कालपासून कोकिळ पक्ष्याची कुहू ऐकू यायला लागलीय. आंब्याच्या मोहोराचा वास तर कधीपासूनच आहे वातावरणात. लस घेतल्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी खाली चालायला उतरले. रस्त्यालगतच्या नारळीवर कधी कधी पाणकावळे (Cormorants) आपले पंख वाळवत बसलेले दिसतात, म्हणून आज तिकडे पाहिलं, तर ते गायब होते. म्हणून हिरमुसले. तर पुढे बागेत तांबडा चाफा पूर्ण फुलला होता. त्याचा लालसर रंग फार मोहक दिसत होता निरभ्र आकाशाच्या पार्श्वभूमिवर. थोडं पुढे गेल्यावर मागल्या भिंतीपाशी बहाव्याला सुंदर, सोनेरी, नाजूक घोस लटकतांना दिसल्यावर माझ्या आनंदाला उधाण आलं. माझी मैत्रीण शोभा भालेकरने (ही लेखिका आहे, नुकतंच तिचं पुस्तक प्रसिध्द झालं) आमची गृहनिर्माण संस्था उभी राहिली त्या सुरुवातीच्या काळात हे झाड इथे लावलं. पण कुंपणाच्या भिंतीजवळ असल्याने त्याची काटछाट होत राहिली. आताही काही फांद्या उरल्यात. पण त्या तुटपुंज्या फांद्यांवरही बरेच घोस डोळ्यांना मेजवानी देत वाऱ्यावर डोलत होते. तिसऱ्या फेरीच्या दरम्यान भारद्वाजाचा ऊप, ऊप आवाज घुमायला लागला. कुठेतरी लपून बसून आपल्या भरदार आवाजात हाका घालत होते साहेब. तेवढ्यात निळ्या रंगाचा खंड्या डावीकडून उडत चाफ्याच्या मागे असलेल्या एका निष्पर्ण झाडावर जाऊन बसला. आज मोबाईल जवळ नसल्याचं वाईट वाटलं. पण नंतर लगेच असं वाटलं की मोबाईल असता तर छायाचित्र घेण्याच्या नादात हे सगळं सौंदर्य डोळ्यांनी टिपण्याच्या आनंदाला मुकले असते.
एकूणच असं वाटलं की आज सगळे माझं खास स्वागत करताहेत, “आलीस का? ये, ये. बऱ्याच दिवसांनी आलीस, म्हणून आम्हीही आलोय. येत रहा गं बयो, दिसत रहा.”
Wonderful Shubha
LikeLiked by 1 person
Thank you so much dear.
LikeLike
सुंदर लिहिलंय,मॅडम !
आमच्या गॅलरीतून खंड्या(की बंड्या ?) ,कोकीळ,कोकिळा सोन्या, सुभग,शिंजिर,लालबुड्या बुलबुल(जोड्याने),साळुंखी, शिक्रा असे पक्षी नियमित दर्शन देतात.आणि एकदा तर चक्क फिशटेल पाम वृक्षावर धनेश जोडीने आले होते. त्याची परिणीती दुर्बीण व पुढे कॅमेरा घेण्यात झाली.आज हे व यासारखे अनेक पक्षी कॅमेऱ्यात कैद झालेत. ह्या पक्षांमुळेच मला निसर्गाच्या जवळ जाता येतेय !
LikeLike