आज मिनज लाटकर या मैत्रिणीने फेबुवर विचारलं मित्रमंडळींना -बोलीभाषेतला कोणता शब्द तुम्हाला सुंदर वाटतो? उत्तरादाखल बरेच शब्द दिले गेले. बहुसंख्य लोकांनी माय किंवा आय, अम्मा हा शब्द सुंदर वाटल्याचं सांगितलं. पण इतरही काही शब्द समोर आले. हुबलाक, हुर्द, खल्लास, झुर्र, लका, चेडवा, झ्याक, इलुंस, मोक्कार, व्हदडाक, कुटाणा, वानकिनीची, भैताड, चिंगाट, बाजिंदी. मीही त्यात सासरमाहेरच्या काही शब्दांची भर घातली. मला सईबाई हा ओव्यांमधला मैत्रिणीसाठी वापरला जाणारा शब्द फार सुंदर वाटतो. पण काही आवडते शब्द आहेत ज्यांना काही पर्याय सापडणार नाहीत. काही सासूबाईंकडून ऐकलेले आहेत. त्या कशाची चौकशी करायची असली की म्हणत जरा इन्कूरी कराय पायजे. त्यांना अध्येमध्ये काही खायला दिलं की नको वाटे, मग म्हणत, “अतालबताल खाऊन उगाच बाताडाबातड व्हती गं” पण बराच वेळ काही खाल्लं नसलं तर म्हणायच्या, “येळंमाळं काय खाल्लं नाय बग.” टोस्टला टोच म्हणत तर ट्यूबला टूप.
कडूसं पडणं हा संध्याकाळच्या अंधुक वातावरणाला फार साजेसा शब्द वाटतो मला. माझ्या माहेरच्या मालवणीतला गजाली, पहाटेसाठी फाटफट, कालवणासाठी निस्त्याक, विळीसाठी वापरला जाणारा आडाळो, फडक्यासाठी वापरला जाणारा भानशेरा, करंजीसाठी वापरला जाणारा न्हेवरी, असे बरेच शब्द वेगळे आहेत जे आवडतात.
बोलीभाषेतल्या या शब्दांना मातीचा सुगंध आहे तसा गावी कुटल्या जाणाऱ्या मिरचीमसाल्याचा ठसका आहे आणि गावरान बोरांची आंबटतुरटगोड चव आहे. माझ्या सासूप्रमाणे इतर अनेक लोक जसं इंग्रजी शब्दाला बोलीचं वळण दिलेले इन्कूरी, टूप शब्द वापरतात, तसं इतर राज्यांमध्ये होत असावं. उदाहरणार्थ हैदराबादेत साऊंड अँड लाईट शोची तिकीटं काढायच्या खिडकीवर लिहिलं होतं – बुकिंगा कैंटर. पण काही ठिकाणी प्रादेशिक भाषाच कटाक्षाने वापरली जाते. तिथेही इंग्रजीला फार सुंदर पर्याय आढळतात. जसं गोव्यातल्या एका पाटीविषयी मी लिहिलं होतं. तिथल्या एका महाविद्यालयात Grievance Redressal Room साठी कागाळ करपाची कूड असं म्हटलं होतं. ते मी फेबुवर लिहिल्यावर आमचे मित्र प्रवीण बांदेकर यांनी लहानपणी कोकणी बातम्यात वरचेवर ऐकलेल्या एका शब्दसमुच्चयाची आठवण करुन दिली तो म्हणजे भायल्या भानगडींचो मंत्री (External Affairs Minister). या अशा पाट्या फार चित्तवेधक वाटतात. असा काही ठिकाणच्या पाट्यांवरचा मजकूर हा तर स्थानिकांची स्वभाव वैशिष्टयं सांगणारा असतो. (त्यावरुन आठवलं, मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘सावधान, समुद्र पर्यटकांनी खवळलेला आहे’ अशी पाटी होती ती मालवणी माणसाच्या तिरकस विनोदबुद्धीची साक्ष देणारी आहे. एकदा मालवणात तरीमधून सिंधुदुर्गावर जातांना सोबत अर्धा डझन लहान मुलं होती, त्यांचं पूर्ण तिकीट घ्यायला लागल्यावर बहिणीने तरीवाल्याला म्हटलं, “न्हानग्या पोरांचा अर्धा तिकीट घेवक व्हया तुमी” त्यावर तरीवाला म्हणाला, “नाय, तसा तुमचापन अर्धाच तिकीट घेवक व्हया.”) कोल्हापुरकडेही बऱ्याच पुल्लिंगी शब्दाचं नपुंसकलिंगीकरण करण्याची पद्धत आहे. एखाद्या मित्रासंबंधी कोल्हापुरकर जितक्या सहजपणे “ग्यालं त्ये, आता कुटलं यायला” म्हणेल तितक्या सहजपणे बोलणं अवघडच. कारण आपल्या अवतीभवती वावरत असलेल्या प्रमाणभाषेचं दडपण आपल्यावर असतं. तिची अशी काही व्यवस्था असते ती सहजी मोडता येत नाही. म्हणजे बोलीला तशी व्यवस्था नसते असं नाही. पण तिच्या चौकटी फार घट्ट नसाव्यात. त्यांची उघड जाणीवही बोलणाऱ्यांना नसावी.
कोणतीही बोली शिकतांना तिच्या शिव्या आणि म्हणी यायला लागल्या तर ती आपल्याला बोलता यायला लागली असं मानायला हरकत नसावी. बोलींमधल्या शिव्या आणि म्हणींना समांतर शिव्या आणि म्हणी काही प्रमाणात प्रमाणभाषेत आल्या असल्या तरी नेहमीच ते शक्य नसतं. उदाहरणार्थ मालवणी माणूस पावलोपावली आवशीचो घो म्हणतो. त्याचा अनुवाद करणं शक्य नाही. (इथे पुन्हा एक किस्सा आठवला. माझे मोठे मेहुणे असेच दर दोनतीन वाक्यांनंतर आवशीचो घो म्हणत. एकदा ते धाकट्या बहिणीकडे गेले तर दार उघडणाऱ्या माझ्या छोट्या भाचीने जाहीर केलं, “आवशीचो घो इलो.” मग मोठाच हशा उसळला आणि तिला सांगावं लागलं, “अगो आवशीचो नाय तो मावशीचो घो.”) मालवणीतली अशीच एक म्हण म्हणजे आपलीच मोरी नि मुताक चोरी. मालवणीत अशा बऱ्याच म्हणी आहेत -कपाळार मुगुट नि खालसून नागडो, देव गेल्लो हगाक नि ह्यो गेल्लो अक्कल मागाक.
बोलीभाषेतली ही प्रादेशिक स्वभाववैशिष्ट्यं, त्यांचा इरसालपणा, ठसका, गोडवा टिकून रहाण्यासाठी पुन्हा एकदा त्यांची उजळणी करायला हवी. आता बोलींचा वापर बऱ्याच मालिका, वेबमालिकात झालाय ज्या ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्यात. त्या आधी कळायला कठीण गेलं तरी त्या माध्यमामुळे हळूहळू लोकांच्या सवयीच्या होतात. त्यांचा वापर करायला हवा. मग लोक आपसूक म्हणतील चालतंय की!
फारच छान लिहिलं आहे।
विषय खूप मोठा आहे। व्यक्ती निवडून जसं सासूबाईंची भाषा तसेच भेटलेल्या माणसांनी कोणकोणत्या शब्दांची समृद्ध केले अशी मालिका लिही। सध्या फारच गरज आहे
LikeLike
बघते. विचार करते. धन्यवाद विजय
LikeLike