
आज रोजचे ‘निष्ठावंत’ चालणारे दिसत नव्हते. पण टाळेबंदीत काही मिळणार नाही अशा भयाने जवळच्या डी मार्टमधून गाड्या भरभरून सामान नेणाऱ्यांची मात्र वर्दळ होती. समोरच्या खाजणात राहणारं ते नोकरी करणारं जोडपं आज सूर्यास्ताच्या वीसपंचवीस मिनिटं अगोदरच पोचलं होतं. नेहमी नवरा नंतर येतो नि बायको वाट पाहत बसते. पण आज उलटं झालं. नवरा आधी आला. एरवी बायको बिचारी त्याला कितीही वेळ लागला तरी सोशिकपणे वाट पाहते. हा फार अस्वस्थ झाला होता. सारखा रस्त्याकडे पाहत फेऱ्या घालत होता. तेवढ्यात रिक्षातून बायको उतरली. नेहमीसारख्याच तिच्या हातात कांदे, बटाटे, वाणसामानाच्या जड पिशव्या होत्या. ती गरोदर असावी असंही वाटतंय. ह्या गृहस्थाचं मी एक पाहून ठेवलंय. तो आला की आपला वेग अजिबात कमी न करता, बायकोशी एकाही शब्दाची देवाणघेवाण न करता सरळ चालत राहतो, कधी कधी कुणा ओळखीच्या व्यक्तीला हात हलवून अभिवादन करतो. पण बायकोशी काही बोलणं, तिच्या हातातलं ओझं घेणं कधीच नाही. मला आठवतंय आमची मैत्री होती तेव्हापासूनच चंदर- माझा नवरा- माझ्या हातात काहीही असलं -अगदी खांद्यावरची सत्राशेसाठ गोष्टींनी भरलेली पर्सही घेतो. मी मग मोकळेपणी मजेत चालायला लागते. सुनीताबाईंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आठवतंय की त्यांच्या प्रणयाराधनेच्या काळात आणि बहुधा नंतरही पुलंनी कधी त्यांच्या हातातली पिशवी घेण्यासाठी हातही पुढे केला नव्हता हे त्यांना जरा खटकत असे. बायकोची ओझी वाटल्यास तिची तिने वहावीत पण निदान तिची दखल तरी घ्यायला हवी ना? राजीव गांधी पंतप्रधान असतांनाचं एक दृश्य अशी जोडपी बघतांना नेहमी आठवतं. ते कुठल्या तरी दौऱ्यावरून विमानतळावर उतरले. मंत्रीसंत्री सगळे लगबगीने पुढे धावले. पण राजीव गांधीच्या लक्षात आलं की सोनिया मागे राहिल्यात. ते तिथेच थबकले. त्या आल्या मग त्यांना सोबत घेऊनच पुढे निघाले.
हे सर्व मनात येईस्तोवर सूर्य मावळत आला, रस्त्यावरून रोज जाणारं जोडपं दिसलं एकमेकांच्या चालीशी चाल जुळवत चाललेलं
अंतर्मुख करणारा अनुभव !
LikeLike