मनातली भुतावळ

लहानपणी आम्ही चाळीत रहात असू तेव्हा रात्री घुंगरांचा आवाज आला की भीती वाटे. शेजारपाजारच्या लोकांकडून ऐकलेलं असे की मूळ मालक किंवा राखणदार घुंगराची काठी घेऊन फिरतो. रात्री कुणी नळावर आंघोळ करीत असेल तर त्याला चोप देतो. रात्रपाळीवरुन आलेला असाच एक कामगार नळावर आंघोळीला गेल्यावर अर्धांगवायूचा झटका येऊन कोसळलेला दुसऱ्या दिवशी आढळल्यावर तर या शंकांना बळ मिळत असे. आता ते आठवलं की हसू येतं.

पण अशा कित्येक दंतकथा लहानपणी ऐकलेल्या होत्या. लहानापासून थोरांपर्यंत सगळेच असं काही सांगत असत. आमच्या वर्गातला मॉनिटर बंड्या म्हापणकर शाळेशेजारी उभ्या असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या खोडात खोचलेला चाकू दाखवून बढाया मारीत असे की अमावास्येच्या रात्री त्याने तो येऊन खोवून ठेवलाय भुताला घाबरवायला. एका मैत्रिणीला तर नादच होता. ती स्वतः भुतांच्या गोष्टी ऐकवी आणि इतरांनीही सांगाव्यात म्हणून हट्ट धरीत असे. माझ्या चुलतभावाचा मित्र थॉमस मला म्हणत असे, “तुला पटत नाही ना, तर मग ये बरं दोन नंबरच्या शाळेजवळ अमावास्येला रात्री बारा वाजता.” मला कुणी जाऊ दिलं नाही म्हणा, पण माझे वडील त्यांच्या तरुणपणी खरोखरीच भुतं असतात का हे बघायला रात्री स्मशानात जात. जातांना मामांना कळू नये म्हणून भावाच्या पायाला दोरी बांधून ठेवीत. ती दोरी हलवली की आमचे काका दार उघडून वडीलांना घरात घेत. पण इतकं करुनही त्यांना काही भुतं दिसली नाहीत. आता यावरही लोकांनी उपाय शोधलाय. काय तर म्हणे राक्षस गणाच्या लोकांनाच भूत दिसतं बाकीच्या लोकांना नाही. असं असेल आणि जग तीन गणांमध्ये विभागलं गेलं असेल तर किमानपक्षी एक तृतीयांश लोकांना भूतं खरोखरीच दिसायला  हवीत. ती खरोखरीच दिसतात की त्यांच्या मनात असतात? यावरून एक किस्सा आठवला.

आमची बँक सुरुवातीच्या काळात ज्या इमारतीत होती, ती इमारत नव्याने बांधलेली होती. त्याआधी तिथे पारशी लोकांची एक इमारत होती. ती आग लागून जळाली. त्यावेळी अर्थातच काही माणसं मृत्यूमुखी पडली. मग आम्ही तिथे असतांना बऱ्याच अफवा होत्या. उद्वाहनातून वाचवा वाचवा असा आवाज येतो. अमक्या मजल्यावर काहीतरी दिसतं, ऐकू येतं वगैरे वगैरे. लोक मीठमिरची लावून एकमेकांना आलेले अनुभव सांगत. तर एकदा असं झालं- बँकेचं सहामाही क्लोजिंगचं काम होतं. सगळा ताळेबंद जुळवून काम संपल्यावरच लोक घरी जात. उशीर झाला तर रात्री बँकेतच थांबत आणि सकाळी पहिल्या गाडीने घरी जात. असेच आमचे दोन सहकारी काम आटोपायला उशीर झाल्याने तिथेच थांबले. रात्री दरवाजा घट्ट लावून टेबलं एकमेकांना जोडून झोपी गेले. मध्यरात्री दरवाज्यावर थाप पडली. दोघेही घाबरले. आतूनच विचारलं कोणंय म्हणून. तर उत्तर आलं – हारवाला. मग तर यांची कढी पातळ झाली. कारण आधीच्या इमारतीत फुलपुडी, हार देणारा हारवाला मृत्यूमुखी पडला होता. दरवाजा अजिबात न उघडता, रामरक्षेचा जप करीत दोघेही पाय पोटाशी घेऊन झोपले. सकाळी पहिली गाडी पकडायला उठले. दरवाजा उघडला तर सुरक्षारक्षक म्हणे, “काय तुम्ही घोडे बेचके झोपला साहेब, अहो तो तारवाला तार घेऊन आला होता, पण तुम्ही दारच उघडीनात, तेव्हा मीच घेतली सही करुन. घ्या ही.” अशी गंमत.

नंतर आम्ही ज्या इमारतीत आमची मुंबई शाखा उघडली, तिथल्या गच्चीवरून उडी मारुन आमच्याच एका सहकारी मुलीने आत्महत्या केली होती. माझी अधिकारी म्हणून बढती झाल्यावर सुरुवातीला काम आटोक्यात येईपर्यंत मी उशिरा बसून काम संपवून निघत असे. कधी कधी दहा वाजत. तेव्हा आमचा एक अभियंता सहकारी सांगे, “मॅम देर राततक मत रुकिए, सफेद कपड़े में लेडी का भूत आता है यहाँ.” मला तर कधी बिचारी दिसली नाही (आता माझा राक्षस गण वगैरे आहे का हे विचारू नका, माझा पत्रिकेवर विश्वास नसल्याने पत्रिकाच नाही.) हे लेडीचं भूत सफेद कपड्यातच का असतं नेहमी हा एक प्रश्न मला पडायचा. श्रीकांत सिनकरांच्या कथांमध्येही दुचाकीवरून जाणाऱ्या नायकाला सफेद कपड्यातली तरुण मुलगी लिफ्ट मागते, मग ती स्मशानात अंतर्धान पावते असे उल्लेख वाचल्यावर मला प्रश्न पडे की इतक्या लंबूस्टांग सिनकरांना भूत घाबरलं कसं नाही. ते सोडा पण ते सफेद कपड्यातलंच का असतं हा खरंच एक गहन प्रश्न. मला तर वाटतं की रहस्यकथालेखक आणि चित्रपटांच्या क्षेत्रातल्या लोकांनी तयार केलं हे मिथक असावं. विशेषतः तरुण माणसं गेली की त्यांच्या इच्छा राहून गेल्या  असल्याने त्यांचं भूत झालं असावं अशा समजुतीतून या लोकांना आपणच निर्मिलेली ही भुतं दिसतात की काय कोण जाणे. मग त्यांना कपडे कोणते घालायचे तर सफेद बरे असावेत, रंगीत कपड्यातलं भूत खरं तर किती छान दिसेल, पण नाही,  आपल्याकडे विधवा बाईला पांढरे कपडे नेसायला भाग पाडतातच पण बिचारी भुतंही या लोकांच्या तावडीतून सुटत नाहीत. या आपणच निर्मिलेल्या भुतांच्या तावडीतून सुटायला फार धडपड करावी लागते. तंत्रमंत्र, देवऋषि, भगत काय न् काय. फारच गळ्यापर्यंत अडकला असाल तर मात्र मानसोपचार करावे लागतील. पण एरवी खरं तर आपला बुद्धिप्रामाण्यवाद कायम ठेवला तरच यातून सुटका करुन घेता येईल.

माझी शेजारीण ग्रीवा ही तशी शांत, नो नॉन्सेन्स प्रकारातली, फारसं न बोलणारी, पण बोलेल ते विचारपूर्वक अशी. पण तिचा नवरा बलिराज परदेशी गेल्यावर ती घरात एकटीच उरली. संबंध दिवस तर बँकेतली नोकरी करण्यात जाई. पण रात्री हा एकटेपणा घेरुन येई. एक दिवस ती मला म्हणाली, “Shubhangi, I hear voices.” मला कळेना तिला काय म्हणायचं ते. तर तिने स्पष्ट करुन सांगितलं की तिला रात्री कसले कसले आवाज ऐकू येत. मी तिला समजावलं की रात्री शांतता असते त्यामुळे साधे साधे आवाज जसं की वाऱ्याने कॅलेंडरचं पान फडफडणं, एखादी पाल सरपटत जाणं हेही जोरात ऐकू येतात आणि ते कसले ते  कळत नाही. मी तिला म्हटलं की तू आवाज ऐकलास की दिवा लावून पहा किंवा मला फोन कर मी लगेच येते. मग ती शांत झाली. ती बुद्धिप्रामाण्याला मानणारी असल्याने तिला माझं म्हणणं पटलं आणि मग तिला शांत झोप लागू लागली. त्याच दरम्यान तिच्याच फ्लॅटखाली भाड्याने घर घेऊन रहाणाऱ्या दोन मुलींनीही तक्रार केली की रात्री वाद्यांचे, घुंगराचे आवाज येतात. भुताटकी आहे वगैरे. शोध घेतल्यावर लक्षात आलं की खालच्या फ्लॅटमध्ये एक व्यक्ती एकटीच रहात होती. बरेचदा एकट्या रहाणाऱ्या व्यक्तींना टीव्ही, रेडियो यांच्या आवाजाचा आधार वाटतो, घरात कुणीतरी आहे असं वाटतं, तसं ती व्यक्ती टीव्ही, रेडियोवर शास्त्रीय संगीत ऐकणं, नृत्याचे कार्यक्रम पहाणं असं रात्री दोन अडीच वाजेपर्यंत करीत असे. त्यातून गायननर्तन करणारं भूत उभं राहिलं. त्या व्यक्तीला सांगितल्यावर तिने आवाज कमी करुन ऐकायला सुरुवात केल्यावर गायननर्तन करणारं भूत पळून गेलं ते गेलंच.

ताणायचं किती?

