अभावग्रस्तांचं खाणं

माझ्या बहिणीला स्वेच्छानिवृत्ती घ्यायची होती. पण निर्णय होत नव्हता. तर माझे मेहुणे म्हणाले, “मीठभाताला काही कमी तर पडणार नाही, मग झालं तर!”  ते असं म्हणाले असले तरी मध्यमवर्गाला अगदी मीठभात खाऊन रहायची पाळी सहसा येत नसते. पण शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या अभावग्रस्तांना तर त्यातलं मीठही कधी कधी मिळायची पंचाईत असते.  खेडेगांवातल्या गरीब शेतकऱ्यांच्या बायका शेळ्या, कोंबड्या पाळून गावच्या किंवा तालुक्याच्या आठवडे बाजारात शेळ्या, कोंबड्या, अंडी विकून मीठमिरचीची सोय करतात. पण आदिवासी आणि गावकुसाबाहेरच्या आयाबायांना तर तेही करता येत नाही. अर्थात काही आदिवासी जमाती मीठही खात नाहीत.

खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या एका वाहिनीवर एका कार्यक्रमात पाहिलं होतं. एक मुलगी आदिवासी पाड्यात गेली होती. तिथल्या एका घरातल्या बाईला हाक मारून म्हणाली, “मग काय केलंस आज ताई जेवायला?” ग्रामीण भागातल्या लोकांच्या जिव्हाळ्याने त्या बाईने म्हटलं, “जेवशील का आमच्याबरोबर?  ये तर मग.” त्या बाईने खेकडे पकडले होते. ते तिने साफ करायला घेतले. तोवर चुलीवर भात रटरटत होता. गरमागरम वाफाळलेला भात झाल्यावर तिने पानात ते नीट केलेले खेकडे ठेवले आणि त्यांच्यावर गरमागरम भात टाकला. मुलीला म्हणाली, “घे. खा.” त्या मुलीला कॅमेऱ्यासमोर तरी तो चाखून फार चांगला लागतोय म्हणावं लागलं. मला ते पाहून आठवलं की जपानमध्ये नाश्त्यासाठी अशाच प्रकारे गरमागरम भातावर अंडं फोडून ते खायला देतात. पण ग्रामीण भागातल्या बायका कोंबड्या पाळत असल्या तरी अंडी खाणं त्यांच्या नशिबात नसतं. ती बरेचदा घरातल्या पुरूषांच्या पोटात जातात. संध्या नरे पवार यांनी ‘तिची भाकरी कोणी चोरली?” या आपल्या पुस्तकात ग्रामीण बायकांना “मटणाचे तुकडे कोणाच्या ताटात जातात?”  हा प्रश्न विचारल्यावर आलेलं उत्तर आठवलं. “तुकडे पुरूषांच्या आणि मुलग्यांच्या ताटात जातात. बायका उरलेले तुकडे आणि रस्सा खातात.” याच पुस्तकात त्यांनी नोंदवल्याप्रमाणे सोयाबीन खरं तर बायकांसाठी चांगलं, पण ते पिकवणाऱ्या बायका ते खात नाहीत, विकतात. दूध तर बायकांचं लहानपणापासूनच बंद होतं हेही निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. पूर्वी शेतात घरच्या वापरासाठी धान्य, भाज्या, डाळी लावले जाई. पण बागायती पिकांचा बोलबाला झाला आणि लोक एक छोटा चौकोनही भाजी लावण्यासाठी मोकळा सोडेनासे झाले. त्यामुळे थोडंफार पोषण होत असे त्यापासूनही बायकामुली वंचित झाल्या. कारण विकत आणलेल्या डाळी, भाज्याही कर्त्या पुरूषांच्या आणि मुलग्यांच्या खाऊन झाल्यावर उरल्यासुरल्या तर घरातल्या  बायकामुलींच्या वाट्याला येतात.

पर्जन्यछायेच्या प्रदेशातल्या आमच्या गावी साधारण आठदहा एकराची शेती असलेल्या शेतकऱ्यांवरही दुष्काळात कण्या भरडून खायची वेळ येई. पण गावकुसाबाहेरच्या अभावग्रस्तांना तर बरेचदा कण्याच भरडून खाव्या लागतात. त्या कण्यांमध्ये असलंच घरात थोडं दूधदुभतं (बकरीचं) तर थोडं ताक, मीठ, मिरची तर टाकायचं नाहीतर नुसत्याच कण्या उकडून खायच्या.  दुष्काळात एका बाईला कण्या फारशा मिळाल्या नाहीत. मग घरातल्या पोराबाळांना कुठे काय मिळेल ते पहायला सांगितलं. तर थोडा चिंचेचा पाला, सुकलेली उंबरं, कुठेतरी राहिलेले चुकार भुईमूगाचे दाणे असं काही काही मिळालं. ते सगळं तिने त्या कण्या उकडतांना त्यात टाकलं होतं. हे असंच कुठेतरी वाचलेलं. जे काही मिळेल त्यात भागवायचा बायकांचा नेहमीच प्रयत्न असतो.

पुरवणीला यावं म्हणून, तसंच आधीच कमी आहे त्यात वाया जाऊ नये म्हणून काही काही फंडे असतात. जसं की पाणी जास्त टाकायचं, तरीही चव रहावी म्हणून थोडं तिखट, मीठ जास्तीचं घालायचं. पिठलं होण्याइतकं पुरेसं चण्याचं पीठ नसलं तर त्यात ज्वारीचं पीठ घालायचं. माझ्या ओळखीच्या एक बाई मासे घोळवलेलं तांदळाचं पीठ वाया जाऊ नये म्हणून त्यात पाणी घालून त्याचा घावन काढीत ( अर्थातच हा घावन त्या आपल्या मुलीला न देता लाडक्या मुलाला देत). भेंडीची देठं आणि टोकं यांची किंवा शिराळ्याच्या सालींची चटणी करणं हेही यातलेच प्रकार.

‘मास्तरांची सावली’ या कृष्णाबाई नारायण सुर्वे यांच्या पुस्तकात यांनी कोंड्याचा मांडा करणाऱ्या अशा अभावग्रस्त बायकांची अशीच एक पाककृती दिली आहे. “गुजराती शाळेतल्या शिक्षिका शाळेत येतांना दुपारीच भाजी घेऊन शाळेत यायच्या. कधी चवळीच्या शेंगा, कधी तुरीच्या किंवा मटारच्या शेंगा..मी माझी शाळेतली झाडलोटीची वगैरे कामं आटोपली की मधल्या फावल्या वेळेत त्यांना शेंगा मोडून द्यायची. मटारीचे, तुरीचे दाणे सोलून द्यायची. मी मनात विचार करायची, “कृष्णाबाई, तुझ्यासारखीच या बायांची अवस्था आहे, संध्याकाळी घरी जातील केव्हा, भाज्या निवडतील केव्हा.”  त्यांनी थँक्यू म्हटलं की मला बरं वाटायचं. त्यांना मदत करण्यामागे माझाही एक हेतू असायचा. रोज रोज भाज्या घेण्याइतकी माझी काही ऐपत नव्हती. मी त्या मटारीचे दाणे काढून दिले की शेंगांच्या साली एका पिशवीत भरून घ्यायची आणि घरी आणायची. त्या सालींचे बाजूचे दोर आणि वरचा पातळ पापुद्रा काढला की आत जी हिरवीकंच पातळ साल उरायची त्याची चिरून भाजी करायची. ओली मिरची, कांदा, खोबरं घालून भाजी केली की अगदी पापडीच्या शेंगासारखी भाजी लागायची.” अशा प्रकारे काहीही खाण्याजोगं मिळत असेल ते खाऊन दिवस ढकलायचा एकच विचार अभावग्रस्तांच्या मनात असतो.

