कोपरा

मी तिसरीत असतांना ऐन परीक्षेच्या आधी घटसर्पाने आजारी झाले. शाळेत मावसबहिणीकडून निरोप दिला होता. पण तिने चुकून उलटा निरोप सांगितला की ती येणार नाही, नाव काढून टाकायला सांगितलंय. वडील शाळेत गेल्यावर हे कळलं तेव्हा त्यांनी शाळेतल्या लोकांना लेखी पत्र न देता लहान मुलीच्या सांगण्यावरुन हे कसं केलंत वगैरे विचारलं, पण नगरपालिकांच्या शाळेत हे असं होत असावं. मग वडीलांनी मला वर्षभर तब्येत सुधारण्याच्या नावाखाली (टिळकांना डोक्यात खवडे झाले होते तेव्हा त्यांच्या वडीलांनी असंच केलं होतं असं ऐकवत) घरी बसवलं. वडील कामात असत. मोठी भावंडं त्यांच्या व्यापात. आई धाकट्या भावंडांचं करणं, स्वैंपाकपाणी यात गुंतलेली. मग मी उठून चाळीचे तीन मजले उतरुन खाली येत असे. तीनचार मिनिटं चाललं की एक कोपरा होता. तिथे मोठ्या खांबांखाली बसायला अगदी लहान मुलालाच बसता येईल असे चौथरे होते. त्यातल्या एका चौथऱ्यावर बसकण मांडून पुढचे कित्येक तास मी मजेत असे. समोर वाहता आंबेडकर रस्ता. डावीकडे एक रस्ता गणेश टॉकीजवरुन चिंचपोकळीकडे जायचा. समोर लालबाग मार्केट. समोरुन ट्राम, मोटारी, टॅक्श्या, घोडागाड्या, लॉऱ्या,ट्रक, बैलगाड्या, हातगाड्या अशी वाहनं आणि माणसं हे सगळं वाहत चाललंय. तास न् तास. तसंच्या तसंच. मीही तशीच तास न् तास बसून. स्तब्ध, शांत, निवांत. फक्त शांततेखेरीज काहीच नव्हतं.

माझा आणि त्या वर्दळीचा एकमेकांशी काही संबंध नव्हताही आणि होताही. मी त्या वर्दळीचा एक भाग नव्हते. मी धावत नव्हते जीवापाड. मी फक्त त्या वर्दळीची एक प्रेक्षक होते. त्या वर्दळीचा भाग नसल्याने माझ्या मनावर त्याचा काही ताण नव्हता. एखादं चलच्चित्र पहावं तशी ती वर्दळ मी पाहत होते.

वर्षभराने शाळा पुन्हा सुरु आणि आयुष्याची वर्दळही. त्यानंतर कधीच असा निवांत कोपरा मिळाला नाही.

रस्ता -६

घराखालून जाणाऱ्या रस्त्यावर समोरच्या पदपथावर अदानींचं काम कंत्राटावर करणाऱ्या कामगारांचा एक जत्था राहत होता. सकाळ संध्याकाळ त्यांच्यामुळे रस्ता जागा असे. रात्री उशिरापर्यंत ते गप्पा हाणत, ट्रान्झिस्टरवर गाणी ऐकत बसत. पहाटे साडेचारलाच त्यांचा दिवस सुरु होई. सकाळी सूर्योदयासोबतच कामाला सुरुवात होई त्यांची. मग नऊच्या सुमारास ब्रंच म्हणजे सांबारभात, क्वचित उपमा. संध्याकाळी काम संपल्यावर पुन्हा जमल्यास आंघोळ किंवा जमेल तितकी स्वच्छता उरकून जेवून घेतलं की त्यांच्या गप्पाटप्पा, मस्ती चालू होई. एक जोडपं सतत भांडत असे. एकदा त्यातल्या नवऱ्याने बायकोला जरा जोरात झापल्यावर इतर बायका खोट्या रागाने त्याला काठीने मारु का मारु का विचारत होत्या.  त्यांच्यातला एक तरुण मुलगा कायम मोठ्याने गाणी लावून ऐकत बसे म्हणून मला जरा राग येई. पण एकदा पाहिलं तर त्याची आई चहा करीत असतांना त्याने साखर पळवून खाल्ली. जरा निरखून पाहिलं तर ध्यानात आलं की तसा लहान मुलगाचं होता तो पौंगडावस्थेतला. इतर पुरुषांबरोबर कष्टाची कामं करुन थोराड दिसायला लागला होता इतकंच. त्या सगळ्यांसोबत जगण्याची इतकी सवय झाली त्या दिवसात की एक दिवस एकाएकी पदपथावरून सामानासह ते नाहीसे झाल्यावर वाईट वाटलं. ते फक्त आपलं काम करीत असंच नाही. समोरच्या घरामागे माड आहे. त्याच्या झावळ्या खाली पडलेल्या असत. त्यांच्यातली स्वैंपाक करणारी बाई फावल्या वेळात त्या  सुकलेल्या झावळ्यांपासून झाडू तयार करी. ते पाहिल्यावर समोरच्या घरातले लोक लगेच म्हणायला लागले त्या आमच्या माडाच्या झावळ्या आहेत. मग त्यांनाही तिने त्यातल्या दोनतीन झाडू दिल्या त्या बदल्यात. आता ते मुख्य रस्त्यावर काम करायला गेले तरी त्यांच्यातला एकजण येऊन ते झाडू करायचं  काम करीत बसतो वेळ मिळाला की. आजही तो बसला होता दुपार सरेपावेतो.

समोरच्या खाजणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी खाजणात राहणारा एक मुलगा नेहमीसारखा ड्रम सायकलच्या हँडलला टांगून पाणी भरायला निघाला होता. त्याच्या ओळखीच्या कुटुंबातली एक अडीच-तीन वर्षांची मुलगी तिथेच आईची वाट पाहत खेळत होती. तो मुलगा तिथेच थांबून सायकलने त्या मुलीला टेकलत आत ढकलत राहिला. मी सध्या बोलूही शकत नाही, ओरडणं तर दूरच. काय करावं असा विचार करीत राहिले. एकदा मनात आलं की कदाचित त्या मुलीच्या आईने तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं असेल, ती रस्त्यावर जाऊ नये म्हणून हा असं करीत असेल. पण तसं नव्हतं. खाजणातून त्याच्या ओळखीचे लोक येतांना दिसले की तो ते थांबवी, त्यांची पाठ फिरली की पुन्हा त्याचा हा उद्योग सुरु होई. शेवटी तो तिला तिथे सोडून गेला. मुलगी मग गोल गोल फिरत नाचायला लागली, उड्या मारायला लागली. तिची मावशी किंवा कुणी तरी आणखी तीन लहान्या मुलींसोबत तिथे आली. समोरच्या घरातल्या बाईने त्या सर्वांना खाऊ दिला. मग मुली खेळत राहिल्या.

समोर खाजणातच राहणारं एक जोडपं अगदी सूर्य मावळायच्या पाच मिनिटं आधी येतात. दोघंही कुठेतरी नोकरी करीत असावीत पण वेगवेगळ्या ठिकाणी.  कधी पाठीला पाठपिशवी लावलेला नवरा आधी येई तर कधी खांद्यावर पर्स घेतलेली बायको आधी येई. मला नेहमी कुतूहल वाटे की अशी कुठली नोकरी करीत असतील ही दोघं की सूर्यास्ताच्या वेळा बदलल्या तरी बरोब्बर सूर्य मावळायच्या आत पोचतात.  आज बायको आधी आली. आज ती रिक्षाने आली. कारण तिच्याकडे खरेदीच्या दोनतीन जड पिशव्या होत्या. नवरा आला नाही हे बघितल्यावर तिथेच समोरच्या घराशेजारी बसली. तिच्या ओळखीचे एक गृहस्थ तिथे आले. त्यांना तिने विचारलं, “काय खाल्लंत मग?” कधीही लोक संभाषण जेवलात का, काय खाल्लंत यापासून का सुरु करतात काय जाणे, मग ते सामाजिक माध्यमावर का असेना. त्या गृहस्थांनी विचारलं, “रघू नाही आला का अजून?” त्यांचं सगळं संभाषण ऐकू येत नव्हतं रहदारीमुळे. पण अशा नोकरीपेक्षा मंत्रालयात नोकरी करावी असं ते गृहस्थ म्हणत होते, जसं काही ती नोकरी अगदी सहजच मिळते. सध्या नोकऱ्या गेल्यामुळे चांगले शिकलेले लोक भाजी विकताहेत अन् मंत्रालयातली नोकरी कुठून मिळायला. पण त्यांच्या सांगण्यावरून तिने नवऱ्याला फोन लावला. तो लवकर येऊ शकणार नाही हे कळल्यावर ती सामान उचलून चालू लागली. मघाचा मुलगा पाण्याचे ड्रम घेऊन तितक्यातच पोचला. त्याने आपणहून त्या बाईला विचारलं तुमचं काही सामान घेऊ का सायकलवर म्हणून.  तिने एक पिशवी दिली. पण दुसरंही ओझं जड दिसत होतं. म्हणून त्याने तेही घेतलं. आणि तो सायकल हळू चालवत तिच्यासोबत निघाला.

