श्रमोपाहार१

आमच्या घरकामात मदत करणाऱ्या मावशींनी  माझ्या गरोदरपणात मला खावीशी वाटे म्हणून फणसाची भाजी माझ्यासाठी खास करुन आणली. भाजी छानच होती, माझे डोहाळे पुरवल्यामुळे मी त्यांचे आभार मानतांना म्हटलं, “छान होती भाजी, फक्त जरा तिखट होती. पण चव आली त्यामुळे तोंडाला.” “जल्ला मेला सगला दिस पान्यात हात…” असं म्हणत त्यांची गाडी सुरु झाली. तात्पर्य हे की पाण्यात संबंध वेळ हात (आणि पायही) असल्याने सर्दी होऊ नये म्हणून त्या तिखट खातात. तिखटामुळे आपल्या घशातला सर्दीचा चिकटपणा स्वच्छ व्हायला मदत होत असली तरी वरचेवर तिखट खाल्ल्याने त्यावर काही परिणाम होत नाहीच, शिवाय इतकं तिखट खाल्ल्याने पित्तप्रकोप, मूळव्याध ह्यांसारखे आजार मात्र सोबतीला येतात.

माझं बालपण लालबाग परेल ह्या कष्टकऱ्यांच्या मुंबईत गेलं. तिथे डोक्यावरच्या पेटाऱ्यात  खारी बिस्किटं, बटर, कडक पाव घेऊन हिंडणारे फिरते विक्रेते असत. चहात बुडवल्यावर हे सगळं टम्म फुगत असे. त्याची एक वेगळीच मज्जा असे. गिरणीत काम करणारी माणसं  ह्यातलं काहीतरी – विशेषतः कडक पाव घेऊन तो चहासोबत खाऊन न्याहारीचा प्रश्न मिटवून टाकीत. दिवसभर कष्ट करणारी आमच्या ह्या मावशींसारखी माणसं स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्षच करतात. सकाळी न्याहारी करायला सवडही नसते.  मग नुसताच चहा प्यायचा. किंवा फारतर आधल्या दिवशीची चपाती गरम करुन चहासोबत खायची, शिळ्या भाताला फोडणी देऊन खायचं किंवा परवडत असेल तर खारी, बटर चहासोबत खायचं हाच त्यांचा नाश्ता. कष्ट करणाऱ्या मंडळींनी खरं तर संमिश्र कर्बोदकं आहारात घेतली पाहिजेत. त्यातून त्यांना दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा मिळते. हल्ली पीठ चाळून घेऊनच वापरलं जातं. खऱं तर कोंड्यासकटच्या धान्यातून मिळणारं कर्बोदक अधिक चांगलं असतं कारण त्यात चोथा असतो. धान्यांप्रमाणे संमिश्र कर्बोदकं  मटार, चवळी ह्यासारख्या शेंगांमध्ये, बटाटा, रताळे ह्यांसारखे कंद (ह्यांच्या विषयीच्या गैरसमजातून ह्या भाज्या आहारातून बादच झाल्या आहेत) आणि केळ्यासारखी फळं, लाल भोपळ्यासारख्या भाज्यांमधून मिळतात. पण हे सगळे घटक वापरुन न्याहारीसाठी काही पदार्थ करावा इतकी उसंत मिळत नसते. परिणामी काही काळाने आरोग्य बिघडत जातं. ह्यासाठी आज सहज घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांमधून करता येण्याजोगे दोन पदार्थ इथे देते. एक कामाच्या दिवशी करायचा आणि दुसरा सुट्टीच्या दिवशी मुलाबाळांसह घरात काही विशेष, वेगळं खाता यावं ह्यासाठी.

शिळा भात बरेच वेळा उरलेला असतो. बऱ्याच घरांतून तो फोडणीला घालून खाल्ला जातो. काही लोक त्यात बेसनाचं पीठ घालून त्याची भजी करतात. ह्याच शिळ्या भाताचा वापर करुन आपल्याला एक चटकदार पदार्थ करता येईल ज्यातून ऊर्जाही मिळेल आणि जीवनसत्वही मिळतील आणि जिभेचे चोचलेही पुरवले जातील. ह्यासाठी लागणारे घटक जसं की कांदा, कोथिंबीर, लसूण, बटाटा किंवा लाल भोपळा हे घरात सहसा उपलब्ध असतात. पण त्या व्यतिरिक्त एका भाजीचा वापर आपण करणार आहोत, जी आजूबाजूला सहज उपलब्ध असते. ती भाजी म्हणजे शेवग्याचा पाला. शेवग्याच्या पानात जीवनसत्व अ, क आणि लोह भरपूर प्रमाणात असते. विशेषतः बायकांना ह्यातल्या लोहाची फार गरज असते.

  • भाताचं थालीपीठ

लागणारे जिन्नस : एक वाटी भात, एक मध्यम कांदा बारीक चिरलेला, एक गच्च वाटी भरून शेवग्याचा पाला बारीक चिरलेला, चार पाकळ्या लसूण बारीक चिरलेला, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा किंवा रताळं, पाव चमचा हळदपूड, मालवणी मसाला एक चमचा (तुम्हाला मालवणी मसाला आवडत नसल्यास किंवा घरात उपलब्ध नसल्यास घरी रोजच्या वापरासाठी केलेला मसाला चालेल किंवा धणेजिरे पूड आणि लाल तिखट चालेल), एक मूठ कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धी वाटी बेसनपीठ ( बेसनपीठाऐवजी आधल्या रात्रीची उरलेली एखादी डाळ असल्यास चालेल, पण फार पातळ नको), चवीनुसार मीठ, लसूण बारीक चिरुन, लाल भोपळ्याचा छोटा तुकडा किसून

कृती  : भात हाताने बारीक करुन घ्यावा, बटाटा/रताळं कुस्करुन घ्यावं. बाकी साहित्य त्यात मिसळून थापता येण्याजोगं पीठ झालं असेल तर ठीक फार घट्ट वाटलं तरच पाणी घालावं. बेसनाऐवजी डाळ वापरली असेल तर तिखटमीठ त्या अंदाजाने कमी करावं, डाळ पातळ असेल तर भाताचं, बटाट्याचं प्रमाण थोडं वाढवावं किंवा घरात असलेल्या पीठांपैकी काही जसं की गव्हाचं, ज्वारीचं  किंवा नाचणीचं पीठ अंदाजाने घालावं . ओल्या रुमालावर किंवा प्लास्टिकच्या तुकड्यावर थापून थालीपीठाला थोडी भोकं पाडावीत. बीडाच्या तव्यावर किंवा निर्लेपच्या तव्यावर भोकातून किंचित तेल सोडून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजून घ्यावं. ह्यासोबत दही, स़ॉस काहीही चांगलं लागतं पण दुसऱ्या पदार्थासाठी दिलेली चटणी केल्यास उत्तम.

  • सारणाच्या शेवया

लागणारे जिन्नस :

शेवयांसाठी:  तांदूळपीठ २ वाट्या, चवीनुसार मीठ, एक चमचा तेल

गोड सारणासाठी : खवलेलं ओलं खोबरं एक वाटी, गूळ पाऊण वाटी, केळं, आंबा (कुठलाही पायरी किंवा रायवळही चालेल), किंवा फणस ह्यांपैकी कोणतेही एक फळ बारीक चिरुन किंवा रस, आवडत असल्यास वेलचीपूड, जायफळपूड

तिखट सारणासाठी : बारीक चिरलेला किंवा किसलेला कोबी एक वाटी, किसलेलं गाजर एक वाटी, उकडलेले मटारदाणे एक वाटी, आलं,लसूण, हिरवी मिरची ह्यांचा ठेचा आवडीनुसार, चवीनुसार मीठ, लिंबू रस एक चमचा

चटणीसाठी : दोन मध्यम टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे किंवा डाळ्या अर्धी वाटी, लसूण ३-४ पाकळ्या, कढीपत्त्याची पानं अर्धी वाटी, चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर, लाल तिखट आवडीनुसार

कृती : दोन वाट्या पीठासाठी दोन वाट्या पाणी घेऊन त्यात किंचित मीठ, एक चमचाभर तेल घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यावर आच बंद करुन पीठ हळूहळू सोडून उलथन्याच्या टोकाने ढवळून पीठ नीट मिसळून घ्यावं. थोडं गार झाल्यावर तेलाचा हात लावून नीट मळून घ्यावं.

गोड सारण करतांना शक्यतो ताडाचा गूळ मिळाल्यास घ्यावा. ताडाच्या गूळात बी २ हे जीवनसत्व असतं जे मज्जातंतूना बळ पुरवतं, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, कोबाल्ट हे त्यात बऱ्यापैकी असतात, त्याने ऊर्जा तर मिळतेच शिवाय रक्तक्षय होऊ नये यासाठी त्याचा फार उपयोग होतो. सारणाचे सर्व पदार्थ शिजवून साधारण कोरडे करुन घ्यावेत.

तिखट सारण करतांनाही सर्व घटक पदार्थ एकत्र परतून घेऊन त्यातला पाण्याचा अंश जाईल इतपत कोरडे करुन घ्यावे.

चकलीच्या सोऱ्यात शेवेची चकती लावून उकड काढलेलं पीठ घालून केळीच्या पानावर किंवा प्लास्टीकच्या कागदावर लांबट आकारात शेवया पाडाव्या. गोड किंवा तिखट सारण घालून पानाच्या किंवा प्लास्टिकच्या सहाय्याने गुंडाळी करावी. मोदकपात्रात घालून वाफवावी.

चटणीसाठीचे सगळे जिन्नस एकत्र वाटावे. आवडत असल्यास खोबरेल तेलात राई, हिंगाची फोडणी देऊन चटणीवर घालावी आणि तिखट शेवयांसोबत वाढावी.