अलीकडे एका मालिकेत कामावर वेळेवर न पोचल्याने काही लोकांना मेमो देण्यात येतो असं पाहिलं. मला तर निवृत्त होऊन इतकी वर्षं झाली तरी अजूनही मी वेळेवर पोहोचण्यासाठी कसरत करीत चाललेय आणि वाटेत अनेक अडथळे येताहेत अशी स्वप्नं पडतात. मुंबईसारख्या शहरात वाहतूक व्यवस्थेवर इतके ताण असतात की खरंच कसरत करावी लागते. मला दहिसरवरुन कफ परेडला पोहोचायला आधी बस किंवा रिक्षा, मग लोकल, मग पुन्हा बस, शेअर टॅक्सी किंवा साधी टॅक्सी करुन जावं लागे. तेही सहजासहजी मिळत नसेच. प्रत्येक वाहनासाठी इतका आटापिटा करावा लागे की विचारुन सोय नाही. त्यातून दक्षिण मुंबईत मंत्रालय असल्याने वेगवेगळे मोर्चे, निदर्शनं, एखाद्या मंत्र्याचं, आमदाराचं निधन, सरकारने बोलावलेल्या परदेशी किंवा देशी नेत्यांचं आगमन या सगळ्यांमुळे वाहतुकीचा अर्धा तास ते तासभरही होणारा खोळंबा ही एक अडचण असे. कधी कधी घाईत आपण टॅक्सी करावी तर विचित्र अनुभव येत. एकदा लोकल काही कारणाने रखडल्यामुळे मी आणि एका सहकारी मुलीने टॅक्सी केली. जेव्हा यू टर्न घेतांना त्या चालकाने गाडी फुटपाथवर चढवली तेव्हा कुठे ध्यानात आलं की तो प्यायलेला होता. बरं तो आरडाओरडा करुनही उतरु देईना. जीव मुठीत धरुन तो प्रवास केला. त्याने लांबून नेल्याने पैसेही अधिक खर्च झाले शिवाय उशीर टळला नाहीच. एकदा असाच एक चालक सगळ्या गाड्यांना हात करुन आपल्या पुढे जाऊ देत होता. त्याला म्हटलं बाबा रे कामावर जायला उशीर होतोय म्हणून तुझी टॅक्सी घेतली. तर पठ्ठ्याने “अईसा का? हम को लगा घूमने निकली हो” असं म्हटल्यावर त्याला सांगितलं कळलं ना आता तरी नीट चल बाबा. तर साहेबांनी “हम नही चलाता हूँ” असं म्हणत स्टिअरींग व्हीलवरचे हात सोडून दिले. इतकं सगळं करुन उतरल्यावरही आम्ही पळत पळत वीसाव्या मजल्यावर पोचायला उद्वाहनाच्या रांगेत, मग तिथून विभागात पोचल्यावर संगणक सुरु करायला वेळ लागे, तो सुरु करायचा वेगळा परवलीचा शब्द, मग हजेरीच्या ठिकाणचा वेगळा परवलीचा शब्द, पुन्हा तिथे प्रत्येकाचा वेगळा कर्मचारी क्रमांक आणि पुन्हा एक परवलीचा शब्द असं सगळं करुन आपली हजेरी लागली की हुश्श करायचं.

आता  वाटतं इतका ताण घ्यायची काय गरज होती कोण जाणे. टाळेबंदीच्या काळात निदान हे तरी टळलं म्हणून अनेकांना बरं वाटलं. शिवाय कामावर वेळेवर जायचा उटारेटा न करताही वेळेवर काम संपवता येतं हेही कळलं. मग का इतकी धावपळ करतो आपण? त्या मालिकेतल्या माणसासारखा आपलाही अहंकार आड येतो का की आपण वेळेवर जातो असा आपला रेकॉर्डच आहे? कित्येक लोक मी पाहिलेत जे वेळेवर कधीच पोचत नसत तरीही त्यांचं काही बिघडलं नाही. तेही माझ्यासारखेच निवृत्त झाले, त्यांनाही पेन्शन मिळाली, थोडी कमी असेल कदाचित. पण ते रोज उशिरा जात हे आता त्यांनाही आठवत नसेल. हे तर मान्यच की वेळेवर जाणं – विशेषतः जिथे ग्राहकांशी संबंध येतो तिथे तर नक्कीच- अत्यावश्यक आहे. पण त्यासाठी किती मानसिक ताण घेतो आपण. तसंही आमच्याकडे कामावर यायची वेळ निश्चित असली तरी घरी जायची वेळ ठरलेली नसे. ती फक्त कागदोपत्रीच असायची. घरी पोचायला माझ्यासारख्या अनेकांना रात्रीचे दहा अकरा वाजत. कौटुंबिक आयुष्याचा पुरता बोजवारा उडे. जिथे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना राबवून घेतलं जातं तिथे ग्राहकांशी संबंध येत नसेल अशा विभागातल्या लोकांसाठी कामाचे तास लवचिक (flexi hours) ठेवायला काय हरकत आहे? जिथे ग्राहकांशी संबंध येतो तिथेही जास्तीचे कर्मचारी घेऊन हा प्रश्न मिटवता येऊ शकतो जेणेकरुन वेळेवर येणं आलटून पालटून बंधनकारक असेल. पण सध्या सगळीकडे कर्मचारी कपात, खर्चात कपात असं धोरण असल्याने कंत्राटी कामगार घेतले जातात आणि त्यांना फारशा सवलती न पुरवता कसंही राबवून घेता येतं. टाळेबंदीच्या काळात घरून काम करण्याचा पर्याय उपयोगी ठरतो खरं तर हे सगळ्यांच्या लक्षात आलं. शिवाय ज्यांना लोकल किंवा बसने जाण्याची परवानगी नव्हती पण कामावर जावंच लागे असे कर्मचारी एकाच परिसरात रहाणाऱ्या सहकाऱ्यांसोबत गाडीने एकत्र जात. हे दोन्ही पर्याय पुढेही उपलब्ध असले तर पर्यावरणाची हानिही टाळता येईल

आता टाळेबंदीच्या काळातल्या बदलांमुळे व्यवस्थापनाने काही धडे घेऊन या सगळ्यात बदल केले तर अनेक कर्मचाऱ्यांची मानसिक तणावातून सुटका होईल. माझ्या आठवणीप्रमाणे एक्झिम बँकेने या दशकाच्या सुरुवातीलाच फ्लेक्सी आवर्स ही संकल्पना राबवली होती. जे उशिरा कामावर दाखल होत, त्यांना तितकंच उशिरापर्यंत थांबावं लागे. जे लवकर ये त्यांना लवकर जाण्याची मुभा असे. अशा प्रकारे वेळेच्या आधी आणि वेळेवर येणारे असे दोन्ही वर्गातले लोक हजर असल्याने फारशी अडचणही होत नसे. ही व्यवस्था तिथल्या कर्मचाऱ्यांना खरंच सोयीची ठरली असं तिथं काम करणाऱ्या मैत्रिणीने सांगितलं.

दुसरेही काही ताण असतात ते आपणच निर्माण करतो कधी कधी. एकदा माझ्यावर लेखा विभागातल्या परकीय चलनात देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात एक सॉफ्टवेअर तयार करुन घेऊन ते अंमलात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. माझं रोजचं काम करुन हेही काम तातडीने करायचं होतं. सॉफ्टवेअर करुन घेतलं पण अंमलात आणायचं कामही मी त्या कामासारखं एका कोपऱ्यात बसून माझं मीच करायचं ठरवलं. आधीचं काम करतानांचा ताण होताच तरीही मी कशाला दुसऱ्यांना यात ओढा, माझं मी करीन म्हटलं. पण आमच्या वरीष्ठांनी मला समजावलं. ते म्हणाले, “असंही हे काम नंतर सर्वांनी आपापल्या कंपन्यांसाठी करायचं आहे. आत्ताच सगळ्यांना या कामात गुंतवलं तर ते लवकर पुरं होईल, त्या निमित्ताने प्रत्येकाला त्यातल्या खाचाखोचा कळतील त्याची त्यांना मदतच होईल.” अर्थात इतरांनी मला मनातल्या मनात शिव्या दिल्या असल्या तरी नंतर त्यांनाही हे कळून चुकलं की हे आधी केलं ते बरं झालं. पण कधी संकोचामुळे, कधी फुकटच्या अहंकारापायी, कधी भीतीपोटी इतरांना कामात सहभागी करुन घेणं किंवा काम वाटून देणं आपण टाळतो. त्या वेळी ध्यानात येत नसलं तरी असं करुन आपण आपला ताण उगाचच वाढवित असतो हे आपल्या शरीराला, मनाला त्रास व्हायला लागला की आपल्या ध्यानात येतं.