छोटू

माझ्या उंचीमुळे नेहमीच ‘अटकमटक चवळी चटक, उंची वाढवायची असेल तर झाडाला लटक’ अशा प्रकारचे शेला पागोटे मिळत असत. एकदा बँकेत मी एक घोळ निस्तरल्यावर आमचा आयटीवाला मोठ्या कौतुकाने म्हणाला “But for our chhota madam, that (तो घोळ) would have never been sorted out.” हे छोटेपणही मला नेहमीच चिकटून राहिलं. पण तरीही माझ्या कधी ध्यानात हे आलंच नाही की आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक ‘छोटूं’चं स्वतःचं काही वेगळं नाव असेल. दुकानावर मी छोटूमल आणि कुं. किंवा छोटेलाल ड्रेसवाला अशा प्रकारची नावं पाहिली होती. त्यामुळे ते इतर नावांसारखंच एक नाव असं मी धरून चालले होते. एकदा आमच्या बँकेतल्या एक लिफ्टमनला मी हाक मारली, “छोटू जरा थांबा हं.” तेव्हा एक सहकारी हळूच दुसरीला म्हणाली, “Look, who’s saying chhotu!” तत्क्षणी माझ्या डोक्यात वीज चमकली. नंतर मी त्याला त्याचं खरं नाव विचारलं तेव्हा ते विजय निघालं. मग मी आवर्जून नाव विचारायला लागले. आमच्याकडे वीजेची कामं करायला येणाऱ्या इलेक्ट्रीशियनला सगळे पिंटू म्हणतात, त्याचं खरं नाव अजय सिंह निघालं. पण कित्येकदा लोक खरं नाव विसरुन स्वतःची ओळख लोकांनी त्यांना दिलेल्या अशा नावानेच करुन देतात. आजही आमचा रद्दीवाला आला होता. मी दार उघडताच म्हणाला, “आंटी, मैं छोटू, छोटू रद्दीवाला.” बायकांना जसं आपल्या गुलामगिरीच्या निशाण्या अंगाखांद्यावर बाळगतांना उमगत नाही तसंच यांचं होऊन जातं.

अधोलोकाने तर हकल्या, चकण्या, टकल्या वगैरे लोकप्रिय करुन टाकलंय. त्याच्याशी गुंडगिरीतून येणाऱ्या सत्तेचा, सामर्थ्याचा प्रत्यय येत असावा बहुतेक. त्यामुळे लोकांना ते वापरायला फार आवडतं.

वजनदार लोक तर कायम हक्काचा विनोदाचा विषय. एकदा एका वाढदिवसाच्या सोहळ्यात अशा प्रकारच्या सोहळ्यांचं संयोजन करणाऱ्या माणसाने जवळ उभ्या असलेल्या एका वजनदार आणि डोक्यावर जरा कमी केस असलेल्या तरूणाला जवळ बोलावून घेतलं. मग पुढचा सगळा सोहळा संपेपर्यंत “यह भाईसाब एक बार पार्क में गये…”असं करीत वेगवेगळ्या प्रकारचे विनोद केले गेले. त्या तरुणालाही मनात नसतांना चेहऱ्यावर हसू बाळगत ते झेलायला लागलं. नंतर त्याला या सगळ्या प्रकाराने समजा नैराश्य आलं तर त्याला कोण जबाबदार हा विचार त्या सोहळ्यात अशा विनोदांवर खळखळून हसणाऱ्या कुणाच्याही मनात आला नसेल का?

एका मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात तर कायम आमच्यासारख्या बुटक्या, वजनदार, कृष्ण वर्णाच्या लोकांची टिंगल उडवली जाते. इतकंच नाही तर ते अधोरेखित करायला पात्रांची नावं किंवा आडनावंही त्यावरून ठेवली जातात. त्यावरुन आठवलं काही लोकांच्या आडनावावरूनही त्यांचा छळ मांडला जातो. आमच्या बँकेत आमच्या एका मित्राचं आडनाव खरं तर हरम असं होतं. पण आमचा एक सहकारी कायम त्याला “ए हराम इकडे ये.” असं म्हणत असे.

आपल्या समाजात आदर्श दिसणारी व्यक्ती कशी असते हे कळण्यासाठी विवाहविषयक जाहिराती पाहिल्या तरी कल्पना येईल. माझ्या परिचयातली एक मुलगी दिसायला खरं तर फार सुंदर, उंची, बांधा सगळं छान असं होतं. पण ती सावळी आहे आणि तिला चष्मा आहे हे कळल्यावरच माझ्या एका मैत्रिणीने भविष्यवाणी वर्तवली, “हिचं लग्न जमणं कठीण आहे.” प्रत्यक्षात तिला एका मुलाकडून लवकरच मागणी आली आणि तिचं लग्न झालं ही गोष्ट वेगळी, पण जणू काही अशा लोकांनी लग्नाच्या फंदात पडूच नये असाच लोकांचा आविर्भाव असतो.

मुलींच्या बाबतीत तर नुसतं रंगरुपच नव्हे तर तिच्या अंगावर किती केस आहेत, ते तिने काढलेत की नाही हेही पाहिलं जातं. आमच्या लोकलमध्ये एक तरुण मुलगी असे. तिला मिशा होत्या. तर लोक तिच्याकडे अगदी विचित्र नजरेने पाहत. कुणीही तिच्याशी बोलत नसे. त्या अनुभवामुळे कार्यकर्त्या अनीता पगारे यांनी टाळेबंदीकाळातल्या मिशांबद्दल मोकळेपणी लिहिल्यावर फार बरं वाटलं.

आमचा एक परिचित जरा नाजूक हालचाली करीत असे. तो होता खूप हुशार, कामसू, कुठलंही अवघड काम झटक्यात पार पाडणारा. पण त्याच्या ह्या सगळ्या गुणांकडे दुर्लक्ष करुन त्याच्या हालचालींवरून त्याला चिडवलं जाऊ लागलं. परिणामी तो इतरांशी बोलणं टाळायला लागला. मग त्याला शर्मिला नाव ठेवलं गेलं. पुढे काही मित्रांनी प्रयत्नपूर्वक त्याला माणसात आणलं.

जात, धर्मावरून वाईट वागवलं जाणं तर आपल्या समाजाला मुळीच नवीन नाही. ‘सरकारी जावई’ म्हणून इतरांना हिणवणारे उच्चभ्रू एके काळी वेगळ्या प्रकारे ‘सरकारी जावई’ होते हे मात्र विसरुन जातात. इतर धर्मीयांनाच काय इतर प्रांतीयांनाही नावं ठेवली जातात. ‘नगरी मापं’ ‘मावळी भुतं’ ‘कोकणाटं’ ‘वायदेशी रानदांडगे’ ‘घाटी बरबाट चाटी’ हे वानगीदाखल. एकूण काय तर आम्ही तेवढे सर्वगुणसंपन्न.

दिसणं, प्रांत, जातधर्म ह्या माणसाच्या जन्माआधीच ठरलेल्या, त्याच्या हातात नसलेल्या गोष्टींवरून लचके तोडणारी ही जमात कधी नष्ट होणार काय माहीत.

चालणारीची रोजनिशी-४

आज पहिल्या फेरीलाच लक्ष गेलं फाटकाजवळच्या टेबलाकडे. दहाबारा दिवसांपूर्वीच ख्रिस्तजन्माच्या देखाव्यातल्या गवतासाठी रुजवण घातलं गेलं होतं. तिथे आता देखावा जवळपास तयारच होता. रात्री त्यात बाळ येशू, मेरी, संत, गोठ्यातले प्राणी असं सगळं मांडलं जाईल आणि देखावा पूर्ण होईल. दरवर्षी अगदी इतक्याच उत्साहाने तो देखावा बघावासा वाटतो. गेले काही दिवस आमच्या ख्रिश्चनबहुल गृहनिर्माण संस्थेच्या आवारात सकाळी फेऱ्या घालतांनाच नाताळची लगबग जाणवतेय. घराघरांतून केक, कुकीज भाजल्याचे, करंज्या तळल्याचे वास येताहेत. कालपरवापासूनच खिडक्यांमध्ये ताऱ्याच्या आकाराचे कंदील लावले गेलेत. रोशणाई केली गेलीय. या वातावरणात एरव्ही फार उत्साह येतो. पण यंदा सगळं जरा थंड आहे.

