गोष्ट तिसरी

गोष्ट तिसरी

ही गोष्टही वरच्या गोष्टीतल्या पेक्षाही खुळचट असलेल्या बाईची आहे. पुन्हा एक बाई होती, तिला नवरा होता. (आता हे तुमच्या सवयीचं आणि ओळखीचं झालं असेल). त्या बाईचं नाव ठेवू शांता. (कारण ही गोष्ट सांगणाऱ्या माझ्या आजीचं नावही तेच होतं, शांताबाई कदम) तर या शांताबाईला एक सासूही होती. त्या सासूवर तिचं फार म्हणजे फार म्हणजे फारच प्रेम होते. लग्न झालं तेव्हा तिला काहीच काम करता येत नव्हतं. सगळं सासूनेच शिकवलं होतं. त्यामुळे तिला सगळं सासूला विचारून करायची सवय होती. अगदी साध्या साध्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीही ती सासूला विचारून करीत असे. पण सासू काही तिच्या जन्माला पुरणार नव्हती. ती एक दिवस म्हातारपणामुळे मेली. शांताने रडून रडून गोंधळ घातला. ती सासूला नेऊच देईना. आता काय करायचं? शेवटी तिच्या नवऱ्याने थेट आपल्या आईसारखी एक बाहुली तिला दिली आणि म्हटलं, “ही घे तुझी सासू.” हे ऐकून शांता शांत झाली. ती बाहुली छातीशी कवटाळून ती घरात गेली. मग दुसऱ्या दिवसापासून एक नवा प्रकार सुरू झाला. त्या बाहुलीला तिने आपली सासू बसत असे तिथे बसवलं. मग ती सासूला जे विचारीत असे ते ते बाहुलीला विचारू लागली. “सासूबाई, सासूबाई न्याहारीला काय करू? थालीपीठ करू का?” “सासूबाई, सासूबाई मीठ कीती घालू? इतकं पुरे का?” आता बाहुली कशी बोलणार. पण शांता स्वतःच म्हणे, “थालीपीठ नको बरं. पानगी कर.” “हं. इतकं पुरे.”  सकाळपासून रात्रीपर्यंत अस्सं चालत असे. नवऱ्याने हे बघितलं बघितलं नि एक दिवस या खुळचट बायकोबरोबर संसार कसा करायचा म्हणून तिला घराबाहेर काढलं. (सगळे नवरे असे बायकांना घराबाहेर काढीत की काय!). शांताने नवऱ्याने आतून बंद केलेल्या दारावर थपडा मारल्या, विनंत्या केल्या पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपल्या माहेरी जायला ती निघाली. रात्र पडत आली होती. चोहीकडे अंधार दाटून आला होता. शांता वाट चुकली. चुकून जंगलात शिरली. तिला काही कळेना. जंगली जनावरांचे आवाज ऐकून ती घाबरली आणि ‘सासूबाई’ला काखोटीला मारून झाडावर चढली. रात्र झाली. योगायोगाने ती ज्या झाडावर बसली होती. त्या झाडाखाली काही चोर चोरलेला माल वाटून घ्यायला बसले होते. त्यांची वाटणी चालली होती, तितक्यात शांताबाईला झोप लागल्याने तिच्या हातून ‘सासूबाई’ निसटून खाली पडली. मग काय! ती दचकून जागी झाली, सासूबाई हातात नाही म्हटल्यावर घाबरून मोठमोठ्याने रडायला लागली. सासूबाई, सासूबाई म्हणून ओरडू लागली. एवढ्या घनदाट जंगलात कुठून बाईचा आवाज येणार. तेव्हा हे नक्कीच भूत आहे असं वाटून ते आपला माल तिथेच टाकून पळत सुटले. सकाळी शांताबाई झाडावरून खाली उतरली. तिची ‘सासूबाई’ तर सापडलीच पण बरेचसे दागदागिने, पैसाअडका सापडला. तशी खुळचट असली तरी तिला या गोष्टींचं महत्त्व माहीत होतं. ते सगळं तिने एका गाठोड्यात गोळा करून सासूसोबत ते गाठोडंही काखोटीला मारलं आणि सासरचं घर गाठलं. पण नवरा काही घरात घेईना. मग तिने सांगितलं, “अहो, पहा तरी मी केवढं धन आणलंय ते!” ते ऐकताच नवऱ्याने दार उघडलं आणि तिला घरात घेतलं. ती सुखाने नांदू लागली. पण गोष्ट एवढ्यावर संपली का? तर नाही. शांताबाईच्या नवऱ्याला हाव सुटली. त्याने आणखी आठपंधरा दिवसांनी पुन्हा शांताबाईला त्या जंगलात सासूबाईला घेऊन पुन्हा पाठवलं आणि त्या झाडावर बसवलं. रात्र झाली. पुन्हा पेंग आल्यावर सासूबाई खाली पडली. दचकून जागी होऊन शांताबाई किंचाळली. पण या वेळी पौर्णिमा होती. चोरांनी ठरवलं की तसा काळोख नाही, पहाटेपर्यंत थांबून पाहू काय होतं ते. शांताबाई खाली उतरली. आधी सासूबाईला घेतलं कडेवर, मग चोरांनी मुद्दाम तिथे सोडून दिलेलं धन गोळा करून ती जाऊ लागल्यावर चोरांनी तिला पकडलं. तिचं नाक कान कापून सोडून दिलं. आता नाककान कापलेल्या विद्रूप आणि पैसेही न आणू शकणाऱ्या बायकोशी कसा संसार करायचा म्हणून नवऱ्याने काही तिला घरात घेतलं नाही. तिचं पुढे काय झालं ते आजी कधी सांगत नसे. ती स्वतः विधवा आणि एक मुलगी पदरात असल्याने सासरच्यांचा आधार गमावलेली बाई. तिला अशा बायकांचं पुढे काय होतं ते ठाऊक असल्याने तिने कधीच सांगितलं नसावं. किंवा कदाचित तिच्या लेखीही ही एक मूर्ख बाई असल्याने नसेल सांगितलं. पण ही गोष्ट ऐकून लहानपणीही मला कधी मजा वाटली नाही. तेव्हाही मला वाटे की हिचं किंवा सखूबाईचं काय झालं असेल पुढे.

