“तुझा चेहरा दिसला तर दिवस चांगला जातो, दिवस चांगला जातोSS” ही गाण्याची लकेर आणि त्यासोबत सुंदर, गोऱ्या गोमट्या बाईचा चेहरा, तिच्याभोवती फेर धरणारी गोंडस मुलं हे सगळं पाहिलं की ते अगदी मनात घर करतं आणि आपण विसरून जातो की ही जाहिरात एक अंधश्रद्धा नकळत रुजवतेय. एकतर कुणाचा तरी मुखडा पाहिल्यावर दिवस चांगला किंवा वाईट जातो ही मुख्य अंधश्रद्धा आणि तितकीच भयानक अंधश्रद्धा म्हणजे ते विशिष्ट क्रीम किंवा विशिष्ट साबण वापरून गोरी झालेली मुलगीच चांगली दिसते ही. अशा जाहिरातींच्या सापळ्यात अडकलेल्या कित्येक तरुण मुली आपल्या आजूबाजूला आढळतील. अगदी ग्रामीण भागातही अशी क्रीम्स, साबण वापरणाऱ्या, दिवसभर मेकप करुन गोऱ्या दिसण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुली दिसतील. कोवळ्या वयात अशी प्रसाधनं वापरुन त्यांच्या त्वचेवर कायमचा परिणाम होत असतो.
अशी तरुण मुलं असोत, लहान मुलं असोत की वयस्कर माणसं आपण सगळेच दृश्य श्राव्य माध्यमांच्या फार आहारी गेलोय सध्या. वाचन, लेखन, व्याख्यानं ऐकणं हे पूर्वी सुसंस्कृत होण्याचे जे उपाय असत ते आता मागे पडलेत. आता ही दृश्य श्राव्य माध्यमं म्हणजेच ज्ञानाचे स्रोत. जाहिराती असोत, मालिका असोत, चित्रपट असोत की व्हिडियो गेम्स असोत ह्या सगळ्यात आपला दिवसाचा बराच वेळ खर्ची पडतो. खरं तर ही माध्यमं फार शक्तीशाली आहेत. जे सांगायचंय पोहोचवायचंय ते समोर दिसत असतं, ऐकू येत असतं त्यामुळे ह्या माध्यमांकडे लोक अधिक आकर्षित होतात. पूर्वीच्या छपाई माध्यमांसारखी ती नाहीत. अगदी निरीक्षर व्यक्तीपर्यंतही ही माध्यमं पोहोचू शकतात. त्यातली पॉडकास्ट, ऑनलाईन चर्चा, शिक्षण, वेगवेगळ्या विषयांवरील यूट्यूब मालिका ह्यांचा शिकण्यासाठी फार उपयोग होतो. नीट जबाबदारीने निवड करता आली तर ही माध्यमं उत्तम रित्या उपयोगी पडतात. पण सगळ्या ठिकाणी ते आपल्या हातात नसतं. कारण आपण एखादा विशिष्ट चित्रपट, विशिष्ट मालिका पहायचं ठरवलं तरी त्यासोबत येणाऱ्या जाहिरातींवर आपला ताबा नसतो. तसंच एखादी मालिका चांगली वाटली म्हणून पाहात गेलो तर ती कुठे, कशी भरकटत जाईल, तिच्यातून काय समोर येईल ह्यावरही आपला ताबा नसतो.
माझ्या मुलाचं एक निरीक्षण मला ह्या संदर्भात महत्त्वाचं वाटलं. एका विशिष्ट वाहिनीवरील काही मालिकांसंदर्भात त्याने एकदा मला सांगितलं, “ह्या सगळ्या मालिकांमधले नायक हे उद्योगपती किंवा श्रीमंत घरातले आहेत आणि सगळ्या नायिका गरीब आहेत. इतकंच नाही तर नायक त्यांच्या प्रेमात पडलेत कारण त्या नायिका सर्वांशी जुळवून घेणाऱ्या, सर्वांची मर्जी राखत प्रसंगी आपल्याला जे मनापासून करावसं वाटतं त्याचा बळी देणाऱ्या आहेत. परंपरेशी जुळवून घेणाऱ्या आणि त्यासाठी एक व्यक्ती म्हणून आपल्या अधिकारांवर पाणी सोडणाऱ्या आहेत.”