समोरच्या रस्त्याचं काम चालू आहे. त्यासाठी कंत्राटावर काम करायला आलेल्या कामगारांनी रस्त्यापलीकडे पदपथावर त्यांचा संसार मांडलाय. आम्ही चालायला येतो तेव्हा त्यांनी गाड्यांच्या आडोशाने आंघोळ उरकून न्याहारी करायला सुरुवात केलेली असते. पाचसहा पुरुष, तीनचार बायका असा जत्था आहे. त्यातली एक बाई फक्त स्वैंपाकाचं काम करतांना दिसते. न्याहारी म्हणजे रोज सांबारभातच असतो. ती बाई प्रत्येकाला ठराविक प्रमाणात वाढून देते, मग जो तो खाऊन संपल्यावर स्टीलची थाळी धुवून ठेवतो. आज सर्वांचं खाणं संपत आल्यावर स्वैंपाक करणारी बाई उभ्या उभ्याच भात बोकाणत होती भुकेजल्यासारखी. इतकी कष्टाची कामं करुन फक्त सांबारभातावर यांचं कसं भागत असेल, त्यांना कितीसं पोषण मिळत असेल, किती काळ ते असा तग धरतील या प्रश्नांना थारा देऊन काही उपयोग नाही. आपलंच डोकं गरगरतं.

त्याच वेळी रस्त्यावरुन आदू जातांना दिसला आईचं बोट पकडून. त्याचं लक्ष नाहीय, स्वारी बोलण्यात गुंग आहे, मीही हाक मारत नाही. आदू म्हणजे राइस अॅडम्स हा माझा छोटा मित्र. आमच्या कट्ट्यावर त्याची आजी त्याला घेऊन येई. पहिल्यांदाच त्याला पाहिलं तेव्हा त्याला कुणीतरी चॉकलेट दिलं होतं आणि तो तक्रार करीत होता मला का चॉकलेट दिलंय. अशी तक्रार करणारा मी हा पहिलाच लहान मुलगा पाहिला होता. मग कुणीतरी त्याला समजावलं तू लहान आहेस ना म्हणून तुला चॉकलेट दिलंय. तर त्यावर साहेब म्हणतात, “ I am not small, I am four and a half.” तेव्हापासून मी त्याला ,”Hey, four and a half” अशीच हाक मारायला लागले. आजी इतर मैत्रिणींशी गप्पा मारी. मग हा कंटाळून बसण्याऐवजी कल्पना लढवित बसे. मला सांगे समोरच्या वीजेच्या खांबाआड राक्षस दडलाय. एकदा त्याने उत्साहाने सांगितलं की आम्ही बसतो तो बाक ज्या झाडाखाली आहे त्यावर एक साप होता. ओवी म्हणे थापाड्या दिसतोय हा पोरगा. मग मी चौकशी केल्यावर कळलं की खरंच एक साप झाडावरून लोंबकळत होता आदल्या दिवशी. एक दिवस मी त्याला बोटं लपवायचा खेळ शिकवला आणि त्याची आणि माझी गट्टी झाली. आम्ही खुशाल लपाछपीही खेळायला लागलो. माझं चालून झाल्यावर मी बाकावर येऊन मैत्रिणींशी गप्पा मारीत असे. त्या वेळी दोन बाकांच्या मध्ये तो माझी वाट अडवून उभा राही. मग मी तर चालतेय अजून अशी हुलकावणी देऊन मी मागच्या बाजूने बाकावर येऊन बसत असे. हा खेळ त्याला फार आवडायचा. जाम खिदळायचो दोघंही. एकदा मी बाकावर बसले होते. तो आईसोबत मागून येतांना तिला म्हणाला, “I think my friend is there.” मग थोड्या वेळाने वळणावर निराश होऊन म्हणाला, “ Oh no, she is not there.” त्याच्या आईला नवल वाटलं की कोण याची मैत्रीण बसलीय बाकावर. मग मी दिसल्यावर त्याने सांगून टाकलं ही माझी मैत्रीण तेव्हा त्याच्या आईला नवलच वाटलं. तसे साहेब माझ्यावर जरा हक्कही गाजवत. “आज तू ती उभी टिकली का नाही लावलीस मला आवडते ती, आज तू तो ड्रेस का नाही घातलास” असंही चाले त्याचं. मग एक दिवस त्याने मला घरी यायचं आमंत्रण दिलं. मग तुला माहीत आहे का कसं यायचं ते म्हणून  पद्धतशीर पत्ता सांगितला. “Take a left turn from Waste Coast (Restaurant), then go straight, straight, don’t turn hann,  Ok? …”असं करीत. त्याची कल्पनाशक्ती फार धावत असे. एकदा त्याने मला गोष्ट सांगितली तो कसा घरातून चालत निघाला, मग एका क्रेनने त्याला उचलून कसं कचऱ्याच्या गाडीत टाकलं, मग तो कसा कचऱ्यात पोहत होता (इथे स्वतःच स्वतःला डर्टी बॉय म्हणून झालं. आम्ही खूप गंमतीजंमती करत असू. नंतर त्याची शाळा, अभ्यास, पोहण्याचा(कचऱ्यात नव्हे तर पाण्यात) वर्ग सुरु झाला आणि त्याचं कट्टयावर भेटणं दुर्मिळ होत गेलं. आता तो असाच दिसतो कधी मी खिडकीत उभी असतांना आईसोबत, आजीसोबत चालतांना.

वाट लागली

मराठी भाषा वळवावी तशी वळते हा आमच्या तरुणपणीचा लोकप्रिय डायलॉग असे. पण मराठीच का कुठल्याही भाषेच्या बाबतीत हे खरं असावं. अनवधानाने आकार, उकार, वेलांटी, मात्रा चुकली की अर्थाचा अनर्थ ठरलेला. हल्ली मोबाईलवर भराभर टंकण्याच्या नादात असे काही घोळ होतात की विचारू नका. त्यातून तुम्ही रोमन लिपीत मराठी लिहित असात तर बघायलाच नको. इंग्रजीतली अशी अनेक उदाहरणं लोकांनी देऊन झालीत.

असं बऱ्याच भाषांमध्ये होत असतं म्हणा. स्पॅनिशमध्ये Carro म्हणजे कार पण त्यातला एक आर कमी करून Caro केलं तर त्याचा अर्थ होतो महागडा. अर्थात कार ही महागडी वस्तू आहेच म्हणा.  Cabello (घोडा),  Caballo (केस) Carretera (मार्ग)  Cartera (पैशाची पिशवी किंवा हँडबॅग) हे आपलं उदारहणादाखल दिलं, असे बरेच शब्द आहेत. मराठीतही यावर लिहिलं गेलंय.

कधी कधी तर एकाच शब्दाचे दोन किंवा तीन भिन्न अर्थ होतात. जसं की चूक, टीप, पीठ, वीट, छंद. मग कोणत्या वेळी कोणत्या अर्थी हा शब्द वापरावा यासाठी आम्हाला लहानपणी संस्कृत शिकतांना एक उदाहरण नेहमी दिलं जाई. सैंधव म्हणजे मीठ आणि सैंधव म्हणजे घोडा. आता जेवतांना जर सैंधवम् आनय म्हटलं आणि घोडा आणला तर तो आणणाऱ्याच्या अकलेचा उद्धारच होईल. त्यामुळे तारतम्य वापरणं हा यातला कळीचा मुद्दा आहे.

वाट बघ म्हटल्यावर वाटेला न्याहाळत बसणारा आढळला की लोक म्हणतील अकलेची वाट लागली याच्या आणि अशी वाट लागलेल्याची काही वट रहात नाही बाकी. वास्तू ही एक वस्तूच असली आणि वास्तूत अनेक वस्तू वसतीला असल्या तरी ही माझी वस्तू असं कुणी आपल्या घराकडे बोट दाखवीत म्हणत नाही ना. उपाहारगृहात उपहार मिळत नाही त्यासाठी दुकानातच जावं लागेल. वारीला गेल्यावर उपवास करतांना वरी खाल हो पण वरीला चाललो असं म्हणालात तर लोकांना वाटेल वर चाललात. एकाएकी एकाकी वाटू लागतं माणसाला पण म्हणून मला एकाएकी वाटायलंय असं म्हणालात तर लोकांना प्रश्न पडेल की याला नक्की काय वाटतंय. तुमचं चित्त चोरीला गेलंय असं आडवळणाने तुमच्या प्रिय व्यक्तीला कळवतांना चित्ता लिहू नका नाहीतर मामला तिथेच आटोपला समजा. पूर्वी चवलीला मणभर चवळी मिळत असेल पण आता चवळी आणायला गेल्यावर चवलीची आठवण काढलीत तर येड्यातच गणना व्हायची की. काही लोक कचेरीत चहासोबत कचोरी खातात हे खरंय पण मामलेदार कचोरीत जायचंय म्हणालात तर लोकांना वाटायचं मामलेदाराच्या मिसळीसारखी मामलेदाराची कचोरीही निघाली की काय. चिकट, चिकटा हे एकमेकांशी संबंधित आहेत कारण त्यांचा चिकटपणाशी संबंध आहे पण चिकाटी ही मळाच्या चिकटून रहाण्याच्या चिकाटीशी संबंधित आहे असं वाटून घेऊ नका मात्र.

यावरून एक किस्सा आठवला. माझ्या मुलाच्या हॉस्टेलमधल्या खिडकीच्या खूप वरच्या भागात अगदी लहान मुलाच्या हाताच्या ठशाएवढा ठसा उमटलेला होता. तो तिथे कसा काय उमटला असेल यावर बरंच चर्वितचर्वण झाल्यावर एक मुलगा म्हणाला, “चिकाटीचं काम असेल.” आता हे काय असा प्रश्न सर्वांना पडल्यावर त्याने जे वर्णन केलं ते चेटकीणीचं वर्णन होतं.