कोकणात पेजभात खाऊन रहाणारे तर बरेच लोक असतील (यासोबत मिळालाच एखादा भाजलेला बांगडा किंवा बोंबिल तर त्यांना पंचपक्वान्न मिळाल्याचा आनंद होतो). नागली किंवा नाचणीची भाकर आणि कुळथाचं पिठलं हे सर्वसामान्य कोकणी माणसाला सहज उपलब्ध असलेलं खाद्य. याशिवाय कोकमाचं सार आणि भातही. इथे मुंबईत आपण नारळाचं दूध घातलेली सोलकढी पितो तशी कोकणातही ती पितात. पण कित्येक ठिकाणी नारळ हे पैशांसाठी विकले जातात आणि कोकमाचा फक्त आगळ (रस) घेऊन त्यात मीठमिरची घालून सार केलं जातं. नाचणीचे उकडलेले गोळे (यांना मुद्दे म्हणतात) हा तर कर्नाटकातल्या बऱ्याच गोरगरीबांच्या पोटाला मोठा आधार असतो. नागलीप्रमाणे वरीचे उंडे हाही असाच एक प्रकार. सावे हे तृणधान्यही असंच खाल्लं जातं( आमच्या लहानपणी गावाहून धोतराच्या किंवा जुन्या लुगड्याच्या तुकड्यात बांधून उकडे तांदूळ, कुळीथपीठ आणि साव्याचं पीठ -मालवणीत त्याला सायाचं पीठ म्हणतात- कुणाच्या तरी हाती पाठवलं जाई). हुलगे किंवा कुळथाचं माडगं, ज्वारी किंवा इतर कुठल्या धान्याची आंबील अशा आणि इतरही काही पदार्थांवर दिवस काढले जातात. दक्षिणेत उरलेल्या शिळ्या भातात पाणी घालून तो रात्रभर झाकून ठेवून सकाळी खाल्ला जातो. तर उत्तरेत भाजलेले चणे आणि जंव दळून केलेला सत्तू पाण्यात कालवून खातात. बिहारमध्ये दहीचुडा. माझी कारवारकडची एक मैत्रीण सांगत होती की तिच्या घरी फणस फार पिकत. घरी वापरून उरलेले फणस ते स्वस्तात विकत असत. गावातली ओढगस्त असलेली कुटुंबं ते फणस घेऊन जात. कारण फणस खाल्ला की भूक लागत नाही. मग एका फणसावर अख्ख्या कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण होऊन जाई. शिवाय आठळ्या असत. या आठळ्या नुसत्या मीठ घालून उकडून खाता येत. काही ठिकाणी आठळ्या वाळवून त्यांचं पीठ करून तेही वापरलं जातं. आंब्याच्या कोयीही भाजून खाल्ल्या जातात.  वेगवेगळ्या प्रकारचे कंद उपलब्ध असतात. आमच्या वडिलांची मामी गावाहून येतांना पोतंभर कणकं आणि करांदे घेऊन येई. करांदे जरा कडवट असतात त्यामुळे ते उकडतांना दोनतीनदा पाणी काढून टाकावं लागतं. पण कणकं चांगली लागतात. अशा प्रकारचे कंद हे अभावग्रस्तांना निसर्गात सहज उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात सहज उपलब्ध असलेली अळिंबी. पण ती मात्र जपून नीट ओळखून खावी लागते कारण काही जाती विषारी असतात. पण जंगल हे ज्यांचं घर आहे अशा आदिवासींना त्या बरोबर ओळखता येतात.

कंदांप्रमाणेच पावसाळ्यात उगवणाऱ्या असंख्य रानभाज्याही सहज उपलब्ध होतात. –  कुर्डू, टाकळा, भुईआवळा, पाथ्री, कुत्तरमाठ, तेलपाट,  राजगिरा, घोळ (ही तर कुठेही आणि हिवाळ्यातही मिळते), शेवग्याचा पाला, वाघाटं, कोरला, कुळू, शतावरी. सतीश काळसेकरांनी एके ठिकाणी लिहिलं होतं की ते काश्मीरला गेले असतांना नावाडी तिथेच तळ्यात उगवणारा कसलासा पाला उकडून भाताबरोबर खात. अंबाडीची भाजी दक्षिणेत फार खाल्ली जाते. तिथे तिला गोंगुरा म्हणतात. तिचा लोणच्यासारखा टिकणारा पदार्थ करून तोही भातासोबत खाल्ला जातो. पाल्यासोबतच वेगवेगळी फुलं जसं की भोकराची फुलं, मोहाची फुलं, शेवग्याची आणि हादग्याची फुलं हीसुद्धा खाल्ली जातात. मोहाची फुलं वाळवून त्यांची पूड करून ती साठवली जाते आणि भाकरीत घालून खाल्ली जाते. केळीचं आणि शेवग्याचं झाड हे तर गोरगरीबांसाठी कल्पवृक्षच. त्यांचे जवळपास सगळे भाग खाल्ले जातात. जसे केळी कच्ची आणि पिकलेली दोन्ही खाल्ली जातात, तसं केळफूलही भाजीसाठी वापरलं जातं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीतल्या प्रदेशातही. पालघर पट्ट्यात चिरलेलं केळफूल तांदळाच्या पिठात घालून त्याच्या भाकरी केल्या जातात. केळीच्या खुंटाचीही भाजी केली जाते (ही भाजी मूतखड्यावरचं एक उत्तम औषध मानलं जातं). त्यावरून आठवलं कोकणात खाल्ले जाणारे काही पदार्थ हे देशावरच्या सुपीक जमीन बाळगणाऱ्या लोकांसाठी कदान्न असतं. माझं लग्न झाल्यावर मला भुट्टा खायला आवडतो हे कळल्यावर माझी सासू म्हणाली ते तर आम्ही बैलांना घालतो. केळफूलं तर तिथे टाकूनच देतात. असंच उर्मिला पवार यांनी ‘आयदान’मध्ये सांगितलेला प्रसंग आहे तो आठवला. त्यांच्या आईने त्या सासरी जातांना त्यांच्यातर्फे सासरच्यांना भेट म्हणून मुळ्ये (मोठ्या आकाराचे शिंपले) दिले. नवऱ्याच्या आग्रहाखातर दोघं वाटेत एका लॉजमध्ये गेली. तिथून निघतांना मुळ्यांची पिशवी तिथेच राहिली तर नवरा म्हणाला नाहीतरी आमच्याकडे कोण खाणार ते मुळ्ये. पण कोकणात गरीब लोक मुळ्ये नुसते उकडूनही खातात.

आमच्या लहानपणी भीक मागून जगणाऱ्या लोकांना त्यांनी आणलेल्या एकाच पातेल्यात वेगवेगळ्या घरच्या वेगवेगळ्या डाळी, कालवणं मिळत, तसंच त्यांच्या झोळीत वेगवेगळ्या घरच्या शिळ्या चपात्या, भाकरी, डोसे, भात जमा होत असे. पुलाखालच्या किंवा रेल्वे फलाटावरच्या त्यांच्या तात्पुरत्या घरात ते हे सगळं एकत्र उकळ आणून खातांना दिसत. त्याचा आंबूस वास पसरलेला असे. शाहू पाटोळे यांनीही त्यांच्या ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ या पुस्तकात सणासुदीला हक्काच्या वतनाच्या घरातून मिळणाऱ्या पुरणपोळ्या, गुळवणी, कुरडया, भजी, भात यासारखे नाशिवंत पदार्थ आठ दिवस टिकवून खाण्यासाठी भोकं बुजवलेल्या मडक्यात मंद आगीवर ते एकत्र शिजवून केल्या जाणाऱ्या आंबुरा या पदार्थाची कृती दिली आहे.

आम्ही गिरणगावात रहात असतांना बरेच लोक घुले नावाचे समुद्रात आढळणारे किडे स्वस्त असत ते उकडून खात. आतला कीडा पीन किंवा टाचणी वापरून ओढून खावा लागे. हे सगळे कीडे काढून घेऊन त्यांचं मसाला घालून दबदबीत कालवणही केलं जाई. आता हा प्रकार कुठे दिसत नाही. कर्नाटकातही भाताच्या शेतात सापडणारे घोंगे असेच उकडून पिनाने काढून खातात. अगदी बारीक, धोतरात पकडता येणाऱ्या कोळंबीच्या छोट्या कोलीम या प्रकाराचंही लोणचं करून ते प्रवासात वापरलं जातं किंवा काहीच मिळालं नाही तर भात, चपाती, भाकर कशाही बरोबर खाल्लं जातं पालघर, डहाणू पट्ट्यात. कोळी बांधवही ही कोलीम नेहमी करून ठेवतात. मांसाहारातले रक्ती, वज्री, भेजा, जीभ असे टाकाऊ पदार्थ जसे ग्रामीण भागातील अभावग्रस्त खात तसेच आमच्या लहानपणी गिरणगावातल्या भंडारी भोजनगृहातही स्वस्त आणि मस्त असे हे पदार्थ गिरणी कामगार खात असत. मेघालयकडचा माझा मित्र सांगत होता की तिथे उंदीरही खाल्ले जातात. महाराष्ट्रातही उंदीर, घोरपड वगैरे प्राणी खाणाऱ्या जमाती आहेत. पण असे टाकाऊ पदार्थही वरचेवर मिळतात असं नाही. अशा वेळी सुकट, सुका बोंबील, बांगडा, वाकट अशा सुक्या माशांचा पोटाला आधार होतो. आदिवासीसुद्धा अशा सुक्या माशांच्या आधारावर पावसाळा ढकलतात. त्यावरून आठवलं. मी वेगवेगळ्या प्रकारचं मस्त सारण असलेल्या कानवल्यांविषयी ऐकलं होतं, तुम्ही ऐकलं असेलच. पण अलीकडेच मी जरा वेगळ्या कानवल्यांविषयी वाचलं. डॉ. कृष्णा भवारी यांच्या ‘इधोस’ या कादंबरीत जुन्नर पट्ट्यातल्या आदिवासींच्या विशेष प्रसंगी खाण्यात येणाऱ्या भुईमूगाच्या कानवल्यांविषयी लिहिलेलं वाचलं. आदिवासी रहातात तो भाग वनसंरक्षण पट्टा म्हणून जाहीर झाल्यावर आदिवासी आपल्या हक्काच्या जंगलापासून तोडला जातो, त्याच्या आयुष्याचा जो विध्वंस होतो तो मांडणारी ही एक चांगली कादंबरी आहे.