खापरपणजीच्या गोष्टी -२

गोष्ट दुसरी

एका बाईच्या नवऱ्याला कोकणात करतात तसे ज्यांना आपण मालवणी वडे म्हणतो ते वडे फार आवडत. नवऱ्यासाठी ते वडे करायचं या सखूबाईने ठरवलं. ते कसे करतात ते तर माहीत नाही, म्हणून ती शेजारच्या म्हाताऱ्या विधवा आजींकडे गेली. आजींनी सगळी कृती प्रेमाने सांगितली. पण या सखूबाईला एक वाईट खोड होती. कुणी काही समजावून सांगू लागलं की ती म्हणायची “ते मला माहीताय.” आजींनी तांदूळ कसे धुवून घ्यायचे, डाळ कशी धुवून घ्यायची, मग कसे वाळवून घेऊन त्यात धणे, जिरे, बडीशेप, मेथी घालायची असं सगळं सांगून पीठ कसं मळायचं इथवर संगळं सांगितलं. मधूनमधून ही सखूबाई म्हणत राहिली. “ते मला माहीताय.”. तेव्हा आजींनी विचार केला हिला पुढचं सगळं माहीत असेलच. त्यामुळे वडे थापून तळायचे इतकं सांगून त्या आपल्या कामाला लागल्या. सखूबाई घरी आली. निगुतीने पीठ तयार केलं. मळलं. वडे थापले आणि चुलीवर कढई ठेवली. कढईत तेल टाकलं. मग त्यात वडे सोडले तर वडे काही फुगेनात. ती विचार करू लागली. मग तिच्या मनात आलं की शेजारच्या आजी बोडक्या आहेत ना ( विधवा बायकांच्या डोक्यावरचे केस भादरायची पद्धत असल्याने आजींच्या डोक्यावर केस नव्हते) म्हणून त्यांचे वडे फुगतात. मग तिने एक कातर घेतली आणि आपले केस जमतील तसे कापून टाकले. मग आजींसारखे लाल आलवणाचे लुगडे नेसून पदर घेतला. इतक्या वेळात तेल अगदी चांगलंच गरम झालं आणि वडे गरगरून फुगू लागले. इतक्यात सखूबाईचा नवरा आला. त्याला काही कळेना बायको कुठे गेली. सखूबाईची आईही विधवा होती. पाटावर वडे तळत बसलेल्या सखूबाईला सासू समजून तो विचारू लागला, “मामी, तुम्ही कधी आलात?” (मामाच्या मुलीशी लग्न करायची प्रथा असल्याने तेव्हा जावई सासूसासऱ्यांना मामामामी म्हणत असे आणि बायका आपल्या सासूला आत्याबाई म्हणत). सखूबाई लाजून मुरका मारून म्हणू लागली, “असं काय ते? मी नाही का ती?” आपली सासू इतके मुरके का मारते हे न कळलेल्या जावयाला सखूबाईने पदर दूर करून चेहरा दाखवला तेव्हा त्याला चक्कर यायची बाकी राहिली. “अगं, मी जिवंत असतांना तू हे केलंसच कसं?” मग सखूबाईने सगळी कथा सांगितली. इतक्या मूर्ख बायकोबरोबर कसा काय संसार करायचा या विचाराने आपल्यासाठी इतक्या प्रेमाने वडे करणाऱ्या बायकोला त्याने घराबाहेर काढली. ( त्याकाळीच नवरे असं करीत असं नाही अजूनही करीत असतील कदाचित ) पण सखूबाई खरंच मूर्ख होती की बायकांनी शिक्षण घेऊ नये, चूल आणि मूल सांभाळावी या पितृसत्ताक मानसिकतेची बळी होती?

खापरपणजीच्या गोष्टी

मी तर सासरमाहेरच्या जवळपास वीसएक नातवंडाची आजी झाले. नातवंडांना गोष्टीही सांगते त्यांनी आग्रह केला की. मग मला हटकून माझ्या आजीची- आईच्या आईची आठवण येते. वडीलांची आई हयात नव्हती आणि ही आजी आमच्या घरी रहात असे. तेव्हा आम्ही तिच्याकडे गोष्ट सांगायचा हट्ट करीत असू. पण आजी ज्या गोष्टी सांगे त्या पृथ्वीच्या पाठीवरल्या कुठल्या लहान मुलांना कळत असतील किंवा कळल्या तर आवडत असतील असा प्रश्न आज कुणालाही पडू शकेल –अपवाद फक्त बोलक्या शंखोबाच्या गोष्टीचा. कारण आज मुलांना सांगायच्या गोष्टींविषयीच्या कल्पना बदलत चालल्या आहेत. पण त्या गोष्टी आपल्या परीने मनोरंजकच होत्या म्हणायच्या. तर या माझ्या आजीच्या म्हणजे आताच्या लहान मुलांच्यासाठी खापरपणजीच्या गोष्टी.

