सहोदर

काही वेळा आपण दुसऱ्यांकडे पाहून अंदाज बांधत असतो. जसं की ही घरेलू दिसणारी बाई बहुधा भाजी घ्यायला चाललीय, ही कोपऱ्यातली बाई बहुधा सरकारी कार्यालयात कारकून असावी. ती कलकत्ता साडी नेसलेली, भांगात सिंदूर भरलेली बाई बहुधा बंगाली शिक्षिका असावी, ती खिडकीजवळ बसलेली जयपुरी प्रिंटचा सलवार कमीझ घातलेली, गोरीपान, सुखवस्तू दिसणारी मुलगी बहुधा पार्ल्याला उतरणार (क्लेम लावायला हवा जागेसाठी) इ.इ. कधी ते थोडेफार बरोबर निघतात तर कधी सपशेल फसगत होते.

एकदा माझंही असंच झालं. तेव्हा मी बँकेच्या ग्रंथसंग्रहालयात काम करीत होते. आमचे बरेचसे वरिष्ठ नवनवीन पुस्तकं, लेख वाचून स्वतःचं आमच्या क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत ठेवीत. त्यात काही अर्थतज्ज्ञही असत आमच्या डॉ.माधव दातारांसारखे. त्यांना संदर्भ शोधून देण्याचं काम आम्ही आनंदाने करीत असू. एकदा असाच एक सावळा, उंच, देखणा, कुरळ्या केसांचा तरूण काही संदर्भ शोधत होता. त्याला ते मिळाले नाहीत. तो गेल्यावर काही मिनिटातच मला त्याला हव्या असलेल्या विषयाच्या संदर्भात काही सापडलं. पण मी काही त्याला ओळखत नव्हते. तेव्हा मी माझ्या सहकारी मैत्रिणीला बेला लाहिरी चौधरीला म्हटलं, “अगं, तो मघा इथं एक बंगाली मुलगा उभा होता ना, त्याचं नाव आणि इंटरकॉम नंबर सांग ना, त्याला हवा असलेला एक लेख सापडलाय मला.” तर ती हसून म्हणाली, “अगं तो ना, तो बंगाली नाहीय जन्मानं. त्याचं नाव राघवन पुत्रन्. तमिळीयन आहे.”  “पण त्याचे उच्चार, बोलण्याची पद्धत, हातवारे यावरून तर मला तो बंगाली वाटला.” तर ती म्हणाली, “नाही, तुझं बरोबर आहे तसं. तो खरं तर अर्धा काय पुरा बंगालीच आहे. Born and brought up in Kolkata. त्याचं लग्नही बंगाली मुलीशी झालंय.”

मला एकदम प्रा.सुहास गोळे यांच्या मेहुण्याबद्दल चंदर सांगायचा ते आठवलं. प्रा.गोळ्यांनी एका चिनी महिलेशी लग्न केलं होतं. पण ते कुटुंब वाढलं होतं कोल्हापुरात. त्यामुळे त्यांचा चिनी मेहुणा अस्सल कोल्हापुरकरांसारखे कपडे घालून वावरत असे आणि कोल्हापुरात बोलतात तसं, “आमचं दाजी काय करायल्यात काय माहीत” असं बोलायचा म्हणे.

असाच आमचा एक मेनन नावाचा मित्र. वाढला डोंबिवलीत. आता डोंबिवलीत, पार्ल्यात बालपण गेलेले लोक जवळपास पुणेकरांसारखेच. तो अगदी अस्सल मराठीत बोलतो. इतकंच काय शिव्याही मराठीत देतो. त्याला मल्याळी बोलता येत असावं. पण इतक्या वर्षात तो कधीही मल्याळी बोलतांना आढळला नाही. तो एकतर मराठी, बंबैय्या हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो. त्याने लग्नही आमच्या एका मराठी मैत्रिणीशी केलं. गंमत अशी की ही मैत्रीण लोकांना मल्याळी वाटत असे. त्यातून आडनाव मेनन म्हटल्यावर लोक तिच्याशी मल्याळीतच बोलू पहात.

माझ्या स्वतःच्या बाबतीतही हे बरेचदा घडतं. खरं तर मला मुंबईत राहिल्याने गुजराती चांगली बोलता, वाचता येते. कोकणीही समजते. माझ्या एका बंगाली शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार माझं बंगाली हस्ताक्षर तर बंगाली लोकांपेक्षाही चांगलं होतं. दाक्षिणात्य भाषा मात्र प्रयत्न करूनही शिकता आल्या नाहीत. पण सर्वसाधारण अनुभव असा की माझा सावळा रंग, मोठे डोळे, कुरळे केस आणि सहसा उभी टिकली लावायची पद्धत यामुळे असेल पण लोकांना मी दाक्षिणात्य वाटते. आमच्या बँकेतल्या एक दाक्षिणात्य उच्चपदस्थाने एकदा मला विचारलं होतं, “Madam, are you a South Indian?” हा अनुभव मी बरेचदा घेतलाय. आमच्या चालायला जायच्या रस्त्यावर एक मल्याळी जोडपं (मला त्यांच्याकडे पाहून ते मल्याळी असावेत असं वाटायचं ते खरं निघालं) नेहमी समोरून येई. ते आमच्याकडे पाहून हसत, आम्ही त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य करीत असू. एक दिवस त्या बाई मला थांबवून मल्याळीत काहीतरी विचारायला लागल्या. मला काही ओ का ठो कळेना. शेवटी मी त्यांना सांगून टाकलं त्या काय बोलताहेत ते मला कळत नाही. मग त्या म्हणाल्या मला वाटलं तुम्ही मल्याळी आहात. नंतर अर्थात मी मल्याळी नसले तरी आमची मैत्री झाली.

कधी कधी आपण जन्मलो, वाढलो एके ठिकाणी आणि नंतरच्या आयुष्यातला बराचसा भाग अगदी वेगळ्याच प्रदेशात घालवला की रहातो त्या गावच्यासारखे होऊन जातो. असं नेहमीच होईल किंवा होईलच असं नाही. काही परदेशस्थ भारतीय नाही का परदेशी गेले तरी जेवणाखाण्याच्या भारतीय सवयी, सणवार, जातीपाती घट्ट पकडून ठेवतात. अर्थात हेही खरं की एरवी एकमेकांना दुष्मन समजणारे भारतीय आणि पाकिस्तानी परदेशात गेले की पाकिस्तानी लोकांना भारतीय आणि भारतीयांना पाकिस्तानी आपले वाटू लागतात. कधी कधी काही लोकांना आपल्या लोकांपासून दूर आल्यामुळे इतकं एकटं वाटतं की त्यांना  जिथे ते रहातात त्या लोकांमध्ये मिसळून जायला जमतही नाही. आमचे एक मानलेले मामा होते. ते नोकरीनिमित्ताने इंदूरला होते बरीच वर्षं, पण त्यांच्या पत्रांतून कायम एकटेपणाचा सूर असे. आई माझ्याकडून त्यांना पत्र लिहवून घेई त्यात तिने त्यांना बरेचदा सांगितलेलं असे आजूबाजूच्या लोकांत मिसळत जा, नवे मित्र बनवा. पण त्यांनी ते केलं असेल असं वाटत नसे त्यांच्या पत्रांवरून. त्यामुळे आपल्या प्रदेशापासून दूर गेल्यावर प्रत्येकाला आपल्या स्वभावानुसार वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. आमच्या मुलांच्या बाबतीही काहीसं असंच घडलं.

आमची दोन्ही मुलं बंगलोरात शिक्षणानिमित्ताने राहिली. पण दोघांच्याही बाबतीत वेगळं घडलं. मुलगा आयआयएससीसारख्या उच्चभ्रू संस्थेत शिकला. त्यांच्या संकुलात सगळ्या गोष्टींची सोय असे. त्यामुळे बाहेर शहरात भटकायला गेलं तरच स्थानिक लोकांशी संबंध येई. त्यामुळे त्याच्या एकूण वागण्याबोलण्यात, आवडीनिवडीत फारसा फरक पडला नाही. (त्याचा स्वभावही थोडा संकोची आहे म्हणा) अर्थात पूर्वी त्याला न आवडणारे इडलीसारखे काही पदार्थ त्याला आवडू लागले. एकदा आम्ही गेलो होतो ( पालकांना मुलांसोबत रहायची, जेवायची सोय होती तेव्हा) त्यावेळी योगायोगाने तो मेस सांभाळत होता. त्यामुळे नाश्ता, जेवण यांचा बेत ठरवायचं काम त्याच्याकडे होतं. तर त्याने नाश्त्याला आम्हाला आपल्याकडल्या पातोळ्यांसारखाच पण मिरची, जिरं घालून शिजवलेल्या चणाडाळीचं पुरण असलेल्या उकडीच्या करंज्या खाऊ घातल्या होत्या. अशा काही गोष्टी सोडल्या तर तो फार प्रमाणात बदलला नव्हता. त्याचे मित्रमैत्रिणीही सगळ्या गोष्टींना माडी (म्हणजे उदाहरणार्थ क्लीन माडी) लावून तिथल्या लोकांशी बोलत. बाकी त्यांना फारसं कानडी येत नसे. पण आमच्या मुलीच्या बाबतीत मात्र असं घडलं की ती जवळपास दाक्षिणात्यच होऊन गेलीय. ती फार बोलकी, मनमोकळी, माणसांची भुकेली आहे. थोडा कार्यकर्त्याचा पिंड असल्याने असेल कदाचित रोजचे भाजीवाले, रिक्षावाले, त्यांची खोली साफ करणाऱ्या अम्मा या सगळ्यांबरोबर तिचा संवाद चालत असतो. बंगळुरात तुम्ही सार्वजनिक वाहनांनी किंवा रिक्षाने फिरत असाल, रोजचे व्यवहार स्थानिकांशी करीत असाल तर कानडी बोलणं, समजणं उपयोगाचं ठरतं. पण तिने थोडं प्रेमाने, आवडीने ते शिकायला घेतलं. तिथल्या लोकांच्या आवडीनिवडीही तिने नकळत उचलल्यात. तिथली खाद्यसंस्कृती तर तिने इतकी अंगिकारलीय की एकदा मुंबईतल्या फोर्ट भागातल्या ‘टेस्ट ऑफ केरला’ या भोजनालयात आम्ही गेलो होतो तेव्हा तिची जेवण्याची पद्धत पाहून तिथल्या माणसांना खात्रीच पटली ही आपली सहोदर आहे. मग आमच्याकडे दुर्लक्ष करीत ‘अम्मा पायनॅपल पच्चडी’ ‘अम्मा इरीशेरी’ असं करीत त्यांनी आम्हाला न वाढलेल्या सगळ्या खास गोष्टी तिला वाढल्या.

