बबडं माझं गुण करतंय

परदेशी असणारा आमचा लेक सध्या भारतात आलाय. आपण सुट्टीवर घरी आलोच आहोत तर म्हाताऱ्या आईवडीलांना जरा आराम द्यावा म्हणून तो स्वयंपाक करतो बरेचदा. पण जर काही जळालं तर मला जळालेलं आवडतं म्हणून स्वतः खातो आणि न जळालेलं आम्हाला देतो. हा त्याच्या स्वभावातला ह्रद्य भाग आहे, हे खरं आणि हेही खरं की कुणीही असं करु नये. पण सहसा बायकाच हे करतांना आढळतात. मला खरपूड आवडते असं सांगत जळालेलं खाणाऱ्या, स्वयंपाक उरला नाही की “नाहीतरी दुपारी जरा जास्तच खाल्लंय, त्यामुळे भूकच नव्हती” असं म्हणणाऱ्या बायका हमखास आढळतात. स्वयंपाक चांगला झाला म्हणून घरच्यांनी मनसोक्त हादडल्यावर उरलासुरला भात किंवा पोळी लोणच्याशी खाणाऱ्या माऊलींना तोटा नाही. तर स्वयंपाक चांगला झाला नाही म्हणून घरच्यांनी नीट खाल्लं नाही की उरलंसुरलं शिळंपाकंही याच माऊलीला खावं लागतं. सासुरवाशीणींचं – विशेषतः खेडेगावातल्या – तर पहायलाच नको. शौचाला जायचं निमित्त करुन चोरुन भाकरी खाणाऱ्या सासुरवाशीणींविषयी मी सासू आणि थोरल्या जावेकडून बरेचदा ऐकलंय. आधी दोनतीन मुलीच झाल्या असल्या तर गरोदर बाईलाही “आताही हिच्या पोटाला पोरगीच येती का काय कुणाला दखल” म्हणत उपाशी ठेवणारे सासरचे लोक अजूनही जागोजागी सापडतात.

बाईने कमीच खावं यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीने शास्त्रपुराणांमधून खास बायकांसाठी अनेक व्रतवैकल्यं योजून ठेवलेली असतातच. शिवाय स्त्रीची प्रतिमा अशी तयार केलेली असते की खादाड स्त्री ही नेहमी विनोदाचा विषय व्हावी. संत एकनाथांच्या भारुडातली असो की लोककथांमधली असो, नवऱ्याला कमी खायला देऊन स्वतः हादडणारी किंवा त्याच्या माघारी भरपूर खाऊन घेणारी स्त्री ही विनोदाचा विषय तर असतेच पण तिरस्करणीयही. पुरुष मात्र त्याच्या खाण्यामुळे कधी विनोदाचा विषय ठरत नाही. उलट त्याच्या गाडाभर खाण्याचंही कौतुकच होतं. पुरुषाच्या ह्रदयात शिरायचा मार्ग त्याच्या पोटातून जात असल्याने त्याला भरपूर आणि चांगलंचुंगलं खाऊ घाल असा सल्ला नेहमीच दिला जातो. बायकाही हा सल्ला मनावर घेऊन मनोभावे स्वैंपाकपाण्यात बुडून जातात. स्वैंपाकपाणीच नव्हे तर नवरा आणि मुलांची दिनचर्या, त्यांची कामं ह्या सगळ्यात त्यांचं आयुष्य गुंतलेलं असतं. अगदी वनवासाला जाणारी सीतामाईसुद्धा काय करते हे जात्यावरच्या ओव्यात कसं सांगितलंय पहा-

सीता चाल्ली वनवासा, गेली सांगून तेलणीला।

गेली सांगून तेलणीला। बाई हंडाभर त्याल रामाच्या आंगुळीला।

रामाच्या आंगुळीला।।

सीता चाल्ली वनवासा, गेली सांगून कोळणीला।

गेली सांगून कोळणीला। बाई दहा हंडं पानी रामाच्या आंगुळीला।।

रामाच्या आंगुळीला।।

अशी नवऱ्याच्या आणि मुलांच्या आयुष्याभोवती गरागरा आपलं आयुष्य बांधून घेणारी, उपाशीतापाशी बाई कुणाच्या खिजगणतीत नसते. पण तिला स्वतःला हे कळत नाही का? कळत असावं. आपल्या नशीबी जे होतं ते आपल्या लेकीच्या नशीबी तरी येऊ नये. ती गरोदर असतांना, तिचं बाळ तान्हं असतांना तरी तिने भरपूर खावं प्यावं असं तिला वाटतं. म्हणूनच भातुकलीत रमलेल्या आपल्या बबडीकडे प्रेमाने बघत ती म्हणते

बबडं माजं गुण करतंय, शेराच्या भाकरी तीन करतंय

नवऱ्या मेल्याला येक देतंय, आपल्या जीवाला दोन खातंय

नवऱ्या मेल्याचं काय जायचं, बबडीच्या बाळाला दूद यायचं

4 thoughts on “बबडं माझं गुण करतंय

  1. वाह! फार सुंदर आणि महत्वाचं. खूप खानाऱ्या स्त्रीवर एकनाथी भारुडात पण विनोद आहेत, हे माहीत नव्हतं. शिवाय शेवटी वापरलेलं बडबड-लोकगीत पण नव्याने कळलं…पण प्लिज अजून डिटेल्ड लिहा ना यावर. हवं तर काही भाग लिहा.

    Like

    1. बाई मी भोळी गं भोळी मधली नवऱ्याला देते आंबट कढी आणि आपण खाते पुरणपोळी किंवा दादला नको गं बाई मधली कळण्याची भाकर नि नुसतीच आंबाडीची भाजी वर तेलाची धारच न्हाई म्हणून दादला नको म्हणणारी बाई आहे की. त्या सगळ्याला आध्यात्मिक अर्थ असेल, पण भारुड म्हणणारे बाईच्या खादाडपणावर विनोद करीत बसतात. माझ्या आजीने सांगितलेली कोकणातली एक लोककथा मी ह्याच ब्लॉगवर दिलीय खापरपणजीच्या गोष्टी म्हणून. त्यातली बाई नवऱ्याला सांगत असते की तुम्ही नसलात तर मला अन्न जात नाही, पण त्याची पाठ फिरल्यावर सात काप्याचे घावन, खीर करुन खाते. असं बायकांना का करावं लागतं ह्याचं विश्लेषण व्हायला हवं. तुझ्या म्हणण्याचा विचार करते. बडबडगीत जुन्नर आंबेगाव पट्ट्यातलं लोकप्रिय बडबडगीत आहे. आभार

      Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s