गोष्ट पहिली

एक बाई नेहमी आपल्या नवऱ्याला सांगे, “तुमी घरात नसलास की माका गमत नाय. अन्नाचो योक कण जात नाय की य़ोक घ्वाट पानी पिवक व्हत नाय.” अन् नवरा तर पडला व्यापारी. त्याला कामानिमित्ताने नेहमीच बाहेर जावं लागे. त्याला आपल्या बायकोचं आपल्यावर इतकं प्रेम आहे हे पाहून फार अभिमान वाटे. पण एकदा सहज त्याच्या मनात आलं की बघू या तरी कशी आपली बायको आपण नसतांना उपाशीतापाशी रहाते ते. म्हणून त्याने काय केलं तर बायकोला खोटंच सांगितलं की आज कामासाठी परगावी जायचंय. पण प्रत्यक्षात तो घराबाहेर पडून दूर जाऊन परत माघारी वळला आणि घराच्या मागे बायको दिसेल अशा बेताने लपून राहिला.

इकडे नवरा बाहेर गेल्याची खात्री करून झाल्यावर बायको चांगली पाय पसरून बसली. म्हणाली, “घोव गेलो गावा काय खाशी जीवा?” मग तिनं कोपऱ्यात ठेवलेला चांगला रसाने भरलेला ऊस घेतला. चांगला निगुतीने सोलला. मग निवांतपणे बसून खाल्ला. थोड्या वेळाने पुन्हा तिला प्रश्न पडला, “घोव गेलो गावा काय खाशी जीवा?” मग तिनं चांगला भलामोठ्ठा नारळ घेतला, तो खवून काढला. त्यात गूळ, वेलची घालून त्याचं सारण केलं. आणि मग घावन काढायला तांदळाचं पीठ भिजवलं, मग एक घावन बीडाच्या तव्यावर टाकला, त्याच्या अर्ध्या भागावर सारण टाकून दुमडला, उरलेल्या भागावर घावनाचं पीठ पसरलं, तो अर्धा भागातला घावन होत आल्यावर त्यावर सारण टाकून तो दुमडला. पुन्हा उरलेल्या अर्ध्या भागावर घावनाचं पीठ पसरलं. त्यावर सारण टाकलं. असं करीत करीत सात कप्प्यांचा भलाथोरला घावन केला. केळीच्या पानावर वाढून घेतला. त्यावर तूप सोडलं. चवीचवीनं सगळा घावन खाल्ला. थोड्या वेळाने पुन्हा तिला प्रश्न पडला, “घोव गेलो गावा काय खाशी जीवा?” मग तिने पुन्हा एक नारळ खवला, त्याचं दूध काढलं, पुन्हा गूळ चिरला. तांदूळ धुवून शिजवून त्यात नारळाचं दूध, गूळ घालून खीर केली. या खिरीला कोकणात सोजी म्हणतात. मग शांतपणे वाटीत घेऊन प्यायच्या भानगडीत न पडता पातेल्याला तोंड लावून ती खीर पिऊन टाकली. मग तिचा जीव थंड झाला. मग तिने छानपैकी झोप काढली. इकडे नवरा मधल्या काळात आपली लपण्याची जागा सोडून वळसा घालून बाहेरून आल्यासारखे दाखवीत घरासमोर येऊन दार ठोठावू लागला. बायको लगबगीने उठली. नवऱ्याला समोर पाहून म्हणाली, “बरां झाला लवकर इलास. तुमका म्हायत आसा ना तुमी घरात नसलास का माका गमत नाय. अन्नाचो येक घास जात नाय का पान्याचो येक घ्वाट जात नाय. पण माका येक सांगा तुमचा काम इतक्या लवकर कसा झाला?”  नवरा म्हणाला, “अगो काय सांगू तुका. मी गावाच्या वढ्याजवळ गेलंय नि समोरून येदो मोठ्ठो नाग इलो. केवडो? ह्या कोपऱ्यात तो ऊस होतो का नाय तेवडो मोठ्ठो. तेचो फडो केवडो मोठो म्हायत आसा तुका? अगो आपलो सात काप्याचो घावन असता मा तेवडो मोठो तेचो फडो काय समाजलां?” बायको मनातून घाबरली पण वरवर काळजी दाखवित म्हणाली, “अगे बाय! काय केलास मगे?” “अगो तुजा माज्यावर प्रेम आसा, मी नसलंय तर तू उपाशीतापाशी रंवतस मा, म्हणान् देवानंच माका वाचवल्यान. तो नाग माका बघून असो आपल्या बिळात पळालो, आपली सोजी कशी पोटात जाता लप लप लप लप अगदी तस्सो.” आता मात्र बायको पुरती समजून चुकली आणि पुन्हा तिने नवऱ्याला त्याच्यावर आपले प्रेम असल्याने तो नसतांना आपण काही खातपित नाही अशा थापा मारणं बंद केलं.

आता ही गोष्ट लहानपणी ऐकणाऱ्या मुलग्यांना आपल्या बायकोच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. तिने सांगितलेल्या गोष्टींची तिच्यावर पाळत ठेवून खात्री करून घ्यावी असंच मोठेपणी वाटलं तर त्यात नवल नाही. त्या काळी आपला संसार हेच बाईचं सर्वस्व असे. आणि संसारातलं आपलं स्थान टिकवण्यासाठी आपलं मन मारून जगणं किंवा खोटं बोलणं इतकेच पर्याय त्यांच्याकडे असावेत हे कुणाच्या ध्यानी कसं येणार.