तोच प्रकार काम नाकारण्याचाही. कधी कधी तात्पुरता का होईना नकार देणं आवश्यक असतो. मराठीत एक अश्लील म्हण आहे – भीडे भीडे पोट वाढे तसं व्हायला नको. नव्वदच्या दशकातली गोष्ट आहे. संगणीकीकरण ही तशी नवी गोष्ट होती अजूनही. कित्येकांचे संगणकाविषयी मजेदार समज असत. एकदा एक चांगला बुद्धीमान सहकारी मला म्हणाला, “पण मॅडम, कॉम्प्युटर कशी काय चूक करु शकेल?” म्हणजे आपण चुकीची विदा भरली तरी संगणकाची चूक होणारच नाही. संगणक जादूने काहीतरी करतो असाच समज असे. तसंच संगणीकीकरणाचा अर्थ भल्याभल्यांना नीट माहीत नसे. मी लेखा विभागात होते आणि माझ्याकडे परकीय चलनातल्या कर्जाचं काम होतं. जवळपास पाचशे कंपन्यांना दिलेली वेगवेगळी कर्ज, प्रत्येक कर्ज फेडण्यासाठी व्याजाचे, दंडाचे वेगवेगळे दर, वेगवेगळ्या अटी असं होतं. त्या कामाचं संगणीकीकरण झालं नव्हतं. माझ्या चमूतली माणसं ते हाती करीत. मोठाल्या खातेबुकात ते मांडून ठेवीत. आमचे महाव्यवस्थापक फार कडक शिस्तीचे होते. कर्जाचे हप्ते बुडवणाऱ्या कंपन्यांवर ते सतत नजर ठेवून असत. त्यासाठी दर आठवड्याला त्यांना आकडेवारी पुरवावी लागे. मी एक्सेलशीटवर इतक्या सगळ्या कंपन्यांचं काम हाती करुन ठेवीत असे. पण ते करायला वेळ लागे. आणि सोमवार जवळ आला की पोटात गोळा उठे. कारण साहेबांना सगळा तपशील द्यायचा असे. एवढी मोठी फाईल तयार व्हायला वेळ लागे. मी रविवारी काम करुनही पूर्ण होत नसे, कारण माझं रोजचं काम करुन मला हे करावं लागायचं. शेवटी एकदा मी धीर करुन त्यांना सांगून टाकलं की सर मला हे शक्य नाही. ते म्हणाले तुला काय करायचंय त्यात संगणकला फक्त आज्ञा द्यायची ना. तेव्हा मी त्यांना ते काम संगणकीकृत नाही तर हाताने कसं केलं जातं ते दाखवलं आणि त्यांना ते पटलंच शिवाय संगणीकीकरण तातडीने करुन घेण्यासाठी त्यांनी परवानगी दिली, तशा सूचना हे काम करणाऱ्या विभागाला दिल्या तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. खरं तर हे मी सुरुवातीलाच करायला हवं होतं. पण आपण कुठे तरी कमी पडतोय असं वाटून अशा प्रकारची कृती हातून होत नाही. आपण फार कुशल आहोत हे सिद्ध करण्यासाठी ताकदीबाहेर आटापीटा करणारे कित्येक सहकारी अशा प्रकारे निराशेच्या गर्तेत गेलेले मी पाहिलेत. उपचार घेऊन ते त्यातून बाहेर पडले तरी त्यांची कारकीर्द नंतर पहिल्यासारखी होऊ शकली नाही हेही खरं. थोडासा ताण तुमच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आवश्यक असतो हे खरं. लवचिक असलं पाहिजे रबरासारखं. पण रबर फार ताणला की तुटतोच. तो किती ताणायचा हे समजून घेणं फार आवश्यक आहे.

शेवटल्या बाकांचे सरदार

तशी मी अभ्यासात बरी होते. शाळेत घालायला वडील घेऊन गेले तोवर मोठ्या बहिणींचं ऐकून पुस्तक पाठ झालं होतं. तेव्हा वर्षानुवर्षे पुस्तकं तीच असत आणि आम्हा बहिणींमध्ये दोन दोन वर्षांचं अंतर असे. त्यामुळे पान पहिलं धडा पहिला इथपासून सगळं पाठ होतं. मुख्याध्यापक माझी प्रगती पाहून चकीत झाले. म्हणाले ही तर तिसरीतच जाऊ शकेल थेट पण आपण दुसरीत घालू. वडील म्हणाले थांबा जरा. त्यांनी आजूबाजूला शोध घेत माझ्या परिचयाचं नसलेलं एक पुस्तक हाती दिलं. मला एक अक्षरही वाचता आलं नाही, तेव्हा कुठे त्यांच्या ध्यानी आला खरा प्रकार. पण नंतर अर्थातच भराभर शिकले. प्राथमिक शाळेतल्या आमच्या वर्गशिक्षिका हेमलता जोशी यांनी वर्गात एक मोठा लाकडी पेटारा ठेवलेला असे. चांगले गुण मिळवणाऱ्या किंवा काहीही चांगलं करणाऱ्याला (उदाहरणार्थ की चांगलं गाणं, खेळ, नृत्य, चित्र काढणं) त्या पेटाऱ्यात लपलेल्या खजिन्यातून काहीतरी मिळत असे. मी पहिला क्रमांक मिळवत असल्याने मला एक खेळण्यातलं घड्याळ आणि एक शाईचा छोटुकला पेन मिळाला होता.

असं असलं तरी का कुणास ठाऊक मला शेवटच्या बाकावर बसायला फार आवडत असे. सहसा पहिला क्रमांक मिळवणारी मुलं पुढच्या बाकावर बसतात. शेवटच्या बाकावरची मुलं ढ, उडाणटप्पू ठरवली जातात. हे माहीत असूनही मी शेवटच्या बाकावर बसत असे. कदाचित शाळेतली एक घटना त्याला कारणीभूत असावी. बोकील नावाचे एक शिक्षक वर्गात जाळ्यात अडकलेल्या सिंहाची ती सुप्रसिद्ध गोष्ट सांगत होते. ते जाळं कसं होतं हे सांगतांना माझ्या फ्रॉककडे बोट दाखवीत म्हटलं, “हिच्या फ्रॉकसारखं होतं बरं का ते जाळं.” त्या काळी अंगावर एक, दांडीवर एक इतकेच कपडे असत. तेसुद्धा मोठ्या भावंडांनी वापरुन जुने झालेले धाकट्यांना मिळत. शिवाय परिस्थिती हलाखीची. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. तिथे नवा फ्रॉक कुठून मिळायला. तोपर्यंत मलाही तो घालायला लाज वाटत नसे. पण शिक्षकांनी असं म्हटल्यावर सगळे माझा फ्रॉक पाहून हसायला लागले. नंतर चिडवायलाही लागले. त्यामुळे बहुधा मी पुढे बसायचं नाही असं ठरवलं असावं.

पण मला तिथे बसायला अनेक कारणांनी आवडत असे. पुढे बसल्यावर शिक्षकांचं लक्ष असेच. शिवाय माझ्या मागे बसणारी माझी मैत्रीण मीना माझ्या रिबिनी सोडून वेण्यांच्या टोकांना वळवून ती गोल झाली की त्यात बोटं फिरवीत बसे. उत्तर आलं नाही की सगळ्या वर्गासमोर इज्जत का फालुदा. हे सगळं असे. पण माझ्या मागच्या बाकांवरच्या मैत्रिणी अधिक आपल्याशा वाटत. त्या आखडू नसायच्या. लोकांना वाटतं तशा निर्बुद्ध नसायच्या. कदाचित त्यांना दुसरं काही महत्त्वाचं वाटत असेल, आवडत असेल अभ्यासाऐवजी इतकंच. मला तर अशी पक्की खात्री आहे की शेवटच्या बाकावर बसलेल्यांना आपल्या ठरीव शिक्षणपद्धतीचा निषेध करायचा असावा आणि म्हणून ते इतके दूर बसत असावेत. शिक्षक काहीतरी गिरवत बसायला सांगून वर्गाबाहेर गेले की आम्ही आपापाल्या दप्तरातला (माझं तर खाकी जाड कापडाचं होतं) खजिना एकमेकींना दाखवत असू. त्यात सरांनी लिहून उरलेले खडूचे तुकडे, पेन्सिलींचे तुकडे, पेपरमिंटच्या गोळ्या आणि चॉकलेट यांची वेष्टणं, सिगरेटच्या पाकीटातला चंदेरी कागद, रंगीबेरंगी गोट्या, खडे, चक्क बांगड्याचे तुकडे असं बरंच काही असे. कधी कधी जास्तीच्या गोष्टींची देवाणघेवाणही होई. “कुण्णालाही सांगू नकोस हं. आईने बजावलंय. मला ना जांभळ्या रंगाची सुसू होते.” असं एकदा मैत्रिणीने सांगितलं होतं. तेव्हा काहीच कळलं नव्हतं. पण अशी गुपितं कानात सांगितली जात. घरुन क्वचित मिळालेल्या पैशांचे खारे दाणे, बोरं वाटून घेतली जात. कधी कधी वर्गातला हुशार आणि शिष्ट मॉनिटर बंडू म्हापणकर आमच्या बाकाकडे येऊन खिडकीबाहेरच्या पिंपळाकडे बोट दाखवत थापा मारी, “तो सुरा पाहिलास त्या झाडाच्या खोडावरचा? तो मी अमावाश्येच्या रात्री येऊन खोवून ठेवलाय. नाहीतर भुतं येतात.” पण ते तितकंच. बाकी शिष्ट मुलांचा आणि आमचा फारसा संबंध नसे. पण या सगळ्यामुळे माझ्या अभ्यासावर काही परिणाम होत नसे. त्यामुळे असेल, वर्गशिक्षक माझ्या शेवटच्या बाकावर बसण्याला आक्षेप घेत नसत.

नंतर मी गिरगावातली ती शाळा सोडून घराजवळच्या नगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत गेले. ती शाळा छोटी होती. वर्ग लहान. तिथे मी लाडकी होते शिक्षकांची आणि वर्गातल्या मुलींचीही. त्यामुळे मी कुठेही बसले तरी फरक पडत नसे. आणि मी कुठेही बसत असे. पण त्याचा काही बाऊ केला जात नसे.

