयीचं होतं कधी कधी.

आमच्या लहानपणी भाकरी किंवा चपात्या, कोरडं पीठलं किंवा मोड आलेल्या कडधान्याची ऊसळ, कोरडी चटणी असं सोबत दिलं जाई. फारच लाडाकोडाचं असेल तर तूपसाखर लावलेली चपाती, लाडू असं काहीबाही मिळत असे. त्यावरुन आठवलं आमच्या शाळेच्या सहलींना नेहमी एक ठरलेला बेत असे, त्यामागे काय विचार होता ते तेव्हाही कळलं नाही आणि आताही कळत नाही. तो बेत असायचा कांदेपोहे, बुंदीचे लाडू आणि केळी. आता विकतच्या पुरणपोळ्या सहज उपलब्ध असतात, त्या टिकतातही. त्यामुळे माझ्या ओळखीतल्या कित्येक बायका चक्क परदेशी जातांनासुद्धा पुरणपोळ्या, मेथीचे ठेपले असले पदार्थ सोबत नेतात. आमचा मित्र डॉ. प्रकाश खांडगे शाकाहारी आहे. तो चक्क सोबत चपात्या आणि  कोरडी चटणी घेऊन चीनमध्ये गेला होता आणि त्याने तिथे  तेच खाऊन गुजराण केली म्हणे. माझे एक तमिळी ब्राह्मण वरिष्ठ परदेशात जातांना सांबार पावडर घेऊन जात आणि जातील तिथे सांबारभात शिजवून खात. इतरत्र फिरतांना योगर्ट, फळं आणि आईस्क्रीम खाऊन रहात. परदेशात फिरतांना मांसाहारी लोकांची पूर्वी खूप पंचाईत होत असे, त्यामुळे ते वेगवेगळे पटकन करता येणारे तयार पदार्थ इथूनच घेऊन जात. आता सहसा वेगन लोकांमुळे अशा लोकांनाही जगात जवळपास सर्वत्र शाकाहारी पदार्थ मिळतात.

आमचे डहाके सर प्रभाताईंच्या हातचे धपाटे खाऊन रहातात प्रवासात. त्यांच्या विदर्भात आणि मराठवाड्यातही प्रवासात धपाटे घेऊन जाणारे लोक बरेच पाहिलेत मी. नागपुरात अजून एक प्रकार पाहिला. एका मित्राच्या घरी जेवतांना कोंबडीच्या रश्शासोबत मांडे होते. अरेच्च्या, सांगायचं राहिलंच. तुम्ही म्हणाल की पुरणाचे मांडे आणि कोंबडीचा रस्सा? तर मंडळी तुम्हाला वाटतं तसं नाही. हे पुरणाचे नव्हे तर साधे मांडे. बहुधा पुरणाच्या मांड्याला करतात तसंच फार मेहनत घेऊन केलेल्या कणकेचे खापरावर भाजून केलेले पण ते अख्खे नसतात तर त्यांचे लांब लांब कुरकुरीत तुकडे केलेले असतात. मित्राच्या पत्नीने प्रवासात पोटाला आधार म्हणून हे मांडे दिले. ते नुसते खायलाही छान लागतात. त्याशिवाय विदर्भातलाच माझा एक मित्र गाकर घेऊन जात असे प्रवासात.

कोकणातले लोक सहसा घावन, चटणी घेतात सोबत. मांसाहारी लोक कोकणात अधिक ते तांदळाची भाकरी आणि सोबत कोलंबीचं सुकं किंवा तेलावर परतलेला जवळा नेत असावेत. मीही मूळची कोकणातली. त्यातून मांसाहार आवडीने करणारं सासर. मुलं लहान असतांना मीही इडल्या नेत असे. माझी कोकणात रहाणारी सर्वात मोठी बहीण आम्ही कुडाळहून मुंबईला बसने (कोकण रेल्वे यायच्या आधीच्या काळात) यायला निघालो की डॉ. रानड्यांच्या आईसारखा केळं घालून केलेला शिरा केळीच्या पानात गुंडाळून देत असे. तसा शिराही मी नेत असे. पण नंतरच्या काळात शिजवण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर न करता अंगच्या रसावर परतून परतून केलेलं कोंबडीचं किंवा मोरी माशाचं (मुशी) सुकं न्यायला लागले, कारण ते कशाहीसोबत खाता येई. विशेषतः पावासोबत. असाच एक प्रकार कोळी, आगरी किंवा पालघर, डहाणूकडे पाहिला. तो म्हणजे कोलीम. कोलीम ही अतिशय बारीक कोलंबी असते, ती धोतराच्या कापडात पकडतात म्हणे. त्यात कधी कधी प्लास्टिक किंवा इतर कचरा असेल तर ती अगरबत्तीच्या काडीने साफ करावी लागते इतकी छोटी असते. भरपूर तेलावर मीठ, मसाला घालून परतलेलं कोलीम हा चटणी आणि लोणचं यांच्या मधला प्रकार असतो. तो कशाही सोबत खाता येतो, तांदळाची भाकरी, चपाती, पाव किंवा चक्क वरणभातासोबत तर ती फार छान लागते. आमच्या येशू पाटलांच्या आई वासंती पाटील आमच्यासाठी कोलीम पाठवतात. ती आमची मुलं चक्क परदेशातही घेऊन जातात. ती फ्रीजमध्ये ठेवल्यावर बरेच महिने टिकते. आमचा एक कोळी मित्र सत्संगाला जातांना सोबत कोलीम घेऊन जाई, मग जेवणखाणं मिळालं, तर मिळालं, नाही मिळालं तरी गड्याकडे कोलीम असे, पाव मिळाला तरी काम भागत असे.