भटकंती दक्षिणदेशीची

जानेवारी २०१७ मध्ये थोडी जास्तच भटकंती झाली. सुरूवात वाशी, शांतीवनसारख्या जवळच्या ठिकाणापासून झाली. मग पुढे हैदराबाद, पालाघाट, कोय्यम्बतुर, कोल्हापुर, राधानगरी, दाजीपुर करत मग उलटं वळण घेत कर्नाटकाकडे विजापुर, अलमत्ती, कुडलसंगम, ऐहोळे, पट्टदकल्ल, बदामी करत करत गोकाकमार्गे कोल्हापुरला आणि तिथून घरी परत.

मलाच काय माझ्या कुटुंबात सर्वांनाच भटकंती आवडते. माझी सर्वात आवडती गोष्ट अर्थात काहीतरी बहाण्याने खिडकी पटकावून बाहेरचा निसर्ग डोळाभर न्याहाळणं. कधी कधी खिडकीचाही अडसर वाटू लागतो. निसर्गाचं बदलतं रूप पहायला मजा येते. पालाघाटला तर तेव्हा वसंत बहरला होता. झाडांना आंबे, फणस लटकले होते. बहावा फुलला होता. कोल्हापुरहून दाजीपुरकडे जातांना कोकणात गेल्याचा भास होतो. काही ठिकाणी उन्हाळी भात लावलं होतं. तर कर्नाटककडे सरकतांना डोंगररांगा दिसेनाशा होत मैलोंन गणती शेतं दिसायला लागली. जसंजसं विजापुरकडे जाऊ लागलो सगळं रूक्ष दिसायला लागलं. पुन्हा अलमत्ती, कुडलसंगमकडे जातांना हिरवाई लागली. कुडलसंगमला तर काही ठिकाणी कपाशीची लागवड दिसली. पुन्हा ऐहोळेच्या दिशेने निघाल्यावर ते अंगावर येणारे उभेआडवे दगड दिसायला लागले. बदामीकडून गोकाककडे आल्यावर पुन्हा ओळखीचे डोंगर दुरून दिसू लागले. पिकं, निसर्ग पुन्हा वेगळे दिसू लागले.

भटकंतीत कधी कधी खाण्यापिण्याबाबत समोर काय वाढून येईल याची भीती नाही म्हटलं तरी असतेच. आम्ही तसे जाऊ त्या गांवचे होत तिथले पदार्थ प्रेमाने खातो. बरीच भटकंती दक्षिणेत झाल्याने खाद्यपदार्थ ओळखीचे, सवयीचे, आवडीचे आणि सारखेच होते. पण चवीत प्रत्येक ठिकाणी बदल होत होते. हैदराबादेत तेच पदार्थ अधिक तिखट होते. तिथल्या वेगवेगळ्या चटण्या मात्र फार बहारदार होत्या. डॉ.प्रकासम्मा यांच्या घरी उडदाच्या डाळीचे लाडू खाल्ले नि घरी आल्यासारखंच वाटलं. थेट अस्सेच लाडू सासू आणि मी मधल्या वेळचं खाणं म्हणून करीत असू त्याची आठवण झाली. केरळात तेच पदार्थ सौम्य मसाल्यांमध्ये केलेले होते. तिथे भाज्यांवर भर होता. कर्नाटकातलं सांबार आपल्या डाळीशी साम्य राखून होतं. विजापुरला शेंगा चटणी आणि वरण मिळालं (आणि त्याला ते शेंगा चटणी आणि वरणच म्हणत होते.) बदामीला आमच्या चक्रधारी बंधूंनी मसालाभात घेतला तर तो शेंगदाणे, भाजलेल्या डाळ्या टाकलेला फोडणीचा भात निघाला. कोल्हापुरात पिठल्याचे वेगवेगळे प्रकार तर होतेच पण सर्वत्र पाट्या लावलेल्या होत्या “अख्खा मसुर मिळेल”. काय प्रकार आहे ते पाहिलं तर अख्ख्या मसुराची दबदबीत उसळ होती. छान लागत होती. राहुल कोसंबीच्या घरी बऱ्याच वर्षांनंतर हरभऱ्याच्या पाल्याची भाजी आणि पावटे घातलेली जरा वेगळी फणसाची भाजी खायला मिळाली.

भाषेच्या गंमतीजंमती तर विचारूच नका. कोल्हापुरात राहुलचं “मी गाडी चालवायलोय” किंवा गजानन अपिनेचं थोडं सीमेवरचं “मी वाचलो ते पुस्तक सर” असं कोल्हापुरी ऐकायला मजा आली. स्थानिक भाषा जागतिक (?) भाषेला आपलं वळण देण्याचा कसा  प्रयत्न करते त्याचा हैदराबादेत छान प्रत्यय आला. गोवलकोंडाला जातांना पाटी दिसली –‘बुकिंगा कैंटर’ . पालाघाटला लग्नसमारंभात सगळे सापडा, सापडा करीत खायला खेचून नेत होते. चंदर म्हणे कशासाठी सापडवलं त्यानी तुला. त्याला म्हटलं,”काही नाही. सापडा म्हणजे खायला चल असं म्हणायला कुणीतरी सापडल्याचा आनंद असावा.” पट्टदकल्लला न्याहारीला गेलो. काय़ आहे खायला म्हणून चौकशी केली तर कळलं च्यावच्याव भात. आम्ही मनात म्हटलं कुठल्यातरी चिनी पदार्थाचा कानडी अवतार दिसतोय. तर ताटात काय आलं माहीताय? उप्पीट आणि शिरा. अशी धम्माल. तर अशा अनेक गंमतीजमती सवडीनुसार सांगायच्याच या भटकंतीबद्दल. सध्या एव्हढंच.