गावकुसाबाहेरच्या जमाती, आदिवासी, भूमिहीन मजूर, शहरातील आणि ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखाली असणारे कष्टकरी या सगळ्यांचा हा आहार निसर्गात जे उपलब्ध आहे त्यावर अवलंबून आहे. परंतु आता दिवसेंदिवस बड्या कंपन्यांनी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे त्यांना मिळणाऱ्या अन्नाच्या आणि पाण्याच्या स्त्रोतांवर परिणाम झालाय. तसाच परिणाम बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठी एखाद्या उत्पादनाच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जाहिरातीतून जे समज पसरवले जातात त्यांच्यामुळेही झालाय. जे चित्र उभं केलं जातं ते या वर्गालाही परवडत नसलं तरी आकर्षक आणि हवंहवंसं वाटायला लागलंय. पूर्वी त्यांच्या आहारात नसलेली पांढरी विषं  – मीठ, साखर, मैदा, पाश्चराईज्ड दूध आणि पांढराशुभ्र तांदूळ – ही आता हातपाय पसरत त्यांच्याही आयुष्यात स्थान मिळवायला लागली आहेत. झोपडपट्टीत रहाणाऱ्या मुलालाही अमिताभ बच्चनची जाहिरात पाहून मॅगी खावीशी वाटते. इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवणं हे जसं आपला सामाजिक, आर्थिक  स्तर उंचावण्यासाठी आवश्यक वाटतं तशीच ही आरोग्याला घातक असलेली विविध आकर्षक उत्पादनंही. त्यामुळे आधीच असलेल्या कुपोषणात भर पडतेय. नाचणीच्या सत्वासारख्या कमी खर्चात मुलांना पोषण मिळवून देणाऱ्या आहारापेक्षा साखर आणि कर्बोदकांचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक असलेली तथाकथित पोषक पेये मुलांना दुधातून दिली जातात. याने आधीच खाली असलेल्या खिशावर भार तर पडतोच पण आरोग्यावरही दुष्परिणाम होतात.

या सगळ्या वंचितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारे वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा लावून व्यवस्थेविरूद्ध लढा देत असतात. त्यांना तर वेळेवर जेवण मिळायचीच भ्रांत. मिलिंद बोकील यांनी संपादित केलेल्या ‘कार्य आणि कार्यकर्ते’ या पुस्तकात अमर हबीब यांनी लिहिलंय ते आठवलं. नामांतर चळवळीच्या काळात मराठवाड्यात दलितांवर हल्ले होताहेत हे वाचल्यावर अस्वस्थ झालेले अमर हबीब जळगावहून औरंगाबादला निघाले. ज्या मित्राकडे उतरले होते त्याच्या घरून चहा पिऊन घाईघाईत निघाले. वाहनं नव्हती, दुकानं बंद होती, चालतच निघाले. त्यांनी लिहिलंय, “सिल्लोडला सगळी दुकाने बंद होती. कुठे काहीच खाले नाही. या निर्मनुष्य रस्त्यावर काय मिळणार? निघताना वासंतीने शबनममध्ये घातलेला ब्रेडचा पुडा होता. काढला अन् एक एक कोरडे स्लाइस चावून खाऊ लागलो. ते छान लागत होते.” मिळेल तो असा घास गोड मानणाऱ्या अशा कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकात उल्का महाजन यांनी त्यांना जेऊ घालणाऱ्या मराठे, चांदे कुटुंबांविषयी सांगता सांगता लिहिलंय, “अशा घरी गेलं, की आम्हाला पूर्ण जेवण म्हणजे चपाती, भाजी, डाळ, भात मिळायचं. नाही तर चपाती म्हणजे क्वचितच मिळायची. खिचडी नाही तर अंडी, पाव अथवा एखादं कालवण आणि भात हेच आमचं नेहमीचं जेवण असायचं.” माझे मित्र अशोक सासवडकर सुरूवातीच्या दिवसात कित्येकदा मिळेल तिथे वडापाव खाऊन रहात. सुरेखा दळवींनीही एकदा कसा बरेच दिवस वरणभातसुद्धा मिळाला नव्हता त्याची आठवण सांगितलीय. मेधाताई तर बहुधा वर्षाचा अर्धाअधिक काळ उपोषणच करीत असतात.

आदिवासींकडून जंगलं हिरावून घेतली जाताहेत.  अजूनही टिकून राहिलेल्या जातीव्यवस्थेतले अन्याय चालूच आहेत. खाणींचं बेफाट तोडकाम होतंय.  डोंगर पोखरले जाताहेत. बेफाम वृक्षतोड होते आहे. नद्यांचे गळे आवळले जाताहेत. मोठमोठ्या कारखान्यांनी नद्यांमध्ये सोडलेली विषारी द्रव्ये पाणी, माती दूषित करताहेत. शेतीविषयक चुकीच्या धोरणांमुळे शेतीव्यवस्था ढासळत चाललीय. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होणारे तपमानातले, पर्जन्यमानातले बदल आणि परिणामी सततचा सुका किंवा ओला दुष्काळ, वाढती महागाई, वाढती बेकारी या सगळ्यांमुळे अभावग्रस्तांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ तर होतच राहील. परंतु त्याचबरोबर आत्ताआत्तापावेतो त्यांना निसर्गात सहज उपलब्ध असलेले अन्नाचे आणि पाण्याचे स्त्रोत नाहीसे होत जातील.

तळागाळातले लोक आणि त्यांच्यासाठी लढणारे कार्यकर्ते यांचं हे कुपोषण मिटेल अशी आशा बाळगायला नजीकच्या काळात तरी वाव दिसत नाही.

मराठी मालिकांमधलं आधुनिक मुलींचं चित्रण

अलीकडेच ‘स्त्री लिंग पुल्लिंगी’ नावाच्या मराठी वेब मालिकेतील स्त्री कलाकारांवर त्या ज्या भूमिका साकार करीत होत्या त्यात शिव्या देतांना, दारू पितांना, सिगारेट ओढतांना दाखवल्यामुळे त्यांना ट्रोलिंग होत असल्याची बातमी पाहिली. त्याच मालिकेतल्या पुरूष व्यक्तिरेखाही तशाच वागत असतील. पण पुरूष कलाकारांना कुणी ट्रोलिंग केल्याचं ऐकिवात नाही. बरं दारू पिणं, सिगरेट ओढणं आरोग्याला घातक आहे म्हणून हे ट्रोलिंग होत नाही तर ते मुली करताहेत म्हणून होतंय. याचं कारण स्त्रीने कसं वागावं याचे पितृसत्ताक पद्धतीने घालून दिलेले दंडक प्रत्यक्षातल्याच नव्हे तर कल्पितकथांमधल्या बायकांनाही समाजाने लागू केलेले दिसतात.

मुलींनी शिव्या देणं हे तर लोकांना फारच खटकतंय. एक गंमत म्हणून मला आलेले अनुभव सांगते. आमच्या एका मैत्रिणीला सुरूवातीला ब्लँक कॉल्स यायचे. तिला काही कळत नव्हतं कोण बोलतंय. पण चौथ्या पाचव्या वेळी समोरून पुरूषी आवाजात “हाय डार्लिंग” आलं आणि तिने जो अस्सल ‘भ’कारी शिव्यांचा तडाखा लावला की नंतर पुन्हा तिला असा फोन आला नाही. मग मलाही एकदा घरच्या फोनवर रात्री विचित्र बरळणारे फोन आल्यावर मीही (मला ‘भ’कारी शिव्या येत नसल्या तरी ज्या काही येत होत्या त्या) शिव्यांचा तडाखा लावल्यावर आश्चर्यकारक रित्या ते फोन बंद झाले. असा बायकांना शिव्यांचा उपयोग होतो. आणि कुठल्याच बायका शिव्या देत नाहीत असं नाही. कित्येक बायका देतात. पण ‘संस्कारी’ बायका शिव्या देत नाहीत असा लोकांचा समज आहे. आधुनिक मराठी मालिकांमध्येही तथाकथित संस्कारी बायका आणि आधुनिक मुली (ज्या अर्थातच त्यांच्या मते संस्कारी नसतात) यांचं विरोधाभासात्मक चित्रण आढळतं.