पण त्यानंतर आठवीत मात्र एका खाजगी शाळेत गेले. तिथे आम्हा ‘उल्टीपाल्टी’च्या मुलांची वेगळी तुकडी असे. सकाळी घरातली पाण्याची कामं, दूधकेंद्रावरुन दूध आणणं हे सगळं उरकून पहिल्या दिवशी मी जेमतेम वेळेवर पोचले. वर्गात सगळ्यांनी लवकर येऊन जागा पटकावल्या होत्या. योगायोगाने माझ्या आवडत्या शेवटच्या रांगेतल्या एका बाकावर जागा मोकळी होती. तिथे एक जरा थोराड दिसणारी मुलगी- सुधा तिचं नाव – बसली होती. मी तिच्याशेजारी जाऊन बसले. माझं कुणाशीही जमे तसं तिच्याशीही चांगलं मेतकूट जमलं. तिलाही बरं वाटलं. कारण तिच्या जरा मजबूत देहयष्टीमुळे बाकावर जागा मिळत नाही म्हणून किंवा इतर कशामुळे असेल वर्गातल्या इतर मुली तिच्याशी साध्या बोलतही नसत. शिक्षक नवे होते. त्यामुळे सुरुवातीला काही त्रास झाला नाही. पण एक दिवस आमच्या इंग्रजीच्या सोगावसन नावाच्या बाईंनी एक प्रश्न विचारला तेव्हा सुधा मला बाईंनी काय विचारलंय हे विचारीत होती. मागच्या बाकावरच्या लोकांची ही एक अडचण असते- नीट ऐकू येत नाही किंवा ऐकू आलं तरी समजायला वेळ लागतो त्यामुळे ती मुलं कायम शेजारच्या किंवा पुढच्या बाकावरल्या मुलांना विचारत बसतात आणि शिक्षकांना वाटतं त्यांचं लक्ष नाही किंवा त्यांना वर्गात गोंधळ माजवायचाय. तसं त्या बाईंना वाटलं. त्यांनी मला म्हटलं, “दे बघू उत्तर, येतंय तरी का?” माझं इंग्रजी तसं बरं होतं. आमच्या आधीच्या शाळेत तर मला मड्डम म्हणून चिडवीत. मी बरोबर उत्तर दिलं. तर बाई म्हणाल्या, “कोणी रे हिला प्रॉम्प्टींग केलं? सांग कोणी उत्तर सांगितलं तुला.” मी म्हटलं “कुणी नाही बाई. माझं मीच सांगितलं.” एकतर त्यांना बाई म्हटलेलं आवडत नसे हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे त्या भडकल्या “खरं सांग, खोटं बोललेलं मला आवडत नाही. किती मार्क्स मिळाले होते सातवीत इंग्रजीला?” मी म्हटलं, “पंच्याऐंशी.” आता हे मी मराठीत सांगितल्यामुळे त्या फारच भडकल्या “खोटं बोलतेस अजून? तुला ठाऊक नाही मी काय शिक्षा करते ती.” आता कुठे माझ्या आधीच्या शाळेतल्या वर्गभगिनींना कंठ फुटला, त्या नक्की कोण बोलतेय ते बाईंना कळू नये अशा पद्धतीने एका सुरात म्हणाल्या, “नाही मॅडम, तिला खरंच तितके मार्क्स  मिळाले होते. आमच्या वर्गात होती ती.” मग त्या विचारात पडल्या. पण त्यांनी एक वाईट गोष्ट केली ती म्हणजे मला पुढे बसवलं आणि पुढचे काही दिवस वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लावून खात्री करुन घेतली. पण मीही तशी लबाड होते. त्यांचा तास संपला की मी पुन्हा मागे जाऊन सुधाजवळ बसत असे.

पुढे महाविद्यालयांमध्ये हा प्रश्न उद्भवला नाही. कारण पहिली दोन वर्षं वर्गात मुलांची संख्या जास्त असली तरी तिथेही भाषिक गट असत (त्यातही जातवार असतील कदाचित) आम्ही आठ मराठी मुली एकत्र बसत असू आणि नीट ऐकू यावं म्हणून चौथ्या बाकावर बसत असू. पुढे पदवीसाठी एल्फिन्स्टन महाविद्यालयात तर वर्ग छोटाच असे. तिथे मागे बसलं तरी फार फरक पडत नसे.

पण खूप वर्षांनी मागच्या बाकाचे सरदार होण्याचा अनुभव एम.ए.च्या वर्गात आला. मी आणि चंदर दोघेही दिवसभर नोकरी करुन संध्याकाळी एल्फिन्स्टन महाविद्यालयात एम.ए.चे वर्ग भरत तिथे पळत पळत जात असू. पुढची बाकं भरलेली असत. शिवाय आपल्यामुळे शिक्षक आणि इतर विद्यार्थ्यांना व्यत्यय नको म्हणून हळूच मागच्या बाकावर बसत असू. पदवी शिक्षण पार पडल्यावर तरी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा शब्द न् शब्द लिहून न घेता स्वतः काही वेगळा विचार, विश्लेषण करणं आवश्यक आहे. पण या संध्याकाळच्या वर्गात सगळेच आमच्यासारखे नोकरी करणारे होते म्हणून असेल कदाचित पण बरेचजण अशा प्रकारे लिहून घेत. आमच्या पाठच्या वर्गातली एक मुलगी तर असं लिहून घेत असतांना तिच्या वहीत कुणी डोकावलं तर हाताचा आडोसा करीत असे किंवा चक्क वही मिटून टाकीत असे. आम्हा दोघांना तसं लिहून घ्यायची गरज भासत नसे. मध्येच एखादा मुद्दा आवडला, वेगळा वाटला तर लिहून घेणं वेगळं. प्राध्यापकांनाही तसा काही फरक पडत नसे. पण आमच्या तत्कालीन विभागप्रमुख होत्या त्यांना मात्र त्या सांगत असत ते सगळं लिहून घेतलं नाही तर राग येत असे. “हे महत्त्वाचं आहे.” असं त्या अधून मधून ठासून सांगू पहात. पण आम्ही दोघं गालावर हात ठेवून एकाग्रतेने फक्त ऐकत असू. अर्थात कधी फार कंटाळवाणं वाटलं तर मुद्दा लिहिलाय असं दाखवत शेरेबाजी लिहिलेल्या वह्या एकमेकांकडे सरकवत असू. बाईंनी अनेक विद्यार्थी पाहिलेले असल्याने त्यांना ते कळत असावं. त्यामुळे आम्ही उडाणटप्पू आहोत असं त्यांना वाटे आणि त्या येता जाता रागारागाने पहात. पण पहिली परीक्षा झाली आणि आमच्या उत्तरपत्रिका पाहिल्यावर त्यांचा तो राग गेला. मग आमची चांगली मैत्री झाली.

शाळा महाविद्यालयातच नव्हे तर सभासमारंभाना गेल्यावरही मला मागे बसावसं वाटतं. आपल्या पुढे बसलेले हुषार लोक काय काय करताहेत कार्यक्रम चालू असतांना हे पहायला मज्जा येते. शिवाय वर म्हटलं तसं गंभीरपणे ऐकतोय, लिहून घेतोय असं दाखवत एकमेकांना ताशेरे दाखवत टवाळकी करता येते. बरेच लोक कार्यक्रम कंटाळवाणा झाला की पटकन् पळायला बरं म्हणून शेवटच्या रांगांमध्ये बसतात. हे असे लोक आमच्यासारखं खर्रेखुर्ऱे शेवटच्या बाकांचे सरदार नव्हेत. कारण कार्यक्रम चांगला झाला की त्यांची चलबिचल होते, पुढे बसायला हवं होतं असं त्यांना वाटू लागते.

परवा आमच्या एका मित्राने गुरुपौर्णिमेदिवशी फेसबुकावर लिहिलं होतं – सगळ्या शिक्षकांनी शेवटच्या बाकावरच्या विद्यार्थ्यांना नमस्कार करायला हवा, कारण त्यातला कुणीतरी शिक्षणसंस्थेचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या डोक्यावर येऊन बसू शकतो. पण खरं पहाता आमचे दुसरे एक मित्र म्हणतात तसं आमचे हे जे पुढच्या बाकावर बसणारे, गुणवत्ता यादीत येणारे मित्र आयुष्यात पुढे काय करतात आणि आमच्यासारखे मागच्या बाकांवरचे सरदार काय करतात यावर जरा संशोधन व्हायला हवं.

गुड इव्हिनिंग सर, नमस्कार मॅम

चंदर आणि मी रोज फिरायला जातो तेव्हा एक गृहस्थ नेहमी चंदरला हात उंचावून अभिवादन करतात आणि मला मात्र किंचित लवून दोन्ही हात जोडून नमस्कार करतात. चंदरला ते आवर्जून ´गुड इव्हिनिंग सर´ असं म्हणतात, तर मला मात्र नेमकेपणाने ´नमस्कार´ म्हणतात.

अलीकडे फेबुवर माझ्या एका सहकारी मित्राने आपल्या परदेशवारीची छायाचित्रं टाकली होती. त्यात प्रसिद्ध व्यक्तींच्या मेणाच्या पुतळ्यासोबत काही छायाचित्रं होती. जिथे ती प्रसिद्ध व्यक्ती पुरूष होती तिथे त्यांनी पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून, तर जिथे प्रसिद्ध व्यक्ती स्त्री (भारतीय नव्हे) होती, तिथे मात्र जरा अंतर राखून, शिवाय हात मागे बांधून छायाचित्र घेतलंय. स्त्री आणि पुरूष यांच्याबरोबरच्या व्यवहारातील भेदभावाच्या दृष्टीने मला ते फार गंमतीदार वाटलं.

यात स्त्रीविषयी पारंपरिक रीतीने आदर दाखवायचा, पण त्याचबरोबर पुरुष आणि स्त्री यांच्यातील भेदही अधोरेखित करायचा असं दिसतं. पुरुषाच्या संदर्भात तुम्ही ‘पर’ आहात, पण बरोबरीच्या नाही आहात, खालच्या व दूरच्या पायरीवर आहात असे काहीतरी या व्यवहारातून सुचवलं जात असावं असं वाटलं. खरं तर बरेचसे पुरुष इतरांसमोर बायकांशी मोकळेपणी वागायला घाबरतही असावेत. कारण त्यांना समाजातल्या आपल्या प्रतिमेची चिंता असते.

आता साधी हस्तांदोलनाचीच गोष्ट पहा ना. पुरुषांबरोबर हस्तांदोलन करतांना संपूर्ण हात हातात घेतला जातो. तर बायकांबरोबर हस्तांदोलन करतांना बरेचजण फक्त बोटं हातात घेतात. काही लोक एखाद्या बाईचा हात हातात आला की सोडतच नाहीत, तेव्हा अशा लोकांकडे विचित्र नजरेने पहाणाऱ्यांना मनातून मात्र त्याच्यासारखं करावंसं वाटत असतं. पण लोकलाजेस्तव तसं करणं बरं नाही हे ह्या गड्याला कळत नाही की काय असा भाव त्यांच्या नजरेत असतो.

म्हणजे बाईबद्दल खरोखरी मनात आदर असतो असं नाही. तर तो आहे असं दाखवायची रीत असते. म्हणून मग हे नमस्कार, हात मागे बांधून उभं रहाणं वगैरे.