शिक्षणाची परीक्षा

अलीकडेच प्रथम या स्वयंसेवी संघटनेतर्फे एक अहवाल प्रसिद्ध झाला. तो वाचल्यावर शिक्षणव्यवस्थेविषयी बऱ्याच शंका उपस्थित होतात. उदाहरणार्थ त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशातील तिसऱ्या इयत्तेतील ६०% मुलं अक्षरं ओळखू शकत नाहीत. काही राज्यांमधील पाचव्या इयत्तेतील ५०% मुलं दुसरीचं पाठ्यपुस्तक वाचू शकता नाहीत. आठवीतल्या मुलांना साधी साधी बेरीज वजाबाकीची गणितं सोडवता येत नाहीत. हे सगळं फार धक्कादायक आहे. आमच्या लहानपणी तर स्वराज्याला जेमतेम एक तप झालेलं असूनही परिस्थिती फार चांगली होती. सरकारी शाळामध्ये , नगरपालिकेच्या शाळांमध्ये चांगले, उत्साही शिक्षक होते. ते मुलांना प्रेमाने शिकवत. माझा नवरा जिथे आजही एस्.टी. जात नाही अशा खेड्यात वाढला. पण तिथेही त्याला चांगले शिक्षक मिळाले. त्यांनी त्याला शिक्षणाची, वाचनाची गोडी लावली. आमच्या मुंबईतल्या नगरपालिकेच्या शाळेत तर चक्क एका लाकडी पेटाऱ्यात पुस्तकं ठेवलेली असत आणि आम्ही हवं ते पुस्तक घेऊन वाचत असू. विद्यार्थीच नव्हे तर आमच्या कामगार भागातल्या गिरणी कामगारांनाही शिकायची सोय होती. नोकरी करून शिकणाऱ्यांसाठी रात्रशाळा होत्या. महाविद्यालयांची सकाळची आणि संध्याकाळची सत्रं असत जिथे नोकरी करणारे विद्यार्थी शिकत. पण तेव्हा शिक्षणासाठी अनुकूल वातावरण होतं, जे आता नाहीय. आताचे राजकारणी शिक्षणसम्राट आहेत. त्यांच्या उच्चभ्रू संस्थांमुळे शिक्षणव्यवस्थेवर परिणाम होऊ लागलाय. दुसरीकडे एकेकाळी मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह धरणाऱ्या पालकांची मानसिकता बदलली आहे आणि इंग्रजी माध्यमातून दिलं जाणारं शिक्षण म्हणजेच चांगलं शिक्षण अशी जी धारणा होत चालली आहे त्याला कनिष्ठ आर्थिक वर्गातले पालकही बळी पडायला लागलेत आणि झेपत नसतांनाही मुलांना इंग्रजी माध्यमांच्या महागड्या शाळांमध्ये मुलांना शिकवताहेत. हे आईबाप स्वतः इंग्रजी माध्यमात न शिकलेले किंवा अजिबात न शिकलेले असल्याने मुलांना शिकतांना पालकांची मदत होत नाही आणि शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर कामं वाढल्याने शिकवायला वेळ नाही. या सगळ्याचा परिणाम मात्र बिचाऱ्या मुलांवर होतोय. त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवायला फक्त माध्यान्ह भोजन, दप्तरं, टॅब हे सगळे देऊन उपयोग नाही तर या समस्येच्या मूळाशी जाण्याची गरज आहे.

वाचन : एक अवलोकन

माझ्या एका मैत्रिणीला वाचनाची आवड आहे. “तुझ्याकडे काही पुस्तकं असतील तर दे ना वाचायला.” असा धोशा तिने लावलेला असतो. पण आपण तिला पुस्तकं काढून द्यायला लागलो की काय होतं पहा – “हे असलं जड वैचारिक वगैरे नको गंS, कंटाळा येतो वाचायला”, “हा लेखक मला नाही आवडत, वाचलंय मी त्याचं ते अमकंतमकं.”, “कवितांमधलं मला काही समजत नाही गं, हां पाडगांवकर असतील तर चालेल.” “हा कथासंग्रह बरा वाटतोय, हा दे मला, कादंबऱ्या वाचण्यात वेळ फार जातो. (पानांची संख्या तेव्हढीच असते तिने नको म्हटलेल्या कादंबरीची) कथा बऱ्या पडतात, वाटेल तेव्हा वाचायची, नको तेव्हा पुस्तक बाजूला सारलं तरी काही बिघडत नाही.” “तुझ्याकडे त्या तमक्या बाईचं आत्मचरित्र आहे का गं?”, “हे काय? अन्न हे अपूर्ण ब्रह्म? रेसिपिज आहेत का गं? (चाळून) पण रेसिपीज नीट दिल्या नाहीत वाटतं, आणि हे असले कसले पदार्थ? जाऊं दे, हे नको.” “ते प्रकाश आमटेंवरचं पुस्तक आहे का गं तुझ्याकडे?” असं करता करता काढलेला पाऊण ढीग बाजूला सारला जातो.