उदारहणार्थ झी वाहिनीवरच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ‘तुला पाहते रे’ ‘खुलता कळी खुलेना’ इत्यादी मालिकांमधील राधिका आणि शनाया, ईशा आणि मायरा (किंवा दुसरी खलनायिका सोनियाही), मानसी आणि मोनिका किंवा कलर्स मराठी वरच्या  ‘घाडगे अँड सून्स’ मधल्या अमृता आणि कियारा अशा नायिका-खलनायिकांच्या जोड्या पाहिल्यावर हे ध्यानात येईल. यातल्या नायिका साडी किंवा सलवार -कमीझ-ओढणी अशा सोज्वळ पोशाखात तर खलनायिका अर्ध्यामुर्ध्या, तोकड्या कपड्यात दिसतात. नायिकांना स्वयंपाकपाणी चांगलंच जमत असतं, किंबहुना त्या सुगरणीच दाखवल्या गेल्यात, तर खलनायिकांना साधा चहाही करायला जमत नाही किंवा त्यांचा स्वयंपाकासाठी स्वयंपाकीण बाई ठेवण्यावर भर असतो. नायिका या स्वयंपाकातच नव्हे तर इतरही गृहकृत्यात अगदी निष्णात असतात तर खलनायिकांना साधा केरही काढता येत नाही. नायिका सगळ्या नात्यांना जपतात तर खलनायिका फार स्वार्थी असल्याने त्यांना नात्याची पर्वा तर नसतेच शिवाय त्या लोकांच्या चांगल्या नातेसंबंधामध्ये बिघाड कसा येईल ते पहात असतात. नायिकांना नाती महत्त्वाची वाटतात तर खलनायिका फक्त पैसा, दागदागिने, चैनीच्या वस्तू यांच्या मागे लागलेल्या असतात, इतकंच नव्हे तर हे सगळं मिळवण्यासाठी त्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणजे त्या इतर पुरूषांना त्यासाठी भुरळ घालतात, प्रसंगी चोरी करतात, लबाडी करतात. नायिकांना तथाकथित भारतीय संस्कृतीतल्या पुराणकथा, सणावारांशी निगडित गोष्टी, म्हणी, वाक्प्रचार हे सगळं ठाऊक असतं, तर खलनायिकांना या गोष्टींचा गंधही नसतो. नायिकांना पारंपरिक खाद्यपदार्थ करायला, खायला किंवा लोकांना खाऊ घालायला आवडतात, तर खलनायिका कायम नूडल्स, पास्ता, पिझ्झा, बर्गर असे भारतीय संस्कृतीत न बसणारे पदार्थ खात असतात. शनायासारखा मोदक आणि मोमोजमधला फरकही त्यांना कळत नसतो. या सगळ्या खलनायिकांना डोकं नावाची गोष्ट नसते असं नाही. मायरा किंवा मोनिकासारख्या काहीजणी कॉर्पोरेट जगातले सगळे व्यवहार फार चातुर्याने, कौशल्याने पार पाडतात. बाकीच्यांना डोकं नाही असं दाखवलेलं असलं तरी कुठलंही कारस्थान त्या व्यवस्थित रचतात आणि पार पाडतात. आणि बिचाऱ्या नायिका मात्र त्यांचे सगळे गुन्हे पोटात घालतात. त्याशिवायचं म्हणजे नायिका नवऱ्याने कितीही अपराध, फसवणूक, लांड्यालबाड्या केल्या तरी ते पोटात घालून ‘समजूतदारपणे’ संसार करतात, तर या आधुनिक मुली असलेल्या खलनायिका दुसरा कुणी दागिने, पैसे देतोय म्हणून खुश्शाल नायकाला सोडून त्याच्या मागे जातात (माझ्या नवऱ्याची बायको), इतकंच नाही तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी केल्या गेलेल्या कौटुंबिक हिंसाचार कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा इ. कायद्यांचा सासरच्यांना अडकवण्यासाठी गैरवापर करतात किंवा सासरच्यांना त्या कायद्याचा वापर करून अडकविण्याची धमकी देतात. (घाडगे अँड सून्स) .

हे सगळं इतक्या ठोकळेबाजपणे केलं जातंय की एका मालिकेतल्या नायिकेला किंवा खलनायिकेला झाकावं आणि दुसरीला बाहेर काढावं. पण या ठोकळेबाजपणाच्या आडून खरं तर ध्रुवीकरण केलं जातंय. पारंपरिक, संस्कृतीनिष्ठ यांच्या विरोधात आधुनिक, नीतीहीन असं. आणि हे सगळं गेल्या काही वर्षात बदलत गेलेल्या मानसिकतेचं द्योतक आहे. विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात पुनरूज्जीवनवादी शक्ती पुन्हा जोर धरू लागल्या. वर वर जरी सगळ्या क्षेत्रात स्त्रियांचा वावर सुरू झाल्याने, स्त्रिया बहुशिक्षित झाल्याने, आता स्त्री स्वतंत्र होत चालली आहे असा आभास निर्माण झाला, तरी दुसरीकडे कुटुंबसंस्थेतील स्त्रियांच्या पारंपरिक भूमिकेचे उदात्तीकरण सुरू झालं. तिच्या आईपणाचं भांडवल वेगवेगळ्या माध्यमांमधून केलं जाऊ लागलं. गुढीपाडव्याच्या शोभायात्रांमध्ये पारंपरिक पोशाखातल्या (नऊवारी साडी, नथ, पायात पैंजण, जोडवी, दागदागिने) तरूणी ढोल वाजवतांना दिसू लागल्या. ढोल वाजवणं आणि या पारंपरिक पोशाखावर पुरूषी फेटा बांधणं हे त्यांच्या मुक्तीचं प्रतीक मानलं गेलं. आता तर हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतो. पूर्वीच्या मालिकांमधून न दिसणारा आणि गेल्या काही वर्षांमध्ये हमखास आढळणारा प्रकार म्हणजे वेगवेगळ्या हिंदू सणांना नायिकांनी पारंपरिक पोशाखात नटून थटून कुटुंबाची तथाकथित रीतभात आणि मुख्य म्हणजे आपली महान हिंदू संस्कृती पाळणं. मातृत्वाचं तर इतकं उदात्तीकरण की ‘घाडगे अँड सून्स’मध्ये आधुनिक दाखवल्या गेलेल्या खलनायिकेला – कियाराला गरोदरपणाचं नाटक करावं लागावं किंवा ‘तुझ्यात जीव रंगला’मधल्या नंदिताला नको असतांनाही गरोदरपण निभवावं असं वाटावं. कारण त्या गरोदर राहिल्या तरच त्यांना कुटुंबात मानाचं स्थान मिळेल, त्यांचे लाड केले जातील असं त्यांना वाटतं. आणि ही सगळी तथाकथित मूल्यं ठसवण्यासाठी त्यांना तसाच प्रेक्षकवर्ग सापडला आहे – घरात काम करून थकलेल्या गृहिणी. हे सगळं पाहून त्यांनाही त्यांच्या घरकामाचं महत्त्व पटवून घेण्याशिवाय पर्याय नसतो. पण याच गृहिणी नायिकेच्या रूपाने ‘आदर्श’ ‘संस्कारी’ मुलीचं त्यांच्या मनात रूजत चाललेलं चित्र त्यांच्या पुढील पिढीकडे सोपवणार हा धोका नजरेआड करून चालणार नाही.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधल्या शनाया, किंवा ‘घाडगे अँड सून्स’ मधली कियारा या जेव्हा नूडल्स, पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ खातांना दिसतात, तेव्हाही आरोग्याला घातक म्हणून ते खाऊ नयेत असं त्यांना सांगण्याऐवजी त्यांचं हास्यचित्र उभं करायला त्याचा उपयोग होतो म्हणून ते हास्यास्पद पद्धतीनं दाखवलं जातं. तोकडे किंवा अंगालगत कपडे हे त्या त्या व्यक्तीला- म्हणजे ती पुरूष असो किंवा स्त्री- सोयीचं, आरामदायक वाटत असेल तर त्या व्यक्तीला त्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. पण मालिकांमध्ये फक्त तरूण खलनायिकेच्या तोकड्या कपड्यांचं भांडवल केलं जातं. कारण हेही आजूबाजूला घडतंय. विशिष्ट राजकीय विचारसरणीची नेतेमंडळी तर त्यावर ताशेरे झोडत असतातच, पण हा लेख लिहित असतांना दिल्लीतल्या एका मॉलमध्ये एका मध्यमवयीन महिलेने मिनीस्कर्ट परिधान केलेल्या एका तरूणीला तुमच्यासारख्या मुलींवर बलात्कार व्हायला हवेत असं विधान करून खळबळ माजवल्याचं पाहायला मिळतंय.

