केप टाऊनमधला व्हिक्टोरिया अँड अल्फ्रेड वॉटरफ्रंट हा भाग तिथल्या वास्तव्यात फिरण्यासाठी आमचा आवडता भाग. मुंबईतल्या गेट वे सारखा हा भाग आहे. तिथे समुद्राच्या जवळपास गेट वे सारखीच संग्रहालयं, जुन्या वस्तूंची दुकानं, मॉल्स, देशोदेशीचे खाद्यपदार्थ पुरवणारी मोठमोठी उपाहारगृहं आहेत. तिथेच टू ओशन्स हे १९९५ साली निर्माण केलेलं मोठं मत्स्यालय आहे. अटलांटिक महासागर आणि हिंद महासागर तिथून जवळच असल्याने त्याला हे नाव मिळालंय. टू ओशन्स अक्वेरियम आणि त्याच्या फांऊडेशनकडून कासवांचं संरक्षण, संवर्धन केलं तर जातंच पण राष्ट्रीय पातळीवर पर्यावरणासंबंधात जागरूकता, शिक्षण आणि संशोधनही केलं जातं. तीन हजाराहून अधिक समुद्री जीव इथल्या सहा गॅलऱ्यांमधून पहाता येतात.
फणसाच्या सारणाच्या शेवया

खरं तर कोकण काय आणि केरळ काय तांदळाच्या शेवया दोन्हीकडे केल्या जातात. दोन्हीकडचे तसे बरेच पदार्थ हे तांदूळ, गूळ, नारळ आणि आंबा,फणस,केळी यासारखं तिथे मुबलक उपलब्ध असलेलं साहित्य वापरून केले जातात. त्यामुळे बऱ्याच पदार्थात साधर्म्य आढळतं. कोकणात या तांदळाच्या शेवयांना शिरवळ्या म्हणतात, केरळात इडीअप्पम्. आता मी जी पाककृती देतेय ती आहे खरी श्रीलंकेतली. इडीअप्पम् हे भारताच्या दक्षिणेकडल्या राज्यात आणि श्रीलंकेत, मलेशियात गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वरूपात खाल्ले जातात. ते तांदूळ किंवा नाचणीपासूनही बनविले जातात. तांदळाच्या या शेवया केल्यावर कडला करी म्हणजे चण्याच्या तिखट कालवणासोबत, फणसाच्या कढीसोबत, माशांच्या आमटीसोबत ,भाज्यांच्या स्ट्यूसोबत खाल्ल्या जातात तितक्याच प्रेमाने आपल्याकडे कोकणात खातात तशा नारळाच्या दुधात गूळ घालूनही खाल्ल्या जातात. या इडलीच्या आकारातही केल्या जातात किंवा नुसत्याच केळीच्या पानावर काढून खाल्ल्या जातात. माझी बहीण शुभलक्ष्मी सावंत हिने मला नाचणीच्या शेवयांची एक पाककृति सांगितली होती. या शेवया इडलीपात्रात एक थर देऊन त्यावर मोदकाचं सारण म्हणजे गूळचूणाचा एक थर (गूळ आणि ओलं खोबरं) देऊन त्यावर पुन्हा नाचणीच्या शेवयांचा एक थर द्यायचा. या शेवया तांदळाच्या पीठाच्या शेवयांचा एक थर आणि नाचणीच्या पीठाच्या शेवयांचा एक थर अशा प्रकारे केल्यावर त्याचं पोषणमूल्य तर वाढतंच शिवाय दिसायलाही फार सुंदर दिसतात. श्रीलंकेत या गोड सारण भरलेल्या शेवयांना लवारिया म्हणतात. त्यात गूळखोबऱ्याचं सारण असतं. हाच प्रकार थोड्या वेगळ्या प्रकारे आंबा, केळी किंवा इथे मी फणस वापरलाय तो घालून करता येतो.
तर ही जी पाककृती आहे ती अशी
साहित्य : तांदळाचं पीठ, पाणी (दोन्ही सम प्रमाणात), गूळ चवीनुसार, आवडीनुसार आणि मुख्य म्हणजे पथ्यानुसार कारण त्यात आपण फणसाचा गर घालणार आहोत तोही गोड असतो. तेल, तूप थोडेसे. नारळाचा चव, वेलचीपूड आणि आवडत असल्यास जायफळ पूड, केळीच्या पानाचे लांब तुकडे.
कृती : प्रथम दोन पेले पाण्यात किंचित मीठ आणि एक चमचा तेल, तूप किंवा लोणी घालून ते पाणी उकळवा. उकळ आल्यावर दोन पेले तांदूळाचे पीठ हळूहळू घालून ते कलथ्याच्या (उलथन्याच्या) टोकाने ढवळा. पाच मिनिटे झाकून ठेवून मग साधारण गरम असतांना हाताला तेल लावून नीट मळून त्याचे लांबट गोळे करून घ्या. दुसरीकडे गूळ, नारळाचा चव आणि फणसाचा गर यांचं एकत्रित मिश्रण चुलीवर ढवळून थोडंसं कोरडं करून घ्या, फार कोरडं नको. त्यात वेलचीपूड, जायफळ पूड घालून ढवळून घ्या आणि थंड करीत ठेवा. मग पीठाचे उकड काढलेले लांबट गोळे चकलीच्या सोऱ्यात शेवेची मध्यम आकाराची चकती घालून (किंवा घरात शेवगा – शेवया करायचा साचा -असल्यास त्यातून काढून ) फिरवून केळीच्या पानाच्या लांबट तुकड्यांवर ती शेव पाडून घ्या. ती खाली दिलेल्या चित्रातल्या प्रमाणे पसरायला हवी.