गुजराती लोकांचा प्रवासातला खाण्याचा डबा जरा इतर सामानापेक्षा मोठा असतो (सगळ्यांचाच नाही, पण बऱ्याच लोकांचा) असं माझं निरीक्षण आहे. खाकरा, फरसाण, ठेपले, फळं, मिठाई अशी भरगच्च शिदोरी असते. पंजाबी लोक परोठे घेतात. बंगाली लोकांना पुरी (ही मैद्याचीच आवडते त्यांना) भाजी आवडते प्रवासात. तशी ती इतर राज्यांमधल्याही बऱ्याच लोकांच्या प्रवासाच्या शिदोरीत असते. तिखटमीठाच्या पुऱ्याही प्रवासात न्यायला बऱ्याच लोकांना आवडतात. कर्नाटकातला निपट्टू हा तांदळाच्या तळलेल्या पुऱ्यांसारखा पदार्थही प्रवासात बरा पडतो. आमच्या सासरच्या पट्ट्यात राळे घातलेल्या सारणाच्या पुऱ्या प्रवासात नेत असत. मध्यप्रदेशात, खानदेशात दराबा नावाचा गव्हाच्या रव्याचा तूपात परतून केलेला पदार्थही असा प्रवासात खायला एक चांगला, बल देणारा, तकवा टिकवणारा पदार्थ आहे. पण गोड फार खाता येत नाही.  दक्षिणेकडे केळीच्या पानातून इडली, मलगापोडी किंवा स्टीलच्या डब्यातून सांबारभात किंवा फार व्याप नको असेल तर दहीभात घेऊन जातात.

हे अर्थात जरा आर्थिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या किंवा मध्यमवर्गीय माणसांच्या बाबतीत.

आर्थिक दृष्ट्या कमकुवत माणसं आपली कोरडी रोटी,चटणी घेत असतील.  बिहार, उत्तर प्रदेश, झारखंडकडच्या अशा गरीबांचं प्रवासातलं आणि एरवीचंही खाणं म्हणजे चूडा किंवा सत्तू. चूडा म्हणजे पोहे हे कोरडे असल्याने सोबत घेणं सोपं पडतं आणि ते कसेही खाता येतात. तसंच सत्तूचंही. सत्तू दूध, दही, पाणी कशातही मिसळून घेता येतो. शिवाय त्याने पोट भरतं आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. त्यामुळे लांबच्या प्रवासात हे दोन्ही पदार्थ बरे पडतात.

वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या परिस्थितीतल्या लोकांचे हे प्रवासातल्या शिदोरीचे पर्याय पाहिले, तरी मला अजूनही एक जुना पर्याय आवडतो. आम्ही पदभ्रमंतीला जातांना जसं कोरडे पदार्थ सोबत नेऊन मिळेल तिथे तीन दगडांची चूल मांडून जे उपलब्ध असेल ते शिजवून खातो ते मला फार आवडतं. पूर्वी नाही का धोतराच्या पानात किंवा जुन्या लुगड्याच्या तुकड्यात डाळ,तांदूळ, पीठ, मीठ घेऊन जाऊन धर्मशाळेत स्वैंपाक करुन खात, तसं काही लोक अजूनही करतात. मलाही तसं करायला आवडेल. जवळपास नैसर्गिक रित्या उगवलेला जो काही भाजीपाला असेल तो मिळाला तर बोनस समजायचा. पण आता आपल्या प्रवासाच्या कल्पना फार मध्यमवर्गीय  झाल्यात हे खरं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s