संपर्क ९८१९९६३०४५

लग्नातल्या जेवणावळी

आमच्या लहानपणी गिरणगावात लग्नात जेवणावळी होत नसत. सकाळी आप्तेष्टांसाठी घरातल्या बायका पारंपरिक बेत करीत. संध्याकाळी वधूच्या इमारतीच्या गच्चीवर छोटं व्यासपीठ,मंडप उभारलं जाई. समोर खुर्च्या मांडल्या जात. गोरज मुहूर्तावर लग्न लागलं की पाहुण्यांना पेढे, सुपारी आणि शीतपेय दिलं जाई.त्यात फँटा, मँगोला लोकप्रिय असत. काहीजण दूध कोल्ड्रींक देत. त्यात रोज, पिस्ता लोकप्रिय असत. फारच पैसे असतील तर आईस्क्रीम दिलं जाई. व्हॅनिला, तिरंगी आणि कसाटा अशी चढती भाजणी असे. एखाद्याने कसाटा आईस्क्रीम दिलं तर त्याची चर्चा काही दिवस चाले.

पण ह्यात कुठलाही फापटपसारा नसे. शीतपेय घेऊन आलेला जवळच्या दुकानातला पोरगा बाटल्या क्रेटमध्ये घालून घेऊन जाई. आईस्क्रीमवालाही ओळखीतला असे. उरलेल्या आईस्क्रीमसह सगळं घेऊन जाई. दुसऱ्या दिवशी गच्ची साफ करून दिली की मामला खतम. खर्चही फार नसे.

पुढे हॉल घेऊन आचाऱ्याकडून स्वैंपाक करण्याची पदधत रूढ झाली. पण आधल्या रात्री धान्यधुन्याच्या गोणी घेऊन जाऊन राखण करावी लागे. सकाळी ते आचाऱ्य़ाच्या ताब्यात देऊन भाजीपाला आणून द्यावा लागे. भाताचा एक प्रकार,दोन भाज्या, भजी,गोडाचा पदार्थ,पुऱ्या असे ठराविक प्रकार असत.उरलेलं अन्न आचारी यजमानांना परत करी. रवा,मैदा,बेसन उरलं तर लोक आचाऱ्याला नंतर बोलावून घरच्यांसाठी नानखटाई,लाडू,खारी बनवून घेत. त्यामुळे अन्न फारसं वाया जात नसे.

आता मात्र सगळं कंत्राट देऊन केलं जातं. चार चार दिवस वेगवेगळ्या समारंभांसाठी जेवणावळी होतात. देशीविदेशी विविध पक्वानं अलतात. काय खावं काय नको असं होऊन लोक खूप वाढून घेऊन मग टाकून देतात. पास्ता,डोसा,नूडल्स मागणीप्रमाणे बनवल्यामुळे वाया जात नसतील पण इतर पदार्थांची नासाडी होते. आमच्या ओळखीतल्या एका गृहस्थांचं त्यांच्या आजारांमुळे कडक पथ्य पाळलं जातं. मग अशा समारंभात ते त्याचं उट्ट काढून आडवा हात मारतात आणि आजारी पडतात.

त्या मानाने खेडेगावांत अजूनही मोजक्या पदार्थांचे पारंपरिक बेत असतात. मालवण पट्ट्यात डाळभात, एक भाजी, वडे, काळ्या वाटाण्याची उसळ आणि तांदळाची खीर जिला तिथे सोजी म्हणतात ती जेवणात असते. थोड्याफार फरकाने बेत बदलत असला तरी वडे आणि खीर कोकणात सर्वत्र असते.

जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात तर याहूनही कमी पदार्थ जेवणावळीत असतात. डाळभात,बटाटा आणि हरभरे यांची अंगासरसा रस असणारी भाजी जिला शाक म्हणतात, आणि गोडाचा पदार्थ. माझ्या आजेसासूच्या काळात पुऱ्या आणि गुळवणी, नंतर त्याची जागा लापशीने घेतली. सध्या बुंदी दिली जाते. पण थोड्याफार फरकाने असे बेत असतात. कोबी चणाडाळ, वाटाणा किंवा हरभरा बटाटा अशा स्वस्त, सहज उपलब्ध असलेल्या भाज्या असतात.स्थानिक पातळीवर मुबलक असलेल्या भाज्या वापरल्या जातात. पालघर डहाणूकडे कडवे वाल आणि शेवग्याच्या शेंगांची भाजी, खानदेशातही शेवग्याच्या शेंगांची भाजी केली जाते. त्या त्या ठिकाणचे लोकप्रिय प्रकार जसं विदर्भात साभांरवडी, मराठवाड्यात येसर आमटी केले जातात. गावातले लोकच रांधप वाढप करतात. मंडप घालायची गरज नसते. कुणाची ओसरी, दुकानाच्या पायऱ्या, एखाद्याचं मोठं घर किंवा चक्क गावाच्या आतल्या रस्त्यांवर पाणी शिंपडून पंक्ती बसवल्या जातात. पत्रावळी असतात. शिवाय लोकही घरून ताटवाटी आणतात. या सगळ्यामुळे खर्च कमी होतो. सामुदायिक विवाहात तर फारच कमी खर्च होई. अर्थात वेगाने खेड्यांचं निमशहरीकरण झाल्यावर हे चित्र बदललं. आता तिथेही शहरी पद्धतीने

कंत्राट दिलं जातं.

आताच्या चार पाच दिवस चालणाऱ्या समारंभात फार खर्च आणि अन्नाची नासाडी होते. हे टाळण्यासाठी बरेच पर्याय आहेत. तिन्ही त्रिकाळ भरपेट जेवणाऱ्या लोकांऐवजी गरजूंना अन्नवाटप, अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना देणगी किंवा हे पैसे वधुवराच्या नावे गुंतवणं हे त्यापैकी काही.

आता लोकांनाही हे बदललं पाहिजे असं वाटतंय.

नकळत

“तुझा चेहरा दिसला तर दिवस चांगला जातो, दिवस चांगला जातोSS” ही गाण्याची लकेर आणि त्यासोबत सुंदर, गोऱ्या गोमट्या बाईचा चेहरा, तिच्याभोवती फेर धरणारी गोंडस मुलं हे सगळं पाहिलं की ते अगदी मनात घर करतं आणि आपण विसरून जातो की ही जाहिरात एक अंधश्रद्धा नकळत रुजवतेय. एकतर कुणाचा तरी मुखडा पाहिल्यावर दिवस चांगला किंवा वाईट जातो ही मुख्य अंधश्रद्धा आणि तितकीच भयानक अंधश्रद्धा म्हणजे ते विशिष्ट क्रीम किंवा विशिष्ट साबण वापरून गोरी झालेली मुलगीच चांगली दिसते ही. अशा जाहिरातींच्या सापळ्यात अडकलेल्या कित्येक तरुण मुली आपल्या आजूबाजूला आढळतील. अगदी ग्रामीण भागातही अशी क्रीम्स, साबण वापरणाऱ्या, दिवसभर मेकप करुन गोऱ्या दिसण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुली दिसतील. कोवळ्या वयात अशी प्रसाधनं वापरुन त्यांच्या त्वचेवर कायमचा परिणाम होत असतो.

अशी तरुण मुलं असोत, लहान मुलं असोत की वयस्कर माणसं आपण सगळेच दृश्य श्राव्य माध्यमांच्या फार आहारी गेलोय सध्या. वाचन, लेखन, व्याख्यानं ऐकणं हे पूर्वी सुसंस्कृत होण्याचे जे उपाय असत ते आता मागे पडलेत. आता ही दृश्य श्राव्य माध्यमं म्हणजेच ज्ञानाचे स्रोत. जाहिराती असोत, मालिका असोत, चित्रपट असोत की व्हिडियो गेम्स असोत ह्या सगळ्यात आपला दिवसाचा बराच वेळ खर्ची पडतो. खरं तर ही माध्यमं फार शक्तीशाली आहेत. जे सांगायचंय पोहोचवायचंय ते समोर दिसत असतं, ऐकू येत असतं त्यामुळे ह्या माध्यमांकडे लोक अधिक आकर्षित होतात. पूर्वीच्या छपाई माध्यमांसारखी ती नाहीत. अगदी निरीक्षर व्यक्तीपर्यंतही ही माध्यमं पोहोचू शकतात. त्यातली पॉडकास्ट, ऑनलाईन चर्चा, शिक्षण, वेगवेगळ्या विषयांवरील यूट्यूब मालिका ह्यांचा शिकण्यासाठी फार उपयोग होतो. नीट जबाबदारीने निवड करता आली तर ही माध्यमं उत्तम रित्या उपयोगी पडतात. पण सगळ्या ठिकाणी ते आपल्या हातात नसतं. कारण आपण एखादा विशिष्ट चित्रपट, विशिष्ट मालिका पहायचं ठरवलं तरी त्यासोबत येणाऱ्या जाहिरातींवर आपला ताबा नसतो. तसंच एखादी मालिका चांगली वाटली म्हणून पाहात गेलो तर ती कुठे, कशी भरकटत जाईल, तिच्यातून काय समोर येईल ह्यावरही आपला ताबा नसतो.

माझ्या मुलाचं एक निरीक्षण मला ह्या संदर्भात महत्त्वाचं वाटलं. एका विशिष्ट वाहिनीवरील काही मालिकांसंदर्भात त्याने एकदा मला सांगितलं, “ह्या सगळ्या मालिकांमधले नायक हे उद्योगपती किंवा श्रीमंत घरातले आहेत आणि सगळ्या नायिका गरीब आहेत. इतकंच नाही तर नायक त्यांच्या प्रेमात पडलेत कारण त्या नायिका सर्वांशी जुळवून घेणाऱ्या, सर्वांची मर्जी राखत प्रसंगी आपल्याला जे मनापासून करावसं वाटतं त्याचा बळी देणाऱ्या आहेत. परंपरेशी जुळवून घेणाऱ्या आणि त्यासाठी एक व्यक्ती म्हणून आपल्या अधिकारांवर पाणी सोडणाऱ्या आहेत.”