एकदा बाजूलाच असलेल्या जागतिक व्यापार केंद्रातल्या एका विक्रीजत्रेत एका प्रसिद्ध कॅमेऱ्याच्या कंपनीचा स्टॉल होता. तिथे एका सुंदर, कमनीय बाईचा खऱ्याखुऱ्या बाईसारखा दिसणारा कटआऊट होता. त्यासोबत मोफत छायाचित्र काढता येत होतं. हा त्या कॅमेऱ्याच्या जाहिरातीचा भाग होता. आमच्या बँकेत आमचे एक ‘भोळसर’ सहकारी होते ते तिथे मित्रांसोबत गेले. मित्रांनी त्यांना छायाचित्र घेण्यासाठी भरीला घातलं. तेही एका पायावर उडी मारुन तयार झाले (खरं म्हणजे भरीला घालावं लागलंच नाही). मग त्या बाईला खेटून छायाचित्र घेतलं गेलं. मग त्यांच्या मित्रांनी त्यांच्या नकळत जाऊन ते आपल्या ताब्यात घेतलं. संध्याकाळी ते जाऊन ‘वहिनीं’ना दाखवलं. कॅमेऱ्याच्या करामतीमुळे खरोखरीच्या बाईसोबत काढल्यासारखं ते छायाचित्र पाहून आमच्या सहकाऱ्याचं काय झालं असेल याची कल्पना आलीच असेल. ते छायाचित्र फक्त आपल्या ताब्यात रहाणार या कल्पनेने त्याने ते घेतलं होतं (शिवाय चकटफु) ते जर असं नको तिथे पोचणार याची कल्पना असती तर त्याने मुळात ते काढूनच घेतलं नसतं किंवा घेतलं असतं तर तो आदबशीरपणे हात मागे बांधून सुरक्षित अंतर ठेवलं असतं नाही का?

रस्ता -५

खाजणाकडे जायच्या पायवाटेच्या तोंडावर एक दोन तरी वाहनं थांबलेली असतात. डी मार्टकडे माल घेऊन येणारे टेम्पो, खरेदीला येणाऱ्यांच्या गाड्या, दुचाक्या. तशी हल्ली कुठल्या तरी कंपनीच्या लोकांना घरी नेणारी मिनी बस दिसते. “अरे, तो हा आला का? तो तमका कुठे गेला? अहो मॅडम, चला लवकर.” असं करता करता बस दहा पंधरा मिनिटं थांबते. मग पंधरावीस तरुण मुलंमुली बसली की बस सुटते. आज बस अशीच थांबली होती. तेवढ्यात टाळेबंदीपासून घडली नव्हती अशी गोष्ट घडली. बाहेर रेंगाळणाऱ्या एका पस्तीशीच्या तरुणाला दहा बारा वर्षांच्या दोघातिघा मुलांनी गाठलं. त्यांच्यापाशी असलेल्या छोट्या पिशव्यांमधून लहान मुलांची पुस्तकं, वह्या काढून ते त्याला दाखवू लागले. त्यानेही पाचसहा पुस्तकं चाळून तीनेक विकत घेतली, एकाद दुसरी वही घेतली. मग ती मुलं खिडकीतून आत डोकावत आपलं विक्री कौशल्य आजमावून पहायला लागली. पण कुणीच त्यांना धूप घातला नाही. तेव्हा नाईलाजाने ती दुसरी गिऱ्हाईकं गाठायला निघून गेली.

मला एकदम मी लोकलने बँकेत जात असे तेव्हा आमच्या डब्यात इंग्रजी पुस्तकांची चवड हातावर तोलत सफाईने आत उडी मारुन डब्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ती विकत फिरणारी अशीच छोटी मुलं आठवली. एकतर ती पुस्तकं अशीही पायरेटेड त्यामुळे स्वस्त. शंभरदोनशे रुपयांना मिळत. पण बायका त्यातही मोलभाव करुन निम्म्या किंमतीला मागत. वर आपण काही म्हणावं तर आपल्यालाच शिकवत, “अहो, तुम्हाला काही कळत नाही. शेंडी लावण्यात हुश्शार असतात ही पोरं. केवढा फायदा काढतात. फूटपाथवर पहा, पन्नास रुपयांना मिळतात.” मी बऱ्याचदा या मुलांशी गप्पा मारीत असे. त्यातली काही पळवली गेलेली तर काही घरातून पळून आलेली. त्यांना हे सगळं करणं भाग असे. हा त्यांच्या जगण्याच्या संघर्षाचा एक भाग होता. त्यांच्यासारखी इतर मुलंही कानातले, स्वस्त चिनी वस्तू, टिकल्या असलं काहीबाही विकत. पोलीस, गुंड, वयाने मोठे असलेले इतर फेरीवाले या सर्वांना तोंड देत देत जगत असत. रेल्वे फलाटावर कुणा दानशूराने ठेवलेल्या पाणपोयीवर पाणी पित, फलाटावरच्या वडापाव, सँडविचच्या स्टॉलवर खातांना दिसत कधी मधी, रात्री आपापल्या रहाण्याच्या ठिकाणी किंवा फलाटावर झोपायला जात. कधी एखादी माझ्यासारखी ओळखीची बाई दिसली की मागे लागत, “ले लो ना मॅडम, आज बोवनी नही हुवा है.”

या तीन महिन्यांत त्यांना कोणी खाऊपिऊ घातलं असेल? की तीही आठवणीतून गेलेल्या आपल्या गावाला निघून गेली असतील पायी पायी? की इथेच राहिली असतील टाळेबंदी संपल्यावर असं पुन्हा मांजरासारखं दोन पायांवर उभं राहून जगण्याची धडपड करायला?

तुटलेला चष्मा

मी अशी काहीतरी मोबाईलमध्ये वाचत बसले होते आणि अचानक एक सूक्ष्म असा आवाज झाला आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या चष्म्याची तार लटकतांना दिसली. तातडीने त्या बाजूचं भिंग हातात धरुन ठेवून मी चष्मा हळूच उतरवला, चष्मा, भिंग जपून एका पाकीटात घालून ठेवलं. आपल्या धोरणीपणावर खूष होता होता माझ्या इतका वेळ जी गोष्ट ध्यानी आली नव्हती ती अचानक येऊन आदळलीच. आई गं, या टाळेबंदीच्या अवघड काळात आपला चष्मा तुटलाय. आता काय? लगेच स्वतःला सावरुन (पुन्हा आपल्या धोरणीपणावर खूष होत) चष्मा जिथून घेतो त्या दुकानात फोन लावला. ते म्हणाले उद्या माणूस पाठवतो. मग जीव जरा भांड्यात पडला.

थोड्या वेळाने सवयीने उघडलेला लॅपटॉप बंद करायला लागल्यावर वाटलं अरे बापरे कसं होणार आपलं चष्मा दुरुस्त होईस्तोवर. तरी जरा टीव्हीवर काहीबाही पहात टीपी केला. घरातली रेंगाळलेली कामं उरकली. रात्री झोपतांना सवयीने पुस्तक उघडलं, त्यामध्ये घालून ठेवलेलं खुणेचं पान उलटसुलट केलं आणि ठेवून दिलं. मागून नवऱ्याचा आवाज आला, “काय गं, नित्यकर्म करावं म्हणून उघडून मिटलंस की काय?” खरंच आपण वाचन हे नित्यकर्म करावं तितक्या यांत्रिकपणे करतोय की काय असा प्रश्न पडला जरा वेळ. मग झोप लागायला जरा वेळ लागला.

सकाळी उठून पुन्हा तेच. वॉट्स अॅप उघडायला गेले नि लक्षात आलं वाचता येत नाहीय. नाश्ता झाल्यावर सवयीने लॅपटॉप उघडला नि पुन्हा मिटून ठेवला. असं वाटायला लागलं चष्मा नाही, जगाशी संपर्कच तुटलाय आपला. लिहिणाऱ्या वाचणाऱ्या माणसांनाच नव्हे तर फक्त वॉट्स अॅप वाचणाऱ्या व्यक्तीलाही हे वाटू शकतं की. किंबहुना त्यांना तर अधिकच वाटू शकतं. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर काही दिवस वर्तमानपत्र किंवा वॉट्स अॅप, फेबु वाचता येत नाही म्हणून अत्यंत अस्वस्थ झालेल्या व्यक्ती मी पाहिल्यात.

पण खरं तर चष्म्याचे इतरही कित्येक उपयोग हळूहळू ध्यानी येतात माणसाच्या. एकदा माझी मैत्रीण योगिनी राऊळ म्हणाली, “शुभा, अगं आज एक अपघात झाला स्वयंपाकघरात. डोळ्यावर चष्मा होता म्हणून वाचले  बाई.” तेव्हापासून मीही चष्मा लावून स्वयंपाक करायला लागले. तसे स्वयंपाकघरात  अपघात होतच असतात. एकदा तर माझ्या सगळ्या चेहऱ्यावर गरम तेल उडून चेहरा असा झाला होता की रामसे बंधूंच्या चित्रपटात हमखास भूमिका मिळाली असती. (ते काही झालं नाही फक्त एका खवचट सहकाऱ्याने प्रशस्तीपत्र दिलं, “तुम्ही फारच चांगला स्वैंपाक करीत असणार बघा. नाहीतर आमची बायको इतकी वर्ष स्वैंपाक करते पण असं कधी झालं नाही.) माझा एक कवीमित्र तर सांगत होता की तरुणपणात आपण विचारवंत, बुद्धीजीवी वगैरे दिसावं यासाठी तो झिरो नंबरचा चष्मा लावीत असे. तसा मला अजून एक उपयोग होत असे चष्म्याचा. माझा एक चष्मा उन्हात गेल्यावर काळा होत असे, त्यामुळे समोरच्या व्यक्तीकडे रोखून किंवा रागाने पहाता यायचं बिनधास्त. काही लोक तर एखाद्या प्रॉपसारखा हातवारे करतांना जागा भरायलाही चष्म्याचा वापर करतात. माझ्या ओळखीच्या एक बाई फक्त स्टाईलमध्ये डोक्यावर ठेवता यावा म्हणून चष्मा वापरत असाव्यात असा मला दाट संशय आहे.

पण मला फक्त लिहिण्यावाचण्यासाठी हवा होता हो चष्मा. पण आमच्या गावडे ऑप्टीशियनवाल्यांनी चोवीस तासांच्या आतच माणूस पाठवला. नवल म्हणजे त्याने उभ्या उभ्या पाच मिनिटांत चष्म्याला तार लावली नि हातात दिला म्हणजे थोरच. पण त्यामुळे आता घरातली रेंगाळलेली कामं पुन्हा रेंगाळणार ना हो!

