कुछ बढिया मंगा लो

एका जाहिरातीत “मॅच है कुछ बढ़िया बना लो” असं नवरा बायकोला फर्मावतो. मग बायको त्याला उलट फर्मावते “मॅच है कुछ बढ़िया मंगा लो”. खरं तर नवऱ्यालाही करता येईल की काहीतरी चटपटीत. काही नवरे करतही असतील. माझ्या चमूतल्या एका मुलाच्या घरी क्रिकेटचा सामना असला की घरच्या बायकांनाही तो निर्वेधपणे बघता यावा म्हणून बाहेरुन सँडविचेस किंवा तत्सम काही पदार्थ मागवले जात. पण काही ठिकाणी नक्कीच घरातला एखादा पुरुष करीत असेल. फक्त मागचा पसारा मात्र बायकोला आवरावा लागत असेल कदाचित. आपल्या कुटुंबात, आजूबाजूला असे बरेच पुरुष दिसतात अधूनमधून (संख्येने फार नसले तरी).

माझ्या वडीलांना स्वयंपाक येत असावा, मी त्यांना भात करतांना पाहिलंय क्वचित. पण घरी ते कधी स्वयंपाक करीत नसत. आई, आजी (आईची आई) आम्ही सात बहिणी असतांना त्यांच्यावर स्वयंपाक करण्याची पाळी फारशी आली नाही. चहा मात्र ते करीत असत. चहा करण्याचं त्यांचं असं तंत्र असे. ते आम्ही चहा केला तरी सांभाळावं लागे. नाहीतर चुकून जास्त उकळला की “विष झालंय त्याचं विष” असं ऐकून घ्यावं लागे. ते चहा करतांना कपाने मोजून आधण ठेवीत. मग उकळ आल्यावर मोजून पण फार कमी साखर घालीत. ती पाण्यात विरघळली की मग चहाची पूडही मोजून टाकीत. लगेच आच बंद करुन झाकण ठेवीत. झाकून घड्याळ लावून तीन मिनिटं ठेवीत. मग कपात दूध गाळलं जाई, तेही मोजूनच. त्यावर मग गाळलेल्या चहाचा अर्क ओतला जाई. आम्ही भावंडं अजूनही ह्याच पद्धतीने चहा करतो.

भावाचंही वडीलांसारखंच. एक तर तो सगळ्यात धाकटा, एकुलता एक मुलगा, आम्ही इतक्याजणी असतांना स्वयंपाकघरात जाणं सोडाच पण साधं पाणीही कधी घ्यावं लागलं नाही. पण आमची सगळ्यांची लग्न झाल्यावर कसा, कधी कोण जाणे पण त्याने स्वयंपाक शिकला असावा. पण हेही तितकंच खरं की त्याला स्वयंपाकाची आवड असावी. त्याची पहिली चुणूक पहायला मिळाली ती माझ्या गरोदरपणात. मुलीच्या वेळी गरोदर असतांना मला सक्तीची विश्रांती देण्यात आली होती डॉक्टरांकडून. सासूबाई आणि घरातली इतर माणसं बाहेर गेली होती. मला लागली भूक. नवऱ्याला काही सुचेना. कारण आम्ही होतो माझ्या दीराकडे. जावेच्या स्वयंपाकघरातलं काही त्याच्या सवयीचं नव्हतं. तेवढ्यात भावाचा फोन आल्यावर नवऱ्याने त्याला ही अडचण सांगितली. भावाने नुकताच ‘क्रॅमर व्हर्सस क्रॅमर’ हा चित्रपट पाहिला होता. त्यात नायक फ्रेंच टोस्ट करतांना दाखवलं होतं. ते पाहून बंधुराजांनी घरी आल्यावर फ्रेंच टोस्ट केला होता. त्याचीच कृती त्याने नवऱ्याला सांगितली आणि मला मस्तपैकी फ्रेंच टोस्ट खायला मिळाले. नंतरही धाकटी बहीण आणि भाऊ शेजारी शेजारी राहात असल्याने तिथे गेलो की जेवतांना तोही काही पदार्थ करुन आणीत असे. त्यातला त्याने केलेला दही घातलेला पुलाव नेहमी आठवतो. आपल्या मुलांना भूक लागली म्हणून स्वयंपाक करणाऱ्या माझ्या माहितीतल्या काही पुरुषांपैकी तो एक. दुसरे आमचे तरुण मित्र शैलेश औटी, उदय रोटे आणि येशू पाटील. शैलेश काही वेगळेच प्रयोग करीत असे. पण त्यातले बरेचसे सफल होत.