खरं तर ते भोजनालय केरळी लोकांचं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश यांच्या एकूण जीवनशैलीत, खाद्यसंस्कृतीत फरक असतील. तरीही ही ‘सहोदर’ असल्याची भावना निर्माण होऊ शकते.

नुसतंच खाणं, पिणं, लेणं यांच्यातल्या साम्यामुळे नाही तर स्वभावातलं साम्य, विचार करण्याच्या पद्धतीतलं साम्य, सारख्या आवडीनिवडी, सारखे गुण, दोष, मर्मस्थळं या आणि अशा कित्येक गोष्टींमुळे ही भावना निर्माण होते. मग आपण म्हणतो हा अगदी माझा सख्खा भाऊ आहे किंवा ही अगदी माझी सख्खी बहीण आहे.

पण मग असेच सख्खे बहीणभावंडं किंवा ज्यांना आपण रोजच्या व्यवहारातल्या संबंधांतून निर्माण झालेल्या नात्यांमधून मावशी, काका, मामू, चाचा म्हणतो त्यांच्याच विरोधात आपण कसे काय उभे रहातो?

मला आठवतंय घाटकोपरला आम्ही रहात होतो. तेव्हा स्वयंपाकाचा गॅस मिळवण्यासाठीच्या यादीत आपला क्रमांक अगदी तळाला असे. वाट पहात बसण्याशिवाय काहीच हातात नसे.  रॉकेलवर चालणाऱ्या स्टोव्हचा वापरच सर्रास होत असे. त्यामुळे स्टोव्ह दुरूस्त करणारा माणूस आयुष्यात फार महत्त्वाचा असे. आमच्या घराजवळ एका मुस्लीम गृहस्थांचं स्टोव्ह दुरूस्त करण्याचं टपरीवजा दुकान होतं. बरेचदा काम पडत असल्याने संबंधातून आलेल्या जिव्हाळ्यातून त्या गृहस्थांना कोणी मामू म्हणे तर कोणी चाचा. तेही सर्वांची कामं प्रेमाने करून देत. पण लवकरच हिंदू-मुस्लीम दंगली उसळल्या आणि त्या दंगलीत त्या गृहस्थांचं दुकान जाळलं तर गेलंच पण तेही मारले गेले. हे करणाऱ्यात जसा गुंडाचा सहभाग होता तसाच त्यांना मामू चाचा म्हणणाऱ्यांचाही हात होता.

कालपरवापर्यंत सहोदर वाटणारे लोक असे एकाएकी पूर्ण परके, अनोळखीच नव्हे तर तिरस्करणीयही का आणि कसे होतात? त्या सगळ्यांशी न मिळणाऱ्या, फटकून रहाणाऱ्या अशा  कुठल्या अस्मिता जागृत होतात आणि कशा?  आपला प्रदेश, आपली संस्कृती, आपली जात, आपला धर्म, आपली भाषा हे सगळं इतकं का खोलवर रूजलेलं असतं आपल्यात की केशवसुतांसारखा ‘प्रदेश साकल्याचा’ धुंडाळायला बाहेर पडलो, त्या नव्या प्रदेशाने आपल्या सीमा विस्तारल्या तरी कुठल्या तरी वेड्या अस्मितेने डोकं वर काढून आपली नवी ओळख, नवे बंध उपटून काढून टाकावेत? शुभांगी थोरात

Photo by fauxels on Pexels.com

कलापथि

पद्मा खरं तर आमच्या मैत्रिणीची सरस्वतीची भाची. पण लहानपणापासून बहिणीकडे वाढलेल्या सरूची ही भाचरंच सर्वस्व. त्यामुळे पद्मा सरूबरोबर पर्यायाने आमच्यासोबत नेहमी असे. तर तिच्या लग्नासाठी आमंत्रण आलं आणि पालक्कड किंवा पालघाटजवळच्या कलापथि गावी जायला तिथून सर्वात जवळ असलेल्या कोय्यम्बत्तुर ( सरू कोईमतुरचा असाच उच्चार करते आणि विमानतळावरही तो तसाच लिहिलेला आढळला) विमानतळावर दाखल झालो. आम्हाला न्यायला आलेले फक्रुण्णा भलतेच चटपटीत निघाले, आम्ही त्यांना शोधायच्या आधीच त्यांनी आम्हाला गाठलं. नाव फक्रुद्दीन. पण “खाली नाम से कैसे बुलानेका?” म्हणून सरू त्यांना फक्रुण्णा म्हणत असे आणि आम्ही ही त्या तरूणाचं तेच नामकरण करून टाकलं. त्यावरून आमच्या ओवीची गंमत आठवली. बंगळुरूच्या सवयीने आम्ही हैदराबादला रस्ता विचारतांना तिने अण्णा अशी हाक मारली तर कुणीच बघेना. मग तिच्या मित्राने तिला भैय्या किंवा भाई म्हणून हाक मारायला सांगितलं तर जादू झाल्यासारखा प्रतिसाद मिळाला. तर फक्रुण्णांनी आमची गाठोडी कलापथि गावात आणून टाकली. आमच्या जाण्याचं त्या सर्वांना एव्हढं अप्रुप वाटत होतं कि आमची अगदी बऱ्याच वर्षांनी माहेरी आलेल्या मुलींसारखी बडदास्त ठेवली गेली. कुठल्याही कामाला हात लावणं तर सोडाच आमच्या तिथल्या बंधुंनी अगदी आमची अंथरूणंही आम्हाला घालू दिली नाहीत. खाण्यापिण्याचं आणि भ्रमणध्वनिवरून धडाधड छायाचित्र पाडण्याचं काम फक्त उरलं. तेव्हा ते पचवायला आम्ही गावात फेरफटका मारायला लागलो.

उतरत्या कौलांची घरं गल्लीच्या दुतर्फा होती. बाहेरून ती एकसारखी दिसली तरी आतून घरमालकाच्या सांपत्तिक स्थितीनुसार वेगवेगळी होती हे आम्ही अनुभवलं. सरूचं घर आणि आम्ही शेवटल्या रात्री जिथे राहिलो ती दोन्ही घर पारंपरिक मल्याळी घरं होती. लाकडी खांबांवर छताची चौकट बांधलेली, आडव्या काळ्या लाकडी तुळया. सरूच्या घरात मोठ्या खांबासारखं काहीतरी होतं कोपऱ्यात. विचारलं तर कळलं कि छतावरून येणारं पावसाचं पाणी गोळा करून साठवण्याची सोय होती. एक प्रकारचं वॉटर हार्वेस्टींगच ते. पण त्याच गल्लीच्या टोकाशी आम्ही दोन दिवस राहिलो ते घर म्हणजे एक आधुनिक बंगला होता.

बाहेरून या सर्व घरात एक साम्य होतं. ते म्हणजे प्रत्येक घराच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूला बसण्यासाठी केलेले ओटे आणि रांगोळी काढण्यासाठी बसवलेले काळे चौकोनी दगड. दोन्ही दिवसात गावात तरूण मुलांचा वावर फारसा दिसला नाही. वयस्कर माणसंच जास्त होती. तरूण मुलं बहुधा शिक्षण किंवा नोकरीसाठी बाहेरगांवी असावीत. नवऱ्याला लाडाकोडाने हाताला धरून नेणाऱ्या, त्याची काळजी वहाणाऱ्या (त्यात सरूची आईही होती) म्हाताऱ्या अधिक होत्या. मग या नवनवीन रांगोळ्या कोण एव्हढ्या उत्साहाने काढतं हे माझं कुतूहल काही शमलं नाही.


कलापथि ही जवळच्या तामिळनाडूतून स्थलांतरित झालेल्या तामिळी ब्राह्मणांची पहिली वस्ती (अग्रहारम्). सततच्या आगी, जीवित आणि मालमत्तेची हानि या सगळ्याला घाबरून त्यांनी आपल्या रक्षणासाठी गणपतीचं मंदिर बांधलं. हे गांव दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. इथले ब्राह्मण विद्वान पंचक्रोशीतली धर्मकार्य करीत. (त्यामुळेच कि काय आपल्याकडे कविसंमेलनात जसे श्रोत्यांपेक्षा व्यासपीठावर कवी संख्येने अधिक असतात तसे पद्माच्या लग्नात दोन्हीकडचे पुरोहितच जास्त दिसत होते.)
गावाची रचना साधीच. काटकोनात वळणाऱ्या छोट्या गल्ल्या. प्रत्येक गल्लीच्या तोंडाशी किमान एक देऊळ. मला केरळ आणि पश्चिम बंगाल या साम्यवादी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्यांचं काही कळत नाही या बाबतीत. केरळमधले डाव्या विचारसरणीचे पुढारीही कपाळावर भस्माचे पट्टे मिरवतात. बहुधा त्यांनी आपला साम्यवाद आणि धर्म यांचे वेगवेगळे कप्पे केले असावेत. काही दुकानं. एक दोन ठिकाणी दुकानावर पाटी दिसली ‘Brahmin Products’. म्हणून कुतूहलाने पाहिलं तर पूजेच्या साहित्यासोबत पापड, कुरडया, लाडू असे पदार्थ दिसले. हे बहुधा ‘सोवळ्यातले’ असावेत. एकदा आमच्या ओवीने असंच चेन्नईवरून अय्यंगार ब्राह्मणांनी केलेले पापड आणले होते. संध्याकाळी ओट्यांवर म्हातारी माणसं उदासवाणी बसलेली असत. महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यात नवीन माणसं दिसल्यावर “ काय, कोण गावचं पाव्हणं म्हणायचं?” “खयसून इलास?” इत्यादी चौकशा होतात तशा इथे कुणी करीत नव्हतं. हे उदासवाणं, झोपाळू गाव आणि त्या शांत गल्ल्या माझ्या नेहमीच स्मरणात राहतील.