मग मला जाणवलं की अरे हो खरंच की. नकळत आपल्या मनात काय रुजवलं जातंय हे माझ्यासारख्या स्वतःला जबाबदार समजणाऱ्या व्यक्तीलाही उमगत नाही इतके आपण ह्या माध्यमांच्या प्रभावाखाली असतो. हल्ली एखादा हिंदूंचा सण आला की मालिकांमध्ये त्या सणाचा ‘इव्हेंट’ केला जातो. सगळ्या वाहिन्यांवर तेच दृश्य वेगवेगळ्या रुपात दिसतं. दागिन्यांनी मढलेल्या बायका व्रतवैकल्यं करतांना दिसतात. मला आठवतंय की पूर्वीही छट पूजा उत्तर भारतीयांकडून केली जायची पण आता त्या छटपूजेचाच काय गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचाही ‘इव्हेंट’ केला जातो. त्यात राजकारणाचा भाग असला तरी दृश्य श्राव्य माध्यमांचा प्रभाव नाकारता येत नाही. शोभायात्रेवरून आठवलं. एका चहाच्या ब्रँडच्या जाहिरातीत घरच्यांना चहानाश्ता देऊन घरातली सगळी कामं उरकून नऊवारी साडी, दागिने, फेटा, नथ आणि गॉगल घालून शोभायात्रेत बाईकवरून जाणारी तरूणी दाखवलीय आणि ती पुन्हा घरी आल्यावर चहा करून इतरांना पाजतांना आणि स्वतः पितांना दाखवलंय. म्हणजे आधुनिक, स्वतंत्र स्त्री कोणती तर जी शोभायात्रेत बाईकवरून जाते, ढोल वाजवते पण जिला घरात कुणी एक कप चहाही करून देत नाही. सगळी कर्तव्य पार पाडल्यावरच ‘स्वतंत्र’ असल्याचं समाधान तिला मिळू शकतं. अशा कर्तव्यनिष्ठ स्त्रिया डोंबीवली, पार्ला, गिरगाव, ठाणे, पुणे, कोल्हापुर सर्वत्र पहायला मिळतील. जाहिरातीत खरीखुरी स्वतंत्र स्त्री दाखवायला काही मनाई नाही. परंतु बऱ्याच जाहिरातींमध्ये आणि मालिकांमध्ये अशाच कर्तव्यनिष्ठ स्त्रिया दाखवल्या जातात. एका जाहिरातीत आईची जागा नेहमी स्वैंपाकघरातच का असते असा प्रश्न मुलीला पडलेला दाखवलाय. तिला आपल्या आईला मनासारखं जगता येत नाही याचं वाईट वाटतंय. जाहिरातीच्या शेवटी आई तिचं आवडतं नृत्य करतांना दाखवलीय, पण त्याआधी ती साबुदाणावड्यापासून साग्रसंगीत जेवणाचे सगळे पदार्थ तयार करुन ते विशिष्ट तेलात केल्याने ताजे राहणारे पदार्थ गरम राहतील अशा प्रकारे टेबलावर ठेवून मगच स्वतःसाठी वेळ काढते.
काही जाहिराती अपवाद असतात, नाही असं नाही. उदाहरणार्थ एका जाहिरातीत मुलीचा मित्र घरी आल्यावर वडील पुऱ्या तळतांना दाखवलेत आणि ते त्या मित्राला फार प्रेमाने गरमागरम पुऱ्या खातोस का असं विचारतात. तर दुसऱ्या एका जाहिरातीत कांदेपोह्यांच्या (दाखवण्याच्या) कार्यक्रमात मुलगा घरी आलेल्या मुलीला आणि तिच्या वडीलांना ताक देतो असं दाखवलंय. अलीकडेच एक जाहिरात पाहिली. त्यात अशाच कार्यक्रमात मुलाची आई मुलीकडच्यांना सांगते की आमचा मुलगा स्वावलंबी आहे, स्वतःचा स्वैंपाक स्वतःच करतो. मग तो मुलगाही त्या मुलीला आश्वासन देतो की मी तुला स्वैंपाकात मदत करीन. त्यावर ती मुलगी म्हणते, “ठीक आहे, मग मीही तुम्हाला भांडी घासायला मदत करीन. कारण मला कामावरून यायला बरेचदा उशीर होतो तेव्हा भांडी तुम्हाला घासावी लागतील. त्यात मीही तुम्हाला मदत करीन. स्वैंपाकासारखं घरकामातही स्वावलंबी व्हायला हवं”
काही मालिकांमध्ये समाजातले काही प्रश्न मांडले जातात. जोडीदाराच्या निधनानंतर वयस्कांनी एकट्याने उरलेलं आयुष्य निभावण्याऐवजी पुन्हा जोडीदार शोधला तर ते सुसह्य होतं. पण समाजात ह्या विचाराला अजूनही मान्यता मिळत नाही. विशेषतः बायकांच्या बाबतीत तर फारच विरोध होतो. गूपचूप देव देव करीत बसण्याऐवजी हे काय भलतंच खूळ म्हातारपणात असं म्हटलं जातं. हा प्रश्न एका मालिकेत मांडला गेला पण पुढे कारस्थानांच्या धबधब्यात मूळ प्रश्न मागे पडला. वजनदार मुलींना ज्या टीकेला तोंड द्यावं लागतं, ज्या प्रकारे त्यांना लग्न होण्यात अडचणी येतात त्यावर काही मालिका आल्या. पण तिथेही हाच प्रकार घडला. कारस्थानांच्या धबधब्यात मूळ प्रश्न मागे पडून जातात. शिवाय हाही प्रश्न पडतो की फक्त वजनदार मुलींनाच अडचणी येतात का? वजनदार मुलांनाही हे असे अनुभव येत असतील. मग ते का मांडले जात नाहीत? की फक्त मुली वजनदार असलेल्या चालत नाहीत, मुलं वजनदार असली तरी काही फरक पडत नाही?
