
लहानपणी आम्ही चाळीत रहात असू तेव्हा रात्री घुंगरांचा आवाज आला की भीती वाटे. शेजारपाजारच्या लोकांकडून ऐकलेलं असे की मूळ मालक किंवा राखणदार घुंगराची काठी घेऊन फिरतो. रात्री कुणी नळावर आंघोळ करीत असेल तर त्याला चोप देतो. रात्रपाळीवरुन आलेला असाच एक कामगार नळावर आंघोळीला गेल्यावर अर्धांगवायूचा झटका येऊन कोसळलेला दुसऱ्या दिवशी आढळल्यावर तर या शंकांना बळ मिळत असे. आता ते आठवलं की हसू येतं.
पण अशा कित्येक दंतकथा लहानपणी ऐकलेल्या होत्या. लहानापासून थोरांपर्यंत सगळेच असं काही सांगत असत. आमच्या वर्गातला मॉनिटर बंड्या म्हापणकर शाळेशेजारी उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या खोडात खोचलेला चाकू दाखवून बढाया मारीत असे की अमावास्येच्या रात्री त्याने तो येऊन खोवून ठेवलाय भुताला घाबरवायला. एका मैत्रिणीला तर नादच होता. ती स्वतः भुतांच्या गोष्टी ऐकवी आणि इतरांनीही सांगाव्यात म्हणून हट्ट धरीत असे. माझ्या चुलतभावाचा मित्र थॉमस मला म्हणत असे, “तुला पटत नाही ना, तर मग ये बरं दोन नंबरच्या शाळेजवळ अमावास्येला रात्री बारा वाजता.” मला कुणी जाऊ दिलं नाही म्हणा, पण माझे वडील त्यांच्या तरुणपणी खरोखरीच भुतं असतात का हे बघायला रात्री स्मशानात जात. जातांना मामांना कळू नये म्हणून भावाच्या पायाला दोरी बांधून ठेवीत. ती दोरी हलवली की आमचे काका दार उघडून वडीलांना घरात घेत. पण इतकं करुनही त्यांना काही भुतं दिसली नाहीत. आता यावरही लोकांनी उपाय शोधलाय. काय तर म्हणे राक्षस गणाच्या लोकांनाच भूत दिसतं बाकीच्या लोकांना नाही. असं असेल आणि जग तीन गणांमध्ये विभागलं गेलं असेल तर किमानपक्षी एक तृतीयांश लोकांना भूतं खरोखरीच दिसायला हवीत. ती खरोखरीच दिसतात की त्यांच्या मनात असतात? यावरून एक किस्सा आठवला.
आमची बँक सुरुवातीच्या काळात ज्या इमारतीत होती, ती इमारत नव्याने बांधलेली होती. त्याआधी तिथे पारशी लोकांची एक इमारत होती. ती आग लागून जळाली. त्यावेळी अर्थातच काही माणसं मृत्यूमुखी पडली. मग आम्ही तिथे असतांना बऱ्याच अफवा होत्या. उद्वाहनातून वाचवा वाचवा असा आवाज येतो. अमक्या मजल्यावर काहीतरी दिसतं, ऐकू येतं वगैरे वगैरे. लोक मीठमिरची लावून एकमेकांना आलेले अनुभव सांगत. तर एकदा असं झालं- बँकेचं सहामाही क्लोजिंगचं काम होतं. सगळा ताळेबंद जुळवून काम संपल्यावरच लोक घरी जात. उशीर झाला तर रात्री बँकेतच थांबत आणि सकाळी पहिल्या गाडीने घरी जात. असेच आमचे दोन सहकारी काम आटोपायला उशीर झाल्याने तिथेच थांबले. रात्री दरवाजा घट्ट लावून टेबलं एकमेकांना जोडून झोपी गेले. मध्यरात्री दरवाज्यावर थाप पडली. दोघेही घाबरले. आतूनच विचारलं कोणंय म्हणून. तर उत्तर आलं – हारवाला. मग तर यांची कढी पातळ झाली. कारण आधीच्या इमारतीत फुलपुडी, हार देणारा हारवाला मृत्यूमुखी पडला होता. दरवाजा अजिबात न उघडता, रामरक्षेचा जप करीत दोघेही पाय पोटाशी घेऊन झोपले. सकाळी पहिली गाडी पकडायला उठले. दरवाजा उघडला तर सुरक्षारक्षक म्हणे, “काय तुम्ही घोडे बेचके झोपला साहेब, अहो तो तारवाला तार घेऊन आला होता, पण तुम्ही दारच उघडीनात, तेव्हा मीच घेतली सही करुन. घ्या ही.” अशी गंमत.