आता सुरूवातीचा काही भाग सोडून सारण त्यावर चित्रात दाखवल्याप्रमाणे घाला आणि मासवड्या किंवा अळूवडी करतांना करतो तशी गुंडाळी केळीच्या पानासकट करीत जा. या गुंडाळ्या तयार झाल्यावर त्या मोदकपात्रात किंवा पाचकपात्राला शिट्टी न लावता पंधरा मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम शेवया तय्यार. खातांना तुमच्या पथ्यात बसत असेल तर गरम शेवयांवर तुपाची धार सोडायला हरकत नाही.
काजूच्या बोंडूचं सरबत

आमच्या आईला वेगवेगळ्या प्रकारचे मुरांबे, सरबतं करायला आवडत. असंही मालवणी माणसाच्या घरात कोकमाचं सरबत तर असतंच नेहमी. घरचे रातांबे असले की रातांबे अर्धवट चिरून त्यात साखर भरून बरणीत भरून, त्याला दादरा म्हणजे स्वच्छ, मलमलची किंवा सुती कपडा घट्ट गुंडाळून ठेवून ते मुरत ठेवायचं. काही दिवसातच सुंदर लाल रंगाचं नितळ मिश्रण तयार होतं ते योग्य प्रमाणात पाण्यात मिसळून त्यात चवीपुरतं मीठ, जिरेपूड घातली की छान सरबत तय्यार. पण आई सहसा लोक करीत नसत अशी सरबतं -जांभळाचं, आवळ्याचं, पिकलेल्या करवंदांचं अशी वेगवेगळी सरबतं करीत असे. मध्यंतरी मी एका नोंदीत वर्ध्याला दाते दांपत्याने आतिथ्यशीलतेने खिलवलेल्या पदार्थात आंबाडीच्या फुलांचं सरबत दाखवलं होतं तेही चविष्ट आणि सुंदर लाल रंगाचं होतं. आता या छायाचित्रात आर जे गौरी पितेय ते पाहून – विशेषतः तिचा चषक पाहून तुम्हाला काही भलत्या शंका यायच्या आधीच सांगते की हे आहे काजूच्या बोंडूचं सरबत. लहानपणी तुरट लागले तरी मीठ, तिखट पेरून काजूचे बोंडू – काजूची फळं- खायला आवडत. काही वर्षांपूर्वी कोकणात गेले होते तेव्हा माझी मोठी बहीण शुभलक्ष्मी सावंत हिने प्रेमाने काजूच्या बोंडूचं सरबत प्यायला तर दिलंच शिवाय ओवीसाठी एक बाटली भरून दिलं. आता ते मुंबईतही काही ठिकाणी मिळतं म्हणा. पण तुम्हाला घरी करायचं असल्यास खास बहिणीने दिलेली पाककृती खाली देत्येय.
काजूच्या बोंडूच्या सरबताची पाककृती
काजूचे बोंडू रात्रभर मीठाच्या पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी ते पाणी काढून टाकून बोंडूच्या फोडी एका डब्यात घालून (डब्यात पाणी न घालता) कुकरमध्ये ठेवून ( कुकरच्या तळाशी नेहमीप्रमाणे पाणी घालावं) एक शिट्टी काढावी. कुकरमधून काढून घेऊन थंड झाल्यावर बोंडूच्या फोडी मिक्सरमधून फिरवून घ्याव्या. त्याचा रस गाळून घ्यावा. एका भांड्यात रसाच्या दीडपट साखर व निम्मे पाणी घेऊन ते उकळून घ्यावे. हा पाक थंड झाल्यावर त्यात बोंडूचा गाळून घेतलेला रस घालावा. यात अन्य काही घालायची गरज नाही.
पपा
लहानपणची एक आठवण. मुंबईतल्या त्या काळच्या सर्वच कोकणी माणसांप्रमाणे वडील गांवच्या लोकांच्या इथल्या संघटनांच्या बैठकांना, नात्यागोत्यातल्या समारंभाना जात. (बहुधा आईच्या तगाद्यामुळे जात असावेत. नंतर त्यांनी ते बंद केलं.) अशा वेळी मी त्यांच्यासोबत कधी गेले तर माझ्याकडे पाहूनच लोक ओळखून विचारीत “दादाचा चेडू?”. एव्हढं दिसण्यातलं साम्य सोडलं तर दुसरं काही असल्यास मला वाटतं तेही इतरांनाच अधिक कळत असेल. पुढे आमच्या बँकेच्या खाजगीकरणाच्या विरोधातल्या सभेत मी भाषण केलं. ते आमच्या राघवन् साहेबांना आवडलं. ते ऐकत असतांना त्यांच्या शेजारी असलेल्या त्यांच्या मित्राने त्यांना म्हटलं, “अहो बरोबर आहे. ती कोणाची मुलगी आहे माहीत आहे का?” त्यांना अर्थातच ठाऊक नव्हतं. फार मोठे नसले तरी वडील कार्यकर्ते होते. लालबाग सारख्या कामगार भागात स्वस्त धान्य दुकान, मुख्य म्हणजे एक मोठं वाचनालय, मंत्रालयाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट सोसायटी इ. सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता. साने गुरूजी कथामाला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयसारख्या साहित्याशी संबंधित व इतर अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे ते पदाधिकारी होते. अभ्युदयनगरातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना रहायला दिलेल्या जागा त्यांना मालकी तत्त्वावर मिळाव्या म्हणून त्यांनी फार दिवस लढा दिला. (त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार फार अल्प असत. त्यामुळे बचत करून घर घेण्याची त्यांची क्षमता नसे. माझा सुरूवातीचा पगार वडिलांच्या निवृत्तीच्या वेळच्या पगाराइतका होता यावरून कल्पना यावी.) मी शिकत असतांना सुरू झालेली लढाई आम्हा सर्व मुलींची लग्नं झाली तरी चालू होती. शेवटी १९८३ च्या आसपास कधीतरी दोन इमारती सरकारी कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर मिळाल्या. परंतु दरवेळी जागा खाली करायची नोटीस सर्वात आधी आमच्यावर बजावली जाई व सर्व सामान घराबाहेर काढल्यावर पोलीस ताबा घेणार अशा वेळी वडील स्टे ऑर्डर फडकावित येत व सर्व सामान पुन्हा घरात ठेवावे लागे.