माझा नवरा गावी वाढलेला. त्याला बहीण नव्हती. सगळे भाऊच. त्यामुळे घरकामात आईला मदत करावीच लागे. त्यातूनही पाळीच्या काळात बाईला वेगळं बसावं लागल्याने तेव्हा तर स्वयंपाक करावाच लागे. मग लांब वेगळं बसलेली आई हातवारे करीत “अरे मेल्या, अस्सा नाही अस्सा घसरा दे पीठाला” असं सांगत भाकरी करुन घेई. एकदा माझ्या मोठ्या दीरांनी अशाच वेळी शिरा केला. तो इतका कडक झाला की खलबत्त्यात कुटून खावा लागला. धाकटा दीर आमच्या लग्नाआधी मी घरी जाई तेव्हा एकदोनदा मटण केलं होतं ते फार छान झालं होतं. मात्र भाज्या त्याला जमत नसत. गवारीच्या शेंगा न निवडता अख्ख्या ठेवून तो त्याला चटणी लावून परतत असे. पण असा थोडाफार स्वयंपाक येत असला तरी त्याने लग्नानंतर कधीही स्वयंपाकघरात पाउल टाकलेलं मी पाहिलं नाही. नवऱ्याला पोळीभाकरी उत्तम जमतात. भात, ऑम्लेट, चहा चांगला करता येतो, इतर स्वयंपाक सांगितला किंवा कृती लिहून दिली तर उत्तम जमतो. पण हे सगळं तो नाईलाजाने, कर्तव्य म्हणून करतो. आवडीने नाही. पण इतर साफसफाईची कामं मात्र तो आवडीने करतो.

बरेच पुरुष त्यांना स्वयंपाक येत असला तरी आपल्याला स्वयंपाक येतो हे कुणालाही कळू देत नाहीत. कारण त्यांना भीती वाटते की एकदा केला की रोजच आपल्याला स्वयंपाक करावा लागेल. एकदा प्रसिद्ध अभिनेते रमेश देव ह्यांनी सांगितलेला किस्सा आठवतो. त्यांच्या लग्नानंतर सीमाताईंनी त्यांना सकाळी चहा करायला सांगितला. त्यांनी अगदी किटलीत चहा, दूध, साखर वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घालून कपबशा ट्रेमध्ये ठेवून चहा आणला. पण तो पिण्याजोगा नव्हता. ह्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की मला चहा करता येत नव्हता असं नाही, पण चांगला चहा केला असता तर मला रोजच करावा लागला असता. असा विचार करणाऱ्या पुरुषांनी कधी ह्या गोष्टीचा विचार केलाय का की रोजच आपल्याला चहा नाश्ता हातात आणून देणाऱ्या आपल्या बायकांनी असा विचार केला असता तर आपलं काय झालं असतं. कित्येक बायकांना लग्न होईपर्यंत स्वयंपाक येत नसतो. लग्नाआधी आई शिकवते किंवा लग्नानंतर सासू शिकवते. पण ठीक आहे, नाही ना तुला स्वयंपाक येत आपण मिळून शिकू आणि करु किंवा बाहेरुन डबा मागवू असं म्हणणारं सासर किंवा नवरा क्वचितच पहायला मिळतो. ह्यावरुन एक गंमत आठवली. एका तरुण मित्राने लग्नाआधी लावलेला डबा लग्नानंतरही चालू ठेवला. बायकोला कळेना हा काय प्रकार आहे. तिला वाटलं आपल्याला त्रास होऊ नये म्हणून काळजीपोटी ठेवला असेल. नंतर एक दिवस त्याचा मित्र जेवायला येणार होता तेव्हा बायको म्हणाली “डबा नको, आज मी करते स्वयंपाक”. तेव्हा त्याने नवलाने विचारलं,”म्हणजे तुला येतो का स्वयंपाक?” तरीही त्याला खात्री नव्हती, मग तिने केलेला स्वयंपाक मित्राने चाटूनपुसून खाल्ल्यावर खात्री पटली. मग डबा बंद केला. अर्थात नंतर तिला नोकरी लागल्यावर नोकरी आणि शिक्षण दोन्ही चालू होतं म्हणून मग स्वयंपाकाला बाई ठेवली.