परवा साहित्य संमेलनात माझ्या एका प्रथितयश कवी (आणि फार चांगली जाण असलेल्या) मैत्रिणीने बऱ्याच इंग्रजी, मराठी रहस्यकथा खरेदी केल्या, प्रवासात वाचायला बऱ्या पडतात म्हणून. तीच कशाला मी स्वतःही गरोदरपणात सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती तेव्हा बऱ्याच रहस्यकथांचा फडशा पाडला होता. आजही छानपैकी पाऊस पडत असतांना अगाथा ख्रिस्तीचं एखादं पुस्तक घेऊन गुरफटून लोळत वाचायला आवडतंच की.

पण याचा अर्थ असा आहे का की कविता, कादंबऱ्या, समीक्षा, वैचारिक गद्य कुणीही वाचत नाही? माझ्या दोन सहकाऱ्यांनी माझा नवरा हरिश्चंद्र थोरात याचं ‘साहित्याचे संदर्भ’ चक्क वाचून त्यांना ते कळलं आणि ते आवडलंही असं सांगितलं. त्याच्या  ‘साहित्याचे संदर्भ’ आणि ‘कादंबरीविषयी’ या दोन्ही पुस्तकांच्या प्रत्येकी दोन आवृत्त्या निघाल्या. राहुल कोसंबींच्या ‘उभं आडवं’ या पुस्तकालाही बऱ्यापैकी मागणी आहे. मध्यंतरी साहित्य संमेलनात शब्द पब्लिकेशनच्या स्टॉलवर अनुराधा पाटील यांच्या नव्या कवितासंग्रहाचाही चांगला खप झाला. मग या सगळ्यांचे वाचक कोण आहेत? शब्द पब्लिकेशनशी थोडाफार संबंध असल्याने आणि नवरा साहित्यिक असल्याने हे सगळं मला कळण्याची सोय असली तरी त्याला मर्यादा आहेत. खरं तर कुठल्या भाषिक प्रदेशात कुठली पुस्तकं अधिक वाचली जातात, कुठल्या पेशातले लोक कुठली पुस्तकं अधिक वाचतात, ते आपल्या आवडीच्या किंवा कामाच्या क्षेत्राबाहेर जाऊन दुसऱ्या कुठल्या क्षेत्रातली पुस्तकं वाचतात, कुठल्या विचारसरणीचे लोक (हे जरा कठीण आहे तरीही) कुठली पुस्तकं आवडीने वाचतात, तरूणांना काय आवडतं वाचायला, लहान मुलांना, वयात येणाऱ्या मुलांना काय आवडतं वाचायला अशी सगळी वेगवेगळी सर्वेक्षणं होणं, आकडेवारी गोळा करणं गरजेचं आहे. एरवी महाजालावरून हे सगळं कळूही शकेल, पण त्यासाठी सगळीच पुस्तकखरेदी ऑनलाइन असावी लागेल जे आत्ता तरी होत नाहीय. हे सगळं पुस्तकविक्रेत्यांना करता येऊ शकेल. पण होतं असं की एखाद्या विशिष्ट लोकवस्तीतला पुस्तकविक्रेता त्याच्या विक्रीच्या आकड्यांवरून किंवा त्यानेच शिफारस करून त्याच्या गिऱ्हाईकांच्या गळ्यात मारलेल्या पुस्तकांच्या विक्रीवरून म्हणू लागतो की कादंबऱ्या काही वाचत नाहीत बुवा लोक. मग लोकांनाही वाटायला लागतं की हो बाबा कादंबऱ्या वाचणं कमीच झालंय अलिकडे, अहो लोकांना वेळ कुठेय एवढा इ.इ.

खरं तर आपल्या वाचनासंबंधीच्या आवडीनिवडीशी बऱ्याच गोष्टी निगडीत असतात. आपल्या लहानपणचं घरातलं वातावरण, आईवडीलांची शैक्षणिक पार्श्वभूमि आणि त्यांच्या वाचनाच्या आवडीनिवडी, ज्या सामाजिक पर्यावरणात वाढत्या वयातलं आयुष्य जातं ते पर्यावरण,  घराच्या आजूबाजूला असलेली ग्रंथालयं, तिथला वाचकवर्ग आणि त्यांची आवडनिवड, शिक्षकांची आवडनिवड, विशेषतः आपल्याला आवडणाऱ्या शिक्षकांच्या आवडीनिवडींचा वाढत्या वयात आपल्यावर पडणारा प्रभाव, घराजवळ उपलब्ध असलेली पुस्तकांची दुकानं आणि तिथली पुस्तकं, पुढे महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातले सवंगडी आणि त्यांना वाचनाची आवड आहे किंवा नाही, महाविद्यालयातलं ग्रंथालय आणि तिथल्या ग्रंथपालांचा उत्साह, पुढे नोकरीच्या ठिकाणचं वातावरण, नोकरी करतांना कितपत वेळ मिळतो, तो कसा घालवायचा यासंबंधीचे उपलब्ध पर्याय, लग्नाच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी, कुटुंब आणि नोकरी सांभाळतांना उपलब्ध असलेला वेळ आणि एकूणच कुटुंबाची वेळेचा सदुपयोग करायची कल्पना..अशा कितीतरी गोष्टींचा परिणाम आपल्या वाचनावर होत असतो.