पूर्वी एखादं पत्र पाठवलं की म्हणत उलट टपाली खुशाली कळवावी. म्हणजे पत्राला टपालाने दुसरं पत्र पाठवून तुम्हीही सुखरुप आहात हे कळवावं. पण समजा एखाद्याने उलट टपली लिहिलं असतं तर काय झालं असतं?

एखादं काम हातात घेतलं की तडीला न्यायचं असा काहींचा खाक्या असतो पण अशा आदरणीय व्यक्तींना काम ताडीला न्यालच असं कुणी म्हटलं तर?

दाढदुखीसाठी दंतवैद्याकडे गेलात आणि माझी दाढी दुखतेय म्हणालात तर हा कुठला नवा रोग म्हणून शोधत बसायचा बिचारा.

काम निश्चित झालं की आपण निश्चिंत होतो पण म्हणून काम करणाऱ्याला काम निश्चिंत करायला सांगितलंत तर किती वेळ लागेल सांगता येत नाही बरं का

तर शोधायला गेलात की असे बरेच शब्द सापडतील. कट,काट, कल,काल, अनावृत, अनावृत्त, उंबर, उंबरा, उकड, उकाडा, उतार, उतारा, ओवा, ओवी, ओटा, ओटी, विळा, विळी, किनरा, किनारा, किल्ला, किल्ली, कुरण, कुराण, खर, खरा, खार, मत, मात, कुच, कूच, कुबड,कुबडी, खुंट, खुंटी, गारुड, गारुडी, चंची, चंचू, चुटका, चुटकी, चेरी, चोरी, तर, तार, झिंग, झिंगा, टिकाऊ, टिकाव, जुडा, जुडी, टाळ, टाळी, टाळू, तपकिरी, तपकीर,तप, ताप, ताट, ताटी, तीट, तुरा, तुरी, थापा, थापी, दक्षिण, दक्षिणा, दाणा, दाणी, दिंड, दिंडी, धुरा, धुरी, नाक, नाका, पकड, पक्कड, पळ, पळी, पक्ष, पक्षी, पगडी, पागडी, बंगली, बंगाली, बरीक, बारीक, भोवरा, भोवरी, मुका, मूका, मीलन, मिलन, लवून, लावून, हुंडा, हुंडी, हुक्का, हुक्की.

जेष्ठ कवी अनुराधा पाटील यांच्या कवितेतल्या ओळी आहेत

उकारवेलांटीच्या

वळशांनीही

गुदमरतो शब्दांचा जीव

तेव्हा असा शब्दांचा आणि संवादाचा जीव गुदमरु देऊ नका.

चालणारीची रोजनिशी-३

रोज सकाळी चालायला खाली उतरलं की वेगवेगळ्या घरांतून वेगवेगळे स्वयंपाकाचे, नाश्त्याच्या पदार्थांचे वास येत असतात. आम्लेटपाव, कुरकुरीत भाजलेला टोस्ट, मेदूवडा सांबार, डोसे, उप्पीट. मीही काहीतरी तयारी करुन ठेवलेली असते वर गेल्यावर नाश्ता करण्यासाठी. पण या वासांनी चालण्यावरचं लक्ष विचलीत होतं.

आज दोन्ही मांजरी कुठेतरी शिकारीला गेल्या असाव्यात. गायब आहेत. त्यामुळे बागेत चिमण्या आणि साळुंख्या निर्वेधपणे काहीतरी टिपताहेत.

ड्यूटीवर नसलेला सुरक्षारक्षक कानाला फोन चिकटवून वाकड्या मानेने भाजी नीट करीत बसलाय. ड्यूटीवर असलेला डोक्याला तेल लावून भांग पाडीत बसलाय.

पुन्हा रस्त्याला लागून असलेल्या बाजूने चालतांना लक्ष गेलं. पलीकडल्या बाजूला रस्त्याच्या कडेला एक पाटी हल्लीच उगवलीय. ‘Cash on credit card’. नोटाबंदीनंतरच्या काळात अशा पाट्यांचं पीक आलं होतं. आताही लोकांच्या हाती पैसे नाहीत. त्यामुळे पुन्हा त्यांनी डोकं वर काढलंय. एकीकडे ही पाटी आणि दुसरीकडे बाजूच्या डी मार्टमधून भरभरुन सामान खरेदी करुन कारमध्ये टाकून घेऊन जाणारे. तरी टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात साडेसहा वाजल्यापासून डी मार्टला जाणाऱ्यांची रांग असे तशी नसते म्हणा आता. सगळंच मिळायला लागलंय. रस्त्यावर भाजीवाले, फीsssश, फीsssश लो फीsssश असा आवाज देत बाईकवरुन मासे विकणारे, शहाळेवाला सगळे जात असतात.

आता सगळं पूर्वीसारखं चालल्यासारखं वरकरणी तरी वाटतंय खरं, पण किती काळ वाटत राहील हे असं? पुन्हा लाट आली तर काय होईल? मग हे चक्र पुन्हा मागे जाईल का हे विचार भेडसावत असतात. असो.

चालणारीची रोजनिशी-२

चालायला खाली उतरले आणि जोरात शंखनाद ऐकू आला आणि माझ्या ध्यानी आलं की आज आपल्याला उशीर झालाय. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात लोक रात्रभर जागत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत. पण आता मात्र हळूहळू का होईना पण गाडं पूर्वपदावर यायला लागलंय. सकाळी मी नेहमीच्या वेळी खाली उतरले की पहिल्या फेरीला सहाव्या मजल्यावरचा अनिल मेहता स्कूटरवर बसून कामावर जातांना दिसतो. दुसऱ्या फेरीच्या दरम्यान लांब वेणी घालणारी नेपाळी घरकामगार येते. हात स्वच्छ करता करता, नोंदवहीत नाव लिहिता लिहिता सुरक्षारक्षकांशी गप्पा मारते. मग ओघ सुरू होतो. फुटबॉलकोच असलेला मेनन आणि त्याची बहुधा बँकेत काम करणारी उत्तरेकडची बायको आपल्या मुलाला घेऊन दुचाकीवरुन निघतात. तिसऱ्या, चौथ्या फेरीच्या दरम्यान शेजारच्या बंगल्यातल्या पाटलीणबाईंनी पूजेच्या वेळी वाजवलेला शंख ऐकू येतो. त्यानंतर बाजूच्या विंगमधले काहीतरी मानसिक आजार असलेले वृद्ध गृहस्थ त्यांच्या सहायकाचा हात पकडून फिरायला निघतात.

हे सगळं डोक्यात चालू असतांनाच चिमण्यांचा एक थवा घाबरल्यासारखा चिवचिवाट करीत घाबऱ्या घाबऱ्या गतीने इथेतिथे उडत शेवटी अशोकाच्या जरा आडव्या झालेल्या फांदीवर बसला. कारखाली सुस्तावून लोळणारी मांजर लगेच सावध होऊन कारच्या आडोशाला दबा धरुन बसली. तितक्यात ओवी तिथे आल्यावर तिच्याशी खेळतांनाही मांजर चिमण्यांवर एक डोळा ठेवून होतीच. पण त्या काही तिच्या हाती लागल्या नाहीत.

या पक्ष्यांचं आणि प्राण्यांचंही एक वेळापत्रक असावं बहुधा. या दरम्यान दुसरी दांडगी मांजर बाजूच्या बंगल्याशी सामायिक असलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात एका विशिष्ट जागी बसलेली असते. एक बुलबुलही असाच एका निष्पर्ण झाडाच्या खोडावर बसलेला असतो. दुसऱ्या फेरीच्या दरम्यान पूर्ण काळेभोर पंख असलेलं पांढरं कबूतर बाजूच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका विशिष्ट खिडकीत येऊन बसतं. टाळेबंदीच्या काळात त्यांचं हे नैसर्गिक वेळापत्रक बदललं होतं का याचा अभ्यास करायला हवा कुणीतरी.

चालणारीची रोजनिशी

उद्वाहनातून बाहेर पडल्यावर खाली सुरक्षारक्षकाजवळ उभारलेल्या जंतूनाशकाने हात साफ करून चालायला सुरुवात केली. एक सुरक्षारक्षक झाडांना पाणी घालत होता. दुसरा सफाई कामगारासोबत शिळोप्याच्या गप्पा हाणत येणाऱ्याजाणाऱ्यांना हात साफ करायला, वहीमध्ये नोंद करायला सांगत होता, त्यांचं तापमान मोजत होता. पाणी फारच वाया चाललंय असं मनात आलं. हात हलवत चालत राहिले. बाग जवळ आली. एक साळुंकी बागेतल्या गवतात काहीतरी शोधून खात होती. तिच्या मागे नुकतीच शिकार करायला शिकलेली मांजर तिच्यावर डोळा ठेवून दबा धरून बसली होती. तेवढ्यात पिंपळाचं एक पान पक्ष्याच्या सफाईने गिरक्या घेत खाली पडलं म्हणून मांजरीने वळून पहायला आणि साळुंकी उडून जायला एक गाठ पडली.