बोलीत बोला

आज मिनज लाटकर या मैत्रिणीने फेबुवर विचारलं मित्रमंडळींना -बोलीभाषेतला कोणता शब्द तुम्हाला सुंदर वाटतो? उत्तरादाखल बरेच शब्द दिले गेले. बहुसंख्य लोकांनी माय किंवा आय, अम्मा हा शब्द सुंदर वाटल्याचं सांगितलं. पण इतरही काही शब्द समोर आले. हुबलाक, हुर्द, खल्लास, झुर्र, लका, चेडवा, झ्याक, इलुंस, मोक्कार, व्हदडाक, कुटाणा, वानकिनीची, भैताड, चिंगाट, बाजिंदी. मीही त्यात सासरमाहेरच्या काही शब्दांची भर घातली. मला सईबाई हा ओव्यांमधला मैत्रिणीसाठी वापरला जाणारा शब्द फार सुंदर वाटतो. पण काही आवडते शब्द आहेत ज्यांना काही पर्याय सापडणार नाहीत. काही सासूबाईंकडून ऐकलेले आहेत. त्या कशाची चौकशी करायची असली की म्हणत जरा इन्कूरी कराय पायजे. त्यांना अध्येमध्ये काही खायला दिलं की नको वाटे, मग म्हणत, “अतालबताल खाऊन उगाच बाताडाबातड व्हती गं” पण बराच वेळ काही खाल्लं नसलं तर म्हणायच्या, “येळंमाळं काय खाल्लं नाय बग.” टोस्टला टोच म्हणत तर ट्यूबला टूप.

कडूसं पडणं हा संध्याकाळच्या अंधुक वातावरणाला फार साजेसा शब्द वाटतो मला. माझ्या माहेरच्या मालवणीतला गजाली, पहाटेसाठी फाटफट, कालवणासाठी निस्त्याक, विळीसाठी वापरला जाणारा आडाळो, फडक्यासाठी वापरला जाणारा भानशेरा, करंजीसाठी वापरला जाणारा न्हेवरी, असे बरेच शब्द वेगळे आहेत जे आवडतात.

बोलीभाषेतल्या या शब्दांना मातीचा सुगंध आहे तसा गावी कुटल्या जाणाऱ्या मिरचीमसाल्याचा ठसका आहे आणि गावरान बोरांची आंबटतुरटगोड चव आहे. माझ्या सासूप्रमाणे इतर अनेक लोक जसं इंग्रजी शब्दाला बोलीचं वळण दिलेले इन्कूरी, टूप शब्द वापरतात, तसं इतर राज्यांमध्ये होत असावं. उदाहरणार्थ हैदराबादेत साऊंड अँड लाईट शोची तिकीटं काढायच्या खिडकीवर लिहिलं होतं – बुकिंगा कैंटर. पण काही ठिकाणी प्रादेशिक भाषाच कटाक्षाने वापरली जाते. तिथेही इंग्रजीला फार सुंदर पर्याय आढळतात. जसं गोव्यातल्या एका पाटीविषयी मी लिहिलं होतं. तिथल्या एका महाविद्यालयात Grievance Redressal Room साठी कागाळ करपाची कूड असं म्हटलं होतं. ते मी फेबुवर लिहिल्यावर आमचे मित्र प्रवीण बांदेकर यांनी लहानपणी कोकणी बातम्यात वरचेवर ऐकलेल्या एका शब्दसमुच्चयाची आठवण करुन दिली तो म्हणजे भायल्या भानगडींचो मंत्री (External Affairs Minister). या अशा पाट्या फार चित्तवेधक वाटतात. असा काही ठिकाणच्या पाट्यांवरचा मजकूर हा तर स्थानिकांची स्वभाव वैशिष्टयं सांगणारा असतो. (त्यावरुन आठवलं, मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘सावधान, समुद्र पर्यटकांनी खवळलेला आहे’ अशी पाटी होती ती मालवणी माणसाच्या तिरकस विनोदबुद्धीची साक्ष देणारी आहे. एकदा मालवणात तरीमधून सिंधुदुर्गावर जातांना सोबत अर्धा डझन लहान मुलं होती, त्यांचं पूर्ण तिकीट घ्यायला लागल्यावर बहिणीने तरीवाल्याला म्हटलं, “न्हानग्या पोरांचा अर्धा तिकीट घेवक व्हया तुमी” त्यावर तरीवाला म्हणाला, “नाय, तसा तुमचापन अर्धाच तिकीट घेवक व्हया.”) कोल्हापुरकडेही बऱ्याच पुल्लिंगी शब्दाचं नपुंसकलिंगीकरण करण्याची पद्धत आहे. एखाद्या मित्रासंबंधी कोल्हापुरकर जितक्या सहजपणे “ग्यालं त्ये, आता कुटलं यायला” म्हणेल तितक्या सहजपणे बोलणं अवघडच. कारण आपल्या अवतीभवती वावरत असलेल्या प्रमाणभाषेचं दडपण आपल्यावर असतं. तिची अशी काही व्यवस्था असते ती सहजी मोडता येत नाही. म्हणजे बोलीला तशी व्यवस्था नसते असं नाही. पण तिच्या चौकटी फार घट्ट नसाव्यात. त्यांची उघड जाणीवही बोलणाऱ्यांना नसावी.

कोणतीही बोली शिकतांना तिच्या शिव्या आणि म्हणी यायला लागल्या तर ती आपल्याला बोलता यायला लागली असं मानायला हरकत नसावी. बोलींमधल्या शिव्या आणि म्हणींना समांतर शिव्या आणि म्हणी काही प्रमाणात प्रमाणभाषेत आल्या असल्या तरी नेहमीच ते शक्य नसतं. उदाहरणार्थ मालवणी माणूस पावलोपावली आवशीचो घो म्हणतो. त्याचा अनुवाद करणं शक्य नाही. (इथे पुन्हा एक किस्सा  आठवला. माझे मोठे मेहुणे असेच दर दोनतीन वाक्यांनंतर आवशीचो घो म्हणत. एकदा ते धाकट्या बहिणीकडे गेले तर दार उघडणाऱ्या माझ्या छोट्या भाचीने जाहीर केलं, “आवशीचो घो इलो.” मग मोठाच हशा उसळला आणि तिला सांगावं लागलं, “अगो आवशीचो नाय तो मावशीचो घो.”) मालवणीतली अशीच एक म्हण म्हणजे आपलीच मोरी नि मुताक चोरी. मालवणीत अशा बऱ्याच म्हणी आहेत -कपाळार मुगुट नि खालसून नागडो, देव गेल्लो हगाक नि ह्यो गेल्लो अक्कल मागाक.

बोलीभाषेतली ही प्रादेशिक स्वभाववैशिष्ट्यं, त्यांचा इरसालपणा, ठसका, गोडवा टिकून रहाण्यासाठी पुन्हा एकदा त्यांची उजळणी करायला हवी. आता बोलींचा वापर बऱ्याच मालिका, वेबमालिकात झालाय ज्या ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्यात. त्या आधी कळायला कठीण गेलं तरी त्या माध्यमामुळे हळूहळू लोकांच्या सवयीच्या होतात. त्यांचा वापर करायला हवा. मग लोक आपसूक म्हणतील चालतंय की!

रस्ता ४

समोरच्या इमारतीजवळ एक कार येऊन थांबली. सारथी खाली उतरला. मालकीण डी मार्टकडे किराणा घ्यायला गेली. इमारतीच्या फाटकापाशी प्राणी आणि पक्ष्यांसाठी दगडी पाळ्यात पाणी भरून ठेवलं होतं, त्यातलं पाणी त्याने हाताला चोळलं, मग कारच्या काचेत आपलं प्रतिबिंब न्याहाळून पहात केसांमधून ओले हात फिरवीत केस बोटांनी विंचरले. इकडे तिकडे पहात कुणाला तरी फोन लावला. लाडे लाडे बोलत राहिला. तेवढ्यात मालकीण आली, मग निघाला.

समोरच्या खाजणातून दुचाकीवर एक तरुण आला. तोंडातला तंबाखूचा बार रस्त्यावर मोकळा केला. मग गळ्यातला रुमाल वरुन तोंडावर आणला. नाकाखाली तोंडावर खेचला आणि दुचाकी चालू करुन निघून गेला.

मग मीही आत आले.

थोड्या वेळाने लहान मुलाच्या मोठ्ठ्याने रडण्याचा आवाज आला म्हणून पुन्हा खिडकीपाशी आले. अडीच-तीन वर्षांची एक लहान मुलगी भर दुपारच्या टळटळीत उन्हात अनवाणी पायांनी रडत रडत चालली होती. तिची आई बहुधा खूप पुढे निघून गेली होती. कारण ती रस्त्याच्या टोकाला पाहत हात करीत रडत होती. डीमार्टमधून परतणाऱ्या एका आजोबांनी तिला चॉकलेट दिलं, डोक्यावर थोपटलं आणि तिची आई गेली त्या दिशेने मधून मधून मागे वळून पहात निघून गेले.

रस्ता पुन्हा शांत झाला.

दिव्याखालचा अंधार

दक्षिण आफ्रिकेतल्या प्रिटोरियात काल आमचा मुलगा तिथल्या लोकांनी जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येविरोधात पुकारलेल्या संपात सामील झाला. आमचे मित्र कुमुद कोरडे आणि राजाराम देसाई यांची मुलगी अनुजाही न्यूयॉर्क शहरातल्या आंदोलनात सामील झाली होती. त्यांच्यासारखे जगभर पसरलेले अनेक भारतीय या आंदोलनात सामील झालेत. हे आंदोलन आता जगभर पसरेल. पण भारतात मात्र त्याची साधी दखलही घेतली जात नाहीय. याचं कारण काय असावं?