न्याहारीला इडली, वडे, डोसे, इडीअप्पम, तोड्याची जिलेबी अशा सर्व दाक्षिणात्य पदार्थ पाहून आम्हाला जरा भीतीच वाटली कि न्याहारी अशी तर जेवणात काय असेल. पण जेवण म्हणजे आपल्या ओणम् साद्याचा छोटा अवतार होता. अवियल, काळण, इस्ट्यू, पापडम्, सांबार, भात, रस्सम् या साऱ्यासोबत दोन प्रकारची पायसम् होती. त्यात माझ्या आवडीचं अडापायसम् होतं.

लग्न अगदी साधेपणाने कोणत्याही बडेजावाशिवाय पार पडलं. छोट्या गावात होतं त्याप्रमाणे वधूची तयारी घरातल्या बायकांनी केली. साध्याशा पण स्वच्छ आणि हवेशीर कार्यालयात विवाहसोहळा पार पडला. महाराष्ट्रात मंगलाष्टकं झाल्यावर वाजवा रे वाजवा अशी हाकाटी होते आणि मग वाजवायला सुरूवात होते ती वरातीपर्यंत. इथे गंमत म्हणजे प्रत्येक विधि पार पडल्यावर खूण केली जाई मग तब्बल दोन मिनिटं घडघडघड वाजत राही. मग पुढल्या विधीपर्यंत शांतता. वरातीतही नाचकाम, बँडबाजा काही नाही.

लग्नसोहळा पार पाडल्यावर सरूने फक्रुण्णाला दिमतीला देऊन आम्हाला जवळपासची ठिकाणं पहायला पिटाळलं. गेल्या महिन्यात मलमपुझ्झा, अलमत्ती आणि राधानगरी अशी तीन वेगवेगळ्या राज्यातली धरणं पहायचा योग होता. अलमत्तीला फक्त धरणाचा थगारा बघता येत होता. तिथेही धरणाजवळ अशाच आधुनिक बागा, संगीताच्या तालावर नाचणारी कारंजी होती. हे सगळं नयनरम्य होतं. लोकांना तिथे मजेत वेळ घालवता येत होता. राधानगरीला यातलं काहीही नव्हतं. धरणाची छायाचित्रच घ्यायला काय भ्रमणध्वनि, कॅमेरा काहीही घेऊन जाता येत नव्हतं. वर धरणाचं दृश्य पहायला गेलो तिथे उभं रहायलाही धड जागा नव्हती. पण तरीही मला राधानगरी आवडलं. तिथं असीम शांतता होती. समोर धरणाचं सुंदर दृश्य होतं आणि अलिकडे शेतीभातीचं नैसर्गिक दृश्य.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा कोय्यम्बत्तुरला पोचलो परतीच्या प्रवासासाठी. तिथे अजून फार प्रमाणावर गगनचुंबी इमारती नाहीत. छोटी टुमदार घरं अजूनही आहेत. तमिळ आणि केरळी माणसांना श्वासाइतकी आवश्यक अशी मंदिरं आहेत. कार्यालयात जातानांही भरजरी साड्या, दागिने आणि हो फुलांचे मोठे गजरे माळणाऱ्या दाक्षिणात्य सुंदरी आहेत. या तीन दिवसात आमची ही फुलं माळायची हौस भागली. तिथला मोगरा काही वेगळाच आणि मल्लिगे तर छानच. एकूण एक लक्षात रहाण्याजोगी भटकंती झाली.

शेवडीअप्पम्

आपली ओली शेवही मला आवडते तसेच दाक्षिणात्य इडीअप्पम्. तरुणपणात मालती कारवारकरांची भक्त असलेल्या आईकडून शिकले होते की धान्य आणि प्रथिनाचा स्त्रोत आणि भाज्या या सर्वांचा वाटा ज्या पदार्थात असतो तो आरोग्याला अधिक उत्तम. शिवाय तेल, तूपावर हात थोडा कमीच असलेला बरा. त्यामुळे दोनएक वर्षांपूर्वी चण्याच्या डाळीच्या पीठापासून केली जाणारी ओली शेव आणि कोकणात तसंच दक्षिणेकडील राज्यात लोकप्रिय असलेल्या तांदळाच्या शेवया यांचं मिश्रण असलेला हा नवीन पदार्थ केला. ज्यांना तांदूळ वर्ज्य असतील ते यात तांदळाऐवजी नाचणी, बाजरी वापरु शकतील.

ओल्या शेवेचं पीठ करतांना प्रथम पाणी उकळत ठेवावं. त्यात उकड काढतांना जसं आपण थोडं तेल घालतो तसं घालावं. परातीत बेसन (चणाडाळपीठ) घेऊन त्यात हळदपूड, लाल तिखट, मीठ, धणेजिरेपूड, लिंबाचा रस किंवा फेटलेलं दही घालून मिश्रण नीट एकत्र करावं. मी थोडी हिंगाची पूडही घातली. मग गरम पाणी थोडं थोडं करत घालून थोडं सैलसर पीठ मळून तो गोळा बाजूला ठेवावा. (जेव्हा ओली शेवच करायची असते तेव्हा हा गोळा शेवेच्या साच्यात घालून, शेव पाडली जाते आणि तिच्यावर राई, हिंग, जिरे, कढीपत्ता यांची फोडणी घालून खवलेलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरुन वाढलं जातं.)

मग एका परातीत तांदळाचं किंवा नाचणीचं पीठ घेऊन त्यात चवीपुरतं मीठ घालून उकळलेलं (किंचित तेल घातलेलं) पाणी थोडं थोडं घालून काट्याच्या सहाय्याने मिश्रण एकत्र करावं, मग ते किंचित तेलाचा हात लावून मळून घ्यावं.

इडलीपात्रात पाणी घेऊन त्यात इडलीचा साचा प्रत्येक खळग्याला किचिंत तेलाचं बोट लावून तयार ठेवावा. मग प्रथम तांदळाचं किंवा नाचणीचं उकड काढलेलं पीठ शेवेच्या साच्याला आतून थोडं तेल लावून भरावं, त्याची शेव इडलीच्या साच्यात प्रत्येक खळग्यात घालून घ्यावी. मग आपल्या आवडीचं सारण घालून घ्यावं. मी दोन प्रकारची सारणं वापरली -एक कोथिंबीरीच्या हिरव्या चटणीचं, ज्यात पालक वाटून घालता येईल- दुसरं माझ्या लेकीने बंगळुरुहून आणलेल्या कडले बेलेचं (ही एक प्रकारची चटणी असते जिच्यात चणाडाळ, उडीदडाळ, कढीपत्ता, खोबरं हे सर्व भाजून घेऊन हळदपूड, मिरच्या, मीठ या सगळ्या मिश्रणाची पूड असते). ज्यांना गोड आवडतं ते मोदकाचं किंवा इतर कुठलंही गोड सारण घालू शकतात. मग वरुन बेसनाची उकड शेवेच्या पात्रात घालून तिचा एक थर द्यायचा. शेवेच्या साच्यात दोन्ही उकडी थोड्या थोड्या घालूनही हा पदार्थ करता येतो. साच्यात थोडं पीठ उरलं तर त्याच्या हाताने थापून दोन पुऱ्या करुन मध्ये सारण भरुन त्याच्या कडा बंद कराव्या म्हणजे उरलेलं पीठ आणि सारण वाया न जाता त्याची भरलेली निवगरी करता येईल. हे सर्व इडलीपात्रात ठेवून पंधरा ते वीस मिनिटं वाफ काढावी. बाहेर काढल्यावर आवडीप्रमाणे वरुन फोडणी देऊन किंवा तूप घालून,खोबरं कोथिंबीर पेरून वाढावी. शक्यतो गरमागरम खावी. आधीच करून ठेवलेली खायची झाल्यास ओल्या नारळाचं दूध वापरून केलेला कुठलाही रस्सा वरून ओतून खावी.

जयपुरची खादाडी

मागे २०११ मध्ये सवाई माधोपुरला गेलो होतो, रणथंबोरच्या जंगलाची सफर करायला. तेव्हा शेवभाजी, शेवटमाटर, दालबाटी चुरमा हे राजस्थानी पदार्थ फार मनापासून खाल्ले होते. मला केर सांग्रीची भाजीही चाखून पहायची होती -निव्वळ हा काय प्रकार आहे या कुतूहलापोटी. एका मारवाडी मैत्रिणीने सांगितलं की जयपुरला नक्की मिळेल. आणि अगदी पहिल्याच दिवशी आम्हाला ट्रायडंटमध्ये केर सांग्रीची भाजी तर मिळालीच पण क्षितिजला लाल मांस खायचं होतं तेही मिळालं.