या कोपऱ्यावर जरा भीतीच वाटते. नकळत मुलगी आणि नवरा जवळपास आहेत का पाहिलं. परवा इथेच दुसरी जरा दांडगी मांजर तीरासारखी धावत जातांना दिसली. पाठोपाठ सुरक्षारक्षकही धावत आले. मागून चालत आलेली लेक म्हणाली, “नाग होता तिथे. त्याच्यामागे लागली होती.” मला काही दिसला नाही. पण तेव्हाची भीती काही मनातून गेली नाही. दर फेरीला तिथे पोचल्यावर ती भीती वाटतेच. ती भीती मनात तशीच दडपून चालत रहाते.

फेरी पूर्ण होता होता इयनची आई दिसली. थोड्या गप्पा झाल्या. इयन कसा आहे विचारल्यावर म्हणाली, “आत्ताशी आलाय घरी. गेले सहा महिने माझ्या आईवडीलांकडे होता. आम्ही घरून काम करतो ना. त्याला कोण सांभाळणार? म्हणून तिथे ठेवलं. आता एक मुलगी मिळालीय सांभाळायला. तिची चाचणी करुन घेतलीय. आता ती चोवीस तास आमच्याबरोबर रहातेय म्हणून बरंय. पळते आता, रडत असेल तो. अजून तिची सवय नाही झालीय ना त्याला.” टाळेबंदीपूर्वी बागेत इयनसोबत घालवलेले दिवस आठवले. इयनची आजी अंधेरीहून सकाळी सुनेकडे यायची. सून संध्याकाळी घरी यायच्या आधी नातवाला घेऊन बागेत यायची. मग इयन म्हणजे आम्हा सर्वांचं खेळणंच असायचं. त्याचं ‘क्रोss’ ‘मूssन’ असं हात दाखवून ओरडणं चाले. सीसॉच्या दांडीवर बसलेल्या दयाळ पक्ष्यालाही तो क्रो म्हणायचा ते आठवून आत्ताही हसू आलं.

चौथी फेरी घालतांना कुंपणापलीकडल्या रस्त्यावरुन जाणाऱ्या जोडप्यातल्या बाईने “हौ आर यू?” अशी साद घातली. मास्कमुळे कळलंच नाही आधी कोण ते. मग ध्यानात आलं की ती आमच्या जेष्ठ नागरिकांच्या बाकाजवळ आमच्याशी गप्पा मारायला थांबणारी जेनी होती. तिने बहुधा माझ्या उंचीमुळे ओळखलं असावं.

फेऱ्या घालता घालता सहज वर लटकणाऱ्या तारेकडे लक्ष गेलं. तर ओळीने लांब शेपटीचे पोपट बसले होते. त्यांचा शेपटीकडचा भाग पिवळा होता. शिक्षक वर्गात यायच्या आधी शाळेच्या बाकावर उनाडक्या करीत बसलेल्या मुलांसारखे उनाडक्या करीत होते बराच वेळ.

तरी अजून शेजारच्या रो हाऊसमधल्या लोकांनी छपरावर पक्ष्यांना शेव खायला घातली नव्हती. नाहीतर कावळे, साळुंख्या, चिमण्या सगळेच शेव खायला गोळा होतात कलकलाट करीत.

चला आता शेवटची फेरी झाली की संपला जिवंत जगाशी संबंध.

धबधबा

आमची ही मैत्रीण एके काळी प्रचंड वाचणारी, वाचून वाचून जाड बुडाचा चष्मा डोळ्यांवर चढलेला. गावी हौसेने बांधलेल्या घरातल्या गच्चीवर एक ग्रंथालय करण्याचं स्वप्न पहाणारी. पण त्या दिवशी तिला विचारलं “काय वाचतेहेस सध्या?” तर तिचं उत्तर ऐकून दचकलेच एकदम. “काही नाही गं, वॉट्स अॅपवर येतं तेच वाचते. खूप असतं तिथे काही काही.”

तेही खरंच आहे म्हणा. तिथे काय नसतं? कविता असतात, दुसऱ्यांच्या कविता ऐकवणारे असतात, पुस्तकांचे दुवे दिलेले असतात. अख्खं पुस्तक वाचायचा किंवा अख्खा लेख वाचायचा कंटाळा असलेल्यांसाठी काही लोक दुसऱ्यांच्या लेखातले, पुस्तकातले ‘निवडक’ भाग, वाक्यं किंवा वाक्यांश टाकत असतात, (तेवढ्यावरून तो लेख, ते पुस्तक वाचल्याचा दावा आपल्यालाही करता येतो.) ‘जिवंत’ नाटकं असतात, बसल्या जागी जगभर फिरून यायची सोय असते (प्रवासवर्णन कशाला वाचायचं उगाच), वेगवेगळ्या विचारवंतांच्या नावावर खपवलेले ‘सुविचार’ असतात (त्यामुळे वैचारिक वगैरे काही वाचायची गरज उरत नाही.), संगीताच्या मैफिली असतात. नृत्याचे वेगवेगळे प्रकार असतात. एक मिनिटात करता येणाऱ्या कलाकृती, पाच मिनिटात उरकता येणाऱ्या पाककृती सगळंच असतं. आमच्या लहानपणी फूटपाथवर “कोई भी चीज उठाओ, बे बे आना” असं ओरडणाऱ्या विक्रेत्याकडे असत, तशा सगळ्या जगातल्या यच्चयावत गोष्टी असतात. काही लोकांकडे तर अशा सगळ्या गोष्टींचा धबधबाच सुरु असतो. एकामागोमाग एक कोसळत असतात. कधी कधी त्यात एखादी ‘मोलाची आणि मह्त्त्वाची’ गोष्ट हरवून जाते.

एरव्ही आपण खरंखुरं पुस्तक वाचतो, गाणं ऐकतो, नृत्याच्या आस्वाद घेतो, नाटक पहातो तेव्हा वाचणाऱ्या, ऐकणाऱ्या किंवा पहाणाऱ्या रसिकाच्या मनात ती कलाकृती पुन्हा नव्याने घडत जाते, तिच्या अर्थाची वर्तुळं विस्तारत जातात. इथल्या धबधब्यात नहाणाऱ्यांना फक्त पाणी अंगावरुन जाऊ द्यायचं असतं. एकतर त्यांच्यापाशी फार वेळ नसतो (बरंच काही वाचायचं, पहायचं असतं ना ) शिवाय काही पोस्टी उघडल्या की नको बाई किंवा नको बुवा, काही फार इंटरेस्टिंग नाही वाटतं असं म्हणून पुढे सरकता येण्याची सोय असते. त्यामुळे धबधब्यात उड्या मारीत बसायचं न बाहेर पडायचं. पण गंमत म्हणजे एखादी कलाकृती फॉरवर्डतांना मात्र तिची मालकी त्यांनी स्वतःकडे घेऊन टाकलेली असते. म्हणजे ते नाव मूळ कलाकाराचं देतातही कित्येकदा. पण वाहव्वा मात्र त्यांना स्वतःला अपेक्षित असते. ते पुन्हा पुन्हा कोण अंगठे देतंय, कोण बदाम पाठवतंय, कोण वा म्हणतंय, कोण तू फारच थोर आहेस हे कुठून सापडतं तुला असं म्हणतंय, इतकंच नाही तर कोण तू काय थोर लिहिलंयस/केलंयस असं म्हणतंय ते तपासून पहातात. कोण दुर्लक्ष करतंय हे ध्यानात ठेवतात. अशी दाद न देणाऱ्यांचा त्यांना मनापासून राग येतो. त्यांचा अहंकार त्यामुळे दुखावला जातो. तरीही अर्थात ते हार मानत नाहीत. पुन्हा वेगळं काहीतरी फॉरवर्डतात. या वेळी दाद मिळेलच अशी त्यांना खात्री असते. काही लोकांकडून मिळतेही, काही लोकांकडून मिळत नाही. मग ते कायम आपल्या संपर्कातल्या सर्वांना आवडेल अशा पोस्टच्या शोधात रहातात. त्यांच्या आयुष्यातला सगळा वेळ यातच खर्ची पडतोय हे त्यांच्या ध्यानातही येत नाही. मुख्य म्हणजे स्वतः काही नवं वाचण्याची पहाण्याची ऊर्मि नष्ट होतेय हेही त्यांना उमगत नाही.

यांच्या व्यतिरिक्त खरा धोकेबाज गट आहे तो म्हणजे गुगलवरुन माहिती मिळवून ती एकत्र करुन लेख लिहिणारे किंवा खरं तर एखादा व्हिडियो बनवून ती माहिती आपणच शोधून काढलीय अशा प्रकारे पसरविणारे. ती वाचणारेही त्यांच्या ‘ज्ञानाचा साठा’ पाहून विस्मयचकीत आणि आदरभावाने सदगदीत होतात. अशा आपण खरोखरीच ‘ज्ञानी’ आहोत असा समज असणाऱ्यांना तर काही अभ्यास करायची गरजच भासत नसते. शिवाय वर सांगितलेल्या गटातले लोक त्यांचं फॉर्वर्डतात तेव्हा त्यांनी या पोस्टची मालकी स्वतःकडे घेऊन टाकल्याने त्यांचीही तीच भावना असते.