जगात कुठेच नसेल अशी जातीव्यवस्था भारतात आहे. गेली कित्येक शतकं ती हटवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी प्रयत्न करुन झाले. पण लोकांच्या मनातली जात काही जात नाही. अगदी धर्मांतर केलेले लोकही धर्मांतराच्या आधी ज्या जातीत होते त्याच जातीत आजही विवाहादी व्यवहार करतात. त्यामुळे श्रेष्ठकनिष्ठतेचे जातीधर्मावर आधारित निकष समाजात अगदी मुरलेले आहेतच. पण वर्णभेदावर आधारित निकषही समाजाच्या मनात खोलवर दडलेले आहेत.

गोऱ्या रंगाचं आपल्या समाजाला प्रचंड आकर्षण. शुभ्र असलेलं सगळं काही सुंदर, पवित्र असाच आपल्याकडे समज असतो. मुलगी जन्माला आली तर लोकांना दुःख होतंच पण ती जर रंगाने सावळी असेल तर त्या दुःखात फार वाढ होते. एखादी व्यक्ती रंगाने काळीसावळी असेल तर तिला शाळेत, शेजारीपाजारी काळू म्हणून हिणवलं जातंच, पण अगदी नोकरीसाठी मुलाखतीतही दिसणं महत्त्वाचं ठरतं. (संध्या नावाच्या सावळ्या मुलींना “संध्या काळी संध्या काळी, संध्या अमुची का काळी” असं गाणं ऐकवलं जाई). त्यामुळे बऱ्याच तरुण मुली गोरेपणा देणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमागे वेड्यासारख्या लागलेल्या असतात. पश्चिम बंगालमधल्या बर्द्वानमध्ये एका प्राथमिक शाळेत यू फॉर अग्ली असं शिकवलं जातंय आणि सोबतच्या चित्रात एक काळीसावळी व्यक्ती दाखवलेली आहे. काळ्या व्यक्तींना कायम या अशा वागणुकीमुळे एक गंड निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांच्या प्रगतीतही अडथळे येतात. एखादी गोरी व्यक्ती असेल तर तिला मात्र गोरेपणाचा फायदा मिळतो. विशेषतः लग्नाळू लोकांच्या जाहिराती पाहिल्या तर त्यात मुलींच्या गोरेपणाला फार महत्त्व असतं आणि त्यापुढे जणू काही गोरी म्हणजेच सुंदर असल्यासारखं सुंदर हे विशेषणंही डकवलं जातं. त्यातून विदेशी गोरी व्यक्ती म्हणजे तर देवच. तिला दरवानही लगेच सलाम ठोकणार, पण तीच जर देशीविदेशी कृष्णवर्णीय व्यक्ती असेल तर तिला सत्राशेसाठ प्रश्न विचारुन मगच प्रवेश मिळणार. शिवाय या सगळ्यात लोकांना काहीही गैर वाटत नाही.

बुटक्या लोकांना ए छोटू, टक्कल पडलेल्या लोकांना ए टकल्या आणि तोतरं बोलणाऱ्यांना हकल्या म्हणणं, ईशान्य भारतीयांना चीनी म्हणणं आणि कृष्णवर्णीयांना कालू म्हणणं यात लोकांना काहीही फरक वाटत नाही.

वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाचा कर्णधार डॅरेल सामीला आणि श्रीलंकेच्या थिसारा परेराला सनराइज हैदराबादच्या आयपीएल चमूतले सहकारी ‘कालू’ म्हणत, तेव्हा त्याला वाटे ते त्याच्या दणकटपणासाठी त्याची स्तुती करणारं काहीतरी संबोधन असावं. पण हसन मिन्हाज या विनोदवीराला ऐकतांना त्याला अचानक कळलं की हे त्याच्या काळ्या वर्णावरुन त्याला खिजवणारं संबोधन आहे. काय वाटलं असेल त्याला तेव्हा जे संबोधन त्याने आपल्याला सहकाऱ्यांनी प्रेमाने वापरलंय असं वाटत होतं त्यामागचं सत्य कळल्यावर? 

एझुगो लॉरेन्स हा चोवीस वर्षीय नायजेरियन विद्यार्थी भारतातल्या आपल्या अनुभवाविषयी लिहितो, “चार वर्षांपूर्वी मी भारतात आलो तेव्हा एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने भारत, त्याचा इतिहास, त्याचा प्रचंड आणि वैविध्यपूर्ण विस्तार, वेगवेगळे लोक, तिथलं अन्न, भाषा, संगीत आणि चित्रपट यांचा शोध घेण्यासाठी आलो होतो. मी वर्गात शिरलो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर मोठ्ठं स्मित होतं. पण या गेल्या वर्षांमधल्या प्रत्येक दिवशी मला वर्णभेदाचा प्रत्यय येत गेला….मी पहिला हिंदी शब्द शिकलो तो म्हणजे कालू. वर्गात, रस्त्यावर, भाजीवाल्याकडे सतत हा शब्द माझ्या कानावर आदळत असतो.” तो पुढे सांगतो की अगदी घरमालकही भाडं घेतांना लांब उभा असतो, भारतीयांच्या आदरातिथ्याविषयी मी खूप ऐकलंय, पण आजवर चहा तर सोडाच पण कुणी मला पाणी घे असंही म्हटलेलं नाही. आमच्यासारख्या लोकांकडे कायम संशयाने पाहिलं जातं.

आता यावर काही लोक म्हणतील की आमचे देव पहा सगळे सावळे किंवा कृष्णवर्णीय आहेत. राम घ्या, कृष्ण घ्या, विठ्ठल घ्या. आम्ही तर त्यांची पूजा करतो. खरंय, पण मग अशी पूजा आपल्या देशाच्या लॉरेन्ससारख्या अतिथीची नाही केलीत तरी चालेल फक्त त्याला माणसासारखं वागवा ही अपेक्षा करणं चुकीचं आहे का?

ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर ही दोन हजार तेरा साली सुरु झालेली चळवळ दलित चळवळ आणि स्त्रीवादी, डाव्या चळवळी या सर्वांना  आपलीशी वाटायला हरकत नाही. कारण ती शतकानुशतके वंचित ठेवल्या गेलेल्या समाजातील व्यक्तींवरील राज्य-पुरस्कृत हिंसाचाराच्या विरोधात, दमनाच्या विरोधात आहे, ती या समाजाच्या व्यक्तींना सर्व प्रकारचा अवकाश मिळावा, त्यांना आनंदाने, सुखाने जगता यावं यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे भारतात या चळवळीला पाठिंबा द्यायला या सर्वांनी एकत्र यायला हवं, तेही लवकर.

सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे भारताबाहेरच्या भारतीयांना मात्र पाश्चात्य देशातल्या वर्णभेदांचा अनुभव आहे, ते सगळं त्यांच्या नजरेसमोर घडतंय, त्यामुळे ते त्याच्याशी जोडले जाताहेत. ती चळवळ त्यांना आपलीशी वाटतेय. काहींचं तर असंही म्हणणं आहे की भारतातही लोकांनी जातीभेदाविरोधात अशा प्रकारे एकत्र यायला हवं. पण इथल्या महान संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्यांनी लोकांना दिव्याखालचा अंधार दिसू नये याची पुरती सोय केलेली आहे.

टाळेबंदीतली नाती

आताच्या पिढीला बागुलबुवा माहीत नसेल, कारण हल्ली अशी भीती मुलांना घालणं चुकीचं आहे हे पालकांना कळायला लागलंय. पण आमच्या लहानपणी सर्रास बागुलबुवा बोकाळलेले असत. आता बऱ्याच वर्षांनी ती बागुलबुवाची भीती जाणवायला लागलीय. सोसायटीच्या फाटकापर्यंत गेलं तरी असं वाटतं काहीतरी दबा धरुन बसलंय, आत्ता येऊन आपल्याला पकडणार किंवा भॉssक करणार. एक भीती सर्वत्र पसरलीय.

त्याचा एक भाग असा आहे की आपल्या सवयीचं जे काही आजूबाजूला होतं ते तसं राहिलं नाही. खेडेगावात आयुष्य थोडं संथ असलं तरी दिवसभर जे कष्ट करायचे असतात ते पहाटेच सुरु होतात. मुंबईसारख्या शहरातही पहाटे सगळं सुरु होतं, पण त्यामागे सततचा ताण असतो. घड्याळ्याच्या काट्यावर अख्खी मुंबई धावत असते. इथे रात्रीची निरव शांतता हवीहवीशी वाटे. पण आता चोवीस तासांची शांतता अंगावर यायला लागलीय. घड्याळ्याच्या काट्यावर धावणारं शहर ही मुंबईची ओळखच हरवलीय या काळात. अजूनही काहीतरी हरवलंय. जातीय दंगली असोत, बॉम्बस्फोट असोत, २६ जुलैसारखा हाहाकार असो, अतिरेकी हल्ला असो, मुंबईकर एकमेकांना हात देत त्यातून सावरत पुन्हा धावायला लागतात. आता हे हात हातात घेणं थांबलंय. एक एक इमारत म्हणजे किल्ला झालाय. त्यात बाहेरच्या लोकांना तर जाऊं देत, त्या इमारतीत हक्काचं घर असलेल्या माणसालाही बाधित असल्याच्या किंवा याच्या/हिच्यामुळे बाधा होऊ शकेल अशा आशंकेमुळे आयुष्यभराची कमाई घालवून घेतलेल्या घरातही घेतलं जात नाहीय. एक बाई मेधाताई पाटकरांना सांगत होत्या की त्यांच्या फाटकाजवळून आपल्या घरी परतू पहाणारे रोजंदारीवर जगणारे लोक, मजूर पाहून त्यांना मदत करावीशी वाटत असली तरी सोसायटीतले लोक, रखवालदार त्यांना तसं करु देणार नाहीत हे माहीत असल्याने त्या हतबल झाल्याहेत. हे घरी जाऊ पहाणारे मजूर ना नात्याचे ना गोताचे, पण तरीही त्या बाईंना ते आपले वाटताहेत, तर दुसरीकडे एका पत्रकार मैत्रिणीने सांगितलेला अनुभव असा की एका कुटुंबातले वडील कोरोनाग्रस्त होऊन गेले तर पोलीसांनी सांगूनही मुलं अंत्यदर्शनासाठी घराबाहेर येईनात. कहर म्हणजे नंतर त्यांनी त्या पत्रकार मैत्रिणीला सांगितलं की ती रात्र त्यांनी तळमळत काढली. तेव्हा ती म्हणाली की साहजिक आहे असा प्रसंग ओढवल्यावर होतं असं, बाहेर पडाल त्यातून हळुहळू. तर ते म्हणे की तुम्ही समजताय तसं नाही, इथं विलगीकरण कक्षात पंखा नाही म्हणून तळमळत होतो. अगदी अलीकडे एका आईने कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने अनेक मैल प्रवास करुन घरी आलेला मुलगा, सून आणि नातू यांना प्रवेश नाकारल्याची घटना ताजी आहे. तसंच ज्या आरोग्यसेवकांसाठी दिवे लावणं, थाळ्या, घंटा वाजवणं, फुलं उधळणं केलं गेलं त्यांनाच घरातून बाहेर काढणं, वाळीत टाकणं हेही अनुभवाला आलंय.