अलीकडे विवाहबाह्य संबंध हा विषय मालिकांना नव्याने सापडल्यासारखं झालंय. ‘माझ्या नवऱ्याची बायको’‘घाडगे अँड सून्स’ यासारख्या मालिकांमध्ये अशा आधुनिक मुली चांगल्या ‘संस्कारी’ कुटुंबातल्या मुलांना नादी लावून घर तोडणाऱ्या, अशा पद्धतीने उभ्या केलेल्या दिसतात. त्यामुळे अशा मुली या संसार मोडणाऱ्या मुली अशी त्यांची प्रतिमा निर्माण केली जातेय. त्याहीपेक्षा कठीण म्हणजे त्यांच्या संस्कारी बायका नवऱ्याचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम असतांनाही त्याला न सोडता, त्याच्या कारवायांनी रंजीस येऊनही आपलं लग्न टिकविण्याची धडपड करतांना दिसतात. लग्न नक्कीच टिकवावं पण ते जर दोघांमध्ये मतभेद, गैरसमज असतील आणि मनात प्रेम असूनही या मतभेदांमुळे लग्न मोडत असेल तर. पण इथे नवऱ्यांच्या मनात दुसऱ्या बाईबद्दल प्रेम आहे हे उघड असतांनाही केवळ कुटुंबसंस्था टिकवण्यासाठी, मुलांपोटी ते टिकवून स्त्रीवर अन्याय होऊ देणं गैर आहे.  

आजच्या धकाधकीच्या कार्यसंस्कृतीत बायकांना स्वयंपाक, गृहकृत्य करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना मोलाने ही कामं करून घ्यावी लागतात. ते साहजिकच आहे. पण ही कामं घरातल्या सगळ्यांची आहेत ती वाटून घेऊन केली पाहिजेत, असं न दाखवता ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘घाडगे अँड सून्स’, ‘तुझ्यात जीव रंगला’,‘खुलता कळी खुलेना’ या आणि अशा अनेक मालिकांमधून ही कामं नायिकांनी, त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी करायची, पुरूषांना गरम गरम अन्न वाढायचं हेच त्यांचं काम दाखवलेलं आहे. घरात बायकोच्या बरोबरीने काम करणारा पुरूष क्वचितच दाखवला जातो. त्यामुळे या पारंपरिक चित्रात गृहकृत्य, स्वयंपाक न येणारी शनाया, कियारा किंवा मोनिकासारखी आधुनिक मुलगी सहज हास्यास्पद ठरवता येते. पत्नी म्हणून अयोग्य ठरवली जाते. खरं तर अशा प्रकारे आधुनिक विचारांच्या मुलींचं सर्वसाधारणीकरण करणं हेच हास्यास्पद आहे. हे मालिका सादर करणाऱ्या चमूला समजत नसेल असं नाही. पण ते हे सगळं एका विशिष्ट उद्ददेशाने करीत आहेत की काय अशी शंका घ्यायला वाव आहे. स्त्री असो वा पुरूष प्रत्येकाला स्वावलंबी होण्यासाठी सगळी कामं यायला हवीत हे मान्य. पण स्वतःला इतर सर्जनशील कामात गुंतविण्यासाठी तयार स्वयंपाक किंवा इतर गृहकृत्यांसाठी पैसे मोजून सेवा घेणं हे चुकीचं असल्याचं चित्र उभं करून स्त्रियांना पारंपरिक कामांमध्ये गुंतवून ठेवणं, स्त्रीने स्वतःला आरामदायक वाटेल असा पोशाख न घालता पारंपरिक पद्धतीचा पोशाख करणं हे कसं चांगलं आहे हे दाखवीत तिला पुन्हा साडी, दागदागिने यांनी मढवून ठेवणं, मूल जन्माला घालणं, वाढवणं हा एक आनंदाचा भाग असला तरी त्याचं महत्त्व ठसवित आईपणाचे सोहळे साजरे करीत बाईने गुंतून रहाणं, संसार टिकवण्यासाठी वाट्टेल ते सहन करणं हे कसं चांगलं आहे हे ठसवण्याचा प्रयत्न करणं, असे अनेक उद्देश या मालिकांमधल्या आधुनिक मुलींच्या चित्रणामागे असावेत असं वाटलं तर ते चुकीचं ठरू नये. खरं तर आधुनिक स्त्रीच्या आयुष्यातली अनेक अशी वेगवेगळी आव्हानं आहेत ज्यांचा वेध घेता येईल. पण दुर्दैवाने हे प्रभावी दृक्चित्र माध्यम विवाहबाह्य संबंध, पारंपरिक नाती, उत्सव यांचे सोहळे मांडण्यात मग्न आहे.

रस्ता

घरासमोर फार मोठ्ठं खारफुटीच्या जंगलाचं, उत्तनच्या डोंगरांचं दृश्य दिसतं. त्यामुळे दिवसभरात अधूनमधून आणि संध्याकाळी बाहेरच्या जगाशी आता असलेला हा एकमेव संपर्क बंद व्हायच्या आधी सूर्यास्तापर्यंत खिडकीत रेंगाळायचा मोह आवरता येत नाही.

आज मात्र नेहमीच्या वेळेच्या बऱ्याच आधी कुत्र्यांच्या केकाटण्याने खिडकीने जवळ यायला भाग पाडलं. आमच्या या छोट्याशा रस्त्यावर पाच सहा कुत्री आहेत. ल़ॉकडाऊनच्या आधी एक जोडपं गाडीतून येऊन त्यांना खायला घालीत असे. कुत्र्यांना, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वापरात नसलेल्या दगडी रगड्यांची पाळी लोक टाकून देण्याऐवजी आणून ठेवतात. अलीकडेच कारवारातल्या गावी कायमचं रहायला गेलेल्या मैत्रिणीनेही असंच केलं होतं. त्यात कुणीतरी (बहुधा त्या त्या इमारतींचे रखवालदार) पाणी भरुन ठेवतं. सध्या त्या कुत्र्यांना खायला मिळत नसल्याने ते असेच एका पक्ष्याच्या पिल्लाच्या मागे लागले. ते पिल्लू घाबरून समोरच पार्क केलेल्या एका गाडीखाली घुसलं. तिथे ते कुत्रेही पंजा घालायला लागल्यावर बहुधा तीन तरुणी तिथे आल्या आणि त्यांनी कुत्र्यांना हुसकावून लावलं. पण ते पिल्लू काही त्यांना काढता येईना. जवळून जाणाऱ्या एका पोरसवदा मुलाला सांगून पाहिलं. त्यालाही जमेना. मग त्यांनी फोनवरुन कुणाला तरी बोलावलं. मधल्या काळात कुत्र्यांसाठी पाव पैदा केला. तर तिकडे तेवढ्यात आपल्याला कुत्र्यांपासून वाचवणारं कुणीतरी आलंय म्हणून कावळे फारच आत्मविश्वासाने कुत्र्यांभोवती कडं करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर नुकत्याच बाळंत झालेल्या कुत्रीच्या पिल्लाला टोचे मारायला लागले. मग पुन्हा मुलींची तारांबळ उडाली. त्यांनी कावळ्यांपासून वाचायला गटाराच्या कडेला लपलेल्या पिल्लाला हळूहळू विश्वास देत ताब्यात घेतलं. कावळ्यांनाही खायला काहीतरी दिलं.

हे सगळं चालू असतांनाच. समोरच्या इमारतीचा पहारेकरी कुठेतरी गेलाय याची खात्री करुन घेऊन एक मुलगा फाटकाबाहेरच्या गुलमोहरावरुन आतल्या आंब्याच्या झाडावर चढला ( सुरुवातीलाच रो ङाऊस आहे तेही आत त्यामुळे कुणी पाहिलं नसावं).  त्याचा साथीदार फाटकाबाहेर पिशवी हातात घेऊन तयारीत राहिला. झाडावरच्या मुलाने पाचदहा मिनिटात पिशवीभर कैऱ्या काढून बाहेर उभ्या असलेल्या मुलाकडे फेकल्या. त्यांच्यातला समन्वय इतका चांगला होता की मला क्रिकेटच्या सामन्याची आठवण आली. दोनतीन कैऱ्याच खाली पडल्या असतील. बाकीच्या सगळ्या पिशवीत जमा झाल्या. पिशवी भरल्यावर फार अधाशीपणा बरा नाही असा वयाला न शोभणारा पोक्त विचार करून मुलं पळाली. ती गेल्यावर साधारण तीन चार मिनिटांत त्या इमारतीतले एक गृहस्थ आले. त्यांना दोन कैऱ्या पडलेल्या दिसल्या त्या उचलून खिशात घालीत ते चालू पडले. मग पहारेकरी पोचला. त्याच्याही नशीबात एक कैरी होती. ती उचलून त्याने आपल्या केबिनमध्ये ठेवली.

मधल्या काळात मुलीही पिल्लाला घेऊन गेल्या.

रस्ता पुन्हा सामसूम झाला.

ते सध्या काय करीत असतील?