दुसरा गट आहे काही तथाकथित विचारवंतांचा, लेखकांचा (खरं तर लिहिणारे सगळेच लेखक, पण हे आभाळातून पडलेले). यांना कधी कधी काही सुचतच नाही. मग ते एक गट तयार करतात. एखाद्या विषयाचं सूतोवाच करतात. काही विचारशक्ती शिल्लक उरलेले लोक हिरीरीने आपली मतं मांडतात, मग यांच्या ‘विचारांना दिशा’ मिळते. मग ते ‘स्वयंस्फूर्ती’ने आणि ‘आत्मनिर्भर’ होऊन एक लेख लिहून टाकतात.

असे लाखो विचारवंत या विद्यापीठीत आज घडीला घडत आहेत. त्यामुळे पुस्तकांची गरज उरलेली नाही अगदीच. प्रकाशकांनी याची कृपया नोंद घ्यावी.

नोकरीपेशा विद्यार्थी

सत्तरच्या दशकात आमच्यासारखे बरेच लोक नोकरी करून शिकत असत. लालबाग परळसारख्या कामगार वस्तीत घरची ओढगस्तीची परिस्थिती असेच. शिवाय घरात मुलंही जास्त असत. त्यामुळे शिकायची इच्छा असणाऱ्या मुलांना कमाई करून शिकण्यापलिकडे दुसरा पर्याय नसे. मुलं सहसा ‘पेपरची/दूधाची लाईन टाकणं’ म्हणजे घरोघरी वर्तमानपत्र, दूध पोहोचतं करणं, किंवा सरकारी दूध विक्री केंद्रावर काम करणं ( हे काम मुलीही करीत असत, माझी एक वर्गमैत्रीण वासंती कदम ही आमच्या घराजवळच्या दूध विक्री केंद्रावर काम करीत असे) अशी कामं करीत आणि रात्रशाळेत शिकत. मुली हातात कला असेल तर कागदी किंवा कापडी फुलं, बाहुल्या करणं, वाळवलेल्या पिंपळाच्या पानावर चित्र रंगवणं किंवा भिंतीवर टांगण्यासाठी केल्या जाणाऱ्या लाकडाच्या कटआऊटवर चित्रं रंगवणं (हे बहुधा एअर इंडियाचा महाराजा किंवा बाहुली किंवा स्त्रीच्या आकारात असत, नंतर त्यांची जागा मिकी, डोनाल्ड वगैरेंनी घेतली), शिवणकाम, भरतकाम करणं अशी कामं करून घरखर्चाला हातभार लावत. शालेय शिक्षण संपलं की खरा प्रश्न आ वासून समोर उभा ठाके. महाविद्यालयाचा खर्च परवडत नसे. आर्थिक दृष्ट्या मागासलेले म्हणून फीमध्ये सूट मिळाली तरी कपडे, वह्यापुस्तकं इ. खर्च असतच. सुदैवाने त्या काळी तुम्ही किमान मॅट्रीक पास असाल तर तुम्हाला छोट्या नोकऱ्या मिळणं अवघड जात नसे. त्यातून टंकलेखन, लघुलिपी वगैरेंच्या सरकारी परीक्षा दिल्या असतील तर मग नक्कीच अशा नोकऱ्या मिळत. त्या काळी अशा लोकांसाठी काही ठराविक महाविद्यालयांत का होईना पण एक चांगली सोय होती. ती म्हणजे सकाळचे किंवा संध्याकाळचे वर्ग. त्यामुळे दिवसा नोकरी करून शिकता येई. त्याकाळी समाजवादी विचारसरणीचा पगडा राज्यकर्त्यांवर असल्याने दुर्बल घटकांचा विचार अग्रभागी असे. आदर्शवाद शिल्लक होता. त्यामुळे कामगारवस्तीत, बैठ्या चाळीत रहाणाऱ्या खालच्या स्तरातल्या विद्यार्थ्यांसाठी या सोयी असत. उदाहरणार्थ कीर्ती महाविद्यालयात जवळच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील मुलं येत. महर्षि दयानंदमध्ये गिरणगांवातली. मी ज्या दोन महाविद्यालयात शिकले त्या दक्षिण मुंबईतल्या जयहिंद आणि एल्फिन्स्टन या दोन्ही महाविद्यालयात सकाळचे वर्ग घेतले जात. या महाविद्यालयांमध्ये दिवसाच्या वर्गांना दक्षिण मुंबईत रहाणारी उच्चभ्रू मुलं येत असली तरी काही अपवाद वगळता सकाळच्या वर्गांना गिरगावातल्या, सँडहर्स्ट रोड, मस्जिद बंदर इथल्या  चाळींमधली मुलं येत. अपुऱ्या उत्पन्नात, अपुऱ्या जागेत आयुष्य कंठणाऱ्या कुटुंबांतून ती येत असत. या सगळ्यातून कुटुंबाला, स्वतःला बाहेर काढण्यासाठी चांगलं शिक्षण घेतलं, तर चांगल्या पगाराची, चांगल्या हुद्द्यावर नोकरी मिळेल हे ध्येय त्यांच्या नजरेसमोर असे. एरव्ही दिवसा पूर्ण वेळाचे वर्ग असत. एल्फिन्स्टनमध्ये वामन चव्हाण, सुरेश चव्हाण, सरला गोडबोले, मेघा पाटील, अरूण गायकवाड, पांडुरंग वैद्य, सिद्धेश्वर पाध्ये, शांताराम बर्डे हे माझे सगळेच  वर्गमित्र कुठे ना कुठे नोकरी करीत होते. अरूण रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये, सरला सैन्यदलाच्या लेखा कार्यालयात, वामन, सुरेश बँकेत, तर मी पाणी शुद्ध करणाऱ्या क्लोरीवॅट नावाच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी दारोदार फिरणाऱ्या मुली तयार करण्याचं, स्वतः महिलामंडळं आणि इतर संस्थांमध्ये जाऊन त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात डेमो देऊन विक्रीचं काम करीत असे. दिवसा शिकणाऱ्या मित्रांमध्ये नाटककार राजीव नाईक, कलिका पटणी, नंदकुमार सांगलीकर होते. कधी कधी आमच्या बाई विजया राजाध्यक्ष आमची एकत्र व्याख्यानं सकाळी घेत असत तेव्हाच या विद्यार्थ्यांशी आमचा संबंध येई. एरव्ही आमचं अस्तित्व महाविद्यालयात जाणवणं, आमच्याविषयी दिवसा शिकणाऱ्या मुलांना माहीत असणंही कठीणच  असे.

सकाळचे वर्ग पहाटे सहा वाजल्यापासून सुरू होत. त्यामुळे घरातून पाचच्या सुमारास निघावं लागे. त्याकाळी मुंबईतल्या लोकलच्या बायकांच्या वर्गात पहाटे फारशी गर्दी नसे. तरीही कुलाब्याला मासे आणायला जाणाऱ्या कोळणी, सकाळच्या पाळीत काम करणाऱ्या रूग्णसेविका, मुंबई टेलिफोन निगममध्ये सकाळच्या पाळीत काम करणाऱ्या स्त्रिया आणि आमच्यासारखे विद्यार्थी असत. पण बोरीबंदरला उतरल्यावर एल्फिन्स्टन महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता निर्मनुष्य आणि धोकादायक असे. सहसा मी बसने जात असे. पत्रकार आणि लेखक अशोक जैन यांची बहीण कमल कित्येकदा माझ्यासोबत असे. पण कधी पैशांची तुटार असली की चालत जायची पाळी येई. आम्ही नोकरी करीत असलो तरी त्या काळी आमच्यासारख्यांना घरी पगार द्यावा लागे व त्यातून काही ठराविक रक्कम येण्याजाण्याच्या व इतर खर्चापोटी घरातील वडीलधारी व्यक्ती देत असे. त्या पैशात भागवावे लागे. मला त्याकाळी वडील पंचवीस रूपये देत असत. त्यातले लोकलचा प्रवास धरून येण्याजाण्याच्या खर्चासाठी दहाबारा रुपये खर्च  होत. सकाळीच घराबाहेर पडल्यामुळे न्याहरी केलेली नसे. मग साडेनऊच्या सुमारास व्याख्यानं संपली की जोरात भूक लागलेली असे. जवळपास सगळ्यांचीच स्थिती माझ्यासारखी असल्याने महाविद्यालयाच्या महागड्या कँटीन किंवा उडप्यापेक्षाही इराण्याकडचा कटींग चहा आणि बनमस्का दोघात मिळून घेणं स्वस्त पडत असे. अर्थात तो मागवायच्या आधी आम्ही आमच्या खिशाचं काय म्हणणं आहे ते ध्यानी घेत असू. माझी फिरती नोकरी असल्याने मी अर्धं काम उरकून घरी जाऊन जेवून पुन्हा बाहेर पडत असे. बाकीचे आपापल्या कामावर जात. घरी जायला संध्याकाळ उजाडत असे. त्यात तुम्ही लघुलिपिक म्हणून काम करीत असाल किंवा निदान परीक्षा दिलेली असेल तर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सराव करणं गरजेचं असे. त्यात घरी पोचल्यावर हाती आलेला मोजका वेळ निघून जाई.