मग मला जाणवलं की अरे हो खरंच की. नकळत आपल्या मनात काय रुजवलं जातंय हे माझ्यासारख्या स्वतःला जबाबदार समजणाऱ्या व्यक्तीलाही उमगत नाही इतके आपण ह्या माध्यमांच्या प्रभावाखाली असतो. हल्ली एखादा हिंदूंचा सण आला की मालिकांमध्ये त्या सणाचा ‘इव्हेंट’ केला जातो. सगळ्या वाहिन्यांवर तेच दृश्य वेगवेगळ्या रुपात दिसतं. दागिन्यांनी मढलेल्या बायका व्रतवैकल्यं करतांना दिसतात. मला आठवतंय की पूर्वीही छट पूजा उत्तर भारतीयांकडून केली जायची पण आता त्या छटपूजेचाच काय गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचाही ‘इव्हेंट’ केला जातो. त्यात राजकारणाचा भाग असला तरी दृश्य श्राव्य माध्यमांचा प्रभाव नाकारता येत नाही. शोभायात्रेवरून आठवलं. एका चहाच्या ब्रँडच्या जाहिरातीत घरच्यांना चहानाश्ता देऊन घरातली सगळी कामं उरकून नऊवारी साडी, दागिने, फेटा, नथ आणि गॉगल घालून शोभायात्रेत बाईकवरून जाणारी तरूणी दाखवलीय आणि ती पुन्हा घरी आल्यावर चहा करून इतरांना पाजतांना आणि स्वतः पितांना दाखवलंय. म्हणजे आधुनिक, स्वतंत्र स्त्री कोणती तर जी शोभायात्रेत बाईकवरून जाते, ढोल वाजवते पण जिला घरात कुणी एक कप चहाही करून देत नाही. सगळी कर्तव्य पार पाडल्यावरच ‘स्वतंत्र’ असल्याचं समाधान तिला मिळू शकतं. अशा कर्तव्यनिष्ठ स्त्रिया डोंबीवली, पार्ला, गिरगाव, ठाणे, पुणे, कोल्हापुर सर्वत्र पहायला मिळतील. जाहिरातीत खरीखुरी स्वतंत्र स्त्री दाखवायला काही मनाई नाही. परंतु बऱ्याच जाहिरातींमध्ये आणि मालिकांमध्ये अशाच कर्तव्यनिष्ठ स्त्रिया दाखवल्या जातात. एका जाहिरातीत आईची जागा नेहमी स्वैंपाकघरातच का असते असा प्रश्न मुलीला पडलेला दाखवलाय. तिला आपल्या आईला मनासारखं जगता येत नाही याचं वाईट वाटतंय. जाहिरातीच्या शेवटी आई तिचं आवडतं नृत्य करतांना दाखवलीय, पण त्याआधी ती साबुदाणावड्यापासून साग्रसंगीत जेवणाचे सगळे पदार्थ तयार करुन ते विशिष्ट तेलात केल्याने ताजे राहणारे पदार्थ गरम राहतील अशा प्रकारे टेबलावर ठेवून मगच स्वतःसाठी वेळ काढते.

काही जाहिराती अपवाद असतात, नाही असं नाही. उदाहरणार्थ एका जाहिरातीत मुलीचा मित्र घरी आल्यावर वडील पुऱ्या तळतांना दाखवलेत आणि ते त्या मित्राला फार प्रेमाने गरमागरम पुऱ्या खातोस का असं विचारतात. तर दुसऱ्या एका जाहिरातीत कांदेपोह्यांच्या (दाखवण्याच्या) कार्यक्रमात मुलगा घरी आलेल्या मुलीला आणि तिच्या वडीलांना ताक देतो असं दाखवलंय. अलीकडेच एक जाहिरात पाहिली. त्यात अशाच कार्यक्रमात मुलाची आई मुलीकडच्यांना सांगते की आमचा मुलगा स्वावलंबी आहे, स्वतःचा स्वैंपाक स्वतःच करतो. मग तो मुलगाही त्या मुलीला आश्वासन देतो की मी तुला स्वैंपाकात मदत करीन. त्यावर ती मुलगी म्हणते, “ठीक आहे, मग मीही तुम्हाला भांडी घासायला मदत करीन. कारण मला कामावरून यायला बरेचदा उशीर होतो तेव्हा भांडी तुम्हाला घासावी लागतील. त्यात मीही तुम्हाला मदत करीन. स्वैंपाकासारखं घरकामातही स्वावलंबी व्हायला हवं”

काही मालिकांमध्ये समाजातले काही प्रश्न मांडले जातात. जोडीदाराच्या निधनानंतर वयस्कांनी एकट्याने उरलेलं आयुष्य निभावण्याऐवजी पुन्हा जोडीदार शोधला तर ते सुसह्य होतं. पण समाजात ह्या विचाराला अजूनही मान्यता मिळत नाही. विशेषतः बायकांच्या बाबतीत तर फारच विरोध होतो. गूपचूप देव देव करीत बसण्याऐवजी हे काय भलतंच खूळ म्हातारपणात असं म्हटलं जातं. हा प्रश्न एका मालिकेत मांडला गेला पण पुढे कारस्थानांच्या धबधब्यात मूळ प्रश्न मागे पडला. वजनदार मुलींना ज्या टीकेला तोंड द्यावं लागतं, ज्या प्रकारे त्यांना लग्न होण्यात अडचणी येतात त्यावर काही मालिका आल्या. पण तिथेही हाच प्रकार घडला. कारस्थानांच्या धबधब्यात मूळ प्रश्न मागे पडून जातात. शिवाय हाही प्रश्न पडतो की फक्त वजनदार मुलींनाच अडचणी येतात का? वजनदार मुलांनाही हे असे अनुभव येत असतील. मग ते का मांडले जात नाहीत? की फक्त मुली वजनदार असलेल्या चालत नाहीत, मुलं वजनदार असली तरी काही फरक पडत नाही?

सध्या स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढीला लागलेल्या आहेत अशा वेळी माध्यमांनी जागरूक असणं आवश्यक आहे. पण खेदाची गोष्ट ही कि जागरूकता तर सोडूनच द्या, साधी संवेदनशीलताही आढळत नाही. अलीकडे एका मालिकेत दाखवलं गेलं कि नायकाला आपल्या प्रेयसीला आपली बाजू समजावून सांगायची असते (तिने अजून त्याला प्रतिसादही दिलेला नाही), त्यासाठी तिला एकांतात गाठायला मित्र एक युक्ती योजतो. तो म्हणतो तू तिला लिफ्टमध्ये गाठ मी ती मध्येच बंद पडेल असं पहातो. तसं केलं जातं. कथानकात काय घडतं ते जरा बाजूला ठेवू, परंतु कायद्याच्या दृष्टीने पाहता हा गुन्हाच ठरु शकतो. एखाद्या स्त्रीला कल्पना न देता अशा प्रकारे तिच्या संमतीशिवाय एकांतात गाठू पाहणं म्हणजे तिच्या हक्कांवर आक्रमणच. अशा तथाकथित कौटुंबिक मालिका अख्खं कुटुंब एकत्रितपणे पाहतं. त्यात लहान मुलंही असतात. ती अपरिपक्व असतात. त्यांना ही घटना आवडू शकते. त्यात काही गैर आहे हे जर कुटुंबातील वयस्करांनी समजावून सांगितलं नाही तर त्यांना कळणारही नाही. एका लोकप्रिय मालिकेतला नायक घरी सुशील, सुंदर पत्नी असतांना तिला घटस्फोट न देता मैत्रिणीशी जुजबी लग्न करतो. दोघींनाही फसवतो. पण हा नायक फार लोकप्रिय झाला. एका खाद्यमालिकेत एका पौगंडावस्थेतील मुलाला बोलवलं होतं. त्याला पदार्थ करतांना गप्पा मारता मारता विचारलं गेलं की तुला मालिकांमधली कुठली व्यक्तीरेखा आवडते. तेव्हा त्याने ह्या नायकाचा उल्लेख केला आणि तो आपला आदर्श असल्याचं सांगितलं. नंतरही एका वृत्तवाहिनीच्या बातमीत त्याच्या वयाच्या बऱ्याच मुलांनी तो नायक त्यांचा आदर्श असल्याचं सांगितलं. मुलांना समुपदेशन न करता अशा प्रकारच्या घटना दाखवल्या गेल्या आणि पुढे जाऊन वर सांगितलेले फंडे अशा प्रेमवीरांनी अंगिकारले तर काय होईल ह्याचा काहीच विचार केला जात नाही. नकळत आपल्या मनात असं बरंच काही रूजवलं जातंय ते कधी थांबेल, कुठे घेऊन जाईल काय माहीत.

वेगवेगळ्या मालिका, वेबमालिका, चित्रपट, व्हिडियो गेम्स ह्यात हिंसाचार प्रचंड असतो. कारण लोकांना तो खिळवून ठेवतो. “उगाच डोक्याला ताप नको” म्हणून हाणामारी पहाणारे अनेकजण असतात हे त्यांना माहिती आहे. मालिकांमध्ये तर कुटुंबियांविरोधात कारस्थानच नव्हे तर त्यांच्यावर मारेकरी घालण्याची चढाओढ दाखवलेली असते. व्हिडियो गेम्समधल्या लढाया, हाणामाऱ्यांमुळे लहान मुलांना हिंसाचाराचं काही वाटेनासं झालं आहे. त्यांचंच कशाला आपलीही तीच गत आहे. आपलीही नजर मेली आहे.

मध्यतंरी धर्म,जात, राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या संदर्भात गैरसमज पसरवणाऱ्या द्वेषमूलक फेक पोस्ट खूप येत होत्या. नंतर त्या फेक असल्याचं कळलं तरी मूळ पोस्टचा परिणाम सहज पुसला जात नाही.

