
काल रात्रीच्या सोसाट्याच्या वाऱ्यापावसात समोरच्या सोसायटीतलं गुलमोहराचं झाड उन्मळून पडलं. पडतांना अर्थातच इमारतीबाहेर पार्क केलेल्या काही गाड्यांपैकी एका गाडीचा चुराडा झाला. माझी मुलगी सांगत होती, गाडीचा मालक बघून गेला, त्याने विमा कंपनीला, पोलीसांना कळवलं. पण वरकरणी तरी त्याला फार वाईट वाटल्याचं दिसलं नाही. मी तिला म्हटलं एक तर विमा काढलेला असल्याने आर्थिक नुकसान होत नाही, शिवाय प्रत्येकाची भावनिक गुंतवणूक असतेच असं नाही ना किंवा त्या माणसाला बऱ्याच पुरुषांप्रमाणे भावना दाखवायला आवडत नसेल. माझा मुलगा हॉटेलमध्ये काही दिवस राहिला तर त्या खोलीतही गुंतून जातो, प्रेमाने तिला सोडतांना निरोप देतो, तसं सर्वांचंच असेल असं थोडंच आहे.
आता या झाडाचंच पहा ना, आम्ही इथे रहायला येऊन एकवीस वर्षं लोटली, त्याही आधीपासून ते इथे होतं. उन्हाळ्याच्या दिवसात फुलायला लागलं की त्याच्या फुलांनी वातावरण रंगीत होऊन जाई. एरवीही मंद उन्हात त्याच्या नाजूक पानांच्या सावल्यांची नक्षी सुंदर दिसे. एखाद्या उन्हाळ्यात फुलांचा रंग फार गडद झाला की आम्ही म्हणत असू यंदा पाऊस फार पडणार वाटतं. गुलमोहर भारतात येऊन दोनशेहून अधिक वर्ष झाली तरी इथल्या पक्ष्यांना अजून या झाडाची फार सवय नसावी. कारण मी कधी फारसे पक्षी या झाडावर पाहिले नाहीत किंवा घरटीही. कीटक मात्र बरेच पाहिलेत. या झाडामुळे सोसायटीच्या आवाराला शोभा यायची. त्याच्या बाजूलाच असलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या आणि गुलमोहराच्या फांद्या एकमेकात गुंतून गेल्या होत्या. मध्यंतरी काही वात्रट मुलांना कैऱ्या चोरायच्या होत्या तेव्हा त्यांनी गुलमोहरावरून हळूच आंब्याच्या झाडावर जाऊ कैऱ्या पाडल्या होत्या. आताही झाड पडलं खरं पण आंब्याच्या झाडात गुंतलेल्या काही फांद्या तशाच अडकून राहिल्यात. गुलमोहराविना ओक्याबोक्या दिसणाऱ्या आवारात आता त्याची तेवढीच खूण उरलीय. उद्यापरवा महानगरपालिकेची माणसं येऊन तोडून ठेवलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावतील. कचऱ्याची गाडी उरलासुरला पाचोळा, भुसा घेऊन जाईल. मग पक्ष्यांच्या आणि माणसांच्या मनातही फक्त त्या झाडाच्या आठवणी उरतील.