आमच्या कट्ट्यावर एक पंचेचाळीशीची पोरगेलीशी दिसणारी बाई येत असे. सुरुवातीला ती काही बोलत नसे. हळूहळू ती बोलायला लागल्यावर कळलं की लग्नानंतर काही वर्षातच तिच्या नवऱ्याला दारुचं व्यसन असल्याने तिच्या वडीलांनी त्याला चोप दिला तेव्हा तो घाबरून आपलं मालकीचं घर सोडून पळून गेला. त्यानंतर तिच्या भावाने तिचं हे घर (तिची सही घेऊन) भाड्याने दिलं. त्या भाड्यातून तो तिच्या आणि तिच्या एकुलत्या मुलाच्या उपजीविकेचा आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवतो. पण ती दुसऱ्या भावाच्या घरी रहाते. या भावाची बायको तिला घरी थारा देत नाही. आपल्या नणंदेचं पाऊल वाकडं पडू नये म्हणून की ती नकोशी आहे म्हणून नक्की कशासाठी ते माहीत नाही, पण तिने तिला एक कठोर दिनक्रम आखून दिलाय. अर्थात हे काही मला तिच्याकडून कळलं नाही . तिच्या भावाच्या इमारतीत रहाणाऱ्या मैत्रिणींकडून कळलं. तर तो दिनक्रम असा – सकाळी घरातली कामं, आंघोळ वगैरे आटोपून चर्चमध्ये सात वाजता जायचं, तिथे साडेदहापर्यंत थांबायचं. मग घरी आल्यावर भावजय तिला जेवणाच्या वेळेपर्यंत दर वेळी वेगवेगळ्या गोष्टी आणायच्या निमित्ताने बाहेर पाठवते. जेवण आटोपलं की तिने बाहेर पडून संध्याकाळी साडेसहापर्यंत बाहेर रहायचं. या काळात तिने फक्त चालत रहायचं, कुठेही थांबायचं नाही, कुणाशीही बोलायचं नाही. आमच्या काही मैत्रिणी तिला म्हणाल्या अगं तू आमच्याशी बोललीस तर आम्ही थोडंच तिला सांगणार आहोत. यावर तिचं म्हणणं हे की भावजय सांगते की तिची माणसं नणंदेवर लक्ष ठेवून असतात, त्यामुळे ती कुणाशी बोलते, काय बोलते, कुठे जाते हे सगळं तिला कळतं. त्यामुळे पाय दुखले तरी ती सतत चालत रहाते. घरी गेल्यावर अर्थात सकाळच्या सारखंच रात्रीपर्यंत तिला वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर धाडलं जातं. मला आपलं वाटायचं की ही तिची भावजय खडूस म्हातारी असणार. तर एकदा मला मैत्रिणींनी ती आमच्या बाकाजवळून जात असतांना दाखवली. मला धक्काच बसला, कारण ती पस्तीशीची तरुणी होती. तिच्यासोबत तिची दत्तक मुलगी होती. इतकी तरुण आणि एकादी मुलगी दत्तक घेणारी बाई असं वागू शकते यावर माझा विश्वासच बसेना.

आमच्या एका जेष्ठ मैत्रिणीची भावजयही अशीच. आमच्यासमोर गोड वागते, तरीही कधी कधी तिचं पितळ उघडं पडतं. शिवाय शेजाऱ्यापाजाऱ्यांकडूनही कळलंय की भावजयीच्या जाचाने ती सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडते ती दिवसभर कुठल्यातरी पायरीवर, बाकावर बसून संध्याकाळी काळोख पडतांना घरी परतते.

आमच्या परिसरातले एक म्हातारे गृहस्थ सकाळ संध्याकाळ बाकावर बसून असतात. मग कळलं की आधीही ते बायकोसह बाकावर बसलेले असत. पण आता ते प्रमाण अधिक वाढलंय, कारण त्यांचं दुकान त्यांची बायको वारल्यावर मुलाने ताब्यात घेतलं आणि त्यांना घरातली माणसंच बाहेर पाठवतात.

आता या लोकांविषयी कुठून तरी खरं खोटं काहीतरी कळतं. पण मी अशी कित्येक माणसं पाहिलीत जी अगदी पिशवीत खायचे पदार्थ, पाण्याची बाटली, टोपी वगैरे जवळ बाळगून एखाद्या झाडाखाली, बंद दुकानाच्या पायरीवर, मॉलच्या कठड्यावर, बागेतल्या किंवा जेष्ठ नागरिकांसाठी नगरपालिकेने बांधलेल्या बाकांवर दिवसभर बसून असतात. यात बायका कमी आढळल्या तरी त्या असतात हे विशेष. (बायका घरातलं काम करायला उपयोगी पडतात, त्यामुळे नकोशा होती नाहीत बहुधा). त्यातल्या काहींच्या घरी कुणीही नसेल, एकटं रहायचं भय वाटत असेल. थोडीफार हालचाल, जाग आजूबाजूला आहे अशा वातावरणात त्यांना कदाचित अधिक सुरक्षित वाटत असेल, पण वृद्धाश्रमात जावंसं वाटत नसेल (जे काही व्हायचं ते आपल्या घरात व्हावं असंही वाटत असतं).

काहींची घरंही इतकी छोटी असतात (याचा अनुभव मलाही आहे), शिवाय इतक्या चिमुकल्या घरांमध्ये माणसंही इतकी असतात की एका वेळी घरातली सगळी माणसं घरात मावूच शकत नाहीत. ती सगळीच कष्ट करणारी असल्याने कायम कामात असतात. शिवाय रात्री सगळे घरातच झोपतात असं नाही, त्यातले काही बाहेर कुठे रस्त्यावर, दुकानाच्या पायरीवर झोपतात. अशा माणसांना चोवीस तास घरात एकत्र रहावं लागलं तर हातपाय बांधूनच बसावं लागेल आणि तरीही कदाचित जागा पुरणार नाही अशी स्थिती असते.

आता टाळेबंदीच्या काळात हे सगळे काय करीत असतील?

काटकसर

आज चंदर सांगत होता, “शुभा, पूर्वी मी चहा करतांना चहाचा चमचा भरुन टाकायचो, आता सपाट चमचा टाकतो.” फाटलेल्या पायजम्याचा राखेपर्यंतचा प्रवास वाचतांना हसत असले तरी पुडीचा दोरा मीही जपून ठेवते. आमच्या पदभ्रमंतीच्या काळात एकदा उरलेल्या मीठाची आणि तिखटाची टाकून देण्यासाठी काढलेली पुडी मी ठेवून दिली आणि त्यानंतर आम्ही वाट चुकून अडकलो, भुकेने बेजार झालो, शेवटी कुठेतरी पाव आणि अंडी आणि थोडं तेल मिळालं. पण बाकी काही नव्हतं. मग मी त्या पुड्या काढल्यावर प्रकाशकडून मॅडम तुम्ही थोर आहात अशी शाबासकी मिळाली. एरव्हीही मी शिराळ्याची सालं, कोथिंबीरीच्या काड्या, पालेभाज्यांची देठं टाकून न देता वापरते. पण आतापर्यंत काय व्हायचं की दोघांसाठी वाटीभर भात शिजायला टाकतांना त्यात अर्धी मूठ नकळत पडायची, असूं दे आल्यागेल्यासाठी म्हणून. पण आता भांड्यातला तांदूळ कमी करून डब्यात पुन्हा टाकणं वाढलंय. पदार्थ अगदी ठीक्क (हा माझ्या मैत्रिणीच्या आईचा शब्द तोंडी बसलेला) व्हावा म्हणून थोडा थोडा दूधी भोपळा, लाल भोपळा, भेंड्या, तोंडल्या वगळून बाजूला ठेवून मग त्याचंच सांबार करायचं हेही ठरलेलं. पण आता काहीही वाया गेलं की आमचा क्षितिज म्हणतो तसं अगदी जीवावर येतं. पूर्वी धान्य, भाज्या धुतांना सिंकमध्ये काही सांडलं तर स्वच्छतेच्या नावाखाली टाकून देणारी मी आता सिंकमध्ये पडलेला लोण्याचा गोळा धुवून घेणाऱ्या सुनीताबाईंची शिष्या होऊन नाहीतरी शिजवायचंच आहे असं म्हणत ते टिपून घेते. माझे वडील सांगत शेतकऱ्याला धान्याचा एकेक कण पिकवायला कष्ट पडतात, त्यामुळे वाया जाऊ देऊ नका, ते आता फारच पटतंय. पण हे शहाणपण नंतरही असंच टिकेल का?

सत्तूचे परोठे

साधारण बारा वर्षांपूर्वी कार्यालयात एका महत्त्वाच्या कामासाठी चार पाच महिने एक तामिळी, एक झारखंडकडचा आणि  मूळची राजस्थानची, पण वैज्ञानिक असलेले वडील विक्रम साराभाईंसोबत काम करीत म्हणून केरळात बरीच वर्ष काढून अस्खलित मल्याळी बोलणारी एक गोड मुलगी असे चारही जण एकाच मोठ्या केबिनमध्ये सकाळी नऊ ते रात्री दहा साडेदहापर्यंत अडकून पडलेले असायचो. खरं तर आम्हाला सूपपासून ते गोडाच्या पदार्थांपर्यंत सगळं जेवण मिळण्याची सोय होती. पण त्यासाठी अधिकारी भोजनकक्षात जाण्याइतकाही वेळ नसे. म्हणून जागेवरच बसून घरून आणलेलं खात असू. तेव्हा हा झारखंडचा मित्र बरेचदा सत्तूचे परोठे घेऊन येई. आज त्या परोठ्यांची आठवण झाली कारण उपलब्ध असलेल्या पदार्थात जमेल ते करायचं असा सध्या खाक्या आहे आणि घरात पटकन् करता येईल म्हणून सत्तूचं पीठ ठेवलेलं होतं.