नंतर आम्ही ज्या इमारतीत आमची मुंबई शाखा उघडली, तिथल्या गच्चीवरून उडी मारुन आमच्याच एका सहकारी मुलीने आत्महत्या केली होती. माझी अधिकारी म्हणून बढती झाल्यावर सुरुवातीला काम आटोक्यात येईपर्यंत मी उशिरा बसून काम संपवून निघत असे. कधी कधी दहा वाजत. तेव्हा आमचा एक अभियंता सहकारी सांगे, “मॅम देर राततक मत रुकिए, सफेद कपड़े में लेडी का भूत आता है यहाँ.” मला तर कधी बिचारी दिसली नाही (आता माझा राक्षस गण वगैरे आहे का हे विचारू नका, माझा पत्रिकेवर विश्वास नसल्याने पत्रिकाच नाही.) हे लेडीचं भूत सफेद कपड्यातच का असतं नेहमी हा एक प्रश्न मला पडायचा. श्रीकांत सिनकरांच्या कथांमध्येही दुचाकीवरून जाणाऱ्या नायकाला सफेद कपड्यातली तरुण मुलगी लिफ्ट मागते, मग ती स्मशानात अंतर्धान पावते असे उल्लेख वाचल्यावर मला प्रश्न पडे की इतक्या लंबूस्टांग सिनकरांना भूत घाबरलं कसं नाही. ते सोडा पण ते सफेद कपड्यातलंच का असतं हा खरंच एक गहन प्रश्न. मला तर वाटतं की रहस्यकथालेखक आणि चित्रपटांच्या क्षेत्रातल्या लोकांनी तयार केलं हे मिथक असावं. विशेषतः तरुण माणसं गेली की त्यांच्या इच्छा राहून गेल्या असल्याने त्यांचं भूत झालं असावं अशा समजुतीतून या लोकांना आपणच निर्मिलेली ही भुतं दिसतात की काय कोण जाणे. मग त्यांना कपडे कोणते घालायचे तर सफेद बरे असावेत, रंगीत कपड्यातलं भूत खरं तर किती छान दिसेल, पण नाही, आपल्याकडे विधवा बाईला पांढरे कपडे नेसायला भाग पाडतातच पण बिचारी भुतंही या लोकांच्या तावडीतून सुटत नाहीत. या आपणच निर्मिलेल्या भुतांच्या तावडीतून सुटायला फार धडपड करावी लागते. तंत्रमंत्र, देवऋषि, भगत काय न् काय. फारच गळ्यापर्यंत अडकला असाल तर मात्र मानसोपचार करावे लागतील. पण एरवी खरं तर आपला बुद्धिप्रामाण्यवाद कायम ठेवला तरच यातून सुटका करुन घेता येईल.
माझी शेजारीण ग्रीवा ही तशी शांत, नो नॉन्सेन्स प्रकारातली, फारसं न बोलणारी, पण बोलेल ते विचारपूर्वक अशी. पण तिचा नवरा बलिराज परदेशी गेल्यावर ती घरात एकटीच उरली. संबंध दिवस तर बँकेतली नोकरी करण्यात जाई. पण रात्री हा एकटेपणा घेरुन येई. एक दिवस ती मला म्हणाली, “Shubhangi, I hear voices.” मला कळेना तिला काय म्हणायचं ते. तर तिने स्पष्ट करुन सांगितलं की तिला रात्री कसले कसले आवाज ऐकू येत. मी तिला समजावलं की रात्री शांतता असते त्यामुळे साधे साधे आवाज जसं की वाऱ्याने कॅलेंडरचं पान फडफडणं, एखादी पाल सरपटत जाणं हेही जोरात ऐकू येतात आणि ते कसले ते कळत नाही. मी तिला म्हटलं की तू आवाज ऐकलास की दिवा लावून पहा किंवा मला फोन कर मी लगेच येते. मग ती शांत झाली. ती बुद्धिप्रामाण्याला मानणारी असल्याने तिला माझं म्हणणं पटलं आणि मग तिला शांत झोप लागू लागली. त्याच दरम्यान तिच्याच फ्लॅटखाली भाड्याने घर घेऊन रहाणाऱ्या दोन मुलींनीही तक्रार केली की रात्री वाद्यांचे, घुंगराचे आवाज येतात. भुताटकी आहे वगैरे. शोध घेतल्यावर लक्षात आलं की खालच्या फ्लॅटमध्ये एक व्यक्ती एकटीच रहात होती. बरेचदा एकट्या रहाणाऱ्या व्यक्तींना टीव्ही, रेडियो यांच्या आवाजाचा आधार वाटतो, घरात कुणीतरी आहे असं वाटतं, तसं ती व्यक्ती टीव्ही, रेडियोवर शास्त्रीय संगीत ऐकणं, नृत्याचे कार्यक्रम पहाणं असं रात्री दोन अडीच वाजेपर्यंत करीत असे. त्यातून गायननर्तन करणारं भूत उभं राहिलं. त्या व्यक्तीला सांगितल्यावर तिने आवाज कमी करुन ऐकायला सुरुवात केल्यावर गायननर्तन करणारं भूत पळून गेलं ते गेलंच.