आता बऱ्याच ठिकाणी बायका नोकरी करीत असल्याने, कामाच्या वेळा अनियमित असल्याने पोळ्या करायला बाई, किंवा भाजी चिरुन, वाटण वाटून, पीठ भिजवून द्यायला बाई, कधी संपूर्ण स्वयंपाकच करायला बाई अशी गरजेनुसार सोय केलेली असते. पूर्वी उच्चमध्यमवर्गीय घरांमध्येच स्वयंपाकाला बाई किंवा आचारी असे. कनिष्ठमध्यमवर्गीय घरातले  ब्रह्मचारी किंवा विधुर पुरुष बहुधा स्वतः स्वयंपाक करीत. माझे एक मामा आमच्या मामीच्या आजारपणामुळे आणि नंतर ती गेल्यावर त्यांच्या तीन मुलांचं आवरुन स्वयंपाक करीत. माझ्या एका सहकाऱ्यांची आई वारली. त्या धक्क्याने त्याच दिवशी त्यांच्या पत्नीचं निधन झालं. त्याआधी त्यांनी कधी स्वयंपाकघरात पाऊलही टाकलं नव्हतं. पण घरात दोन लहान मुली. डबा रोज मागवणं किंवा स्वयंपाक करणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे ते स्वतःच हळूहळू स्वयंपाक शिकून करु लागले. पण सहसा अशा घरांमधल्या मुली कितीही लहान असल्या तरी हे काम त्यांच्यावर पडतं. आमची एक चुलती वारल्यावर त्यावेळी दहाबारा वर्षांच्या असलेल्या माझ्या चुलतबहिणीवर पाच भांवडं आणि वडील अशा सहासात माणसांच्या स्वयंपाकाची जबाबदारी येऊन कोसळली. आमच्या शेजारच्या एका कुटुंबातही असाच प्रकार घडला. पण  अशा वेळी घरातल्या मुलाला मात्र स्वयंपाक करावा लागत नाही. घरात मुलगी नसली तरच तो मुलांना/पुरुषांना करावा लागतो.

त्यामुळे काही वेळा पंचाईत होते. आमचा एक अविवाहित मित्र जोवर नोकरी करीत होता तोवर रोज कार्यालयातल्या कँटीनला न्याहारी आणि सकाळचं जेवण ह्यासाठी उदार आश्रय देत असे. संध्याकाळी बाहेर जेवून घरी जाई. निवृत्तीनंतर घर घेऊन दूरवरच्या उपनगरात स्थायिक झाल्यावर रोज चहानाश्ता बाहेर, जेवणासाठी डबा. पण टाळेबंदीच्या काळात त्याला डबा मिळेना. ह्याला तर साधा चहाही जेमतेम करता येई. घरात स्वयंपाकाची भांडीही पुरेशी नव्हती. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांवर अवलंबून रहावं लागलं. “तुम्ही लिहा तुमचं काय ते, घर मी सांभाळते” असं प्रेमाने म्हणणारी बायको आक्समिकपणे आजारात साथ सोडून गेल्यावर एका प्रसिद्ध नाटककारावर अशीच काहीतरी शिजवून खायची पाळी आली. कित्येकांना तेही जमत नाही. एका पत्रकार मैत्रिणीने अशाच एका मित्राला टाळेबंदीच्या काळात फोनवरुन खिचडी करायला शिकवली. ती अर्धी कच्ची राहिली की जळाली असंच काहीतरी झालं.