बिहार, झारखंड अशा उत्तरेकडच्या भागात, ओदिशात सत्तू हे सर्वसामान्यांचं खाणं आहे. सत्तूमध्ये भाजलेल्या डाळी- बहुधा चणाडाळ आणि धान्यं – बहुधा जव किंवा गहू असल्याने प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. उत्तरेकडे उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी सत्तूचं पीठ ताकात मिरची, जिरं घालून किंवा दूधात गूळासह किंवा तसंच खाल्लं जातं.  फणीश्वरनाथ रेणूंचे फटेहाल नायक सत्तू पाण्यात घोळून खातांना दिसतात. भाजलेलं पीठ असल्याने दक्षिणेकडे जसं भाजलेलं नाचणीचं पीठ दूधात किंवा ताकात मिसळून प्यायलं जातं तसंच हेही. हे कोरडंसुद्धा खाल्लं जातं. पण ज्यांना थोडे जिभेचे चोचले पुरवायचेत त्यांच्यासाठी  सुप्रसिद्ध लिट्टीचोखा हा बिहारी पदार्थ किंवा सत्तूचे परोठे किंवा खीरही करता येते.

आंतरजालावर पाहिलं तर परोठ्याच्या पाककृतीत थोडेफार फरक दिसतात. पीठ तर परोठ्याला घेतो तसंच किंचित मीठ, तूप घालून मळून घ्यायचं नि मुरायला बाजूला ठेवून द्यायचं. सत्तूच्या पीठात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चिमूटभर हिंगपूड, आलंलसूणमिरचीचा ठेचा, ओवा, लिंबाचा रस किंवा आमचूर घालायचं. काही ठिकाणी आवडत असल्यात धण्याजिऱ्याची पूड आणि लाल तिखटही घालावं असं सांगितलंय. तर एके ठिकाणी आंब्याच्या लोणच्याच्या काही फोडी बारीक ठेचून घातल्याने छान लागतं असं म्हटलंय. हे मिश्रण थोडं कोरडं होतं, म्हणून की काय त्यात थोडं मोहरीचं तेल घालावं असंही सांगितलंय, तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्या आवडीचं कुठलंही तेल घाला. हे सारण भरुन नेहमीसारखे परोठे करा आणि दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत गरमागरम खा. मात्र आता सगळेच उपलब्ध पदार्थ जपून वापरायचे असल्याने आणि वजनही वाढू द्यायचं नाही म्हणून तेलातूपाचा वापर जरा बेतानेच करा.

एका खडूस समीक्षकाची हजामत

आजकाल टीव्हीवर बघतांना ओळखीच्याच सिताऱ्यांचे चेहरे बदललेले दिसताहेत. सुंदर दिसणाऱ्या तारका कोरोनावर प्रतिक्रिया देतांना फार सामान्य दिसायला लागल्यात. डोईवर केसांची काळीशार झुल्पं बाळगणाऱ्या अभिनेत्यांच्या केसांचे खरे रंग दिसायला लागलेत. सगळ्यांचीच पंचाईत झालीय. माझ्या नवऱ्याचीही एक वेगळी पंचाईत झाली. एरवी त्याच्या खांद्यापर्यंत रूळणारे कुरळे केस तो अधूनमधून कापत असतो. कोरोनाचा कहर सुरू व्हायच्या आधीच तो म्हणत होता केस कापायला हवेत. पण थोडी कामाची गडबड, थोडा कंटाळा असं करता करता राहून गेलं खरं. नंतर मग शक्यच होईना बाहेर पडणं. मग माझ्यामागे टुमणं लावीत बसला, केस कापायला मदत कर ना.

मी केस या एका बाबतीत फार संवेदनशील आहे. माझे लांबसडक केसही मला कापायचे नव्हते. पण एकत्र कुटुंबाच्या रगाड्यात त्यांची निगा राखणं शक्य होईना, मग चंदर मागेच लागला म्हणून कापून टाकले. पण त्याचं मला कायम दुःख होई आणि संधी मिळताच मी ते वाढवत असे. क्षितिज आणि ओवीचे केसही ती दोघं तान्ही असतांना कापायचा धीर मला होत नसे. त्यामुळे चंदरनेच त्यांचं जावळ कमी केलं होतं. माझ्या एका सहकारी मैत्रिणीच्या केसांचा लांबलचक, भरगच्च शेपटा धावत्या लोकलमध्ये आम्हा कुणालाच काय खुद्द तिलाही न कळू देता कुणीतरी अल्लाद कापून नेला तेव्हा तिच्यापेक्षा मीच अधिक हळहळले.

बरं, या आधी कधी कुणाचे केस कापले नाहीत. त्यामुळे आपल्याला जमेल की नाही याची मला शंका यायला लागली. पण कित्येक गोष्टी आपण निरीक्षणातून शिकत जातो, नाही का? माझ्या लहानपणी घरी खेकडे आणले की मी फार लांब पळत असे. ते साफ करण्याचं काम आईवडील करीत ते मात्र मी नीट लक्ष लावून पहात असे. लग्न होईपर्यंत मी खेकड्यांना कधी हातही लावला नव्हता. पण लग्नानंतर एक दिवस सासूबाई पातेलंभर खेकडे पुढ्यात ठेवून म्हणाल्या, “तुझ्या माह्यारी करतात जणू, तुला येतच असन. कर तूच.” मग काय लहानपणी पाहून गिरवलेले धडे आठवत धडाधड उरकलं न् काय.

आत्ताही तसंच झालं. मेरीच्या पार्लरमध्ये केलेलं निरीक्षण कामी आलं. मेरी ही खरं तर माझी शेजारीण. पण आमच्या गृहनिर्माण संस्थेतलं तिचं घर तिने भाड्याने देऊन टाकलंय. ती चिनी असली तरी गेल्या चारपाच पिढ्या मुंबईत घालवल्याने ती आता पक्की भारतीय झालीय. सर्वसाधारणपणे भारतीय नागरीक असलेले चिनी ठराविकच व्यवसाय करतांना दिसतात. चिनी पुरुष एक तर हॉटेल व्यावसायिक असतात किंवा डेंटिस्ट आणि बायका सहसा ब्यूटी पार्लर चालवतात. हे आपलं माझं निरीक्षण. काहीशी स्थूल, दिसायला सुंदर असणारी मेरी स्वभावाने फार आनंदी. मी आणि ओवी केस कापण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही सौंदर्योपचार करून घेत नाही हे माहीत असल्याने आम्ही गेलो की ती खुणेनेच पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास असं सांगत असे. तिची गिऱ्हाईकं ही वर्षानुवर्षे तिच्याकडे जाणारी असत. त्यांना तिच्याकडूनच केस कापून हवे असत. त्यासाठी थांबायची त्यांची तयारी असे. सगळ्यांच्या कुटुंबांविषयी तिला ठाऊक असे. त्यांच्या मुलांच्या शाळा, तिथले शिक्षक, एकूण शिक्षणव्यवस्था, रोजच्या आयुष्यातल्या अडचणी अशा असंख्य गप्पा आणि सोबत सौंदर्यासाठीच्या युक्त्या. मेरीच्या कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असला तरी तिच्या पार्लरमध्ये तिच्या मदतनीसांनी लावलेली हिंदू देवतांची छायाचित्रं, मूर्त्याही असत. खास पोर्सलीनमधल्या शोभेच्या वस्तूंनी सजावट केलेली असे. मला गंमत येई ती तिथल्या आरशात आमच्या मागच्या आरशामुळे दिसणारी सहासात प्रतिबिंब न्याहाळण्यात. मेरीच्या हालचालीही इतक्या देखण्या असत की केस कापणाऱ्या मेरीला मी बराच वेळ पहात बसे.

ते निरीक्षण चंदरचे केस कापतांना कामी आलं. ती कसे लांब केस कापायच्या आधी सरळ करुन घेऊन कंगवा सरळ उभा धरून केस कापते, मग बारीक करीत आणल्यावर उलट्या कंगव्याने पकडून कसे कापते, कानाजवळचे केस कापतांना कसा तिरपा कंगवा पकडते. अगदी बारीक केस कापतांना काय काळजी घेते, शेवटी मानेवरचे राहिलेले केस उडवतांना कसा नाजूक वस्तरा चालवते हे सगळं आठवत मी चंदरचे केस कापले आणि मुलांना छायाचित्रासकट कळवून टाकलं, “एका खडूस समीक्षकाची एका कवयित्रीने केली हजामत.”