दुसरीकडे परदेशात अडकलेली मुलं आईबापांच्या अधिक जवळ आलीत. नव्या तंत्रज्ञानामुळे एकमेकांना थेट पहात बोलणं शक्य होतंय. मग मुंबईतले आईवडील, आंध्र प्रदेश किंवा केरळमधली बहीण आणि जर्मनीतला भाऊ एकमेकांच्या वेळा जुळवून एकत्र गप्पा मारताहेत, खेळ खेळताहेत किंवा चहापान करताहेत. आजूबाजूच्या परिस्थितीमुळे मनाला घेरुन टाकणारी भीती, एकटेपणा या सगळ्यात अशा भेटींनी धीर मिळतो. शिवाय लांब असलेल्या आईवडीलांसाठी काही करु शकत नाही असं मुलांना आणि मुलांसाठी काही करु शकत नाही असं आईबापांना वाटतंय. अशा भेटींमुळे आपली माणसं डोळ्यांना दिसल्यावर ती सुरक्षित आहेत हे कळल्यावर तो थोडा कमी होतो. त्यामुळे अशा जास्त अंतरावरच्या नात्यांमध्ये कधी नव्हे इतके मानसिक पातळीवर सूर जुळत आलेत आणि नाती घट्ट होताहेत.

चौकोनी कुटुंबात नवराबायको, मुलं आता चोवीस तास एकत्र आहेत, तिथेही टोकाची दृश्य दिसताहेत. कधी नव्हे ते आईबापांशी खेळायला मिळाल्याने लहान मुलं आनंदी झालीत, त्या मुलांना आनंदी ठेवण्यासाठी आईबाप वेगवेगळे खेळ शोधून काढताहेत, कुठे गोष्टी सांगण्याची आमच्या लहानपणातली परंपरा परतून आलीय. कुठे मुलं घरातली छोटी छोटी कामं, स्वयंपाक करायला शिकताहेत. किंवा खरं तर अशी परिस्थिती भविष्यात पुन्हा ओढवेल या भीतीने पालक मुलांना ‘आत्मनिर्भर’ करु पहाताहेत.गावी आईबापांसोबत गेलेली मुलं गाईगुरांना चारा घालणं, वाळवणं राखणं यासारखी एरवी त्यांना करायला मिळत नाही अशी कामं करताहेत. प्रश्न निर्माण झालाय तो पौगंडावस्थेतल्या मुलांचा. मित्रमैत्रिणींसोबत धम्माल करता येत नाही, आईवडील घरात असल्याने लैंगिक कुतूहल भागविण्यासाठी पॉर्न पहाता येत नाहीय. परीक्षा लांबत चालल्याने सततच्या अभ्यासाचा कंटाळा आलाय. या सर्वांमुळे मुलं वैतागलीत आणि तो राग आईवडीलांवर काढला जातोय. मुलांच्या बापांचीही अशीच पंचाईत झालीय. भारतीय पुरुषांना अशीही घरात रहायची सर्वसाधारणपणे फारशी सवय नसते. आता ते किराणा, भाज्या आणायच्या निमित्ताने बाहेर जाऊ पहातात म्हणा पण ते काही खरं नाही. काहींना आपल्या बायकांना किती काम पडतं याचा साक्षात्कार झालाय आणि ते ‘मदत’ करु पहातात. अर्थात काही ठिकाणी ही मदत सामाजिक माध्यमांवरच्या दाखवेगिरीपुरतीही असू शकते, पण त्या निमित्ताने का होईना बायकांना किती काम पडतं याची एकूणच कुटुंबांना जाणीव तरी व्हायला लागलीय. असं असलं तरी एकूण असुरक्षितता, नोकरी गमावण्याची भीती, आर्थिक ताण हे सगळं वाढीला लागलंय.  शिवाय मुंबईतल्या छोट्या घरात सगळी माणसं एकाच वेळी एकत्र कोंडली गेली की हातपाय हलवणंही अशक्य. या सगळ्याचा एकत्रित परिणाम तर होतोच. पण आधीपासूनच आक्रमक, रागीट असलेल्या, बोलता बोलता हाणामारीवर उतरणाऱ्या व्यक्तींवर त्याचा अधिक परिणाम होतोय आणि यातून घरगुती हिंसाचार टाळेबंदीच्या काळात वाढीला लागलेत. या सगळ्याला बळी पडणाऱ्या व्यक्तीला एरवी जे संरक्षण किंवा मदत मिळू शकते ती आता सहजासहजी मिळणं शक्य नाही याची जाणीव असल्याने धरबंदही रहात नाही.

धारावीसारख्या किंवा गिरणगावासारख्या इतर भागात घरं छोटी असली तरी एकाच घरात अनेक माणसं रहातात. त्यात कुटुंबातली माणसंच नव्हे तर दूरच्या नात्यातली, गावाकडच्या ओळखीची अशी माणसंही असतात. पूर्वी ती कामानिमित्त, शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या वेळी बाहेर जात त्यामुळे वेगवेगळ्या वेळी घरी असत. रात्री जागेची अडचण होऊ नये म्हणून त्यातली काही बाहेर दुकानाच्या फळीवर, समाजकल्याण केंद्र, मंदिर अथवा तत्सम ठिकाणी किंवा पदपथावर झोपायला जात. आता तेही शक्य नाही. त्यामुळे सगळी एकत्र कोंबलेली. परिणामी उरलासुरला खाजगी अवकाशही नाहीसा झालाय. याआधी कुटुंबातले नसले तरी सोबत रहाणाऱ्या इतरांना कुटुंबातल्यासारखंच वागवलं जाई. आता त्यांची अडचण व्हायला लागली. घरातल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेशी साधनं हाती नाहीत. मोबाईल रिचार्ज करायला आईबापांकडे पैसे नाहीत, मुलांना पैसे कमावण्यासाठी, निदान आपला खर्च भागवण्यासाठी पूर्वी करता येत असे तसं काम करता येत नाही, त्यामुळे आपण इतर मुलांच्या तुलनेत कमी पडतोय असं वाटून त्यांना नैराश्य येत चाललंय. त्याचा परिणाम म्हणून आईबापांशी तणातणी वाढलीय.

या सगळ्या वेगवेगळ्या छटा नात्यांना दिसताहेत याचं कारण काय असावं? नाती तर तीच आहेत जी टाळेबंदीआधी होती. मग असे बदल का घडताहेत? टाळेबंदीच्या काळात माणसांना स्वतःविषयी भीती आहे, तशीच इतरांविषयीही. आत्तापर्यंत जे जीवाभावाचे होते, ते जीवाच्या भीतीने आता ‘इतर’ झालेत. पूर्वीच्या नातेसंबंधांची लय या सगळ्यामुळे जुळत नाहीय. नवं निवडता येत नाही.विस्कटणाऱ्या शक्तींची ताकद वाढती आहे आणि संबंधांची नवी रूपे दिसत नाहीत. आता खरं तर हे सगळं लोक प्रेमसंबंधात It’s complicated असं जाहीर करतात, तसं गुंतागुंतीचं होत चाललंय. अशा वेळी नाती टिकवायला जगण्याच्या शैलीत, मानसिकतेत बदलाची आवश्यकता आहे. जिथे शक्य असेल तिथे एकाच घरात इतरांना शारीरिक आणि मानसिक अवकाश देण्याची आवश्यकता आहे. शारीरिक अवकाश एक वेळ परवडत असेल तर आखून देता येईल, पण मानसिक अवकाशाचं काय? असाही स्त्रिया आणि लहान मुलं यांना वेगळा अवकाश लागतो, तो देण्याची गरज आहे हे आपल्या देशात सहजपणे मान्य केलं जात नाही. आता तो विशेषत्वाने द्यायची गरज आहे. पण दिला जाईल का? या सर्वस्वी अनोळखी रोगाच्या संसर्गाच्या भीतीने इतकं ग्रासलं आहे की आपल्याला इतरांचा संसर्ग होऊ नये, आणि आपला इतरांना होऊ नये अशा दोन्ही प्रकारे काळजी घेऊन संबंध ठेवणं कठीण जातं आहे. मुळात या रोगाची भयावह अशी धास्ती खोलवर रुजली आहे, ती काढून टाकण्याची गरज आहे. रोग जरी भयानक असला तरी योग्य ती काळजी घेऊन संबंध राखता येतील अशी काही घडी बसवली गेली पाहिजे. भारतीय नातेसंबंधात स्पर्शाला आधीच्या पिढीत फारसं महत्त्व नव्हतं. पण आता हात मिळवणं, आलिंगन देणं हे सहज होत चाललं होतं. या परिस्थितीत ते शक्य नसलं तरी त्यातून विनोदबुद्धी शाबूत ठेवून काही उपाय शोधले जाताहेत ते खरंच फार ह्रद्य वाटतात. पण स्पर्शातल्या आश्वासकतेला, आधाराला, ऊबेला पर्याय शोधला पाहिजे.  तो पर्याय आहे मानसिक पातळीवर जोडले जाण्याचा. हे आव्हान फार अवघड नाही, फक्त त्यासाठी दोन पावलं आपल्या बाजूने टाकण्याची गरज आहे.