ओवीने पांढराधशुभ्र आणि तूपासारखा मध आणला होता. त्यावरून गप्पा चालल्या होत्या. चंदर म्हणाला की गावाकडे बायका एका वेगळ्या कारणासाठी मधाचं पोळं काढण्याची वाट बघत. पुरूषांनी घोंगडी पांघरून मशाली घेऊन पोळं काढलं की घरच्यासाठी मध ठेऊन मुलांनी पोळ्याला चिकटलेला मध खाल्ला की घरातल्या बायका मेण ताब्यात घेऊन आपापला वाटा निगुतीने डबीत भरून ठेवत.त्या काळी बायका पिंजर लावीत असत. कपाळावर मेण लावून त्यावर बोटाने कुंकू अगदी अचूकपणे गोल रेखीत. त्याचं फार नवल वाटे.
शहरात राहणारी, गोल पातळ नेसणारी माझी आईही पिंजर लावत असे.तिच्याकडे एका छोट्या पेटीत मेणाची डबी, पिंजर, घरी केलेलं काजळ किंवा जाई काजळ, पावडर, अफगाण स्नो अशा गोष्टी असत. तिने केलेल्या कागदी, कापडी फुलं, गजरे, बाहुल्या, शंखशिंपल्यांच्या वस्तू विकून दादरच्या सौभाग्य वस्तू भांडारातून ती त्या घेऊन येई. आम्हाला अफगाण स्नोचं फार आकर्षण असे. पण ती हे सगळं फार सांभाळून ठेवत असे आणि जपून वापरत असे.
नंतर बायका ओलं गंध वापरायला लागल्या. काहीजणी लिपस्टीकचा वापर कुंकू लावायला करीत. मग टिकल्यांचा जमाना आला. त्याच दरम्यान सौभाग्यलक्षण असण्याच्या बंधनातून कुंकवाची मुक्ती झाली. कुंकू हा आवडीचा भाग झाला आणि विविध आकार, रंग यातून तिचा मुक्त आविष्कार सुरू झाला. मालिकांमधल्या खलनायिकांच्या चित्रविचित्र टिकल्या लक्ष वेधून घेऊ लागल्या.
आता फक्त खेड्यातल्या म्हाताऱ्या बायका मेणावर पिंजर लावत असतील. कुंकू आणि मधाचा संबंध उरला नाही.