वडिलांच्या लहानपणाविषयी दोनच गोष्टी त्यांच्याकडून ऐकून माहीत होत्या. एक म्हणजे त्यांनी मालवणात एका नाटकात स्त्रीभूमिका केली होती. दुसरे म्हणजे भुताखेतांवर विश्वास नसल्याने ती नाहीत हे सिद्ध करायला ते रात्री स्मशानात जात. घरी नसल्याचं घरच्यांना कळू नये म्हणून भावाच्या पायाला दोरी बांधून ती खाली सोडून मागच्या दाराने जात. परत आल्यावर दोरी ओढीत मग भाऊ त्यांना घरात घेई. आणखी एक गोष्ट म्हणजे आईवडिलांचा प्रेमविवाह होता व ते सायकलने मालवणातल्या रस्त्यावर आईची वाट अडवित असत.
त्यांचा आम्हाला धाक वाटे व ते आले की आम्ही घाईघाईने रेडियो बंद करीत असू. पण माझ्या बहिणीला विषमज्वर झाला व उलटला तेव्हा चव्वेचाळीस दिवस ते तिला मांडीवर घेऊन बसले होते. आईच्या बाळंतपणात आमची आजी म्हणजे आईची आई स्वैंपाक करी. ती फार सुरेख स्वयंपाक करी. पण सकाळची न्याहारी दुपारच्या जेवणाच्या वेळी व दुपारचे जेवण तीन वाजता या वेगाने होई. पण वडील आम्हाला सांगत की हे आईला सांगू नका. हा सगळा मालवणी माणसाच्या मायेचाच एक आविष्कार असे. ते एक तर बऱ्याच वेगवेगळ्या संस्थांच्या बैठकांना जात व उशीरा घरी येत. त्यातून दहा जणांचं खटलं चालवायला महिन्याची दोन्ही टोकं जुळवायला काही कामं करीत त्यामुळेही त्यांना उशीर होई. आम्ही कुणी कितव्या इयत्तेत आहोत हे त्यांच्या लक्षात नसे. पण तरीही ते आपल्या परीने आईच्या आडून आमच्यावर लक्ष ठेवीत. विशेषत: आम्ही काय वाचतोय याकडे त्यांचं लक्ष असे. महादेवशास्त्री जोशांच्या संतकथा, सानेगुरूजींच्या गोष्टी, किशोर असंच वाचायला देत. आई जे वाचीत असे ते आमच्या हाती लागू दिलं जात नसे. चित्रपट पाहणं परवडत नसलं तरी जाण येईतोवर जेव्हा पाहायचा असेल तेव्हा हिरा मोती, छोटा जवान इ. दाखवले जात. (चंदरचे वडील मुंबईत असत नि आमच्या सासूबाई शिकलेल्या नव्हत्या. त्यामुळे पोरगं काही वाचतांना दिसलं तर “वा वा अब्यास करंतय” असं आमच्या सासूबाईंना वाटे. त्याचा फायदा घेऊन त्याने बरंच उभंआडवं वाचन केलं. म्हणून तो समक्षक झाला. वाचनसंस्कार व वाचनसंस्कृती हा मोठा विषय नंतर कधीतरी हाती घेऊ. असो.) घरात बरेच लोक येत जात. घर लहान असल्याने वडिलांचा व त्यांचा संवाद आपसूक कानावर पडे. त्यामुळे वाचनाला कदाचित मर्यादा असल्या तरी सामाजिक प्रश्नांची जाण येत गेली. मुलांशी मैत्री ठेवायची नाही किंवा अमक्यातमक्याशी बोलायचं नाही असं बंधन त्यांनी आमच्यावर कधी घातलं नाही. पण जे कुणी मित्रमैत्रिणी असत त्यांना घरी आणून ओळख करून द्यायला लागे. आईवडील त्यांच्याशी मोकळेपणाने वागत. त्यामुळे त्यांनाही छान वाटे. दुसरं म्हणजे घरात ठराविक वेळेपर्यंत यावं लागे. पण काही कारणाने उशीर होणार असेल तर कुठे जाणार, कधी येणार हे सर्व सांगावं लागे. ही शिस्त ते स्वत:ही पाळत. ही सवय माझ्यात अगदी मुरली आहे.
आमच्या लग्नाला त्यांचा तात्त्विक विरोध नसला तरी त्यांनी आमची जरा परीक्षा बघितलीच. नोंदणी पद्धतीने लग्न करायला त्यांचा प्रथम विरोध होता. पण लग्न झाल्यावर त्यांनी कबूल केलं की हे लग्न त्यांनी काहीही तणाव न घेता मागे बसून आनंद घेतलेलं घरातलं पहिलंच लग्न होतं. मग माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न नोंदणी पद्धतीने झालं. त्यांना चंदरचं फार कौतुक होतं नि त्याची भल्या सकाळी रेडियोवर होणारी पुस्तक परीक्षणं ते कौतुकाने ऐकत. आमच्या प्रसिद्ध झालेल्या लिखाणाची कात्रणं जपून ठेवीत.
शेवटच्या काळात माझा भाऊ आपल्या घरी त्यांना घेऊन जायचा धोशा लावत असला तरी ते हट्टाने आपण झगडून मिळवलेल्या घरातच राहिले. भाऊ आपला संसार बाजूला ठेवून त्यांना बरं नसतांना त्यांच्यासोबत राही. सून सगळं करी. आम्हीही धावत जात असू. पण शेजारीपाजारी व परिचितात त्यांची काळजी वाहणारेही बरेच असत. ते गेले तेव्हाही आपण अंगावर घेतलेली जबाबदारी पार पाडायचा त्यांचा हट्ट होताच. अशा हट्टी वडिलांची मी हट्टी मुलगी.
Top of Form
केप टाऊन दैनंदिनी -७
केप टाऊन दैनंदिनी -७
शाळेत शिकतांना केप ऑफ गुड होपविषयी बरंच वाचून उगाचच एक आकर्षण निर्माण झालं होतं. पण आयुष्यात कधी आपण प्रत्यक्ष तिथे जाऊ असं मात्र वाटलं नव्हतं. त्यामुळे केप ऑफ गुड होपला आपण जायचंय असं क्षितिजने सांगितल्यावर फार आनंद झाला.

