अशी ही थट्टा

आमच्या कार्यालयातले एक जरा वयस्कर सहकारी होते. बरीच तरुण मुलं येताजाता त्यांच्या पाया पडत. मला वाटे बरेच ‘बुवा’ समाजात वावरत असतात, त्यांचं बरंच प्रस्थ असतं, तसं हे कुणी चमत्कारी ‘बुवा’ असावेत. एकदा सहज मी माझ्या ओळखीच्या तरुण सहकाऱ्याला त्याविषयी विचारल्यावर त्याने जे सांगितलं ते ऐकून मी थक्क झाले. त्या गृहस्थांचा असा समज होता की कुणीतरी आपल्याला वाकून नमस्कार केला की त्या व्यक्तीला आपलं सगळं पुण्य मिळतं. म्हणून हे गृहस्थ कुणी त्यांच्या पाया पडलं की उलट त्या व्यक्तीच्या पाया पडत. एक तर ते मध्यमवयीन त्यातून स्थूल, पोट सुटलेलं. त्यामुळे त्यांना असं पाया पडतांना त्रास होत असे. तरीही त्यांचा तो जो समज होता त्यामुळे ते कष्ट पडले तरी पाया पडत असत. त्यांना त्रास होतो ते पाहून ह्या तरुणांना गंमत वाटत असे म्हणून ते मुद्दाम पुन्हा पुन्हा येऊन त्यांच्या पाया पडत.

आम्हीही कुणाकुणाची थट्टा उडवित असू. उदाहरणार्थ वाढदिवसाला एकात एक अशा अनेक खोक्यात छोटीशी भेटवस्तू ठेवणं. एक एप्रिलला तुला फोन आलाय म्हणून त्याकाळी दुर्मिळ असलेल्या कुणाच्या तरी फोनवर बोलायला जायला लावणं. पण आता अशी साधीसुधी थट्टा कुणी करीत नाही. विशेष म्हणजे दुसऱ्याला मनस्ताप होईल अशी थट्टा करुन त्याला होणाऱ्या त्रासाचा आनंद लुटणं आता वाढत चाललंय. आणि तो आनंदही पुन्हा पुन्हा लुटण्याची प्रथाही पडत चाललीय. असं करतांना त्या व्यक्तीला होणारा मनस्ताप, शारिरीक त्रास, कधी कधी त्या साऱ्याचे दूरगामी परिणाम याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं.

माझ्या ओळखीतल्या एका तरुण मुलीच्या बाबतीत घडलेली घटना ह्या दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. ती कार्यालयात आपल्या खुर्चीवर बसायला जात असतांना काही सहकाऱ्यांनी संगनमताने ती खुर्ची अचानक मागे ओढली. त्यामुळे ही मुलगी खाली घसरुन पडली. तिच्या मांडीचं हाड मोडलं. साधारण तीन महिने तिला घरी बसावं लागलं. घरची परिस्थिती चांगली नसल्याने नवरा मध्यपूर्वेत कसलीशी नोकरी करीत होता. त्याला येता येणं शक्य नव्हतं. सत्तरी ओलांडलेली म्हातारी सासू आणि शाळेत जाणाऱ्या दोन मुलांची जबाबदारी तिच्यावर होती. आता तीच अंथरुणावर पडल्यावर घर कसं चालायचं. शेवटी केरळहून तिच्या आईला यावं लागलं. ह्या सगळ्या प्रकरणात ती खाजगी कार्यालयात असल्याने काही दिवसांच्या रजेचा पगार कापला गेला. औषधपाण्याचा खर्च झाला तो वेगळाच. त्यानंतर काही महिने उलटले तरी तिला नीट चालता येत नव्हतं. हे सगळं नुकसान कोण भरुन देणार? तिच्या सहकाऱ्यांनी तर हात झटकले. पण हाच प्रकार त्यांच्या बाबतीत घडला असता तर? निदान आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारुन नुकसानभरपाई तरी आपणहून द्यावी असंही त्यांना वाटलं नाही. ही असंवेदनशीलता फार खुपणारी आहे.

एखाद्याला विशिष्ट गोष्टीचा किंवा वादाचा त्रास होत असेल तर मुद्दाम तो वाद पुन्हा पुन्हा उकरुन काढणं किंवा ती गोष्ट पुन्हा पुन्हा “अरे तो चिडतो ना, मग मज्जा येते फार” असं म्हणत करणं हाही त्यातलाच प्रकार आहे. त्यातून त्या व्यक्तीचा रक्तदाब किंवा पित्त वाढत असेल, त्यामुळे तिला पुढे उपचार घ्यायची पाळी येत असेल तर त्याला कोण जबाबदार?

एखाद्याला किंवा एखादीला अमक्यातमक्याचं किंवा अमकीतमकीचं तुझ्यावर प्रेम आहे असं खोटंच सांगून, किंवा त्या व्यक्तीच्या नावे बनावट पत्र पाठवून त्या व्यक्तीची मजा बघणं हाही सर्रास चालणारा एक प्रकार. ह्या सगळ्यामुळे मुलगी असेल तर तिला आणि घरच्यांना त्रास होतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अशा थट्टेतून त्या व्यक्तीच्या मनातल्या गैरसमजामुळे कधी कधी तिच्याकडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जातं. एक प्रकारे ही हत्याच असते थट्टेथट्टेत केलेली. हलक्याफुलक्या, निरागस थट्टेने मित्र जवळ येतात, आयुष्य थोडं हलकंफुलकं होतं. पण हल्ली तिची जागा ही जीवघेणी थट्टा घ्यायला लागलीय. हे समाजाच्या वाढत्या असंवेदनशीलतेचं लक्षण तर नाही ना?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s