आधुनिक मुली

अलिकडे मालिकांमध्ये आधुनिक तरूण मुलींचं चित्रण फार विनोदी पद्धतीने केलेलं असतं. त्यांच्या लेखी आधुनिक मुली म्हणजे कायम रंगरंगोटी केलेल्या, ब्रँडेड आणि तोकडे कपडे घालणाऱ्या, फक्त पिझ्झा, पास्ता, नूडल्स असंच खाणाऱ्या, शॉपिंग करण्यात कायम बुडालेल्या अशाच असतात. केवढं हे सर्वसाधारणीकरण. बरं, समजा तशा त्या असल्या तर त्यात वाईट काय आहे? त्यांना आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा, खाण्याचा अधिकार आहे . पुरूषांनी हे सगळं केलेलं चालतं की. पण एकही पुरूष पात्र असं विनोदी प्रकारे उभं केलेलं दिसत नाही. याचा अर्थ रोख फक्त मुलींवरच आहे. आज एबीपी माझावर “स्त्रीलिंगी पुल्लिंगी ” या वेब मालिकेत काम करणाऱ्या मुली शिव्या घालतात, दारू पितांना दाखवल्यात म्हणून त्यांना ट्रोलिंग करण्यात येतंय असं त्या मुली सांगत होत्या. म्हणजे मुलींनी शिव्या देऊ नयेत का? १९९३ सालची घटना आहे. माझ्या कार्यालयातल्या एका देखण्या मैत्रिणीला तिच्या दूरध्वनिवर समोरून पुरूषी आवाजात “हाय डार्लिंग” असं कुणीतरी म्हटल्यावर तिने चक्क भकारी शिव्यांची लाखोली वाहिली, त्यानंतर त्या व्यक्तीने कधीही पुन्हा असं करायचं धाडस केलं नाही. त्यानंतर एक दोन वर्षांनी मलाही रात्री असे कुठून कोण जाणे पण निनावी फोन यायला लागले. मी या मैत्रीणीचा कित्ता गिरवला (अर्थात मला भकारी शिव्या येत नव्हत्या, पण ज्या काही येत होत्या त्या झाडल्या) आणि काय नवल चक्क तो प्रकार थांबला. तर बायकांना शिव्यांचा असाही उपयोग होतो. आणि कुणी शिव्या घालूच नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यांनाच मनाई करा की. त्या जाहिरातीतल्या मुलीसारखं म्हणायचं तर “Why boys should have all the fun?”

खाद्यसंस्कृती – मालवणी घाटी

माझं माहेर कोकणातलं मालवण आणि सासर घाटावरचं पुणे जिल्ह्यातलं जुन्नर. त्यामुळे खाद्यसंस्कृतीत फारच फरक. माहेरी सगळ्या पदार्थात नारळ. मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही पद्धतीच्या स्वयंपाकात नारळ हा असेच. भाजलेल्या कांदाखोबऱ्याचं वाटण कोंबडी, मटणच काय पण तूरडाळ, अख्खी मसूर, वाल, काळे वाटाणे या सगळ्या शाकाहारी पदार्थांतही वापरलं जाई. साधं वरणसुद्धा नारळाच्या वाटणाच्या तडाख्यातून सुटत नसे. ओलं खोबरं, जिरं, धणे, मिरे यांची गोळी लावलेलं वरण माझ्या लेकीलाही फार आवडतं. साधं हिंग, हळद घालून केलेल्या वरणातही ओलं खोबरं खवून टाकून त्याला म्हणायचं बेटं वरण. जवळपास सगळेच गोड पदार्थ हे तांदूळ, गूळ आणि खोबरं या तीन घटकांपासून केलेले – मग ती इडलीसदृश, आंब्याचा किंवा फणसाचा गर घालून केलेली सांदणं असोत, मोदक असोत, ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंज्या असोत, सात कप्प्यांचे घावन किंवा नारळाच्या रसात गूळ घालून त्यासोबत दिलेले घावन असोत, त्याच रसासोबत दिल्या जाणाऱ्या तांदळाच्या शेवया असोत की तांदूळ, मूगडाळ,मेथी, थोडी चणाडाळ यांच्या मिश्र पीठाच्या केलेल्या खापरोळ्या असोत, अप्पे असोत, अगदी कोकणातल्या खरवसातही नारळ असायलाच हवा.