जॉर्जी, जिजू आणि बिर्याणी

जॉर्जी ही माझी महिला विशेष लोकलमधली मैत्रीण. तिचं लग्नानंतरचं नाव खरं तर नसीम. ती मूळची ख्रिश्चन असली तरी तिने लग्न हैदराबादच्या निज़ाम आडनावाच्या गृहस्थांशी केलं होतं. पण बरोबर प्रवास करणाऱ्या तिच्या जुन्या ओळखीतल्या मैत्रिणींसारखीच मीही तिला जॉर्जी म्हणायला लागले. एकदा आमच्या एका सिंधी मैत्रिणीचं जर्मनीतल्या एका व्यावसायिकाशी वयाच्या पन्नाशीनंतर लग्न ठरलं आणि ती तिथे जायला निघाली तेव्हा तिला निरोप देतांना आम्ही एक मेजवानी आयोजित केली. प्रत्येकीने काहीतरी पदार्थ करुन आणायचं ठरलं. त्यात जॉर्जीने आणलेली बिर्याणी इतकी चविष्ट होती की तिचं वर्णनही करता येत नाही. अशी बिर्याणी मी त्याआधी आणि नंतरही कधी खाल्ली नाही. पण ती जॉर्जीने केली नव्हती तर तिच्या नवऱ्याने केली होती. निज़ामसाहेब दिसायला चांगले, उंचनिंच होते, पण फार अबोल. जॉर्जी माझ्या शेजारच्या इमारतीत रहात असे त्यामुळे तिच्या आवडीचं काही देण्याच्या निमित्ताने येणंजाणं होई. तिला उकडीचे मोदक फार आवडत. ते कुठल्याही दुकानात ती कसेही मिळाले तरी वेड्यासारखे घेई. म्हणून मी केले की तिला नेऊन देत असे. जॉर्जीला फारसा स्वयंपाक येत नसावा. ती सांगे की तिला फक्त चपात्या करता येतात आणि मासे तळता येतात. पण ही एक गोष्ट मात्र मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे की तिला घरी आल्यावर ताजं, गरमागरम अन्न मिळत असे. जिजू (ओळख नीट झाल्यावर मी निज़ामसाहेबांना जिजू म्हणायला लागले. मी जिजू अशी हाक मारीत असे अशी ती एकमेव व्यक्ती) आणि जॉर्जी यांच्या वयात बरंच अंतर होतं. ते केव्हाच निवृत्त झाले होते. पण जॉर्जी घरी यायच्या आधी साग्रसंगीत चविष्ट स्वयंपाक करुन टेबलावर टेबलक्लॉथ अंथरुन भांड्यांमध्ये सगळा गरम स्वैंपाक झाकून प्लेटस पुसून उलट्या घालून ठेवलेल्या असत. जॉर्जीबाई आंघोळ करून लगेच पानावर बसत.

जरा चांगली जानपहचान झाल्यावर मी जिजूंकडून बिर्याणीची पाककृती घेतली. लहान मुलाला सांगावं तशी (मी होतेच खूप लहान, मी नुकती पन्नाशी ओलांडलेली तर जिजूंनी पंचाहत्तरी) त्यांनी ती “अब क्या डालोगे? कैसे डालोगे?” असं विचारत ती माझ्याकडून घोटून घेतली. तेव्हा मला जमत असे. आता बऱ्याच वर्षांमध्ये केली नाही. नंतर जिजूही कर्करोगाने आजारी पडून गेले. त्यांच्या अखेरच्या दिवसातलं बोलणं फक्त त्यांच्या वेदनांसंबंधी होई. त्याबाबतीत मला काहीच करता येत नसे. आणि शेवटी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. आता जॉर्जीकडेही बिर्याणी होत नाही. ती विकतच आणत असावी. पण जिजू हयात असतांना एकदा मी कामावरुन घरी परतत होते तेव्हा रात्री साडेनऊच्या सुमारास जॉर्जी पळत पळत वाण्याच्या दुकानाकडे निघालेली दिसली. तिला विचारलं काय झालं तर म्हणाली, “अरे, बिर्यानी बनाने का प्लान था, तुम्हारे जिजूने बोला था सामान ला के रखने के लिए, पर फिरभी कुछ भूल गयी।” “कहीं केसर और केवडा इसेन्स यें दोनो तो नहीं ना भूली?” मी विचारलं. “हाँ रे, बराबर पहचाना, तुझे कैसे पता?” मला माहीत होतं, कारण जिजूंप्रमाणेच केशराच्या काड्या आणि केवडा यांच्याशिवाय बिर्याणी करायला मलाही आवडत नाही.

बनवाटाकामारा

आज सकाळी ओवीबरोबर चंदरचा वॉट्स अॅप संवाद चालू होता. ती म्हणाली, “बाबा मी चहा बनवतेय” चंदर तिला म्हणाला, “तू असं म्हटलंस तर माधुरी पुरंदरे रागावतील. त्या बनविणे या क्रियापदाच्या विरोधात आहेत. अलीकडे लोक कशासाठीही बनविण्याचा उपयोग करतात असं त्या म्हणतात. मराठीत म्हणे चहा ठेवतात किंवा करतात. तर तू चहा ठेव किंवा कर.” यावर तिचं म्हणणं असं की सगळेच सगळ्यांना बनवतात बाबा आजकाल. तर मी तिला म्हटलं, “काही लोक चहा घाल म्हणतात, विदर्भात चहा मांडतात तर कोकणात चहा टाकतात. कोकणातली क्रियापदं तर फारच वेगळी. तिकडे चहा खातातही, पंखा किंवा दिवा लावतात, काढतात, कुणीतरी यायला होतो ( चंदर यायची वेळ झाली असं माझ्या सासूबाईम्हणतांना चंदर यायला झाला असं म्हटलं की माझ्या सासूबाई खिक्कन हसायला लागायच्या. त्या म्हणत आपल्याकडं म्हैस यायला होते म्हणजे म्हैस व्यायची वेळ जवळ येते.) प्रसिद्ध लेखक विलास सारंग यांनीही यावर काहीतरी लिहिलंय असं आठवतं. काही हिंसक लोक तर काहीही मारतात. ते चहा मारतात, कुणाला तरी मोबाईल मारतात, कशावर तरी सही मारतात. याशिवाय ते कुणाला फेकून मारणं, उचलून मारणं, बाण मारणं वगैरेही करीत असावेत असा दाट संशय आहे. तुम्ही काय काय मारता ते सांगा बरं का!

कोरोना कोरोना

कोरोनाच्या भीतीने सगळे घरात बसलेत आमच्यासारखे असंच वाटलं मला. सायटीकामुळे फार वेळ एका स्थितीत रहाता येत नाही. म्हणून आलटून पालटून बसणं, उभं रहाणं चाललंय. तरी आज वेळ काढला जरा खिडकीबाहेर डोकावायला तर सगळं जग होतं तसंच चाललंयसं वाटलं. चंदरच्या भाषेत सांगायचं तर ‘निष्ठावंत’ चालणारे चालत होते, रोज बकऱ्यांना चारायला घेऊन जाणारी, नऊवारी अंजिरी, नारिंगी लुगडं आलटून पालटून नेसणारी बाई चक्क मास्क लावून बकऱ्यांना टेकलत होती. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या मुली नेहमीसारख्या गेल्या आठवड्यात बाळंत झालेल्या कुत्रीच्या पिल्लाला दूध पाजत होत्या, लस टोचत होत्या, लहान मुलं मास्क लावून सायकली दामटवीत होती, रस्त्याच्या टोकाला असलेल्या बागेबाहेर बाईकींवर किंवा झुडूपाआड प्रेमालाप करणारी जोडपी (ती तरी कुठे जाणार बिचारी, भारतात त्यांची काहीच सोय नाही) बाईक दौडवीत चालली होती. घराजवळच्या डी-मार्टमध्ये तर उद्याच्या ‘जनता कर्फ्यू’च्या भयाने मैलभर लांब रांग होती म्हणे आणि तिकडे आलेल्या लोकांच्या गाड्यांनी रस्ता व्यापला होता.

लोकांना एखाद्या दिवशी जरी घरात रहायचं म्हटलं तर कोंडून पडल्यासारखं वाटतं हे खरं. मग जर पुढचे काही दिवस, कदाचित आठवडेही घरातच रहायचं म्हटलं तर अवघड आहे. आता आमचं कसंय की ठीक आहे बुवा चालायला नाही गेलो तर चंदर घरातल्या घरात चालतो, मुलं व्हिडियो कॉल करून गप्पा मारतात, चंदर काहीतरी रहस्यमय वाचत बसतो, मी माझी भाषांतरं करीत बसते, चित्रं काढत बसते, शिवाय टीव्हीही रंगून जाऊन बघते, गेल्याच आठवड्यात काही नियतकालिकं, पुस्तकं आलीत ती अजून वाचून व्हायचीत. घराबाहेर पडलं नाही तरी खिडकीतून सुंदर दृश्य दिसतं, दुपारी उन्ह घरात येतं त्यामुळे त्यासाठी बाहेर जायची गरज नाही. रात्री दोघंही स्क्रॅबल खेळत बसतो. तसं सगळ्यांनाच करता येईल असं नाही ना, काय करायचं.