सध्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढीला लागलेल्या आहेत अशा वेळी माध्यमांनी जागरूक असणं आवश्यक आहे. पण खेदाची गोष्ट ही कि जागरूकता तर सोडूनच द्या, साधी संवेदनशीलताही आढळत नाही. अलीकडे एका मालिकेत दाखवलं गेलं कि नायकाला आपल्या प्रेयसीला आपली बाजू समजावून सांगायची असते (तिने अजून त्याला प्रतिसादही दिलेला नाही), त्यासाठी तिला एकांतात गाठायला मित्र एक युक्ती योजतो. तो म्हणतो तू तिला लिफ्टमध्ये गाठ मी ती मध्येच बंद पडेल असं पहातो. तसं केलं जातं. कथानकात काय घडतं ते जरा बाजूला ठेवू, परंतु कायद्याच्या दृष्टीने पाहता हा गुन्हाच ठरु शकतो. एखाद्या स्त्रीला कल्पना न देता अशा प्रकारे तिच्या संमतीशिवाय एकांतात गाठू पाहणं म्हणजे तिच्या हक्कांवर आक्रमणच. अशा तथाकथित कौटुंबिक मालिका अख्खं कुटुंब एकत्रितपणे पाहतं. त्यात लहान मुलंही असतात. ती अपरिपक्व असतात. त्यांना ही घटना आवडू शकते. त्यात काही गैर आहे हे जर कुटुंबातील वयस्करांनी समजावून सांगितलं नाही तर त्यांना कळणारही नाही. एका लोकप्रिय मालिकेतला नायक घरी सुशील, सुंदर पत्नी असतांना तिला घटस्फोट न देता मैत्रिणीशी जुजबी लग्न करतो. दोघींनाही फसवतो. पण हा नायक फार लोकप्रिय झाला. एका खाद्यमालिकेत एका पौगंडावस्थेतील मुलाला बोलवलं होतं. त्याला पदार्थ करतांना गप्पा मारता मारता विचारलं गेलं की तुला मालिकांमधली कुठली व्यक्तीरेखा आवडते. तेव्हा त्याने ह्या नायकाचा उल्लेख केला आणि तो आपला आदर्श असल्याचं सांगितलं. नंतरही एका वृत्तवाहिनीच्या बातमीत त्याच्या वयाच्या बऱ्याच मुलांनी तो नायक त्यांचा आदर्श असल्याचं सांगितलं. मुलांना समुपदेशन न करता अशा प्रकारच्या घटना दाखवल्या गेल्या आणि पुढे जाऊन वर सांगितलेले फंडे अशा प्रेमवीरांनी अंगिकारले तर काय होईल ह्याचा काहीच विचार केला जात नाही. नकळत आपल्या मनात असं बरंच काही रूजवलं जातंय ते कधी थांबेल, कुठे घेऊन जाईल काय माहीत.
वेगवेगळ्या मालिका, वेबमालिका, चित्रपट, व्हिडियो गेम्स ह्यात हिंसाचार प्रचंड असतो. कारण लोकांना तो खिळवून ठेवतो. “उगाच डोक्याला ताप नको” म्हणून हाणामारी पहाणारे अनेकजण असतात हे त्यांना माहिती आहे. मालिकांमध्ये तर कुटुंबियांविरोधात कारस्थानच नव्हे तर त्यांच्यावर मारेकरी घालण्याची चढाओढ दाखवलेली असते. व्हिडियो गेम्समधल्या लढाया, हाणामाऱ्यांमुळे लहान मुलांना हिंसाचाराचं काही वाटेनासं झालं आहे. त्यांचंच कशाला आपलीही तीच गत आहे. आपलीही नजर मेली आहे.
मध्यतंरी धर्म,जात, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या संदर्भात गैरसमज पसरवणाऱ्या द्वेषमूलक फेक पोस्ट खूप येत होत्या. नंतर त्या फेक असल्याचं कळलं तरी मूळ पोस्टचा परिणाम सहज पुसला जात नाही.
मूळात हे ध्यानात घेणं आवश्यक आहे की ही माध्यमं इथे तुमचं मनोरंजन करायच्या निमित्ताने आपला फायदा करून घ्यायला आलेली आहेत. त्यांना पैसा कमवायचा आहे. मालिकांना टीआरपी मिळवायचाय, चित्रपटांना गल्ला कमवायचाय. इतर माध्यमांना तुमच्या आवडीनिवडी जाणून त्याच प्रकारच्या जाहिराती तुम्हाला दाखवून पैसा कमवायचाय. समाज कुठल्या दिशेला जाईल ह्याचं त्यांना काहीही पडलेलं नाही. खरं तर विज्ञानवादी, समतावादी, मानवतावादी दृष्टीकोन रुजवण्याच्या दृष्टीने ह्या प्रभावी माध्यमांनी प्रयत्न करायला हवेत. पण तसं होतांना दिसत नाही. त्यामुळे निवड करतांना सावध राहणं, दक्ष राहणं अत्यावश्यक आहे. सावधपणे निवड केली तर ह्या माध्यमांचं सामर्थ्य अधिक वाढेल आणि त्यांचा योग्य उपयोग करता येईल.