केर एक प्रकारचं बोरासारखं, छोट्या बोराएवढं फळ असतं आणि सांग्री एक प्रकारच्या शेंगा असतात. हे दोन्ही वाळवंटात उगवतात. उन्हाळ्यात तापमान फार वाढलं की काही उगवणं कठीण होतं. त्यामुळे केर आणि सांग्री वाळवून ठेवून त्यांचा साठा केला जातो. भाजी नसेल तेव्हा वाळवलेल्या केरसांग्रीला पाण्यात काही काळ भिजवून ठेवल्यावर त्या वापरण्यासाठी तयार असतात. वाळवण्याच्या प्रक्रियेत काही कचरा भाजीत राहून गेला असेल तर तो नीट साफ करावा लागतो. मग दोन्ही वाफवून बाजूला ठेवून फोडणीत हिंग, जिरं, बडीशेप, लाल सुक्या मिरच्या, घालून त्यात वाफवलेली भाजी घातली जाते. मग त्यात धणेपूड, मिरचीपूड, हळदपूड, गरम मसाला, आमचूर घालून नीट ढवळून फेटलेलं दही, मनुका, मीठ घालून वाफ आणली की झाली भाजी तयार. राजस्थानातल्या जेवणात तेल बरंच आढळलं , तसंच ते या भाजीतही बरंच होतं. पण आवडली आम्हाला.

मग दुसऱ्या दिवशी दालबाटी, चुरमा खायला गेलो. सवाई माधोपुरला जो चुरमा खाल्ला होता तो गव्हाच्या बाटीचा होता. इथे आम्हाला दोन प्रकारच्या बाटीचा चुरमा खायला मिळाला -गव्हाच्या आणि बाजरीच्या. मला बाजरीचा चुरमा अधिक आवडला. त्यात गूळ होता. त्यासोबत कढीपकोडी, भात आणि अप्रतिम असं मिरचीचं लोणचं. सोबत लस्सी. मजा आ गया.

गट्टेका साग आधी सवाई माधोपुरला खाल्लं होतं त्यापेक्षा इथलं वेगळं होतं. तिथलं दही, बेसन आणि धणेपूड, बडीशेपपूड टाकून बनवलेलं होतं, तर इथे कांद्याची आणि गरम मसाल्याची चव होती.

ठिकठिकाणी पवित्र भोजनालय अशा पाट्या होत्या. त्याच्या आधी अर्थातच मालकाचं नाव होतं. जसं की श्याम पवित्र भोजनालय, शर्मा पवित्र भोजनालय वगैरे. तेव्हा आमच्या चालकाला विचारलं की हा काय प्रकार आहे ? इथे कांदालसूणविरहीत भोजन मिळतं का? तर त्याने सांगितलं असं काही नाही. फक्त मांसाहार शिजवला जात नाही तिथे म्हणून पवित्र भोजनालय म्हणतात.

चांगली प्रतिष्ठित उपाहारगृहं असोत की रस्त्यावरचे ठेले, न्याहारीसाठी काही ठराविक पदार्थ सगळीकडे दिसत होते – पराठा, पोहे, पुरी भाजी, कचोरी. काही ठिकाणी प्याज कचोरी, मावा कचोरी असे फलक दिसले. कुतूहलापोटी शेवटच्या दिवशी जयपुर स्थानकाजवळच्या सुप्रसिद्ध ‘रावत कचोरी’मध्ये कचोरी खायला गेलो. माव्याचं सारण भरून मग तळून केलेली कचोरी पाकात बुडवून तिच्यावर सुक्या मेव्याचे काप घालतात. ही फार गोडमिट्ट होती. प्याज कचोरीत कांदा फार नव्हता, बटाटाच अधिक होता. पण जे काही होतं ते फार चविष्ट होतं.

तिथे बाजारात सर्वत्र पेरु विकायला ठेवलेले दिसले. अगदी रात्री नऊ वाजताही भाज्या, फळं विकणारे बाजारात दिसत. सवाई माधोपुरला पेरुच्या बागा पाहिल्या होत्या आणि पेरु घेतले होते ते फार गोड निघाले होते. म्हणून इथेही पेरु घेतले. ओवी रणथंबोरमध्ये वाघांच्या कॉरिडॉरवर काम करीत असतांना तिने तिथल्या ओबेरॉयच्या शेफकडून भरलेल्या पेरुची रसभाजी शिकून घेतली होती आणि माझ्या वाढदिवसादिवशी करुन डब्यात भरून दिली होती. ती भाजी करायची ठरली. त्यासाठी बारीक चिरलेलं आलं,लसूण, हिरवी मिरची तेलावर परतून त्यात कुस्करलेलं पनीर आणि दरदरीत वाटलेला सुका मेवा आणि मीठ त्यात टाकून परतून घ्यायचं. मग ते सारण भरल्या वांग्यासाठी चीर देतो त्याप्रमाणे चीर दिलेल्या पेरुत भरायचं. ते पेरु तुपावर परतून घ्यायचे. एका बाजूला कांदा टोमॅटोचा मसाला करून वाटून घ्यायचा. त्यात धणेपूड आणि वेलची, दालचिनी, लवंग इतकेच मसाल्याचे पदार्थ बारीक वाटून टाकायचं, आल्या लसणाचं वाटण टाकायचं. फोडणीत एक दालचिनी, दोन लवंगा, चार वेलच्या, किंचित हळद टाकून त्यात कांदा टोमॅटोचा मसाला नीट परतून घ्यायचा. त्यात भरलेले पेरु टाकायचे. सारण उरलं असल्यास तेही टाकायचं. सर्व नीट परतून हवं असल्यास थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून शिजवायचं. झाली की भरल्या पेरुची भाजी तय्यार.

तिथे सर्वत्र गजक मिळेल अशा पाट्या होत्या. गजक हा तीळाच्या किंवा शेंगदाण्याच्या सपाट चिक्कीचा प्रकार आहे. त्यासाठी आधी जाड बुडाच्या कढईत तीळ भाजून घेतले जातात. ते थंड झाल्यावर त्याची पूड करुन गूळाच्या किंवा साखरेच्या पाकात नीट मिसळून एखाद्या थाळीला तूप लावून त्यावर पातळ थर दिला जातो. हे फार वेगवेगळ्या आकारात मिळतात. आम्हाला मिळालेला गजक अळूवडीसारख्या आकाराचा होता. त्याशिवाय तिथला प्रसिद्ध घीवरही घेतला. या घीवरमध्ये तिथे रबडी टाकून खातात. अर्थात अशी खादाडी केल्यावर वाढलेलं वजन पुन्हा मूळ पदावर आणण्यासाठी इथे आल्यावर व्यायाम करणं भागच आहे म्हणा.

रांगोळी

आमच्या लहानपणी माझी रांगोळीबाबतची पहिली आठवण माझी सर्वात मोठी बहीण शुभलक्ष्मी सावंत (रत्नप्रभा चव्हाण) हिच्यासंदर्भातली. लालबागला आम्ही ज्या चाळीत राहत असू तिथे रांगोळीची स्पर्धा होती. मी त्यावेळी अंदाजे सहा वर्षांची असेन. आमचे एक चुलतचुलते स्मृतीशेष मनोहर चव्हाण हे मूर्तीकार होते. गणेशोत्सवातल्या मोठ्या गणेशमूर्ती करीत आणि रांगोळ्याही काढत. त्या काळात गणेशोत्सवात अशा मूर्तीकारांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनांनाही बरीच गर्दी होत असे. सहसा महान पुरुषांची व्यक्तीचित्रं रेखाटली जात किंवा त्याकाळात युद्धाचं वातावरण असल्याने सीमेवरच्या लढाईचंही चित्र रेखाटलं जाई. अजूनही अशा प्रकारची रंगावली प्रदर्शनं वेळोवेळी आयोजित केली जातात.

त्यापूर्वी मी आजूबाजूच्या बायका ठिपक्यांची रांगोळी काढीत ती पाहिलेली होती. त्यातली भौमितिक आकारांतून साकारलेली शुभचिन्हं, रंगसंगती नेहमीच आकर्षक वाटे. पण या स्पर्धेच्या वेळी बहिणीने मनोहरकाकांनी शिकवलेली रांगोळी काढली होती. ते एक निसर्गदृश्य होतं. मला अजूनही ती रांगोळी आठवते – रांगोळीतला डोंगर, नदी, नदीवरचा पूल हे सगळं आठवतं. माझ्यासाठी रांगोळीतून असं काही निर्माण होऊ शकतं ही एक अद्भुत गोष्ट होती. ती रांगोळी काढायचं तंत्रही वेगळं होतं. त्यात चित्रातल्यासारख्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा निर्माण करता येत होत्या. नंतर माझ्या बहिणींपैकी वनिता साटम (शैलजा) हिनेही ते तंत्र आत्मसात केलं. तिने एकदा काळ्या काठाच्या कलकत्ता साडीतल्या जया भादुडीचं चित्र रांगोळीतून रेखाटलं होतं, ते अजूनही आठवतं. या दोन्ही वडील बहिणींकडून मीही हे सगळं शिकून घेतलं. पुढे कित्येक वर्षं दिवाळीतले चार दिवस रांगोळ्या काढण्यात अत्यंत आनंदात घालवले.

सुरुवातीला आम्ही जुन्या सुती साडीचे छोटे तुकडे करून त्यातून रंग गाळून घेत असू. सहसा दृश्यात एकादी व्यक्ती चितारायची असेल तर कार्डबोर्डवर बाह्याकृती काढून ती कापून तिथे ठेवून मग आजूबाजूचं रंगलेपन केलं जाई. कारण रंग गाळतांना वाऱ्यामुळे तिथे रंग पसरण्याचा धोका असे. सहसा डोळे, ओठ, भुवया हे हातानेच रेखाटले जात असले तरी काही लोक जुन्या बॉलपेनची रिफिल काढून त्यात रंग भरून दाढीचे केस, भुवया रेखाटत असत असंही ऐकलं होतं. रांगोळीत काही मजकुर टाकायचा असेल तर कागदावर प्रथम तो हवा त्या आकारात, ठशात काढून घेऊन पेटत्या उदबत्तीने तो ठसा जाळून मग रांगोळीवर अलगद ठेवून त्यात हवा तो रंग भरला जाई. काळ जात चालला तसतशी नवनवी तंत्र आली तरी हाताने रेखाटणं चालूच राहिलं. सुती कपड्याने रंग गाळण्याऐवजी तोंडावर जाळीचं झाकण असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यातून आता हाताला रंगही न लागू देता सहज रंग भरता येतो. ठिपक्यांच्या रांगोळीला पर्याय म्हणून चाळणीसदृश उपकरणाचा वापर करून सहज पाच मिनिटांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढता येतात. चमचा, काड्या, बांगडी, वाटी अशा विविध उपकरणांचा वापर करुन रांगोळीत वेगवेगळे आकार कसे निर्माण करता येतील या विषयीच्या व्हिडीयोंची यूट्यूबवर भरमार आहे. परंतु या प्रकारच्या रांगोळ्या अजूनही नवं काही करु शकण्याचा अनुभव देतात. कारण तंत्र कितीही पुढे गेलं तरी अशा प्रकारच्या रांगोळ्यामध्ये तुमची कलात्मकता अधिक बहराला येते.