मूळात हे ध्यानात घेणं आवश्यक आहे की ही माध्यमं इथे तुमचं मनोरंजन करायच्या निमित्ताने आपला फायदा करून घ्यायला आलेली आहेत. त्यांना पैसा कमवायचा आहे. मालिकांना टीआरपी मिळवायचाय, चित्रपटांना गल्ला कमवायचाय. इतर माध्यमांना तुमच्या आवडीनिवडी जाणून त्याच प्रकारच्या जाहिराती तुम्हाला दाखवून पैसा कमवायचाय. समाज कुठल्या दिशेला जाईल ह्याचं त्यांना काहीही पडलेलं नाही. खरं तर विज्ञानवादी, समतावादी, मानवतावादी दृष्टीकोन रुजवण्याच्या दृष्टीने ह्या प्रभावी माध्यमांनी प्रयत्न करायला हवेत. पण तसं होतांना दिसत नाही. त्यामुळे निवड करतांना सावध राहणं, दक्ष राहणं अत्यावश्यक आहे. सावधपणे निवड केली तर ह्या माध्यमांचं सामर्थ्य अधिक वाढेल आणि त्यांचा योग्य उपयोग करता येईल.

शाणि माझी बाय ती घोवाघरी जाय ती

आजी आम्हाला जोजवत हे गाणं म्हणायची. खरं तर तिला घोवाघरी म्हणजे नवऱ्याच्या घरी कधी राहता आलंच नाही. नवरा अचानक वारला आणि पोटी पोर आली म्हणून सासरच्यांनी माहेरी पाठवली. तिची आई खंबीर होती आणि तिनेही माहेरच्यांवर भार न होता दुकान चालवलं म्हणून निभावलं. नाहीतर अशा बायकांची फार परवड होते. त्या काळीच नव्हे, तर आजही.

पूर्वी ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ असं म्हणत तिला परत पाठवलं जाई. आता आईवडील पाठीशी असतात. पण ते गेल्यावर भावांना आपल्या संसारात ही अडगळ नकोशी होते. नोकरी करणारी असेल तर ठीक नाहीतर तिची अवस्था मोलकरणीहून वाईट होते. कारण तिच्या श्रमांना मोलच मिळत नाही.

आजकाल बायका कमावत्या असल्याने कर्ज घेऊन घर घेतात. कित्येकदा सासरची मंडळी तिथेच रहातात. पण ह्या तिच्या मालकीच्या घरातही बाईला ‘आमच्या घरात असं चालणार नाही’ असं ऐकून घ्यावं लागतं. सत्ता सासरच्यांची, नवऱ्याची असते. तरीही हे घर सुनेच्या नावावर आहे ह्याची खंतही असते. एका मैत्रिणीची लहान मुलगी तिला एकाएकी म्हणाली “तू ह्या घराची मालकीण आहेस आणि आम्ही सगळे तुझे नोकर आहोत.” ती हबकली. मग मुलीकडून युक्तीने सगळं काढून घेतल्यावर कळलं की तिच्या सासूने हे नातीला सांगितलं होतं. तिने मुलीला समजावलं की असं काही नाही. घर सर्वांचं आहे. ती बिचारी नोकरी सांभाळून घरातली सगळी कामं करीत सकाळी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत राबत असे. तिची कशावरही मालकी, सत्ता नव्हती.

घोवाघरी रहाणं नेहमी शहाणपणाचं ठरतंच असं नाही याची दोन वेगळी उदाहरणं माझ्याकडे आहेत.

एका बाईंच्या नवऱ्याने दुसऱ्या बाईशी संबंध ठेवले. नवरा अपघातात गेल्यावर त्याच्या आईवडीलांना फंड, ग्रॅच्युइटी मिळाली, दुसऱ्या बायकोला  अनुकंपा तत्वावर नोकरी आणि ह्या बाईंना घर मिळालं. डोक्यावर छप्पर शाबूत राहिलं असलं तरी त्या अर्धशिक्षित असल्याने नोकरी मिळेना. अखेर काबाडकष्ट करून तीन मुलींचं संगोपन केलं.

दुसऱ्या उदाहरणातल्या बाईंच्या वडीलांनी त्यांच्या नवऱ्याला दारू पिऊन आला म्हणून त्याच्याच घरातून बाहेर काढलं. नवरा परागंदा झाला तो आजतागायत आलाच नाही. वडील हयात असेपर्यंत सगळं ठीक होतं. पण ते गेल्यावर त्यांच्या एका भावाने ते घर बळकावलं. त्याच्यासोबत बाईंचा मुलगा त्या घरात राहिला आणि मायलेकराची ताटातूट करून बाईंना दुसऱ्या भावाच्या घरात ठेवलं गेलं. मुलाचं शिक्षण जरी मामांनी पूरं करीत आणलं असलं तरी त्या बदल्यात मायलेकरांना खूप राबवून घेतलं जातं. बाहेरच्या कुणाशी बोलायला बंदी आहे.

अशा प्रकारे ह्या दोन्ही बायका नवऱ्याघरी असल्या तरी त्यात त्यांना काहीच मिळालं नाही. आता चित्र बदलत असलं तरी स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे ही जाणीव दिसत नाही. आपल्या आवडीनिवडींपेक्षा सासरच्यांच्या आवडीनिवडी जपणाऱ्या बायकांनाच मान्यता मिळते. अगदी मान्यवर बायकांकडूनही त्यांना स्वैंपाक यावा अशी अपेक्षा दिसते. हे चित्र बदलत नाही तोवर तरी ह्या गाण्यात काही अर्थ नाही.

सर्वांना परवडेल असं  नाही, पण जर नवराबायकोने प्रत्येकी पन्नास टक्के मालकी असलेलं घर घ्यावं. अर्थात त्यासोबत बायको एक व्यक्ती असून तिला आपल्याइतकेच हक्क, अधिकार आहेत, ह्याची जाणीवही असणं आवश्यक आहे.

मध आणि कुंकू

ओवीने पांढराधशुभ्र आणि तूपासारखा मध आणला होता. त्यावरून गप्पा चालल्या होत्या. चंदर म्हणाला की गावाकडे बायका एका वेगळ्या कारणासाठी मधाचं पोळं काढण्याची वाट बघत. पुरूषांनी घोंगडी पांघरून मशाली घेऊन पोळं काढलं की घरच्यासाठी मध ठेऊन मुलांनी पोळ्याला चिकटलेला मध खाल्ला की घरातल्या बायका मेण ताब्यात घेऊन आपापला वाटा निगुतीने डबीत भरून ठेवत.त्या काळी बायका पिंजर लावीत असत. कपाळावर मेण लावून त्यावर बोटाने कुंकू अगदी अचूकपणे गोल रेखीत. त्याचं फार नवल वाटे.

शहरात राहणारी, गोल पातळ नेसणारी माझी आईही पिंजर लावत असे.तिच्याकडे एका छोट्या पेटीत मेणाची डबी, पिंजर, घरी केलेलं काजळ किंवा जाई काजळ, पावडर, अफगाण स्नो अशा गोष्टी असत. तिने केलेल्या कागदी, कापडी फुलं, गजरे, बाहुल्या, शंखशिंपल्यांच्या वस्तू विकून दादरच्या सौभाग्य वस्तू भांडारातून ती त्या घेऊन येई. आम्हाला अफगाण स्नोचं फार आकर्षण असे. पण ती हे सगळं फार सांभाळून ठेवत असे आणि जपून वापरत असे.

नंतर बायका ओलं गंध वापरायला लागल्या. काहीजणी लिपस्टीकचा वापर कुंकू लावायला करीत. मग टिकल्यांचा जमाना आला. त्याच दरम्यान सौभाग्यलक्षण असण्याच्या बंधनातून कुंकवाची मुक्ती झाली. कुंकू हा आवडीचा भाग झाला आणि विविध आकार, रंग यातून तिचा मुक्त आविष्कार सुरू झाला. मालिकांमधल्या खलनायिकांच्या चित्रविचित्र टिकल्या लक्ष वेधून घेऊ लागल्या.

आता फक्त खेड्यातल्या म्हाताऱ्या बायका मेणावर पिंजर लावत असतील. कुंकू आणि मधाचा संबंध उरला नाही.

आऊचा काऊ

माझ्या भावाचे मामेसासरे माझ्या नवऱ्याला अधूनमधून कधीतरी कुठे भेटत असत. भेटल्यावर ते नेहमी बजावत, “आमची मुलगी दिलीय तुम्हाला. तिला जपा.” खरं तर त्यांची माझी भेट क्वचितच घरगुती समारंभात होई, फार बोलणंचालणं नसे. तरीही त्यांनी आवर्जून हे नवऱ्याला सांगणं मला फार  हृद्य वाटे.

माझ्या आईचे मामेभाऊ, मावसभाऊ आईचा उपास असला की शहाळं, केळी घेऊन येत. ती जसं मायेनं त्यांचे संसार मार्गी लावू पाही तसे तेही तिचा भार थोडाफार हलका करू पहात.

श्रीलंकेच्या एका खेळाडूने तामिळनाडूतल्या मुलीशी लग्न केल्याने मी त्याला भारताचा जावई म्हणत असे तसे गावा गावातल्या मुलीबाळींचे नवरे अख्ख्या गावाचे जावई असत. असे जावई सासरी आले की शेजारीपाजारी वानवळा पाठवत.

आता कुटुंब ह्या कल्पनेचा संकोच होत चाललाय. पण खरं पाहता आताच खरी गरज आहे वसुधैव कुटुंबकम् म्हणण्याची. वाढती युद्धखोरी, लोकांचं जात, धर्म, वंश ह्यांच्या नावाखाली ध्रुवीकरण होत असतांना माणसामाणसांमधले संबंध दृढ करण्याची गरज अधिक आहे. ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसांनी नाती जोडण्याची गरज आहे.