केप ऑफ गुड होप हे आफ्रिकेचं दक्षिणेकडचं तसंच अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागर यांना विभागणारे टोक असा सर्वसाधारण समज होता. (पण केप अगुल्यास हे ते सर्वात दक्षिणेकडचं टोक हे आता माहीत झालेलं आहे.) १४८८ मध्ये या भूशिराचा शोध बार्थोल्योमु या डच सागरसाहसवीराने लावला. त्याने त्याचं नामकरण Cabo tormontoso म्हणजे वादळी भूशिर असं केलं होतं. भारत आणि अतिपूर्वेकडच्या देशांशी व्यापार करण्यासाठी पूर्वेकडे जाणारा समुद्री मार्ग सापडल्यामुळे आशादायक वातावरण निर्माण झालं. म्हणून पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन दुसरा याने नंतरच्या काळात या भूशिराला केप ऑफ गुड होप असं नाव ठेवलं असं म्हणतात. १४९७ साली वास्को द गामाही तिथे वेगळ्या दिशेने पोचला. पोर्तुगीज सरकारने ते दोघे ज्या बाजूने तिथे पोचले त्या दोन्ही ठिकाणी दोन दिशादर्शक क्रूस उभारले आहेत -डायस क्रॉस आणि द गामा क्रॉस.