तसं तर रांगोळी तांदळाची ओली पिठी, कोरडं पीठ, डाळी, धान्य, फुलं, पानं, वाळू अशी वेगवेगळी माध्यमं वापरुन काढता येते. काही लोक परातीत किंवा घंगाळात पाण्यावर तेल, कोळशाची पूड घालून तरंगती रांगोळीही फार सुंदर काढतात. त्या सर्व प्रकारात तुम्हाला नवंनवं काही करताच येतं तरीही मी हाताळते तो प्रकार अधिक मुक्त आहे असं वाटतं.

बलात्काराचं निषेधगान

Un violador en tu camino

El patriarcado es un juez
que nos juzga por nacer,
y nuestro castigo
es la violencia que no ves.

El patriarcado es un juez
que nos juzga por nacer,
y nuestro castigo
es la violencia que ya ves.

Es femicidio.
Impunidad para mi asesino.
Es la desaparición.
Es la violación.

Y la culpa no era mía, ni dónde estaba ni cómo vestía.
Y la culpa no era mía, ni dónde estaba ni cómo vestía.
Y la culpa no era mía, ni dónde estaba ni cómo vestía.
Y la culpa no era mía, ni dónde estaba ni cómo vestía.

El violador eras tú.
El violador eres tú.

Son los pacos,
los jueces,
el Estado,
el Presidente.

El Estado opresor es un macho violador.
El Estado opresor es un macho violador.

El violador eras tú.
El violador eres tú.

Duerme tranquila, niña inocente,
sin preocuparte del bandolero,
que por tu sueño dulce y sonriente
vela tu amante carabinero.

El violador eres tú.
El violador eres tú.
El violador eres tú.
El violador eres tú.

तुझ्या मार्गातला बलात्कारी

पितृसत्ता आहे न्यायाधीश

आम्ही जन्म घेतला म्हणून करते आमचा निवाडा

आणि आमची शिक्षा काय तर अशी हिंसा जी तू पाहिली नाहीस

पितृसत्ता आहे न्यायाधीश

आम्ही जन्म घेतला म्हणून आमचा निवाडा करते

आणि आमची शिक्षा काय तर अशी हिंसा जी तू आधीच पाहिली आहेस

ही स्त्रीहत्या आहे

माझ्या खुन्याला आहे अभयदान

नाहीसं होण्याचं

बलात्कार  करण्याचं

आणि दोष माझा नव्हता, मी कुठे होते, काय नेसले होते याचा नव्हता

आणि दोष माझा नव्हता, मी कुठे होते, काय नेसले होते याचा नव्हता

आणि दोष माझा नव्हता, मी कुठे होते, काय नेसले होते याचा नव्हता

आणि दोष माझा नव्हता, मी कुठे होते, काय नेसले होते याचा नव्हता

बलात्कारी आहेस तू

बलात्कारी आहेस तू

ते होते पोलीस

ते होते न्यायाधीश

ती होती राज्यसंस्था

ते होते राष्ट्राध्यक्ष

जुलूमी राज्य आहे एक बलात्कारी नर

जुलूमी राज्य आहे एक बलात्कारी नर

बलात्कारी आहेस तू

बलात्कारी आहेस तू

निरागस मुली, झोप शांतपणे

दरवडेखोरांची चिंता न करता

तुझ्या गोड आणि हसऱ्या स्वप्नांवर

तुझ्या लाडक्या पोलीसाची नजर आहे

बलात्कारी आहेस तू

बलात्कारी आहेस तू

बलात्कारी आहेस तू

बलात्कारी आहेस तू

अनुवाद – शुभांगी थोरात

चहाची लज्जत

माझ्या वडीलांना स्वयंपाक येत असावा. पण मी कधी त्यांना स्वयंपाक करतांना पाहिलं नाही. स्वयंपाकघरात एक गोष्ट मात्र ते फार प्रेमाने करीत आणि त्यांनी ती तितक्याच प्रेमाने आम्हाला शिकवली. ती गोष्ट म्हणजे चहा. त्यांची अशी चहा करायची विशिष्ट पद्धत होती. ती अगदी पायरीपायरीने करावी लागे. आधी कपाने नीट मोजून चहासाठी पाणी घ्यायचं. ते उकळल्यावर त्यात चमच्याने मोजून साखर टाकायची. पाणी उकळून ती विरघळली की लगेच चमच्याने मोजून त्यात चहाची पूड टाकून लगेच आच बंद करून भांड्यावर झाकण ठेवायचं. दोन मिनिटं चहा मुरू द्यायचा. दूध वेगळं उकळून घ्यायचं मधल्या काळात. चहा मुरल्यावर आधी दूध गाळून घ्यायचं कपात. मग त्यावर गाळलेल्या चहाची गरम धार धरायची. कप भरला की मजेने चव घेत रिकामा करायचा. वडीलांना जाऊन तेवीस वर्ष झाली. पण माझ्या घरी अजूनही याच पद्धतीने चहा केला जातो.

त्यानंतर अर्थात मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे चहा प्यायले. मुलामुळे ग्रीन टीचीही आवड लागली. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या रेशम भवनमध्ये तळमजल्यावर टी हाऊस होतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचा चहा प्यायला तर मिळतच असे पण तिथे वेगवेगळ्या प्रकारची चहाची पूड विकतही मिळत असे. मॉरिशसला मात्र चहा पिणं नकोसं वाटे. कारण चहा फार पातळ असेच शिवाय त्यात व्हॅनिला टाकलेलं असे. पण दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनला मिळालेला रुई बोस चहा साखर, दूध न टाकताही फार छान लागे.

पण आजही वडीलांकडून जो चहा करायला शिकले तो प्यायल्यावरच चहा प्यायल्यासारखं वाटतं.

Photo by Mareefe on Pexels.com

हिंदू आणि देशीवाद

अर्थहीन, ढोंगी वर्तमानावर कल्पित भविष्यकाळाच्या चष्म्यातून तिरकस भाष्य करणाऱ्या “कोसला”तल्या पांडुरंगापासून ते भूतकाळाचे उत्खनन करून हिंदू संस्कृतीच्या सगळ्या चांगल्यावाईट गोष्टींचा  पसारा ही “जगण्याची समृद्ध अडगळ” आहे असं मानणाऱ्या ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ मधल्या खंडेरावापर्यंतचा प्रवास भालचंद्र नेमाडेंच्या कादंबऱ्यांच्या नायकाने केला आहे. ‘हिंदू’चे उरलेले भागही येऊ घातले आहेत. त्या निमित्ताने ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत आढळणाऱ्या, नेमाडेंनी ज्याची गेली काही दशके सतत पाठराखण केली त्या देशीवादाच्या सूत्रांचा आढावा व कादंबरीचे विश्लेषण हा या लेखाचा हेतू आहे. त्या दृष्टीने, वाचकांना कदाचित परिचित असला तरी सूत्ररूपाने देशीवाद म्हणजे काय हे सुरूवातीला मांडणे योग्य ठरेल.

नेमाडे यांनी देशीवादाची मांडणी करताना ज्यांची साक्ष काढली आहे त्या राल्फ लिंटन यांनी देशीवादाशी संबंधित विविध अर्थच्छटांच्या सर्वसाधारण विभाजकावर आधारलेली आणि समाधानकारक ठरू शकेल अशी देशीवादाची जी व्याख्या केली आहे ती अशी : “एखाद्या समाजातील सदस्यांनी त्यांच्या संस्कृतीच्या निवडक पैलूंचे पुनरूज्जीवन करण्याचा वा त्यांना चिरस्थायित्व देण्याचा जाणीवपूर्वक व संघटितपणे केलेला प्रयत्न” म्हणजे देशीवाद होय (राल्फ लिंटन, देशीवादी चळवळी, भाषांतरः शुभांगी थोरात, अनुष्टुभ्, मार्च-एप्रिल, १९९६, पृ. १५).

स्वतः नेमाडे यांनी मांडलेल्या देशीवादाचे स्वरूपही पहाण्याजोगे आहे. त्यातले पहिले तत्त्व हे की प्रत्येक समूहाची स्वतःची अशी देशी संस्कृती असते. दुसरे हे की ज्या गोष्टी समाजाची मूळ संरचना वाढविण्यासाठी आवश्यक असतात, अशाच परक्या गोष्टींना देशीपणात स्थान मिळते. आपली देशी संस्कृती छेदून त्या पलीकडच्या आंतरदेशीय महाव्यवस्थेत जाण्याची उलटी प्रक्रिया ही साहित्याची मूलभूत गरज नाही. त्यांच्या मते देशीपणाच्या संकल्पनेत स्थितिशीलत्व अबाधित राखणारी स्वाभाविक अवस्था हा अर्थ अभिप्रेत असतो. ही संकल्पना गुणात्मक नसून ते एक सामान्य आणि अपरिहार्य तत्त्व मानले पाहिजे. कारण देशीपणाचे तत्त्व विशिष्ट संस्कृतीने निर्मिलेल्या बऱ्यावाईट, लहानमोठया सर्व प्रकारच्या कृतिंमध्ये प्रगट झालेले दिसते. शेवटी देशी असणे म्हणजे एकंदर भूमितत्त्वाचे भान, त्यातील सर्व जाती, वंशांचे समूह, संप्रदाय, धर्म, परंपरा, स्थलकालाचे उभेआडवे छेद या सर्वांसकट येणारे एकजिनसीपणाचे भान होय. देशीपणाच्या स्वयंपूर्णतेचे देशीवाद हे बाह्यवर्ती रूप आहे (भालचंद्र नेमाडे, टीकास्वयंवर, १९९०, पृ ७८-९२).

