माझ्या भावाचे मामेसासरे माझ्या नवऱ्याला अधूनमधून कधीतरी कुठे भेटत असत. भेटल्यावर ते नेहमी बजावत, “आमची मुलगी दिलीय तुम्हाला. तिला जपा.” खरं तर त्यांची माझी भेट क्वचितच घरगुती समारंभात होई, फार बोलणंचालणं नसे. तरीही त्यांनी आवर्जून हे नवऱ्याला सांगणं मला फार हृद्य वाटे.
माझ्या आईचे मामेभाऊ, मावसभाऊ आईचा उपास असला की शहाळं, केळी घेऊन येत. ती जसं मायेनं त्यांचे संसार मार्गी लावू पाही तसे तेही तिचा भार थोडाफार हलका करू पहात.
श्रीलंकेच्या एका खेळाडूने तामिळनाडूतल्या मुलीशी लग्न केल्याने मी त्याला भारताचा जावई म्हणत असे तसे गावा गावातल्या मुलीबाळींचे नवरे अख्ख्या गावाचे जावई असत. असे जावई सासरी आले की शेजारीपाजारी वानवळा पाठवत.
आता कुटुंब ह्या कल्पनेचा संकोच होत चाललाय. पण खरं पाहता आताच खरी गरज आहे वसुधैव कुटुंबकम् म्हणण्याची. वाढती युद्धखोरी, लोकांचं जात, धर्म, वंश ह्यांच्या नावाखाली ध्रुवीकरण होत असतांना माणसामाणसांमधले संबंध दृढ करण्याची गरज अधिक आहे. ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसांनी नाती जोडण्याची गरज आहे.
माझी मैत्रीण स्मिता गांधी हिच्या जावयाला जेव्हा मी माझा जावई म्हणते तेव्हा आमच्या सुनीती सु.र. म्हणतात, “आऊचा काऊ तो माझा भाऊ” माझा प्रश्न आहे की मी आऊच्या काऊला भाऊ का म्हणू नये. मला वाटत होतं माझ्यासारखा विचार करणारी माणसं नाहीशी होत चाललीहेत की काय. पण माझी मैत्रीण शालिनी घरी आली तेव्हा माझ्या जावयाला -अब्रारला भेटवस्तू देत म्हणाली- यह मेरे जमाई के लिए, तेव्हा मला जाणवलं की सगळं संपलं नाहीय. आहेत असे लोक आऊच्या काऊला भाऊ मानणारे त्यांची संख्या वाढत राहो.
हा ओलावा आम्हा सर्वांत भिणो !
LikeLike
खरंय. आभार
LikeLike