समोरच्या खारफुटीत राहणारं ते जोडपं आज सकाळी कामावर जोडीने निघालेलं दिसलं. पण ती दोघंच नव्हती. त्यांच्यासोबत एक तरुण मुलगी आणि एक बाई होती. चौघं एकत्र बोलत, हसत येत होती. रस्त्यावर पोचल्यावर नवऱ्याने त्या तरुण मुलीला आणि बाईला रिक्षा पकडून दिली आणि दोघंही नेहमीसारखी एकमेकांशी न बोलता चालू लागली. म्हणजे चारचौघांत असतांना त्यांच्याकडे हसण्याबोलण्याचे विषय असतात, मग दोघंच असल्यावर त्यांचा संवाद का खुरटतो, मला जरा काळजीच वाटायला लागली त्यांच्या संसाराची…
ते तिथून गेल्यावर एक तरुण आपली कार घेऊन आला. खारफुटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी त्याने कार लावली. गाडीतून आपल्या अडीच-तीन वर्षांच्या मुलीला घेऊन तो खाली उतरला. मग गाडीच्या टपावर मुलीला बसवून तिची छायाचित्र घ्यायला लागला. मुलगीही अगदी मान कलती करुन पोझ देत होती. मग तिचा चिमुकला हात धरून तो चालायला लागला. रस्त्याच्या कडेला तिला एक लाल कार दिसली. ती वळून वळून पाहत राहिली. मला एकदम आठवलं माझ्या नवऱ्याला लहानपणी तो मुंबईला आला असतांना रोज एक अशीच लाल कार दिसत असे, ती त्याच्या मनात भरली होती. मग तो रोज वडीलांकडे हट्ट धरीत असे आपण ती घेऊ या ना. महिन्याची दोन टोकं कशीबशी जुळवणारे वडील त्याला रोज काहीतरी वेगळा बहाणा सांगत…. आता त्या मुलीचे पाय दुखायला लागले. वडीलांनी तिला पाठीवर उचलून कांदे बटाटे केलं. दोघंही खिदळत होती. मग थोड्या वेळाने गाडीत बसून निघून गेली. किती प्रेम होतं त्या तरुणाचं आपल्या मुलीवर. किती जीव टाकतात आईबापं पोरांसाठी. पण उद्या हीच मुलगी मोठी झाल्यावर आईबापांच्या मनासारख्या क्षेत्रात गेली नाही किंवा हिने जातीधर्माबाहेर लग्न केलं तर केवढा दुरावा येईल. कदाचित नाहीसुद्धा होणार तसं. पण आजूबाजूला पाहिलं की जे दिसतं त्यामुळे मनात शंका येतात. आमच्या एका मित्राने मुलीचं नाव टाकलं. का तर तिने ज्या मुलाशी लग्न केलं तो त्याला पसंत नव्हता. आपल्या मनासारखा डॉक्टर किंवा इंजिनियर न होता गायक, कवी असं काही झालेल्या मुलाशी उभा दावा मांडणारेही मी पाहिलेत. हिचं नाही ना होणार असं काही?
आज पाऊस नव्हता. उन्ह चढायला लागल्याने रस्ता जरा निर्मनुष्य व्हायला लागला होता. त्याचा फायदा घेत एक अगदी सतरा अठरा वर्षांचं जोडपं रस्त्याच्या कडेला थांबलं होतं. मुलगा बाईकवर ऐटीत बसला होता. मुलगी जरा घाबरत बाईकला टेकली होती. काय झालं कुणास ठाऊक एकाएकी दोघांमध्ये वादावादी झाली. त्या मुलीने एका पिशवीतून काहीतरी आणलेलं ती त्याला देत होती. ते नाकारुन त्याने तिला रस्ता दाखवला. मग तिनेही चिडून हातातली पिशवी जवळच उभ्या असलेल्या उघड्या जीपच्या मागच्या बाकावर टाकली, रिक्षा पकडली आणि निघून गेली. ती गेल्यावर काही मिनिटांनी त्याने ते पिशवी घेतली. उघडून पाहिलं तर आत एक कागद होता त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. बाटलीतलं पाणी पिऊन त्याने तो कागद उलगडला वाचला. त्यानंतर बऱ्याच वेळा तो त्या एक पानी मजकुराची पारायणं करीत राहिला. पुढे काय झालं ते मी पाहिलं नाही. कदाचित त्याने पुन्हा फोन करुन तिला मागे बोलावलं असेल. कदाचित तिची मनधरणी करायला तो तिच्या मागून गेला असेल. काय माहीत काय झालं. पण इथून पुढे काही वर्षांनी कदाचित ती दोघं वेगळ्या परिस्थितीत, वेगळ्या जोडीदारांसोबतही असतील तेव्हा त्यांना आजचा हा प्रसंग आठवला की काय वाटेल.
असो. मी उगाच विचार करतेय. म्हातारपणात असलेच विचार येतात की काय डोक्यात?