माझी मैत्रीण स्मिता गांधी हिच्या जावयाला जेव्हा मी माझा जावई म्हणते तेव्हा आमच्या सुनीती सु.र. म्हणतात, “आऊचा काऊ तो माझा भाऊ” माझा प्रश्न आहे की मी आऊच्या काऊला भाऊ का म्हणू नये. मला वाटत होतं माझ्यासारखा विचार करणारी माणसं नाहीशी होत चाललीहेत की काय. पण माझी मैत्रीण शालिनी घरी आली तेव्हा माझ्या जावयाला -अब्रारला भेटवस्तू देत म्हणाली- यह मेरे जमाई के लिए, तेव्हा मला जाणवलं की सगळं संपलं नाहीय. आहेत असे लोक आऊच्या काऊला भाऊ मानणारे त्यांची संख्या वाढत राहो.

तरुणपणातल्या धडपडी

तरूणपणी आपण जगण्यासाठी जी धडपड करतो, त्यातून बराच अनुभव गाठीशी येतो. मीही माझ्या तरूणपणी अशीच धडपडत होते. नवव्या इयत्तेत असल्यापासून ते इंटर उत्तीर्ण होईपर्यंतची पाच वर्षं मी चारूशीला गुप्ते ह्या लेखिकेची लेखनिका आणि चिटणीस म्हणून काम केलं. एस.एस.सी.पर्यंत मी काळाचौकीहून मलबार हिलवरल्या त्यांच्या घरापर्यंत रोज येजा करीत असे. एस.एस.सी. नंतर मी त्या ज्या जयहिंद महाविद्यालयात शिकवत असत तिथेच प्रवेश घेतला आणि त्याआधीपासूनच त्यांच्या घरी राहून काम करायला सुरुवात झाली. मी त्यांचा मुलगा प्रणय ( हा फार मोठा वार्ताहर होता, त्या वेळी तो न्यूयॉक टाइम्समध्ये काम करत होता) ह्याच्या खोलीत राहत असे. त्याच्या खोलीतून समुद्र दिसत असे आणि त्याच्या पुस्तकांचा संग्रह फार चांगला होता. ह्या दोन गोष्टींमुळे मी तिथे जरा रमले.

बाई फार स्थूल होत्या. त्यामुळे त्यांना बऱ्याच व्याधी होत्या. त्यांना अधून मधून चक्कर येत असे. त्यामुळे कुणीतरी सतत त्यांच्या सोबत रहावं लागत असे. खरं तर मी त्यावेळी छत्तीस किलो वजन असलेली मुलगी. बाईंना चक्कर आली की आधार देणंही शक्य नव्हतं. पण सुदैवाने त्यांना ते आधीच जाणवत असे. मग आम्ही कुठेतरी बसत असू चक्कर जाईपर्यंत.

त्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य होत्या. त्यामुळे त्या बैठकांना जात तेव्हा मला सोबत घेऊन जात. मुख्य चित्रपटगृहात मला एखादा चित्रपट पहात बसवून त्या छोट्या सभागृहात बैठकीला जात. त्या काळात मी बरेच चित्रपट आधी शेवट मग सुरुवात अशा पद्धतीने पाहिले. एकदा असाच शेवट पाहिलेला असल्याने मी बाहेर येऊन बसले आणि चित्रपटाचा नायक कबीर बेदी “So, how did you like it?” असं विचारत आला. मी त्यावेळी बिनधास्त असल्याने कुठलंही दडपण न घेता नाक उडवत बरा होता असं उत्तर दिलं. आमच्या घरात मुलांनी काय पहावं आणि काय पाहू नये ह्याचे दंडक असल्याने एरव्ही मला हे चित्रपट पाहता आले नसते हेही खरं.

त्या काळात एका बायकांच्या मासिकासाठी बाईंनी बऱ्याच गायक, संगीतकारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्या सगळ्या वेळी मी त्यांच्यासोबत असे. आशा भोसले, सुमन कल्याणपुर, वाणी जयराम, जयदेव, सी. रामचंद्र आदींचा त्यात समावेश होता. त्यापैकी वाणी जयराम त्या वेळी वरळीला एका जुनाट इमारतीतल्या पहिल्या मजल्यावर राहत. पहिला मजला असला तरी जिने उंच होते आणि काळोख होता. त्यामुळे बाई पहिल्या वेळी कशाबशा आल्या. नंतर उरलेली मुलाखत घेण्याचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलं. मग ठरलेल्या वेळी बाईंनी दिलेली प्रश्नावली आणि ध्वनिमुद्रणयंत्र घेऊन मी वाणीताईंकडे गेले. त्या तेव्हा अगदी साधेपणाने राहत. घरात नोकरचाकर नव्हते. त्यामुळे त्यांनीच दार उघडलं आणि त्यांच्या हातचा डोसा आणि कॉफी ह्यांचा आस्वाद घेत मी मुलाखत पूर्ण केली. सी. रामचंद्रही शिवाजी पार्कला एका जुन्या इमारतीच्या गच्चीवरल्या घरात राहत. तिथे बाईंना जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तिथेही प्रश्नावली आणि ध्वनिमुद्रण यंत्र घेऊन मी संध्याकाळी गेले. त्यांच्या पत्नीने दार उघडलं. पण सी. रामचंद्रांनी मला अगदी स्पष्टपणे सांगितलं,”संध्याकाळी मी कुणाला भेटायच्या स्थितीत नसतो. तुम्ही उद्या सकाळी या.” दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यावर मात्र ते छान प्रसन्न होते आणि मुलाखत चांगली झाली. सुमन कल्याणपुरांकडे गेलो होतो तेव्हा बहुधा दिवाळी होती. आम्ही गेलो तेव्हा त्या दिवाणखान्यातल्या एका प्रचंड समईभोवती रांगोळी काढत होत्या. ती रांगोळी इतकी सुंदर होती की नजर सतत तिथे वळत होती. सगळ्या ठिकाणी छान आगतस्वागत होई. मंगेशकर कुटुंबियांबाबत मात्र अंतर राखून वागविल्याचा अनुभव आला. खरं तर बाईंचा आणि त्यांचा परिचय फार जुना होता, तरीही असा अनुभव यावा हे नवल. हृदयनाथांच्या बाबतीत मात्र वेगळा अनुभव एकदा आला होता. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात एकदा त्यांचा कार्यक्रम होता. प्रचंड गर्दीमुळे माझ्या धाकट्या बहीणीला चक्कर आल्यावर त्यांनी स्वतःजवळचं तांब्याभांडं घाईघाईने खाली पाठवलं होतं.

बाईंबरोबर असतांना कित्येक मोठे राजकीय नेते, अभिनयक्षेत्रातली माणसं, कवी, लेखक ह्यांच्याशी संबंध येई. अगदी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक ह्यांच्या बंगल्याच्या मागच्या बागेत खुद्द वत्सलाबाईंनी आम्हाला जेवण वाढल्याची आठवण आहे. राजेश खन्ना त्यांचा विद्यार्थी होता. त्याने एकदा आमच्यासाठी गाडी पाठवली होती. त्या गाडीत गीतकार कपिलकुमार होते. त्यांनी अनुभव ह्या चित्रपटासाठी लिहिलेली गीतं मला आवडत असत. बाईंनी ओळख करून देतांना ही हिंदीतही लिहिते असं सांगितल्यावर त्यांनी माझ्या काही कविता ऐकून चांगलं लिहितेस, लिहित रहा असं सांगितल्यावर बरं वाटलं.

माझं मुख्य काम लेखनिकेचं असलं तरी इतर अनेक कामं करावी लागत. जसं की रामकुमार भ्रमर ह्यांची तमाशावर आधारित एक कादंबरी होती. तिचं भाषांतर बाईंनी करायला घेतलं. खरं तर त्यांचं हिंदी अगदी बेतास बात होतं. मी आठवीत असतांनाच कोविदपर्यंतच्या परीक्षा दिल्याने माझं हिंदी तसं चांगलं होतं. त्यामुळे त्या भाषांतरात मला त्यांना बरीच मदत करावी लागली. त्या आनंदबन नावाचं एक त्रैमासिक लहान मुलांसाठी प्रकाशित करीत असत. एके काळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतल्या त्यांच्या भाषणांमुळे त्या फार लोकप्रिय होत्या. तेव्हा बरेच मोठे मोठे लोक त्या त्रैमासिकासाठी साहित्य देत असत. पण नंतर त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्यावर फारसा मजकुर मिळत नसे. मग काहीतरी भर घालावी लागे. त्या इंग्लंड, अमेरिका आणि रशियाची वारी करून आल्या होत्या. तिथून येतांना त्यांनी लहान मुलांसाठी बरीच पुस्तकं आणली होती. त्यातल्या एखाद्या पुस्तकातल्या लोककथेचं किंवा परीकथेचं भाषांतर मी अशा वेळी अंकासाठी करीत असे. माझ्या नावावर आधीच काही मजकुर असेल तर मग हे भाषांतर टोपण नावाने प्रसिद्ध होई. आभा त्रिवेदी हे एक टोपणनाव आठवतं कारण ते मी बरेचदा वापरत असे. बाकी जी काही मनात येतील ती नावं वापरली जात. माझा मधुकर मोहिते नावाचा मित्र अंकासाठी लिहित असे. त्यामुळे एक भाषांतर तर त्याच्याच नावावर खपवलं होतं. त्या काळात बाई वरचेवर आजारी पडत.  कधी कधी बाईंना बरं नसलं तर संपादकीयही लिहावं लागे. अंकातला मजकुर आला की छापखान्यातच बसून तिथल्या तिथे प्रुफ रीडिंग करून मी देत असे. छापखान्यातल्या लोकांना इतकी लहान मुलगी प्रुफ रीडिंग करते ह्याचं फार कौतुक वाटे आणि ते माझ्यासाठी चहा बिस्किटं मागवीत. अंक तयार झाला की वेष्टनावर पत्ते डकवून, मग अंक वेष्टनात गुंडाळून दोन भल्या मोठ्या थैल्यांमध्ये भरून जीपीओत जाऊन दिले की मगच माझं काम संपत असे.