आता प्रथम “हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ” या कादंबरीचे कथासूत्र आणि इतर बाबी पाहू. सिंधू नदीच्या तीरावर आपल्या चमूसह उत्खनन करणारा पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यासक खंडेराव विठ्ठल. वडील मृत्यूशय्येवर असल्याची तार मिळाल्याने आपलं काम तसंच टाकून त्याला आपल्या गावी मोरगावला जावं लागतं. मोरगावला जायच्या आधीही त्याच्या मनात दरक्षणी मोरगाव आहेच. तिथल्या एका बलुची मजुरणीचं एक वर्षाचं लहान मूल मरतं, तेव्हा ती म्हणते, “कुदरतचा होता. कुदरतला सुपूर्दगी केली”  मोरगावची एक बाईही असंच म्हणाली होती याची खंडेरावला आठवण येते. असं मोरगाव त्याच्या आत वसलेलं आहे. प्रवासात तो त्या आत वसलेल्या मोरगावाचं मनातल्या मनात उत्खनन करीत रहातो. त्याचं लहानपण, घरच्यांच्या विरोधात बंड करीत त्यांना निरर्थक वाटणारं शिक्षण घेतांनाचं आयुष्य असं सगळं आत्मचरित्र त्याच्या नजरेसमोर येत रहातं. घरी पोचल्यावर वडील त्याच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतात. आता वडीलांनी मागे सोडलेल्या त्यांच्या, आत्यांच्या, चुलत्यांच्या, भावाच्या मालमत्तेचा वारस- “केवळ वंशवृक्षपारंबी मी” असा तो उरला आहे. आता खंडेराव पर्यायांच्या शोधात आहे. पण तो त्याच्या हाती आहे का आणि नसल्यास का नाही.  

हा नायक पुरातत्वशास्त्रात पीएचडी करणारा संशोधक असल्याने विद्वानच. शिवाय कुठल्याही काळात भ्रमण करू शकणारा असा सोयीचा आहे. तो हडप्पासंस्कृतीच्या काळाचं दर्शन आपल्या स्वप्नातून घडवू शकतो. मध्ययुगातही जाऊ शकतो आणि आधुनिक काळातला तर तो आहेच.

तसंच मोरगावही. बाहेरून आलेले सगळे गावाच्या समाजात वेगवेगळ्या प्रकारे सामावून जातात. रोटीबेटी व्यवहारात अंतर राखून, विरोध बाळगूनही सर्व प्रकारचे संबंध प्रेमाने जोपासून आपापलं अस्तित्व सांभाळून अठरापगड जाती पिढ्यान् पिढ्या एकोप्याने आणि ‘डौलाने’ रहातात. “लोकांचे स्मरण ज्या कोणत्या युगापर्यंत मागे जाई, तेव्हापासून एकमेकांचं अगत्य पडून ब्राह्मण, कुणबी, वाणी, अलुतेबलुते, फिरते, परदेशी – सगळे एकजीव झालेले होते.” (पृ.क्र.११०). खरं संरक्षण गावगाड्यातल्या सगळ्या प्रकारच्या जाती-जमातींच्या राहण्याच्या व्यूहामुळंच. गावाबाहेरचा महारवाडा, मांगवाडा आणि चांभारवाडा या वस्त्या म्हणजे जणू गावाच्या रक्षणासाठी जिवंत खंदकच. कंजारभाट, पारधी, डोंबारी इ.ना तर खास गावाबाहेरच्या मैदानात उघड्यावर राहण्याचा ‘खास दर्जा’ होता. असं हे मोरगाव म्हणजे जणू हजारो वर्षांची हिंदू संस्कृतीच.

विद्वान नायकाच्या आणि इतर पात्रांच्या द्वारे कादंबरीच्या निवेदकाने वेगवेगळ्या जातीजमातीधर्माच्या, वंशाच्या लोकांच्या रितीभाती, गाणीबजावणी, रूढीपरंपरा, सणवार, म्हणी वाक्प्रचार, कथा दंतकथा, विश्वास अंधविश्वास, अंतर्गत आणि बाह्य जगाशी सत्तासंघर्ष असा ‘हिंदू संस्कृती’चा एक बारीकसारीक तपशिलांनी गच्च भरलेला असा विशाल पट उभा केला आहे. वर दाखवलेल्या कथासूत्रासाठी हा पट फार प्रमाणाबाहेर मोठा आहे. तो अनेक किस्से, कहाण्यांनी भरलेला आहे. लेखकाचे भाषेवरचे प्रभुत्व आणि गोष्टी सांगण्याचे कौशल्य यामुळे वाचक भारावून जाऊन त्यात रंगून जात असला तरी त्यांचं कथानकात प्रयोजन काय हा प्रश्न उभा रहातोच. त्या सगळ्यांतून नायकाला एका विशिष्ट निर्णयापर्यंत आणलं जातं आहे. त्या सगळ्या कथनांसोबत काही मांडलं जातं आहे. ते काय  आहे?

या सगळ्या कथनातला घटनाक्रम एका घटनेतून दुसरी- दुसरीतून तिसरी अशा क्रमाने नेत नाही. विस्कळीत स्वप्नासारख्या घटना. त्यातून नायकाची विस्कळीत मनस्थिती दिसेल, पण  घटनाक्रमाला पुढे नेणारं काही येत नाही. कादंबरीच्या सुरूवातीला खंडेरावने स्वप्नात सादर केलेल्या शोधनिबंधासारखे घटनांचे अर्थही त्याला वाटतील तसे आहेत. उदाहरणार्थ त्याची युरोपियन सहकारी मंडी ही किती आत्मनिर्भर, नवऱ्याला सोडून दिलेली इ. सांगतांना लैंगिकदृष्ट्या या बायका लहानपणापासूनच ‘मोकाट’ असल्याने पुढे भीड रहात नाही, व्यभिचाराची शक्यताही यात गृहीत धरलेली असते, हा शोध खंडेरावाला कसा काय लागतो हे उकलत नाही. (गाडीत दिसलेली नटवी तरूणी स्त्रीमुक्तीशी संबंधित असावी असंही त्याला वाटतं). किंवा सततच्या दुष्काळांमुळे ह्या उपखंडाखालच्या भूगर्भातला पाण्याचा साठोवा आटत गेला. शूद्रही वाढले. दहाव्या अकराव्या शतकापासून अस्पृश्यता संस्था म्हणून पक्की झाली असं खंडेराव/निवेदक कोणत्या संशोधनाच्या बळावर म्हणतो हे कळत नाही.

