
आज पहिल्या फेरीलाच लक्ष गेलं फाटकाजवळच्या टेबलाकडे. दहाबारा दिवसांपूर्वीच ख्रिस्तजन्माच्या देखाव्यातल्या गवतासाठी रुजवण घातलं गेलं होतं. तिथे आता देखावा जवळपास तयारच होता. रात्री त्यात बाळ येशू, मेरी, संत, गोठ्यातले प्राणी असं सगळं मांडलं जाईल आणि देखावा पूर्ण होईल. दरवर्षी अगदी इतक्याच उत्साहाने तो देखावा बघावासा वाटतो. गेले काही दिवस आमच्या ख्रिश्चनबहुल गृहनिर्माण संस्थेच्या आवारात सकाळी फेऱ्या घालतांनाच नाताळची लगबग जाणवतेय. घराघरांतून केक, कुकीज भाजल्याचे, करंज्या तळल्याचे वास येताहेत. कालपरवापासूनच खिडक्यांमध्ये ताऱ्याच्या आकाराचे कंदील लावले गेलेत. रोशणाई केली गेलीय. या वातावरणात एरव्ही फार उत्साह येतो. पण यंदा सगळं जरा थंड आहे.
समोरच्या रस्त्याचं काम चालू आहे. त्यासाठी कंत्राटावर काम करायला आलेल्या कामगारांनी रस्त्यापलीकडे पदपथावर त्यांचा संसार मांडलाय. आम्ही चालायला येतो तेव्हा त्यांनी गाड्यांच्या आडोशाने आंघोळ उरकून न्याहारी करायला सुरुवात केलेली असते. पाचसहा पुरुष, तीनचार बायका असा जत्था आहे. त्यातली एक बाई फक्त स्वैंपाकाचं काम करतांना दिसते. न्याहारी म्हणजे रोज सांबारभातच असतो. ती बाई प्रत्येकाला ठराविक प्रमाणात वाढून देते, मग जो तो खाऊन संपल्यावर स्टीलची थाळी धुवून ठेवतो. आज सर्वांचं खाणं संपत आल्यावर स्वैंपाक करणारी बाई उभ्या उभ्याच भात बोकाणत होती भुकेजल्यासारखी. इतकी कष्टाची कामं करुन फक्त सांबारभातावर यांचं कसं भागत असेल, त्यांना कितीसं पोषण मिळत असेल, किती काळ ते असा तग धरतील या प्रश्नांना थारा देऊन काही उपयोग नाही. आपलंच डोकं गरगरतं.
त्याच वेळी रस्त्यावरुन आदू जातांना दिसला आईचं बोट पकडून. त्याचं लक्ष नाहीय, स्वारी बोलण्यात गुंग आहे, मीही हाक मारत नाही. आदू म्हणजे राइस अॅडम्स हा माझा छोटा मित्र. आमच्या कट्ट्यावर त्याची आजी त्याला घेऊन येई. पहिल्यांदाच त्याला पाहिलं तेव्हा त्याला कुणीतरी चॉकलेट दिलं होतं आणि तो तक्रार करीत होता मला का चॉकलेट दिलंय. अशी तक्रार करणारा मी हा पहिलाच लहान मुलगा पाहिला होता. मग कुणीतरी त्याला समजावलं तू लहान आहेस ना म्हणून तुला चॉकलेट दिलंय. तर त्यावर साहेब म्हणतात, “ I am not small, I am four and a half.” तेव्हापासून मी त्याला ,”Hey, four and a half” अशीच हाक मारायला लागले. आजी इतर मैत्रिणींशी गप्पा मारी. मग हा कंटाळून बसण्याऐवजी कल्पना लढवित बसे. मला सांगे समोरच्या वीजेच्या खांबाआड राक्षस दडलाय. एकदा त्याने उत्साहाने सांगितलं की आम्ही बसतो तो बाक ज्या झाडाखाली आहे त्यावर एक साप होता. ओवी म्हणे थापाड्या दिसतोय हा पोरगा. मग मी चौकशी केल्यावर कळलं की खरंच एक साप झाडावरून लोंबकळत होता आदल्या दिवशी. एक दिवस मी त्याला बोटं लपवायचा खेळ शिकवला आणि त्याची आणि माझी गट्टी झाली. आम्ही खुशाल लपाछपीही खेळायला लागलो. माझं चालून झाल्यावर मी बाकावर येऊन मैत्रिणींशी गप्पा मारीत असे. त्या वेळी दोन बाकांच्या मध्ये तो माझी वाट अडवून उभा राही. मग मी तर चालतेय अजून अशी हुलकावणी देऊन मी मागच्या बाजूने बाकावर येऊन बसत असे. हा खेळ त्याला फार आवडायचा. जाम खिदळायचो दोघंही. एकदा मी बाकावर बसले होते. तो आईसोबत मागून येतांना तिला म्हणाला, “I think my friend is there.” मग थोड्या वेळाने वळणावर निराश होऊन म्हणाला, “ Oh no, she is not there.” त्याच्या आईला नवल वाटलं की कोण याची मैत्रीण बसलीय बाकावर. मग मी दिसल्यावर त्याने सांगून टाकलं ही माझी मैत्रीण तेव्हा त्याच्या आईला नवलच वाटलं. तसे साहेब माझ्यावर जरा हक्कही गाजवत. “आज तू ती उभी टिकली का नाही लावलीस मला आवडते ती, आज तू तो ड्रेस का नाही घातलास” असंही चाले त्याचं. मग एक दिवस त्याने मला घरी यायचं आमंत्रण दिलं. मग तुला माहीत आहे का कसं यायचं ते म्हणून पद्धतशीर पत्ता सांगितला. “Take a left turn from Waste Coast (Restaurant), then go straight, straight, don’t turn hann, Ok? …”असं करीत. त्याची कल्पनाशक्ती फार धावत असे. एकदा त्याने मला गोष्ट सांगितली तो कसा घरातून चालत निघाला, मग एका क्रेनने त्याला उचलून कसं कचऱ्याच्या गाडीत टाकलं, मग तो कसा कचऱ्यात पोहत होता (इथे स्वतःच स्वतःला डर्टी बॉय म्हणून झालं. आम्ही खूप गंमतीजंमती करत असू. नंतर त्याची शाळा, अभ्यास, पोहण्याचा(कचऱ्यात नव्हे तर पाण्यात) वर्ग सुरु झाला आणि त्याचं कट्टयावर भेटणं दुर्मिळ होत गेलं. आता तो असाच दिसतो कधी मी खिडकीत उभी असतांना आईसोबत, आजीसोबत चालतांना.