बाई लहान मुलांसाठी एकांकिका स्पर्धाही आयोजित करत. वैद्य नावाचे मंत्रालयातले एक गृहस्थ त्यांना मदत करत असले तरी पत्रव्यवहार करणं, आयत्या वेळी पडणारी कामं करणं हेही माझं काम होतं. बाई विविध वृत्तपत्रांसाठी, नियतकालिकांसाठी लिहित. ते लेख त्या त्या कार्यालयात नेऊन देणं हेही माझं काम असे. त्या खुशाल मला पत्ता देऊन मुंबईभर कुठेही पाठवीत. पोस्टमन, पोलीसदादा ह्यांना पत्ता विचारत मी शोधत जाई. पण माहीत नसलं की पंचाईत होई. एकदा फ्री प्रेस जर्नलचं कार्यालय शोधता शोधता मी शेअर बाजारात पोचले. तेव्हा शेअर बाजारात बायका नसत. त्यामुळे एक तरुण मुलगी आलीय म्हटल्यावर जोरजोरात आरडाओरडा करणारे सटोडिये काही काळ स्तब्ध होऊन मागे वळून पहात राहिले. माझी चूक उमगून तिथून पळाले. नंतर अर्थात ते कार्यालय मला सापडलं. पण ह्या भटकंतीमुळे मला मुंबई चांगलीच माहीत झाली. बेस्टचे बरेचसे मार्ग मला पाठ असत.

एकदा बाईंकडे इंडिया अब्रॉडशी संबंधित वॉल्टर किंवा तसंच काहीसं नाव असलेला अमेरिकन तरुण राहायला आला. तो मुंबईत बसने प्रवास करीत असे. त्याला कुठेही जायचं असलं की हा साडेसहा फूट उंचीचा माणूस कमेरत वाकून मला विचारी, “Chyubangi, how do I go to fountain?” मग मी त्याला कुठून कुठली बस घेऊन कसं जायचं ते समजावीत असे. आमचा हा संवाद ऐकण्याजोगा आणि बघण्याजोगाही असे. गुप्त्यांच्या घरात दारूला मनाई असल्याने त्याच्यासाठी कोरा चहा बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवण्याचं आणि उकडलेल्या भाज्या आणि मासे करण्याचं कामही माझ्या गळ्यात होतं. त्याने मी रांगोळी काढतांना माझं एक रंगीत छायाचित्र घेतलं होतं आणि ते तिथे प्रसिद्धही केलं होतं. ते अजूनही घरात कुठेतरी आहे.

मी बी.ए.च्या पहिल्या वर्षाला जयहिंद महाविद्यालय सोडून एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बाईंची नोकरी सोडली. अर्थात त्यांच्याकडल्या पाच वर्षांनी मला बराच वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव दिला, जो आयुष्यात पुढे फार उपयोगी पडला, बाईंचं हे ऋण माझ्यावर नेहमीच राहील.

एल्फिन्स्टनमधल्या आमच्या विजया राजाध्यक्ष आणि सरोजिनी शेंडे ह्या दोन्ही गुरुंना माझी परिस्थिती माहीत असल्याने त्या दोघीही मला काही कामं मिळवून देत. शिवाय मी शिकवण्याही करीत असे. त्यामुळे माझा खर्च भागत असे. एकदा राजाध्यक्षबाईंनी यंदे नावाच्या एका गृहस्थांशी ओळख करून दिली. त्यांनी पाणी शुद्ध करणारं क्लोरीवॅट नावाचं उत्पादन तयार केलं होतं. त्याकाळी मिनरल पाणी किंवा झिरोबी वगैर नसल्याने ते खपतही होतं. पण त्यांना ते विकण्यासाठी दारोदार जाणाऱ्या विक्रेत्यांना तयार करण्यासाठी तसंच महिला मंडळं आणि कार्यालयांमधून त्याविषयी माहिती देऊन विक्री करण्यासाठी कुणाची तरी गरज होती, त्यासाठी त्यांनी मला नेमलं. मी माझ्या ओळखीपाळखीतल्या आणि नात्यागोत्यातल्या काही तरूणींना तयार केलं. असं फिरतांना काय सावधगिरी घ्यायची ते मला गुप्तेबाईंकडच्या अनुभवामुळे माहित होतंच. ते त्यांना शिकवलं. सुरुवातीला मी त्यांच्यासोबत वस्त्यांमधून जात असे. काही लोक शांतपणे नुसतंच ऐकून घेऊन नकार देत, काही बाटल्या विकत घेत. काही म्हणत आम्ही तुरटी वापरतो, त्याने शुद्ध होतं पाणी. लालबाग, भायखळा, कुलाबा इथल्या पारसी लोकांच्या वसाहतींमध्ये वेगळा अनुभव येई. एकतर घरांमध्ये फक्त वृद्ध असत. दुसरं म्हणजे त्या दरम्यान अशा एकट्या वृद्धांचे खून होण्याच्या घटना वाढीला लागल्याने दहशत होती. त्यामुळे ते दारच उघडत नसत. आतूनच “कोण छो?” विचारीत. ह्यावर मी एक शक्कल काढली. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना गाठून त्यांच्या वार्षिक सभेच्या किंवा कार्यक्रमाच्या वेळी दहा मिनिटं मला देण्याची विनंती केली. त्याचा खूप उपयोग झाला. महिला मंडळांमध्येही त्यांच्या कार्यक्रमाच्या मध्यंतरात मी उत्पादनाविषयी बोलत असे. तिथेही चांगला खप होई. ह्या भटकंतीत कुठेही भूक तहान लागली तर उपाहारगृहात एकटीने जाऊन खाण्याची सवय लागली. त्यामुळे पुढच्या आयुष्यातही कुणाच्या सोबतीवाचून माझं अडत नसे. दोन वर्षं हे काम मी केलं. त्यानंतर एम.ए.ला असतांना जनता साप्ताहिक आणि नंतर बँकेत नोकरीला लागले आणि ह्या सगळ्या धडपडींना पूर्णविराम मिळाला. पण ह्या धडपडींमुळे मी बऱ्याच बाबतीत स्वावलंबी झाले हे मात्र खरं.

घर

माझी बहीण नेहमी म्हणते, “मला ना माझ्या घरीच चांगली झोप लागते गं. इतरत्र कुठे कितीही सोन्याचं असलं तरी माझ्या घरातल्या अंथरुणावर मला बरं वाटतं.” खरंच आहे.

अगदी हॉटेलमधल्यासारखी मऊ गादी, वातानुकूलन हे काही नसलं तरी आपल्या घरातल्या गोधडीवरही छान झोप लागते. त्याचं कारण बहुधा आपल्याला तिथे फार सुरक्षित वाटतं हे असावं. पण तरी ते घरही विशिष्ट असतं. आमचा क्षितिज चार दिवस हॉटेलमध्ये राहिला तरी निघतांना “बाय बाय रुम” असं म्हणतो. त्याच्यासारखंच जिथे थोड्या काळासाठीही वास्तव्य करतो त्या जागेशी आपलं नातं तयार होतं हे खरं असलं तरी एखादं विशिष्ट घर, जागा आपल्याला खास आपली वाटते. मी इतक्या घरांमध्ये आजवर राहिले. ती सगळी माझ्या मनात घर करुन असली तरी ज्या घरात माझी जाणतेपणीची वर्षं गेली ते अभ्युदयनगरातलं दोन खोल्यांचं घर हेच मला अजूनही माझं घर वाटतं. स्वप्नात मला घरी जायचं असतं तेव्हा मी त्याच घरी जायची वाट शोधत असते. अगदी चुकूनही बोरिवलीतलं जुनं किंवा नवं घर ती जागा घेत नाही.

याउलट माझ्या मुलांसाठी मात्र घर म्हणजे बोरिवलीतलं आमचं जुनं दोन खणी घर. आता ते घर इमारतीचा पुनर्विकास होतोय म्हणून पाडलं जातंय. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत ते घर नांदतं होतं. माझ्या नवऱ्याचे – चंदरचे विद्यार्थी, माझी मैत्रीण, माझा दीर अशी कित्येक कुटुंब त्यात राहून गेली. पण पाडलं जाणार म्हणून खाली केलेलं घर गेले काही वर्षं पुनर्विकास रखडल्याने तसंच पडून होतं. एकदा चंदर तिथे गेला आणि त्याची अवस्था पाहून त्याला भडभडून आलं. कधी पाडलं जाईल तेव्हा जावो पण ते असं दुरवस्थेत ठेवायचं नाही असा चंग बांधून आमच्या कुटुंबाच्या सुताराकडून – कांताकडून त्याने घराची डागडुजी,  स्वस्तात रंगकाम, साफसफाई करून घेतली आणि त्याची कळाच पालटली. ते चक्क चकचकीत झालं. मग टाळेबंदीच्या काळात गेल्या वर्षी क्षितिज द. आफ्रिकेहून आल्यावर तिथे विलगीकरणात राहिला. मग ह्या वर्षी आमची मुलगी ओवी आणि जावई अब्रारही तिथे राहिले. दोन्ही मुलांनी लहानपणीच्या सगळ्या आठवणी जागवल्या. ओवी, अब्रारने थोडक्या काळासाठी वास्तव्य केलं तरी ते घर त्यांनी आपलं नेहमीचं घर असल्यासारखं सजवलं. आनंदाने तिथे राहिले. शेवटी ऑक्टोबरमध्ये ते घर पाडलं गेलं तेव्हा दोन्ही मुलं, जावई, चंदर, कांता असे सगळे घराला निरोप देऊन आले. घर पाडलं गेलं तरी जेव्हा ते पाडलं गेलं तेव्हा आपण त्याला दुर्लक्षित, दुरवस्थेत, एकटेपणात सोडलं नाही ह्याचं समाधान सर्वांना वाटलं.