सासरी सुक्या खोबऱ्याइतकाच शेंगदाण्याच्या कूटाचा वापर स्वयंपाकात गरजेचा असे. भरलेल्या भोपळी मिरचीत सुकं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची यांचा मसाला असे. हाच मसाला घातलेला बटाट्याचा रस्सा तर भुरकण्याजोगा. करडई, पालक यासारख्या पातळ भाज्यांतही शेंगदाण्याचा वापर असे. पण त्याव्यतिरिक्त दोन वेगळे मसाले असत. एक मसाला हा अख्ख्या हळकुंडाचा तुकडा, अख्ख्या हिंगाचा तुकडा तेलावर फुलवून त्याच तेलातलं थोडं तेल घेऊन त्यावर धणे थोडे लालसर भाजून त्याचं कूट करून केलेला असे. याला म्हणायचं खलासणी. ही खलासणी कोंबडी किंवा मटणाला लावून ते मुरवत ठेवलं जाई आणि मग त्यात कांदाखोबऱ्याचं वाटण, मसाला घालून ते शिजवलं जाई. घरातल्या लहान मुलांना नुसतंच खलासणीच्या मसाल्यातलं मटण दिलं जाई. आमच्या गावी एकदा एक स्वीस मुलगा आमच्यासोबत आला होता. त्याला आम्ही याच मसाल्यात कोंबडी, भेंडी असं करून दिलं. ते त्याला फार आवडलं होतं. हा खलासणीचा मसाला आणखी काहीही न घालता कारल्यात भरून तेलावर खरपूस परतून कारली केली जातात, त्यांना खलासणीतली कारली म्हणतात. ती तशीच छान लागतात. पण तिखटपणा नसल्याने कुणाला हवा असल्यास जुन्नर पट्ट्यात जे लसूण घातलेलं कैरीचं लोणचं केलं जातं त्याचा खार या कारल्यांवर सोडून काहीजण खातात. तेही छानच लागतं. ( तिथे चक्क फक्त मीठ भरूनही अशी कारली केली जातात त्यांना खार कारली म्हणतात.) दुसरा मसाला हा खुरासण्यांचा (यांना कारेळे असंही म्हणतात). खुरासण्या किंचित तेलावर त्या चटचट होईपर्यंतच भाजायच्या. तवा किंवा कढई फार गरम असेल तर त्या उडतात. त्यामुळे जाळ नियंत्रणात ठेवून त्या भाजायच्या,त्यात धणे घातले की त्या उडत नाहीत. मग त्यांचं कूट करायचं. हे कूट कांदाखोबऱ्याच्या मसाल्यासोबत बऱ्यात कालवणांमध्ये वापरलं जात. विशेषतः वांगी, हिवाळ्यात येणारी मोठी पापडी, शिराळे आणि सांडगे यांच्या कालवणात हा मसाला फार छान लागतो. कोकणात जसे विशेष पदार्थ तांदूळ, खोबरं घालून होतात, तसे इथले विशेष पदार्थ चण्याच्या डाळीचे असतात. पाहुणे आले की पुरणपोळ्या जशा ठरलेल्या तशा मासवड्याही.  हळद, तिखट, मीठ घालून शिजवलेलं चण्याचं पीठ ओल्या रूमालावर थापून त्यात भाजलेला कांदा, खोबरं, तीळ, भरपूर कोथिंबीर आणि भरपूर लसूण यांचं मिश्र सारण त्यावर भरून, मग त्या गुंडाळून त्यांना त्रिकोणी आकार दिला जातो. याच्या वड्या झणझणीत रश्श्यासोबत हाणल्या जातात, सोबत बाजरीची भाकरी असली की अहा! माझ्या सासूबाई श्रावण सोमवारी आणि शनिवारी उपास करीत. संध्याकाळी पारणं फेडतांना जो बेत असे तो मी स्वतः काही मानत नसले, उपासतापास करीत नसले तरी अजून कधी कधी करते. वरणभात, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, भरलेली कारली, अळूवडी, भजी, पोळ्या यांच्या जोडीला काहीतरी गोड असे. गोडाचा पदार्थ म्हणून बरेचदा भोपळघाऱ्या असत. लाल भोपळ्याचा गर किसून त्यात गूळ घालून किंचित शिजवून त्यात गव्हाचं पीठ घातलं जाई. मग हे पीठ रूमालावर थापून दोन्ही बाजूंनी तेल सोडून या घाऱ्या भाजल्या जात. अजूनही मी न्याहारीला हा पदार्थ कधी कधी करते. याशिवाय बाजरी, मटकी, शेंगदाणे हे ओला लसूण आणि मिरची, कोथिंबीर यासह भरडून त्याचे पाणीपुरीच्या आकारात गोलाकार थापायचे, वाळवायचे आणि आयत्या वेळी दोन्ही बाजूंनी तेल सोडून तव्यावर भाजून तोंडीलावणं म्हणून करायचे. याला म्हणायचं बिबड्या. बिबड्या हाही खास या प्रदेशातला पदार्थ. इतरत्रही बिबड्या केल्या जातात पण त्या वेगळ्या. सढळ हाताने हिरवा मसाला घालून केलेली काळ्या उडदाची आमटी हा एक पदार्थही आमच्या आवडीचा. त्याशिवाय इकडचा एक खास पदार्थ म्हणजे शेंगूळी. इतरत्रही शेंगोळ्या केल्या जातात. पण त्या कुळथाच्या पिठाच्या नसतात. जुन्नर पट्ट्यात कुळीथ न म्हणता हुलगे म्हटलं जातं. हुलगे दळून त्यात लाल मिरची आणि लसूण वाटून घातली जाते. मग चवीनुसार मीठ टाकून त्याच्या हाताने चकलीसारख्या शेंगोळ्या पाडल्या जातात. मग एका पातेल्यात उकळत ठेवलेल्या पाण्यात शेंगोळ्या आणि थोडंसं तेच पीठ पाण्यात कालवून सोडलं आणि शिजू दिलं की झाली शेंगोळी तयार.

यातले जवळपास सगळेच पदार्थ मी आजही करते. मालवणी वडे आणि ओल्या काजूची उसळ आणि घाटावरच्या मासवड्या आजही आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना खायला केल्या जातात. मात्र आजच्या योग्य आहाराच्या कल्पनांनुसार काही पाककृतींमध्ये थोडे बदल केले जातात. आता मी खोबऱ्याचा वापर फार कमी केलाय. त्याऐवजी वाटणात किंवा चटणीत अक्रोड, भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या बिया, बदाम यांचा वापर करते. माशाच्या आमटीत नावालाच खोबरं घालून कच्च्या कैरीचे तुकडे घालते ज्यामुळे दाटपणा, आंबटपणा येतोच, शिवाय चवही छान लागते, हिंवसपणा रहात नाही. हा सगळा वारसा थोड्याफार प्रमाणात माझा मुलगा क्षितिज आणि मुलगी ओवी यांच्याकडेही सोपवलाय.