माझा  नवरा हरिश्चंद्र थोरात हाही त्यावेळी बॉम्बे स्टेशनरी मार्ट या फोर्टातल्या प्रसिद्ध दुकानात नोकरी करून कीर्ती महाविद्यालयाच्या संध्याकाळच्या वर्गात शिकत असे. संध्याकाळच्या वर्गांना जाणाऱ्यांचीही परिस्थिती जवळपास अशीच असे. घरून खाऊन बाहेर पडत. कामावरून परस्पर महाविद्यालयात जातांना आमच्यासारखेच कुठेतरी थोडे खाऊन घेऊन पळत पळत जात. त्यातून काही महत्त्वाच्या कामानिमित्ताने कार्यालयात थांबावं लागलं की महाविद्यालयात वर्ग सुरू झाल्यावर गुपचूप खालच्या मानेनं वर्गात घुसावं लागे. मी एम.ए. करीत असतांना जनता साप्ताहिकात नोकरी करीत असे तेव्हा माझ्यावरही हा प्रसंग वरचेवर येई. कारण हे वर्ग संध्याकाळी घेतले जात. सुदैवाने ते वर्गही एल्फिन्स्टनमध्येच घेतले जात आणि तिथे वर्गाला एक मागचं दार होतं. तिथून घुसून मागच्या बाकावर बसणं सोयीचं होई. पण त्यामुळे शिकणं फारसं गंभीरपणे मनावर न घेणारे हे उनाड विद्यार्थी आहेत असा काही प्राध्यापकांचा समज होई. माझ्या आणि हरिश्चंद्र थोरातांच्या बाबतीत आमच्या बाई सरोजिनी वैद्य यांचा असा समज झाला होता. अर्थात आमच्या उत्तरपत्रिका पाहिल्यावर तो दूर झाला ती गोष्ट वेगळी.

एक गोष्ट आमच्या बाजूची असे ती म्हणजे अशा नोकरी करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल आमच्या शिक्षकांना विशेष ममत्व असे आणि ते आम्हाला पुस्तकं पुरवित, विशेष वेळ देऊन मार्गदर्शन करीत. माझ्या महाविद्यालयातील प्राध्यापिका सरोजिनी शेंडे आणि विजया राजाध्यक्ष या कधीही आमच्यासाठी वेळ द्यायला तयार असत. तोच अनुभव थोरातांनाही रमेश तेंडुलकर, सुभाष सोमण या त्याच्या गुरूंकडून येत असे. हे गुरूजन प्रसंगी विद्यार्थ्यांची फीसुद्धा आपल्या खिशातून भरत असत. तसंच त्या काळी आम्ही एखाद्या विषयावर एखाद्या शिक्षकाचं प्रभुत्त्व असेल तर खुशाल दुसऱ्या महाविद्यालयातही जाऊन बसू शकत होतो. लावणीवरचे शांताबाईंचे किंवा नाटकांवरचं पुष्पाबाई भाव्यांचं व्याख्यान ऐकायला, तेंडुलकर सरांना मर्ढेकरांच्या कवितेवर बोलतांना ऐकायला असे कुणाकडून कळल्यावर आणि जमत असेल तर आम्ही इतरत्र जाऊन व्याख्याने ऐकत असू. एकदा तर सौंदर्यशास्त्र हा आमचा विषय नसतांनाही डॉ. रा.भा. पाटणकर सरांची परवानगी घेऊन आम्ही त्यांचं व्याख्यान ऐकलं होतं.

दुसरं म्हणजे त्या काळी बहुतांश महाविद्यालयांची ग्रंथालयं ही रात्री आठ वाजेपर्यंत उघडी असत आणि ग्रंथपालही मदत करीत. कीर्ती महाविद्यालयाच्या बर्वे सरांसारखे ग्रंथपाल तर वाचणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांना मदत करायला तत्पर असत.

असं असलं तरी नोकरीपेशा विद्यार्थ्यांना नोकरीच्या वेळा सांभाळून व्याख्यानांना हजर राहू शकण्याचीच मारामार असल्यामुळे या सगळ्याचा लाभ घेणं फारसं जमत नसे. बहुतांश विद्यार्थी त्यांच्या नोकरीत वेतनवाढ किंवा पदोन्नतीसाठी पदवी मिळवण्याचा खटाटोप करीत असले तरी निव्वळ शिक्षणाची आस असलेलेही काही कमी नव्हते. त्याकाळी शनिवारचा दिवस बहुधा अर्ध्या दिवसाच्या कामाचा असे आणि रविवारी सुट्टी असे. सुदैवाने आत्तासारखे कामाचे तास अनियमित नसत. तेव्हा शनिवारचा अर्धा दिवस आणि रविवारचा पूर्ण दिवस याचा उपयोग अभ्यासासाठी केला जाई.

आम्हा मराठीच्या विद्यार्थ्यांना दादर पूर्वेला असलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा मोठाच आधार असे. ते रविवारीही उघ़डं असे आणि रात्री आठ वाजेपर्यंत तिथल्या संदर्भ विभागात बसून वेगवेगळी पुस्तकं घेऊन अभ्यास करता येई. तिथला कर्मचारी वर्गही तत्पर असे. आपल्याला हव्या असलेल्या विषयावरची पुस्तकं आम्हाला माहीत नसली तरी तो विषय सांगितल्यावर तेच पुस्तकं सुचवीत किंवा किमानपक्षी पाच सहा पुस्तकं आणून देत. पाचारणे, जोशीबाई यांच्यासारख्या जेष्ठ ग्रंथपालांइतकेच ज्ञानदेव खोबरेकर, भगत हे आमचे तरूण मित्रही त्याबाबतीत माहीतगार होते. अर्थात त्यावेळी ग्रंथालयाची ती इमारत हे साठोत्तरी कवि, लेखकांचं एक मोठं केंद्र होतं. समकालीन प्रसिद्ध कवी, लेखकांची तिथे येजा असे. अनियकालिकांची चळवळ चालविणाऱ्या तुळशी परब, सतीश काळसेकर, मनोहर ओक, चंद्रकांत खोत यांच्यासह नामदेव ढसाळ, अरूण कांबळे, दया पवार, बाबूराव बागूल, अर्जुन डांगळे वगैरे मंडळी येत असत. रहस्यकथा लिहिणारे श्रीकांत सिनकर तिथे नेमके काय वाचायला येत ते माहीत नाही. पण तेही तिथे पडीक असत. संग्रहालयाच्या बाजूच्या पायरीवर कवी गुरूनाथ धुरी कायम मुक्कामी असत. त्यामुळे त्याला कवीचा कट्टा हे नाव मिळालं. प्रसिद्ध समीक्षक वसंत पाटणकर आणि त्यांचे मित्र नीळकंठ कदम, चंद्रकांत मर्गज, अशोक बागवे यांचा गटही तिथे असे. या कट्ट्यावर संध्याकाळी उशिरा शांताराम पंदेरे आणि त्यांच्या युक्रांदच्या कार्यकर्त्यांचा अड्डाही जमत असे. तिथल्या सभागृहातही साहित्याशी संबंधित विविध कार्यक्रम होत असत. तिथेच मराठी वाङ्मय कोश, इतिहास संशोधन मंडळ यांची कार्यालयं होती. या सगळ्या वातावरणाचा परिणाम आमच्यावर होत होता. त्यामुळे आम्हीही वेगवेगळ्या साहित्यिक, सामाजिक चळवळींकडे ओढले जात होतो. आमचेही गट असत. वामन चव्हाण, प्रकाश कार्लेकर, शशिकला कार्लेकर, तुकाराम जाधव, विजय नाईक, विजय पाटील, अरविंद रे अशा काहीजणांचा आमचाही गट होता आणि मध्येच अभ्यासाची पुस्तकं टेबलावर तशीच टाकून खाली चहावाल्याकडे तावातावाने चर्चा करण्यात आमचा वेळ जात असे हे खरं असलं तरी अभ्यासही होत असे. त्या काळात एक गोष्ट करता आली ती म्हणजे एक एक कवी (त्यात समकालीनांसोबत संत, पंत आणि तंतही आले), लेखक निवडून त्याच्या समग्र साहित्याचे वाचन, त्यावर आलेली समीक्षा किंवा इतर लेखन हे वाचता आलं. अर्थात हे ग्रंथसंग्रहालयामुळेच शक्य होऊ शकलं. पण सगळ्या विषयाचे विद्यार्थी आमच्याइतके भाग्यवान नसत.  फक्त पदवी मिळवायचा ज्यांचा उद्देश असे ते गाईड वाचून परीक्षा देण्याचा पर्याय स्वीकारत.