पण अशी पाडली जाणारी घरं पार पोटात खड्डा पाडतात. मी एका इस्पितळात उपचारासाठी जात असे तिथे बाजूलाच एक बैठ्या घरांची रांग अशीच पुनर्विकासासाठी अर्धवट पाडलेल्या अवस्थेत बराच काळ होती. तिथल्या एका घराच्या दर्शनी भागातल्या तीन भिंती शाबूत होत्या. त्यातल्या एका भिंतीवर एका गृहस्थांचं हार घातलेलं छायाचित्र तसंच लटकत होतं. मला नेहमी वाटे की का हे छायाचित्र तिथे तसंच ठेवलंय? त्या गृहस्थांची कधीच ते घर पाडलं जाऊ नये अशी इच्छा होती का? की घरासारखीच त्या गृहस्थांची आठवणही मनातून गेली होती? काहीही असो ते पाहून मला फार वाईट वाटे.

नवनिर्मितीसाठी “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुरुनी टाका” असं म्हणायला आणि करायलाही लागत असलं तरी ते केल्यावरही मनातून मात्र जात नाही.

मुंबईतली मांसाहारी भोजनगृहं

माझ्या लहानपणी उपाहारगृहात खायला जाणं ही चैन समजली जाई. आमची शाळा दूर असली तरी सकाळी जेवून निघत असल्याने आणि एकूणच आर्थिक परिस्थितीमुळे पैसे मिळत नसत. कधी मिळालेच तर चणेशेंगदाणे किंवा शाळेजवळच्या बिस्कीटाच्या दुकानात स्वस्तात मिळणारा बिस्कीटाचा चुरा (यात खाऱ्या बिस्कीटांचा थोडी साखर घातलेला चुरा छान लागे) खात असू. आमची शाळा शारदासदन शाळेच्या इमारतीत होती, त्यांच्या कँटीनचा बटाटेवडा चांगला असे पण तो खाल्ल्याचे फार आठवत नाही.

दादर, गिरगावात जी उपाहारगृहं असत ती मुख्यतः ब्राह्मणी खाद्यपदार्थ पुरवणारी असत. गिरगावातल्या कुलकर्ण्यांच्या उपाहारगृहात लोक भजी आणि वालाची डाळिंबी खायला जात. तेव्हा उडप्यांची उपाहारगृहं नुकती उगवू लागली होती. इराण्यांची मात्र ठिकठिकाणी असत. तिथे लोक बनमस्का, खारी यांच्याबरोबरच खिमा पाव, ऑम्लेटपाव खायला जात. मी रहात असे  त्या लालबाग भागात लाडूसम्राट हे प्रसिद्ध दुकान होतं, तिथले लाडू तर लोक खातच शिवाय दादरच्या पणशीकरांकडे किंवा गिरगावातल्या उपाहारगृहात लोक पियूष प्यायला जात तेही तिथे मिळत असे. तिथे मिसळही चांगली मिळे. काळाचौकीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावर सरदार नावाचं उपाहारगृह होतं. तिथली वांगी भजी प्रसिद्ध होती. तिथे मराठी पदार्थ अधिक असत. नंतर तेही उडप्यांसारखे इडली, डोसा ठेवू लागले.

पण भोजनगृहांच्या बाबतीत जरा वेगळी परिस्थिती होती. दादर गिरगावातल्या भोजनगृहात पुरणपोळी, खरवस, डाळिंबी उसळ, अळूचं फदफदं, उकडीचे मोदक, बटाटा भजी असे पदार्थ रोजच्या जेवणातल्या भाजीआमटीसोबत घेता येत. पण महाराष्ट्रात शाकाहारातही जे प्रांतानुसार वैविध्य आहे ते तेव्हाच्या भोजनगृहांत फारसं आढळत नसे.

मांसाहाराच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी होती. गिरगाव ते सायन बांद्र्यापर्यंत पसरलेल्या मुंबईत मांसाहारी भोजनात वैविध्य होतं. भायखळा भागात पारसी, मुस्लीम आणि ख्रिश्चन या तिन्ही पद्धतीची मांसाहारी भोजनगृहं होती. बांद्र्यात आणि माहीम भागात गोव्याकडच्या ख्रिश्चन पद्धतीचा आणि मुस्लीम पद्धतीचा मांसाहार देणारी भोजनगृहं होती आणि  मी लालबागहून गिरगावात शाळेत जातांना फोरास रोड भागात तर खूपच छोटी छोटी मांसाहारी भोजनगृहं, भटारखाने आणि तिथे हातावर थापून बनवलेल्या रोट्या रस्त्यालगत असलेल्या शेगड्यावर शेकणारे स्वयंपाकी दिसत असत. असे भटारखाने आजही माहीम भागात आढळतात. फोर्टातल्या हुतात्मा चौकाच्या, जुन्या हँडलूम हाऊसच्या मागच्या गल्ल्यांमध्ये कारवारी आणि केरळी पद्धतीचा मांसाहार पुरवणारी छोटी उपाहारगृहं होती, त्यातली काही अजूनही शिल्लक आहेत. तिथे सकाळच्या वेळी इडीअप्पम्, मलबार परोठा इ. पदार्थ नाश्त्यासाठी मिळत.

लालबाग परिसरात तेव्हा गिरणी कामगार खानावळ्यांमधून जेवत असत. तिथे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीचं जेवण तर मिळेच, शिवाय तिथेच आपापली ट्रंक, वळकटी ठेवून गिरणीतली पाळी संपल्यावर वळकटी पसरून झोपताही येई. शिवाय घाटी लोकांची, मालवण्यांची अशा वेगवेगळ्या खानावळी असत तिथे आपल्या आवडीप्रमाणे जेवता येई. पण काही ठिकाणी आमटीच्या नावाखाली पातळ पाणी, भात वाढतांना तर भातवाढीत भाताचा किती पातळ थर घ्यायचा याची स्पर्धा असल्यासारखं वाढत. माझे सासरे घाटावरचे असले तरी चंदर आणि ते काही काळ एका मालवणी बाईकडे जेवत आणि चंदरला ते जेवण आवडत असे. समुद्रातले मासे खाण्याची आवड तिथेच जोपासली गेली.

या खानावळींसोबत कोपऱ्याकोपऱ्यांवर भंडारी भोजनगृहं असत. ही साधारण बोळकंडीसारखी रचना असलेली, मोजकी टेबलं टाकून भिंतीकडे तोंड करून जेवता येईल अशी असत. वाढप्यांच्या कळकट पोशाखाकडे आणि एकूण स्वच्छतेकडे जरा काणाडोळा करावा लागला तरी चव छान असे. तिथे मालवणी पद्धतीचे तळलेले मासे, माशाची विशेषतः बांगड्याची कढी, तिखलं, तिसऱ्या, खेकडे यांच्याइतकेच वज्री, कलेजी, भेजा असले पदार्थ जास्त खाल्ले जात किंवा जवळपासच्या चाळीत रहाणाऱ्या कुटुंबांतून कधी कधी मागवले जात. माझ्या मोठ्या बहिणीच्या मैत्रिणीची आई लालबागच्या कामगार मैदानाच्या जवळच्या अशाच एका भोजनगृहातून मटण आणायला स्टीलचा डबा देऊन पाठवत असे. भारतमाता सिनेमाजवळ क्षीरसागर आणि दत्त बोर्डींग ही मांसाहारी भोजनालयं नामांकित होती (अजूनही आहेत).  परेल, डिलाईल रोड, ग्रँट रोड भागातही अशी भोजनगृहं मला आढळली होती. चवीच्या दृष्टीने पदार्थ उत्तम असत आणि मुख्य म्हणजे खिशाला परवडणारे असत. आमच्या कार्यालयाच्या जवळ, कुलाब्यालाही सेंट्रल नावाचं, तर रिझर्व बँकेच्या मुख्यालयाजवळही असं  एक भोजनगृह होतं. सेंट्रल अजूनही चालू आहे. तिथे जवळच्या ससून डॉकवरून घेतलेले ताजे मासे असल्याने आलंलसूण न लावता केलेले मासेही चवीला छान लागतात. गिरगावात शाकाहारी भोजनगृहासोबत काही मोजकी मांसाहारी भोजनगृहं होती. रेळे बिल्डींगमधलं समर्थ आणि खोताच्या वाडीतलं अनंताश्रम.

आमची शाळा तिथून जवळच असली तरी तिथे जायचा योग फार उशिरा म्हणजे मी बँकेत नोकरी करायला लागल्यावर आला. आसपासच्या कार्यालयातले, बँकांमधले कर्मचारी तिथे जेवणाच्या सुट्टीत खादाडी करायला जात. विशेषतः श्रावण सुरू व्हायच्या आधी तिथे जाऊन जेवायला गर्दी होत असे. जेवायला आलेले नोकरदार संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा घरच्यांच्या खास आवडीनुसार पदार्थ बांधूनही घेत. असे नोकरदारच नव्हे तर आसपासच्या परिसरातील ज्यांच्या घरातल्या बायका काही कारणाने बाहेरगावी गेल्या असतील किंवा अख्खं कुटुंबच बाहेर गेलं असेल असे एकांडे पुरूषही बायका घरी परतेपर्यंत तिथे सकाळसंध्याकाळ जेवायला येत. जयवंत दळवीही तिथे नेहमी जेवायला येत असं म्हणतात. मी एकदा त्यांना तिथे पाहिलंही होतं. ते भोजनगृहाच्या एका विशिष्ट भागातच बसत म्हणे. तिथला स्वैंपाक हा चुलीवर केला जाई. ताजा मसाला पाट्यावर वाटतांना तिथले कर्मचारी दिसत. मसालेही त्यांनी घरी केलेले असत. चपात्या घरच्या चपात्यांसारख्या लागत. मासेही खास ताजे खरेदी केले जात. या सगळ्यामुळेही असेल पण चव उत्कृष्ट असे. पुढे दोन भावातल्या भांडणापायी ते भोजनगृह बंद केलं गेल्याची बातमी वाचल्यावर अनेक खवय्ये हळहळले. नंतर अर्थात मालवणी मांसाहारी पदार्थांच्या भोजनगृहांचा सुळसुळाट गल्लोगल्ली झाला.

