
मी अशी काहीतरी मोबाईलमध्ये वाचत बसले होते आणि अचानक एक सूक्ष्म असा आवाज झाला आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या चष्म्याची तार लटकतांना दिसली. तातडीने त्या बाजूचं भिंग हातात धरुन ठेवून मी चष्मा हळूच उतरवला, चष्मा, भिंग जपून एका पाकीटात घालून ठेवलं. आपल्या धोरणीपणावर खूष होता होता माझ्या इतका वेळ जी गोष्ट ध्यानी आली नव्हती ती अचानक येऊन आदळलीच. आई गं, या टाळेबंदीच्या अवघड काळात आपला चष्मा तुटलाय. आता काय? लगेच स्वतःला सावरुन (पुन्हा आपल्या धोरणीपणावर खूष होत) चष्मा जिथून घेतो त्या दुकानात फोन लावला. ते म्हणाले उद्या माणूस पाठवतो. मग जीव जरा भांड्यात पडला.
थोड्या वेळाने सवयीने उघडलेला लॅपटॉप बंद करायला लागल्यावर वाटलं अरे बापरे कसं होणार आपलं चष्मा दुरुस्त होईस्तोवर. तरी जरा टीव्हीवर काहीबाही पहात टीपी केला. घरातली रेंगाळलेली कामं उरकली. रात्री झोपतांना सवयीने पुस्तक उघडलं, त्यामध्ये घालून ठेवलेलं खुणेचं पान उलटसुलट केलं आणि ठेवून दिलं. मागून नवऱ्याचा आवाज आला, “काय गं, नित्यकर्म करावं म्हणून उघडून मिटलंस की काय?” खरंच आपण वाचन हे नित्यकर्म करावं तितक्या यांत्रिकपणे करतोय की काय असा प्रश्न पडला जरा वेळ. मग झोप लागायला जरा वेळ लागला.
सकाळी उठून पुन्हा तेच. वॉट्स अॅप उघडायला गेले नि लक्षात आलं वाचता येत नाहीय. नाश्ता झाल्यावर सवयीने लॅपटॉप उघडला नि पुन्हा मिटून ठेवला. असं वाटायला लागलं चष्मा नाही, जगाशी संपर्कच तुटलाय आपला. लिहिणाऱ्या वाचणाऱ्या माणसांनाच नव्हे तर फक्त वॉट्स अॅप वाचणाऱ्या व्यक्तीलाही हे वाटू शकतं की. किंबहुना त्यांना तर अधिकच वाटू शकतं. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर काही दिवस वर्तमानपत्र किंवा वॉट्स अॅप, फेबु वाचता येत नाही म्हणून अत्यंत अस्वस्थ झालेल्या व्यक्ती मी पाहिल्यात.
पण खरं तर चष्म्याचे इतरही कित्येक उपयोग हळूहळू ध्यानी येतात माणसाच्या. एकदा माझी मैत्रीण योगिनी राऊळ म्हणाली, “शुभा, अगं आज एक अपघात झाला स्वयंपाकघरात. डोळ्यावर चष्मा होता म्हणून वाचले बाई.” तेव्हापासून मीही चष्मा लावून स्वयंपाक करायला लागले. तसे स्वयंपाकघरात अपघात होतच असतात. एकदा तर माझ्या सगळ्या चेहऱ्यावर गरम तेल उडून चेहरा असा झाला होता की रामसे बंधूंच्या चित्रपटात हमखास भूमिका मिळाली असती. (ते काही झालं नाही फक्त एका खवचट सहकाऱ्याने प्रशस्तीपत्र दिलं, “तुम्ही फारच चांगला स्वैंपाक करीत असणार बघा. नाहीतर आमची बायको इतकी वर्ष स्वैंपाक करते पण असं कधी झालं नाही.) माझा एक कवीमित्र तर सांगत होता की तरुणपणात आपण विचारवंत, बुद्धीजीवी वगैरे दिसावं यासाठी तो झिरो नंबरचा चष्मा लावीत असे. तसा मला अजून एक उपयोग होत असे चष्म्याचा. माझा एक चष्मा उन्हात गेल्यावर काळा होत असे, त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे रोखून किंवा रागाने पहाता यायचं बिनधास्त. काही लोक तर एखाद्या प्रॉपसारखा हातवारे करतांना जागा भरायलाही चष्म्याचा वापर करतात. माझ्या ओळखीच्या एक बाई फक्त स्टाईलमध्ये डोक्यावर ठेवता यावा म्हणून चष्मा वापरत असाव्यात असा मला दाट संशय आहे.
पण मला फक्त लिहिण्यावाचण्यासाठी हवा होता हो चष्मा. पण आमच्या गावडे ऑप्टीशियनवाल्यांनी चोवीस तासांच्या आतच माणूस पाठवला. नवल म्हणजे त्याने उभ्या उभ्या पाच मिनिटांत चष्म्याला तार लावली नि हातात दिला म्हणजे थोरच. पण त्यामुळे आता घरातली रेंगाळलेली कामं पुन्हा रेंगाळणार ना हो!