जरी आमचं अस्तित्व महाविद्यालयात जाणवत नसलं तरी आमच्या परीने आम्ही वेळात वेळ काढून विविध उपक्रमात सहभागी होत असू. मी जयहिंदमध्ये असतांना तर  आमच्या सकाळच्या सत्रात शिकणारे, बीपीटीमध्ये नोकरी करणारे वामन आडनावाचे मित्र आमच्या मराठी वाङ्मय मंडळाचे चिटणीस होते. मीही एल्फिन्स्टनच्या वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमात असे. महाविद्यालयातर्फे मला मराठी आणि हिंदीतल्या वेगवेगळ्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धा, वादविवाद स्पर्धांना पाठवलं जाई. माझ्या कामाच्या वेळा तशा लवचिक असल्याने ते जमतही असे.

असं असलं तरी दिवसा पूर्ण वेळ महाविद्यालयात शिकणाऱ्या, बाकीचं काही व्यवधान नसलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली निर्भेळ मजा आम्हाला फारशी अनुभवायला मिळत नसे. संपूर्ण वेळ विद्यार्जनासाठी देऊ शकणे हा खरे तर प्रत्येक तरूणाचा हक्क असायला हवा. त्यासाठी शासन आणि समाजाने काही सोयी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. कारण शिक्षण हे काही फक्त अर्थार्जनाचा हेतू समोर ठेवून करायची गोष्ट नव्हे. शिक्षण तुम्हाला समाजाकडे, आयुष्याच्या विविध पैलूंकडं पहाण्याची एक अंतर्दृष्टी देते. ही अंतर्दृष्टी तरूणांना लाभणं  समाजाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे. आजही असे विद्यार्थी असतात. महाविद्यालयांच्या वेळा अशा विद्यार्थ्यांना अनुकूल नसल्या तरी काही विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्यांच्या वेळा अशा असतात की पूर्ण वेळ महाविद्यालयात जाऊनही नोकरी जमू शकते. जसं की दुपारपर्यंत शिकण्यासाठी वेळ घालवून संध्याकाळी वकील, डॉक्टर किंवा सनदी लेखापाल अशा व्यावसायिकांकडे अर्धवेळ नोकरी करणं. मॉलमध्ये किंवा कॉल सेंटरमध्ये संध्याकाळी किंवा रात्रपाळीत काम करणं. पण आपली शिक्षणव्यवस्था अशा विद्यार्थांचा विचार करत नाही. त्यांना नोकरी करून नीट शिक्षण घेता यावं यासाठी सकाळची किंवा संध्याकाळची वेगळी सत्रं महाविद्यालयांमध्ये फारशा ठिकाणी उपलब्ध नाहीत.

दूरशिक्षणाची सोय त्यावेळेला नुकतीच सुरू झालेली असली तरी प्रत्यक्ष महाविद्यालयात असणं, आजूबाजूला इतर विद्यार्थी असणं, प्राध्यापक समक्ष पुढे असणं या जिवंत गोष्टी दूरशिक्षणात नसत. संध्याकाळचं किंवा सकाळचं महाविद्यालय आम्हाला चैतन्याने रसरसलेलं वाटे. त्याकाळी ही सोय नसती तर आमच्यापैकी अनेकांना शिकताच आलं नसतं. कदाचित दूरशिक्षणासारख्या व्यवस्थेमधून पदव्या मिळवता आल्या असत्या. नाही असं नाही. पण मग शिकणं ही गोष्ट एवढी अर्थपूर्ण, आनंददायक आणि सर्जनशील झाली नसती. सकाळ संध्याकाळच्या या सत्रांचे माझ्यासारख्या लोकांवर खूप मोठे ऋण आहे.

या निम्न किंवा निम्नमध्यम वर्गातल्या नोकरीपेशा विद्यार्थ्यांहून वेगळे असे नोकरीपेशा विद्यार्थीही आहेत. यांना चांगला लठ्ठ पगार, सोयीसवलती असतात. पण आजकाल अशा नोकऱ्या टिकवायच्या आणि त्यातही वरच्या शिडीवर जायचं तर त्या त्या पेशाला अनुकूल अशी अधिक शैक्षणिक पात्रता मिळवत रहावी लागते. बँका, माहिती तंत्रज्ञान कंपन्या इ. ठिकाणी काम करणारे अधिकारीही आजकाल व्यवस्थापनाची पदवी घेऊ लागले आहेत. प्रसंगी नोकरी सोडून ते ही पदवी घेतात. अर्थात पदवी मिळाल्यावर  अधिक चांगल्या पगाराची नोकरी त्यांच्याकडे चालत येते. याशिवाय बँकांमधल्या कामाशी संबंधित वित्त व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन असे अभ्यासक्रमही केले जातात. काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना परदेशी पाठवतात. जर्मनी, चीन, जपान इ.ठिकाणी काही वर्षांसाठी जावं लागलं तर तिथली भाषाही शिकून घ्यावी लागते. अशा भाषांचेही अभ्यासक्रम असतात. हे विविध अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खाजगी संस्थांसाठी हा एक मोठा व्यवसाय असतो आणि इतर कुठल्याही व्यावसायिकांप्रमाणे  या खाजगी संस्था आपल्या गिऱ्हाईकांचा खास विचार करतात, त्यांच्या सोयीनुसार अभ्यासक्रमाच्या वेळा ठेवल्या जातात किंवा महाजालावर त्यांची सामग्री उपलब्ध करून दिली जाते. हे थोडे महाग असले तरी ज्या वर्गासाठी ते असतात त्यांना ते परवडू शकतात. असं असलं तरी अशा नोकऱ्या करणाऱ्यांच्या कामाच्या वेळांना मर्यादा नसते, ताणही बराच असतो. हे सगळं सांभाळून अभ्यासक्रम पुरा करणं हे जिकीरीचंही होतं, शारिरीक, मानसिक आरोग्यावर ताण पडतो हेही तितकंच खरं.

या सगळ्यांव्यतिरिक्तही अशा विद्यार्थ्यांचा एक वेगळा वर्ग आहे. बरेचदा आपल्या मनात असूनही कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा आईवडीलांच्या अपेक्षा यामुळे आपल्या आवडीचं शिक्षण घेता येत नाही. मग तडजोड करावी लागते. परंतु आयुष्यात स्थैर्य आल्यावर किंवा थोडा वेळ मिळाल्यावर काही लोक आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून आपल्या आवडीचा विषय शिकतात किंवा छंद जोपासतात जसं की गायन, नृत्य, छायाचित्रण. हे करणाऱ्या लोकांना आपलं स्वप्न पूर्ण करायचं असल्याने वेळ, वय वगैरे गोष्टींचं बंधन वाटत नाही. आमच्या ओळखीचे एक मूत्ररोगविशेषज्ञ दिवंगत डॉ. टिळक यांनी वयाच्या पन्नाशीनंतर मराठी साहित्याचा अभ्यास करायला घेतला. त्यांच्या व्यवसायात त्यांचं मोठं नाव होतं, त्यांच्याकडे बरेच रूग्ण उपचार घेत असत, त्यामुळे त्यांना काम आटोपून अभ्यास करायला वेळ होत असे. कुणीतरी सुचवल्याने त्यांनी माझ्या नवऱ्याचं मार्गदर्शन घेतलं. मराठी साहित्यात नुसती पदवी घेऊनच ते थांबले नाहीत तर विद्यावाचस्पती ही पदवी म्हणजे डॉक्टरेटही त्यांनी मिळवली. असेही बरेच लोक असतात.

हे सगळं असलं तरी समाजाचा खालचा स्तर अजूनही शिक्षणापासून वंचित आहे. कारण पोटाची भ्रांत त्यांना धड शिकू देत नाही. आमच्याप्रमाणेच अजूनही कित्येक मुलंमुली लहानपणीच पोटापाण्याच्या उद्योगाला लागतात. त्यामुळे शिक्षण घेणं त्यांना शक्य होत नाही. कारण आज शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे. शिक्षणसंस्था शिक्षणसम्राटांच्या हाती आहेत. रात्रशाळा, सकाळची किंवा संध्याकाळची महाविद्यालयं बंद पडत चालाली आहेत. महापालिकेच्या शाळा बंद पडत चालल्या आहेत. कारण इंग्रजीत शिक्षण हेच खरं शिक्षण असा समज दृढ करून देण्यात आल्याने झोपडपट्टीत राहून अपार कष्ट करणाऱ्या आईबापांनाही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांनी शिकावं असं वाटतं आणि ते परवडेनासं झालं की ही मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांची अवस्था त्रिशंकूसारखी होते.  शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर निम्न वर्गातल्या विद्यार्थ्यांची जी गळती होते आहे ती त्याच वेळी रोखली जायची असेल तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जिचा पाया घातला ती कमवा आणि शिका  योजना महाविद्यालयीनच नव्हे तर शालेय पातळीवरही अंमलात आणली गेली पाहिजे. म्हणजे आईवडीलांना पैशाअभावी मुलांचं शिक्षण थांबवावं लागणार नाही. नोकरीपेशा विद्यार्थ्यांचा एक नवा, आशादायी वर्ग तयार होईल.