आमच्या लहानपणी गिरणगावात लग्नात जेवणावळी होत नसत. सकाळी आप्तेष्टांसाठी घरातल्या बायका पारंपरिक बेत करीत. संध्याकाळी वधूच्या इमारतीच्या गच्चीवर छोटं व्यासपीठ,मंडप उभारलं जाई. समोर खुर्च्या मांडल्या जात. गोरज मुहूर्तावर लग्न लागलं की पाहुण्यांना पेढे, सुपारी आणि शीतपेय दिलं जाई.त्यात फँटा, मँगोला लोकप्रिय असत. काहीजण दूध कोल्ड्रींक देत. त्यात रोज, पिस्ता लोकप्रिय असत. फारच पैसे असतील तर आईस्क्रीम दिलं जाई. व्हॅनिला, तिरंगी आणि कसाटा अशी चढती भाजणी असे. एखाद्याने कसाटा आईस्क्रीम दिलं तर त्याची चर्चा काही दिवस चाले.
पण ह्यात कुठलाही फापटपसारा नसे. शीतपेय घेऊन आलेला जवळच्या दुकानातला पोरगा बाटल्या क्रेटमध्ये घालून घेऊन जाई. आईस्क्रीमवालाही ओळखीतला असे. उरलेल्या आईस्क्रीमसह सगळं घेऊन जाई. दुसऱ्या दिवशी गच्ची साफ करून दिली की मामला खतम. खर्चही फार नसे.
पुढे हॉल घेऊन आचाऱ्याकडून स्वैंपाक करण्याची पदधत रूढ झाली. पण आधल्या रात्री धान्यधुन्याच्या गोणी घेऊन जाऊन राखण करावी लागे. सकाळी ते आचाऱ्य़ाच्या ताब्यात देऊन भाजीपाला आणून द्यावा लागे. भाताचा एक प्रकार,दोन भाज्या, भजी,गोडाचा पदार्थ,पुऱ्या असे ठराविक प्रकार असत.उरलेलं अन्न आचारी यजमानांना परत करी. रवा,मैदा,बेसन उरलं तर लोक आचाऱ्याला नंतर बोलावून घरच्यांसाठी नानखटाई,लाडू,खारी बनवून घेत. त्यामुळे अन्न फारसं वाया जात नसे.
आता मात्र सगळं कंत्राट देऊन केलं जातं. चार चार दिवस वेगवेगळ्या समारंभांसाठी जेवणावळी होतात. देशीविदेशी विविध पक्वानं अलतात. काय खावं काय नको असं होऊन लोक खूप वाढून घेऊन मग टाकून देतात. पास्ता,डोसा,नूडल्स मागणीप्रमाणे बनवल्यामुळे वाया जात नसतील पण इतर पदार्थांची नासाडी होते. आमच्या ओळखीतल्या एका गृहस्थांचं त्यांच्या आजारांमुळे कडक पथ्य पाळलं जातं. मग अशा समारंभात ते त्याचं उट्ट काढून आडवा हात मारतात आणि आजारी पडतात.
त्या मानाने खेडेगावांत अजूनही मोजक्या पदार्थांचे पारंपरिक बेत असतात. मालवण पट्ट्यात डाळभात, एक भाजी, वडे, काळ्या वाटाण्याची उसळ आणि तांदळाची खीर जिला तिथे सोजी म्हणतात ती जेवणात असते. थोड्याफार फरकाने बेत बदलत असला तरी वडे आणि खीर कोकणात सर्वत्र असते.
जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात तर याहूनही कमी पदार्थ जेवणावळीत असतात. डाळभात,बटाटा आणि हरभरे यांची अंगासरसा रस असणारी भाजी जिला शाक म्हणतात, आणि गोडाचा पदार्थ. माझ्या आजेसासूच्या काळात पुऱ्या आणि गुळवणी, नंतर त्याची जागा लापशीने घेतली. सध्या बुंदी दिली जाते. पण थोड्याफार फरकाने असे बेत असतात. कोबी चणाडाळ, वाटाणा किंवा हरभरा बटाटा अशा स्वस्त, सहज उपलब्ध असलेल्या भाज्या असतात.स्थानिक पातळीवर मुबलक असलेल्या भाज्या वापरल्या जातात. पालघर डहाणूकडे कडवे वाल आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी, खानदेशातही शेवग्याच्या शेंगांची भाजी केली जाते. त्या त्या ठिकाणचे लोकप्रिय प्रकार जसं विदर्भात साभांरवडी, मराठवाड्यात येसर आमटी केले जातात. गावातले लोकच रांधप वाढप करतात. मंडप घालायची गरज नसते. कुणाची ओसरी, दुकानाच्या पायऱ्या, एखाद्याचं मोठं घर किंवा चक्क गावाच्या आतल्या रस्त्यांवर पाणी शिंपडून पंक्ती बसवल्या जातात. पत्रावळी असतात. शिवाय लोकही घरून ताटवाटी आणतात. या सगळ्यामुळे खर्च कमी होतो. सामुदायिक विवाहात तर फारच कमी खर्च होई. अर्थात वेगाने खेड्यांचं निमशहरीकरण झाल्यावर हे चित्र बदललं. आता तिथेही शहरी पद्धतीने
कंत्राट दिलं जातं.
आताच्या चार पाच दिवस चालणाऱ्या समारंभात फार खर्च आणि अन्नाची नासाडी होते. हे टाळण्यासाठी बरेच पर्याय आहेत. तिन्ही त्रिकाळ भरपेट जेवणाऱ्या लोकांऐवजी गरजूंना अन्नवाटप, अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना देणगी किंवा हे पैसे वधुवराच्या नावे गुंतवणं हे त्यापैकी काही.
आता लोकांनाही हे बदललं पाहिजे असं वाटतंय.