नायक आणि निवेदक हे खरे तर तसे एकच आहेत. कादंबरी सतत वर्तमानकाळ आणि भूतकाळात खेळत रहाते. त्या दृष्टीने हा तृतीयपुरूषी भासणारा निवेदक सोयीचा आहे. कारण इथे नायक लेखकाच्या आधीच्या नायकांसारखा व्यवस्थेला, परंपरेलाच काय पण एकूणच अस्तित्वाला नकार देणारा नसून जी परंपरा, जी व्यवस्था त्यांनी नाकारली तिलाच शरण जायच्या विचारात आहे. त्यासाठी कित्येक वर्षांपासून परंपरेने जे चालत आलं आहे त्याची उदात्तता प्रस्थापित करायची आहे. मग पुन्हा वर्तमानात यायचं आहे. पहिल्या भागात संशोधन करतांनाचे अनुभव मांडतांना खंडेरावाच्या स्वप्नातून प्राचीन संस्कृती, मग पुन्हा वर्तमानातले तपशील, पुन्हा अली या सहकाऱ्याबरोबर जातांना मधून मधून झोपेत लहानपणापासूनचे आयुष्य, मधूनच जागे होत आजूबाजूचे वास्तव अशा रितीने पहिल्या भागाच्या शेवटी खंडेरावाच्या समोरचे महत्त्वाचे नैतिक द्वंद्व मांडले जाते. त्यानंतर निवेदकाच्या तोंडून दुसऱ्या भागात ऐतिहासिक काळातील मोरगावच्या निमित्ताने पेंढाऱ्यांची लूटालूट, होळकर, पेशवे, सातपुड्यातील भिल्ल, कोरकू, मग इंग्रज अंमल,स्वातंत्र्याचा संग्राम (त्यात खंडूचा हुनाकाका शहीद झालेला), त्यानंतर एकदम सात पिढ्या ओलांडून नजीकच्या भूतकाळातल्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या खेड्यातला  कुणब्याचा – म्हणजे खरं तर सधन शेतकऱ्याचा बारदाना, त्याच्या ‘जीवावर’ जगणारे अलुतेबलुते, कुटुंबव्यवस्थेच्या आधाराने जगणाऱ्या सोनावहिनीसारख्या राबराब राबणाऱ्या, ‘नवरा तो नवरा, घर ते घर’ असं मानणाऱ्या  बायका, दुष्काळ, रेशनचं धान्य असं सगळं दाखवून झाल्यावर हा भाग संपतो. मग तिथून खंडेरावाच्या शैक्षणिक आयुष्याचा तपशील येतो. त्यात बडोद्याच्या ओरिएंटल इनस्टिट्यूटमध्ये खंडेराव शिकायला आल्यावर भूतकाळात जाण्यासाठी योगायोगाने दूरचे नातलग निघालेल्या धनजीभाईंच्या म्हाताऱ्या आईचे निमित्त होते आणि आजोबांनी बांधलेल्या जुन्या वाड्याच्या मिषाने खंडेरावाच्या द्वंद्वात पारडं कुठे झुकणार याचे संकेत मिळत जातात. इथं खंडू म्हणतो, “तुम्ही कितीही नवं व्हायचा प्रयत्न केला, तरी आधीचं सगळं संपूर्ण नष्ट करता येत नाही. ते नाहीसं होत नाही. आमच्या आत्ताच्या वाड्यात भिंती नव्या विटांच्या झाल्या, पण जुन्या पद्धतीची चोरकपाटं, भंडाऱ्या, त्यांच्यात चोरकप्पे..हे सगळं आहेच.” (पृष्ठ २७३) यातच पुढे सेप्टिक संडास आधुनिक करायला लागल्यापासून डास यायला लागले हे सांगत खंडू स्वतःला सांगतो, “मॉडर्न या शब्दाचा अर्थ भावडूनं मला सांगितला होता : कुरूप. आणि खंडू, अल्ट्रामॉडर्न इतकं कुरूप काही नाही.”(पृष्ठ २७५) इथून पुढे ज्या वडिलांना विरोध केला त्यांची समर्थ कुटुंबप्रमुख म्हणून प्रतिमा उभी करण्यात आली आहे. पुन्हा वर्तमानकाळात येण्यासाठी निवेदक “खंडेराव तुझं सगळं निराशाजन्य चाललेलं आहे. आठवणीसुद्धा निरूत्साही..काहीतरी जीवनसन्मुख वाटेल असं आयुष्यात घडलेलं आठव.” असं म्हणतो आणि मग खंडेराव लगेच सुखाने आपल्या लैंगिक अनुभवांच्या आठवणीत शिरतो.  रेनी आणि तिच्या प्रेमात पडलेला खंडू, धनगरांच्या संस्कृतीचं चित्रण, धनगर-कुणबी संबंध, गेलेली भावाची बायको ओढून आणण्याचं शास्त्र. यासोबत शैक्षणिक आयुष्य. दुसरीकडे शेतीचे धडे. गावातली आणि कुटुंबातली संस्कृती आणि ज्ञानार्जनाची ओढ यातली ओढाताण, शिक्षणासाठी घर सोडणं. पाचव्या भागात उच्च शिक्षणाचं क्षेत्र, नामांतराची चळवळ, तिथले अनुभव, युनेस्कोच्या स्कॉलरशिपसाठी अर्ज. पाकिस्तानात संशोधनासाठी जाणं. म्हणजे कथन आता जिथे सुरू झालं त्या वर्तमानात येतं. मग पहिल्या भागात जिथे कथकाने कथन खंडित केलं आहे तिथे सहावा आणि शेवटचा भाग सुरू होतो. तो खंडेरावाच्या वडीलांच्या मृत्यूसंबंधातली धार्मिक कार्य, नातेवाईकांचा खंडूवर या सगळ्या कुटुंबाचा, मालमत्तेचा ताबा घेऊन तिची काळजी घेण्यासाठी, लग्न करून पुढे वंश वाढवण्यासाठी वाढत जाणारा दबाव, खंडूच्या विचित्र वागण्याने सैरभैर झालेल्या घरातल्या बायका आणि शेवटी मजुरांच्या हातून घडलेल्या पूजेच्या वेळी झोपलेला खंडू आणि पुन्हा त्याचं ते सुप्रसिद्ध आणि सोयीचं स्वप्न. त्याच्या स्वप्नातल्या पूजेतलं वंशसातत्याचं सूचन. मोहनजोदाडो ते मोरगाव तीन दिवसांचा प्रवास. या प्रवासात ही सगळी (इथे जागेअभावी न मांडता आलेली) कित्येक छोटी छोटी कथनं आक्रमण करीत रहातात. ती घटनाक्रमाशी थेट संबंधित नसली तरी कादंबरीच्या संहितेला एका विशिष्ट दिशेने नेत रहातात.  कथकाच्या या गोष्टींचं वाचकांवर गारूड होतं. या मोहजालात वाचकाला गुंगवून ठेवत कथक त्यांना संस्कृतीच्या गल्लीबोळांच्या भूलभुलैय्यातून सोबत नेत जातो. नायकाच्या नव्हे तर इतर पात्रांच्या परिप्रेक्ष्यातून होणारं परंपरेमधल्या बऱ्यावाईट गोष्टींसकटचं श्रेष्ठत्व पुन्हा पुन्हा ठसवलं जातं.

हिंदू संस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडीत अशी ही कथनं कथानकात आणून वर तिसऱ्या परिच्छेदात मांडलेली देशीवादाची सूत्रं कथारूपाने  कादंबरीत मांडली गेली आहेत हे लक्षात येतं. कादंबरीचा नायक हा सधन शेतकरी कुटुंबातला आहे. त्याच्या मिषाने सधन शेतकरी कुटुंब, त्याच्यावर अवलंबून असलेला गावगाडा, पितृसत्ताक कुटुंबपद्धतीत स्त्रियांना मिळणारे संरक्षण या साऱ्याचे उदात्तीकरण करीत या सगळ्यांमधले शोषणाचे संबंध जरी काही ठिकाणी उघड होत असले तरी त्यासकट ते सगळं कसं चांगले आहे यावर भर दिला जातो आहे. हे सगळं इथलं आहे आणि इथलं आहे म्हणून चांगलं आहे, यावर भर दिला जातो आहे. त्यामुळे आर्य मूळचे पंजाब-हिमाचल-हरयाणामधले आणि इथूनच ते अफगाणिस्तान, उझबेकिस्तानातून युरोपभर पसरले. वंशश्रेष्ठत्वाच्या गंडातून आर्य बाहेरून आल्याचं युरोपीयन विद्वानांनी रूढ केलं आणि हिंदुस्थानातल्या विद्वानांकडे त्यांच्याइतकं पैशाचं पाठबळ नसल्याने ते या गोष्टी ठासून सांगत नाहीत असं यातले विद्वान मांडतांना दिसतात. हजारो वर्षांची इथली कृषिसंस्कृती कशी चांगली आणि आधुनिकीकरण कसं वाईट हे सांगितलं जातंय. कथक (म्हणजे खरं तर खंडूच) खंडेरावाला सांगतो, “खंडेराव, तुझा वारसा केवळ तुझं घरदार जमीनजुमला शेतं शिवारं एवढाच नाही. गेल्या दहा हजार वर्षांपासूच्या कृषिसंस्कृतीचा हा सतत तुझ्यापर्यंत झिरपत आलेला वारसा आहे. तो तुला असा पालीच्या शेपटासारखा खटकन तोडून पुढे जाता येणार नाही…..सगळे रस्ते आपले पाय गिळण्याची वाट पहात असतात – पण तुला वाचवेल तुझी स्वतःची पायवाट. ती तुला कधी सोडून जाणार नाही. कारण तूच ती तयार करतोस. तीच घे. जहाजावरून सोडलेला कावळा जसा परत जहाजावर येतो, जशी वादळी पावसात मुंगी आपल्या पूर्वजांच्या वारूळाकडे लगबगीनं धावत येते.” (पृष्ठ ९४) असं हे पूर्वापार चालत आलेल्या कृषिसंस्कृतीकडे, गावगाड्याकडे परतून येण्याचं आवाहन आहे. या गावगाड्याला “खरं संरक्षण गावगाड्यातल्या सगळ्या प्रकारच्या जाती-जमातींच्या राहण्याच्या व्यूहामुळेच मिळालेलं होतं” (पृष्ठ १०५) अशी त्या गावगाड्याच्या रचनेची भलामण आहे. सधन शेतकरी हा कसा या गावगाड्याचा कणा आहे आणि त्याच्या जीवावर कसं सगळ्या गावाचं, बलुत्यांचं, मजुरांचं, गायी बैल म्हशींचं आणि रानात चोरचिलटे, माकडं, हरणं, पाखरं, किडामुंगी, उंदरासकट सगळ्या प्राण्यांचं पोट भरतं हे सांगितलं जातं आहे.  बायकांच्या आयुष्यातलं मुलं जन्माला घालणं, त्यांचं संगोपन करणं याचं गावगाड्यात लहानपणापासून मिळणारं शिक्षण कसं मोलाचं होतं आणि बायका हे करीत आल्याने समाज कसा मजबूत राहिला हे ठासून सांगितलं जातं आहे. “बाकी मुलांना जन्म देणं, संगोपन ही त्याहीपेक्षा पक्की भूमिका आपोआपच वयात येईपर्यंत तयार झालेली असे. हे सगळं नीट कळायच्या आधीच बायकांच्या पदरात पडत असल्यानं समाजाची ही स्थिर बाजू कधीच ढासळली नाही.” असं हिंदू संस्कृतीतल्या बायकांच्या शोषणाचं उदात्तीकरण केलं जातं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे यातली उत्तान वर्णनं किंवा संभाषणं ही गावकुसाबाहेरील बायकांच्या बाबतीतली आहेत. ‘गरत्या’ बायांचं श्रेष्ठत्वही यातून ठसवलं जातं आहे. अशाच गावकुसाबाहेरच्या बायकांपैकी एक असलेल्या हरखूशी आपण बंड म्हणून लग्न केलं असतं तर वडीलांनी बंडासकट आपल्याला चिरडून काढलं असतं अशा जाणीवेनं नायक असं बंड कधी करतांना दिसत नाही. गावकुसाबाहेरील विश्वाबाबतही “धंद्यानुसार खालच्या वरच्या जाती मोहेनजो-दडो पासूनच होत्या…खाऊ द्या कितीक खातील? चोरून लपूनच खातात ना ? एरवी आपल्या टाचेखालीच आहेत ना? महार मांग चांभार – सगळा गाव बिचारे सांभाळतात. अरे, शहरात एक वॉचमन लावला, तर किती पगार द्यावा लागतो? मग हे वाडवडीलांनी लावून दिलं आहे, ते निदान आहे तसं तं चालू ठेवा? चोऱ्या करो, लबाड्या करो, शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना?” असा वाडवडीलांनी घालून दिलेल्या वाटेवर चालण्याचा आग्रह आहे. कानाकोपऱ्यात मिलिटरीसारखे ब्राह्मण जाऊन राहिल्यानं हिंदूधर्म कसा खेडोपाडी जाऊन रूजला आणि बौद्धधर्म कसा शहरी असल्यानं कसा शहरीच राहिला आणि संपला यावर खंडूला प्रबंध लिहायचा आहे. लग्नाच्या जोडीदाराच्या निवडीचं थोतांड किती मर्यादेपर्यंत न्यायचं? डेटिंग करून करून नंतर निम्म्या लोकांनी घटस्फोट घ्यायचे त्यापेक्षा अंतर्पाट फिटपर्यंत एकमेकांना पाहिलेलं नसतं त्यांचे संसार सुखाचे झाले नाहीत? लग्नानंतर प्रेम करता येतं की, असं खंडेरावला वाटतं. खंडेरावाची ही मतं एकाएकी तयार झालेली नाहीत. त्यासाठी त्याचा भूतकाळ काळजीपूर्वक उभा केला गेला आहे. एक विशिष्ट संस्कृती या मातीतली आणि म्हणूनच तिच्यातल्या भल्याबुऱ्या गोष्टींसह चांगली आहे आणि ती टिकली पाहिजे, पुन्हा उभी राहिली पाहिजे आणि वाढली पाहिजे कारण तसं होण्यातच सर्वांचं भलं आहे आणि त्यासाठीच कथक म्हणतो आहे  “खंडेराव फक्त गोष्ट सांगत जा राव”. कारण गोष्ट सर्वांनाच एक प्रकारची भूल घालते. ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’मध्ये ही भूल देशीवादाच्या आशयसूत्रांची आहे.