माझे वडील आम्हाला सांगत निर्जन बेटावर तुम्हाला कुणी सोडलं तरी जगता आलं पाहिजे. माझ्या धाकट्या बहिणीला स्वयंपाक तर येतंच असे. पण वायरिंग करणं, फर्निचर करणं, सगळ्याप्रकारची तांत्रिक कामं करणं उत्तम जमत असे. वडील म्हणत “हिला एकटीला निर्जन बेटावर सोडलं तरीही ही हातपाय हालवील, तुमचं काय?” स्वयंपाक हेही अशीच एक गरजेची, शिकून घेण्याजोगी गोष्ट आहे – बाईचं काम नव्हे. कारण पोट तर सगळ्यांनाच असतं आणि भूक लागली की खावं हे लागतंच. त्यामुळे तोही सर्वांना आला पाहिजे. अगदी साग्रसंगीत नसला तरी पोटापाण्यापुरता तरी. त्यासाठी लहानपणापासूनच मुलगामुलगी भेद न करता सर्वांनाच तो शिकायला हवा.

आमची मुलं लहानपणापासून स्वयंपाक करीत आली कारण त्यांनी त्यांचे आईबाबा दोघांनाही स्वयंपाक करतांना पाहिलं होतं. आमचा मुलगा सहासात वर्षांचा असतांना त्याने पावाचा चुरा, फ्रीजमध्ये उकडलेला बटाटा ठेवलेला होता, त्याचा लगदा आणि कुस्करलेलं चीज ह्यांच्या मिश्रणात मीठ, तिखट टाकून त्याला वेगवेगळे आकार देऊन पॅटीस केले होते. मुलांना त्यांची कल्पनाशक्ती चालवू दिली की ते बरेच नवे प्रकार शोधू शकतात. कधी कधी गडबड होतेही. एकदा आमची मुलं मावशीकडे रहायला गेली. बहिणीची मुलं आणि आमची मुलं सगळीच सातआठ वर्षांच्या आतली. घरात वडीलमाणसं नसल्यामुळे श्रीखंड करायला घेतलं. त्यातले घटकपदार्थ श्रीखंडाच्या जुन्या डब्यावर पाहून घेतले. इतकं डोकं लढवलं तरी हिंदी अजून शालेय पातळीवर शिकत नसल्याने चिनी म्हणजे काय ह्यावर गाडी अडली. पण अशा वेळी आपण असतोच मदत करायला. आज आमची मुलं उत्कृष्ट स्वयंपाक करतात.(आत्ताच मी लेकाने ऑलिव्ह तेलात जिरं परतून ते कोथिंबीरीसह वाटून केलेला आणि अजिबात हिंवस न लागणारा हलवा मासा खाल्ला.) श्रीनगरमध्ये आमचे जावई पोळ्या भाजताहेत, घरच्या अक्रोडाची आणि मुळ्याची चटणी करताहेत, गूळ घालून शिरा करताहेत अशी छायाचित्र पाहिली की वाटतं आता पुढची पिढीही ह्या दोघांचं पाहून शिकेल. वरच्या छायाचित्रात आमचा एक नातू सात्विक (भाचीचा मुलगा) स्वयंपाक करतोय. असं लहानपणापासून पोटापाण्यापुरत्या गोष्टी शिकलो नाही तर आहेच मग “कुछ बढ़िया मंगा लो”. पण आताच्या काळात एखाद वेळी तेही कठीणच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s