मात्र त्या काळी कोल्हापुरी, सातारी पद्धतीच्या मांसाहाराची भोजनगृहं जशी फारशी नव्हती तशीच आजही. विदर्भ, मराठवाड्याकडच्या मांसाहाराबाबतही तेच घडतंय. आगरी आणि कोळी पद्धतीचे पदार्थ देणारी भोजनगृहं तेव्हा मर्यादित असली तरी आता मात्र जागोजागी उपलब्ध आहेतच शिवाय मालवणी खाद्यजत्रेसारख्याच कोळी, आगरी खाद्यजत्राही भरतात. गोमंतकीय पद्धतीचा मांसाहार गेली बरीच वर्षे दादरच्या गोमंतकमध्ये मिळतो. पार्ल्यात गजालीमध्येही बरेच लोक मांसाहारासाठी जातात. चांद्रसेनीय कायस्थ प्रभुंचा वैशिष्ट्यपूर्ण मांसाहार काही तुरळक ठिकाणी उपलब्ध होता तसाच तो आजही असला तरी त्यांचाही महोत्सव दर वर्षी आयोजित केला जातो.

नव्वदच्या दशकात एकदा आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ‘तेंडुलकर्स’मध्ये जेवायला गेलो होतो. तिथला सारस्वती पद्धतीचा कोळंबीचा रस्सा आणि बोंबिल (जे अजिबात तेलकट नव्हते) अप्रतिम होते. पण नंतर तो डायनर्स क्लब झाल्यावर तिथे जाणं अशक्य झालं. तसंही असे प्रकार जनसामान्यांच्या आटोक्याबाहेरचेच. माहीम आणि अंधेरीला असलेलं अवचटांचं दिवा महाराष्ट्राचाही असंच. तिथे कुणीही जाऊ शकतं. जरा वेगळे पदार्थ जसं की भरलेले बोंबिल, भरलेले खेकडे, खिमा थालीपीठ, उकडीचे खिमा मोदक (हा प्रकार मी स्वतःही ऐंशीच्या दशकात करुन पाहिला होता), नारळाच्या दूधातलं कोलंबीचं सूप वगैरे मिळत असले तरी तेही जरा सामान्यांच्या आटोक्याबाहेरचंच.

मुस्लीम पद्धतीचे बिर्याणी, कबाब, खिमा, मटण इ. पदार्थ तर कुलाब्यापासून वांद्र्या कुर्ल्यापर्यंत सगळीकडे मिळत. कुलाब्यातल्या बडे मियाँच्या गाडीवर संध्याकाळी तोबा गर्दी उसळत असली तरी जरा उच्च मध्यमवर्ग दिल्ली दरबारकडे मोहरा वळवत असे. बडे मियाँनेही आता अशा उच्चभ्रूंसाठी एशियाटीक ग्रंथालयापासून दोन मिनिटांवर वातानुकूलित भोजनगृह उघडलंय. खास रमजानच्या काळात आणि एरवीही बारा हंडी, डोंगरी, महंमद अली रोडवरच्या मांसाहारी भोजनगृहांमध्ये सर्वसामान्यांइतकीच गर्दी जरा उच्च वर्गातल्या लोकांचीही असते, याचं कारण तिथे उपलब्ध असलेलं मांसाहारी पदार्थ आणि गोडाच्या पदार्थांचं वैविध्य. विशेषतः वेगवेगळे कबाब, बिर्याणी, हलीम, फिरनी, मालपुवा यांना फार मागणी असते. आता बरेच जण तिथल्या आठवणी काढत मनातल्या मनात मिटक्या मारत असतील.

पण सर्वसामान्य ते उच्च मध्यमवर्गीय लोक हमखास आढळायचे ते इराणी रेस्तराँत. पूर्वी ही मुंबईत पावलोपावली आढळत. तिथला बनमस्का आणि कटींग किंवा नुसताच कटींग घेऊन तास न् तास लोक बसत. विशेषतः तथाकथित इंटेलेक्चुअल लोकांचा तो अड्डाच असे. पण ज्यांना जेवणावर फार वेळ किंवा पैसा खर्च करायचा नसे त्यांच्यासाठी तिथे खिमा पावसारखे झटपट पदार्थ असत. काही ठिकाणचं पुडींग, मावा केक हे प्रसिद्ध असे. अजूनही मरीन लाइन्सल कयानी, चर्चगेटला स्टेडियम वगैंरेसारखे जुने इराणी तग धरुन आहेत. आणि  अजूनही सर्व आर्थिक स्तरातले, सर्व धर्मांचे लोक त्यांना उदार आश्रय देत असतात.

रस्ता १०

परवा फूटपाथच्या कडेला काही तरुण मुलं कोंडाळं करुन बसलेली दिसली. स्वस्तातले, रस्त्यावर विकत घेतलेले असलेले तरी चांगले कपडे, आधुनिक पद्धतीची केशभूषा, हातात चांगले मोबाईल,

शरीरयष्टी पाहता खात्यापित्या घरची वाटणारी ही मुलं अशी का बसलीत असा विचार करीत असतांनाच तिथे एक माणूस आला आणि त्यांना काही सांगू लागला. मुलं लगेच उभी राहून लक्षपूर्वक ऐकू लागली. थोड्या वेळाने लक्षात आलं की मध्यंतरी अदानी कंपनीची पाइपलाईन टाकतांना पेव्हर ब्ल़ॉक तुटले होते, ते बसवून फूटपाथ रुंदीकरणाचं काम चाललंय तिथे ही मुलं काम करीत असावीत. खरं तर अशा कामाला येणारी मुलं फार हडकुळी म्हणावी अशी सडसडीत असली तरी त्यांचा कामाचा उरक दांडगा असतो. सकाळी ठरल्या वेळी काम सुरु झालं की जेवणाची सुट्टी होईस्तोवर इकडेतिकडे न बघता सटासट काम उरकून टाकायची त्यांची पद्धत असते. पण ह्या मुलांना कष्टाची सवय नसावी. कामातही शिस्त दिसत नव्हती. लाद्या ढकलगाडीत भरुन आणतांना हात भरून येत. मग रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या आड जरा थांबून तो मुलगा विश्रांती घेई. लाद्या उचलून लावणाऱ्या मुलाला त्या नीट रचून ठेवता येत नसत. त्यांच्याकडे पाहिल्यावर कळे की कष्टकरी आईबापांची मुलं असली तरी बाप कुणा शेटकडे ड्रायव्हर, आई कुणा शेटाणीकडे स्वैंपाक करणारी किंवा डायमंडच्या फॅक्टरीत काम करणारी. जरासं बरं आणि नियमित उत्पन्न आणि उत्पन्नाची थोडीफार आणखीही साधनं असलेले आणि बाब्या तू शिकून साहेब हो आम्ही कष्ट करतो असं म्हणणाऱ्या आईवडीलांची ही मुलं असावीत. पण कोरोनाच्या काळात इतकी वर्ष नियमित कमावणाऱ्या आईबापांचं  उत्पन्न बंद झालं असावं आणि कधी काही करायला न लागणाऱ्या ह्या मुलांना आता अशी कष्टाची कामं करायला लागत असावीत. कोरोनाने एकाएकी वर्ग बदलून टाकलेत. कनिष्ठ मध्यम वर्ग रस्त्यावर आलाय. टुकीत राहणाऱ्या मध्यमवर्गीयांना महिन्याची दोन टोकं जुळवणं कठीण होतंय.

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात आमच्याकडे भाजी घरपोच पोचवणाऱ्या निखिलचं उदाहरण बोलकं आहे. सुखवस्तू, नोकरीपेशा निखिलची नोकरी टाळेबंदीच्या काळात बंद झाली. मग त्याने धडपड करून पालघर, नाशिकहून भाजी मागवून गृहनिर्माण संस्थांमध्ये विकण्याचा उद्योग सुरु केला होता. पण धंध्यात जम बसतोय न बसतोय तोच त्याच्या बाजूच्या गोडाऊनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने ह्यालाही बंदी केली गेली. आत माल सडून खराब झाला. पुन्हा नोकरी शोधावी लागली. सुदैवाने कोरोनाकाळात जेष्ठ नागरिकांसाठी काम कऱणाऱ्या  एका स्वयंसेवी संस्थेत त्याला नोकरी मिळाली. तिथे उत्पन्न फारसं नसलं तरी नोकरी मिळाली हेच समाधान

कित्येक शिक्षकांनीही भाजीविक्रीचा व्यवसाय स्वीकारल्याच्या बातम्या वाचल्या. अलीकडे तर चक्क एका शिक्षकाने बारमध्ये नोकरी धरल्याचं कळलं.

असे कित्येकांनी आपले मूळ व्यवसाय बदलले. उत्पन्न कमी झालं असलं तरी ते किती का होईना आहे हेच महत्त्वाचं ठरतंय. ‘सुवर्ण कोकण’ची उत्पादनं आम्हाला घरपोच देणाऱ्या बाणेंचा मूळ व्यवसाय चष्मे बनविण्याचा. पण आता ते माल पोचवताहेत. अर्थात जिथे जातात तिथेही चश्म्याचं काम असेल तर सांगा हे म्हणायला विसरत नाहीत. त्यांच्याप्रमाणेच अनेकांना कधीतरी आपलं मूळ काम आपल्याला परत मिळेल अशी आशा आहे. पण खरंच तसं होईल का?