————————————————

खारी भाजी

ही आहे खारी भाजी. या भाजीत मीठाचा अंश असल्याने पानं खारट लागतात, म्हणून तिला खारी भाजी म्हणतात. तिचं मोरस भाजी असंही नाव आहे. गुजराती बायका जया पार्वतीचं व्रत आषाढात करतात. या व्रतात मीठ खायचं नसतं. त्यामुळे ही नैसर्गिक मीठ अंगचंच असलेली भाजी , दही, पीठात घालून त्याचे पोळे करून या बायका खातात. काही त्याचे गोटे करून तळूनही खातात. हे व्रत आषाढात असतं त्यामुळे या व्रताचे दहाबारा दिवस ही भाजी गुजराती लोकांची वस्ती असलेल्या पश्चिम उपनगरांमध्ये सर्रास मिळते. या भाजीची भजी करतात असंही मी टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या पुरवणीत वाचलं (पाककृती दिली नव्हती, पण आपण इतर कुठल्याही भाजीची भजी करतो तशी करता येतील).

आपल्याला काही व्रत करायचं नाही. त्यामुळे आपण हवं ते घालू शकतो. दोन वाटी पीठासाठी भाजीचा एक वाटा पुरेसा होतो. (ही भाजी वाट्यावर मिळते, जुडी किंवा वजनावर नाही.) आधी भाजी साफ करून घ्यावी, तिला माती लागलेली असते. ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि बारीक चिरून घ्यावी. मग ती थोडी कुस्करुन घ्यावी म्हणजे भाजीतलं मीठ पदार्थात मिसळायला मदत होते आणि ती थोडी मऊही पडते. मग दोन वाट्या गव्हाच्या पीठात प्रत्येकी दोन छोटे चमचे रवा आणि चण्याचं पीठ घालावं म्हणजे पोळे चिकट होणार नाहीत. मग त्या पीठात आवडीनुसार बारीक चिरलेली किंवा भरड वाटलेली हिरवी मिरची किंवा लाल तिखट, अर्धा चमचा हळदपूड, अर्धा इंच बारीक लांबट चिरलेलं आलं, आवडत असल्यास बारीक चिरलेला लसूण, अर्धा चमचा जिरं, दोन चिमटी हिंगपूड घालावी. मीठ भाजीत अंगचं असलं तरी पोळे करतांना ते अळणी लागतात म्हणून अर्धा चमचा मीठ घालावं. या मिश्रणात चिरून, कुस्करून ठेवलेली भाजी, अर्धी वाटी दही घालावं. मग पोळे काढायला सरसरीत पीठ लागेल त्याचा अंदाज घेऊन पाणी घालावं. तव्यावर दोन्ही बाजूंनी तेल सोडून पोळे भाजून घ्यावे. आवडीप्रमाणे दही, लोणचं, टमाटूचा सॉस, हिरवी चटणी यापैकी कशाही सोबत हादडावे.

ऐब

“यात एक ऐब आहे. तो पाण्यात भिजल्यावर चालत नाही” नव्या भ्रमणध्वनियंत्राबद्दल चंदरची तक्रार. मी म्हटलं, “हा शब्द तुझा फार लाडका आहे ना?” “ अगं तो भाऊबाबांच्या शब्दसंपदेमधला खास शब्द होता.” भाऊबाबा म्हणजे माझे आजेसासरे. जुन्नरच्या पूर्वेला चार पाच किलोमीटरवरल्या तेजेवाडी नावाच्या खेड्यातील एक शेतकरी. 
एकदा ते चंदरला म्हणाले, “हरिचंदर, जा पळ, नव्या घरात खुंटीला गल्लास टांगलाय तो आण.” चंदर नव्या घरी गेला. तिथल्या सगळ्या खुंट्या धुंडाळूनही त्याला गल्लास म्हणजे पेला सापडला नाही. तो हात हलवित परत आलेला पाहून भाऊबाबा म्हणाले, “XXXX, तुला गल्लास माहीत नाही?” तर गल्लास म्हणजे भाऊबाबांच्या शब्दकोशाप्रमाणे कंदिल. असे अप्रचलित शब्द फेकून ऐकणाऱ्याला गोंधळात पाडणे ही भाऊबाबांची खास लकब होती.
मी भाऊबाबांना फक्त छायाचित्रातच पाहिलंय. पण त्यांच्याविषयी ऐकलंय मात्र बरंच. बाईंच्या म्हणजे आमच्या सासूबाईंच्या तोंडी खास भाऊबाबांचे असे बरेच शब्द, लकबी असत. उदाहरणार्थ गावात किंवा कुटुंबात काही विशेष घडलं की त्या म्हणत,” जरा त्याची इन्कुरी कराय पाह्यजे.”
भाऊबाबा म्हणजे एक वल्ली होती. इतरांपेक्षा वेगळं काही करायला त्यांना नेहमीच आवडे. मग ते डोक्यावरचं पागोटं का असेना वेगळं असलं पाहिजे. बाराबंदी किंवा कोपरीवर ते जाकिट घालीत. धोतरावर गुलबट छटा यावी म्हणून ते सावलीत वाळवित. दगडधोंड्यापासून ते खिळे, सुऱ्या, मोडकी जुनी अवजारं असं सर्व काही ते जमवून ठेवीत. माझ्या पाठच्या दिराला, रमेशलाही हे असं सगळं जमवायला आवडतं. तो ते सगळं घेऊन एखादं जुनं बंद पडलेलं घड्याळ उघडून बसला की बाई म्हणत,”बसला बोवा माहा सासरा खिरपाळ घेऊन.”
भाऊबाबा कधी कुठल्या प्रश्नाला सरळ उत्तर देत नसत. गांवाकडचे लोक संभाषण सुरू करायला विचारतात तसं कुणी विचारलं, “ काय भाऊबाबा, आंगूळ चाललीय वाटतं?” अशा वेळी आमच्या आजेसासूबाईंशी खटकलं असलं की भाऊबाबा म्हणत, “व्हय. म्हतारीच्या नावानं आंगूळ करतोय.” भाऊबाबा घराच्या ओट्यावर बसलेले दिसले की जवळून जाणारा माणूस विचारी, “काय भाऊबाबा, बसलाय का?” यावर भाऊबाबांचं उत्तर असे, “नाय. उभा राह्यलोय.”
समोरचा श्रोतृवृंद पाहून त्याप्रमाणे गोष्टी रचणे हाही त्यांचा एक छंद होता. उदाहरणार्थ त्यांनी रचलेली ही गोष्ट. पर्जन्यछायेच्या त्या प्रदेशात उन्हाळ्यात गुरांसाठी चारा नसे. मग पाऊस पडून चारा होईपर्यंत गुरं घाट (दाऱ्या घाट किंवा नाणेघाट असावा) उतरून जाऊन एका गावात गुरं ‘राखोळी’ घातली जात. एकदा भाऊबाबा घाटातून जातांना विसावा घ्यायला एका दगडावर टेकले. अन् दगड हालायला की हो लागला. बघतात तर काय? अगं बाबौ, भला थोरला अजगर होता तो दगड म्हणजे. म्हातारीशी भांडण झालेलं असलं ( आणि बरेचदा तसं झालेलं असे) की भाऊबाबा दोन दोन दिवस जेवत नसत. सासरा उपाशी आहे मग आपण कसं खायचं हा प्रश्न आमच्या सासूबाईंना पडे. पण एकदा भाऊबाबांचा कब्जा धुवायला काढल्यावर खिशात खारीक, खोबरं असा शेलका ऐवज सापडल्यावर त्यांच्या दोन दोन दिवसांच्या उपासाचं गुपित त्यांना उमगलं.
विक्षिप्तपणाला त्यांच्या वर्तनात मोठं स्थान असे. बहुधा भोवतालच्या रटाळ जगण्यावर शोधून काढलेला तो उपायही असेल. चारचौघांना मान्य असलेल्या चाकोऱ्यांबाहेर जाण्याची अदम्य इच्छाही त्यामागे असावी. असा विक्षिप्तपणा अलीकडे दुर्मिळ झाला आहे.