हिंदी महासागराकडून येणारे उष्ण प्रवाह आणि अटलांटिककडून येणारे थंड प्रवाह एकमेकांत मिसळण्याचा बिंदू केप ऑफ गुड होप आणि केप अग्युल्यास यांच्या मध्ये बदलत रहातो.

असं हे ऐतिहासिक ठिकाण बघण्यासाठी आम्ही मायकलच्या गाडीने निघालो. वाटेत LLandudno Beach पाहिला. आम्ही फार अल्प काळासाठी थांबलो होतो. फार सुंदर परंतु खडकाळ किनारा. आजूबाजूला मोठे खडक आणि डोंगर यांनी वेढलेला. इथे सर्फिंग करणं खडकांमुळे कदाचित धोक्याचं असेल, पण तरीही सर्फिंगची फळी हातात घेऊन तिथे जाणारे येणारे लोक बरेच दिसत होते.

त्यानंतर हाऊट बे (Hout Bay) ला थांबलो. इथे लोक सर्फिंगसाठी येतात. तसंच इथे ताजे मासे खाण्याचीही बरीच ठिकाणं आहेत. किल्ला सदृश बांधकामं दिसली आणि काही जुन्या तोफाही इथे आहेत. केप टाऊनमध्ये इतरत्र दिसले तसेच मोठमोठे सील मासे इथेही दिसले. एक माणूस तर पाळीव प्राण्यासारखा एका सीलला मासे भरवत होता आणि तो त्याला पाहिजे त्याप्रमाणे छायाचित्रासाठी पोझही देत होता. इथेही फार थोडा वेळ थांबून उशीर होईल म्हणून आम्ही निघालो.


केप ऑफ गुड होप नेचर रिझर्व्ह बरंच विस्तृत परिसरात पसरलेलं आहे. आत शिरायला बरीच मोठी रांग होती. त्यामुळे हळूहळू पुढे सरकतांना जवळपासची झुडूपं न्याहाळत होतो. साधारणपणे हजाराहून अधिक छोट्या झुडूपांच्या जाती इथे आढळतात ज्या अन्यत्र सहसा दिसत नाहीत. जोरात वाहणारे वारे आणि वालुकाश्माची (sandstone) माती, दोन समुद्रांच्या पाण्याचं मिश्रण या सगळ्यांमुळे अशा प्रकारची झुडूपं तयार होतात असं म्हटलं जातं.

वाटेत काही पक्षी, प्राणी दिसत होते. तिथे पक्ष्यांच्या २५० हून अधिक जाती आढळतात. आम्हाला पाणकावळे, वटवट्या, साळुंख्या (starling) सगळीकडे दिसत होते. साळुंख्या तर फार धीट होत्या, क्षितिजचा खाऊ हिसकावून घ्यायला आल्या होत्या. काही हरणं, गायीसारखा दिसणारा इलँड, डासी हा उंदीरसदृश प्राणी दिसले. एक बबून तर अगदी गाडीसमोरून गेला.

उंच कड्यावरून केप ऑफ गुड होपचं भूशिर न्याहाळण्यासाठी वर चढून जाता येतं. क्षितिज वर चढून गेला होता तो त्याच्या मते एक अविस्मरणीय अनुभव होता. पण जर पायी वर चढून जायचं नसेल तर Flying Dutchman Funicular ने माणशी अंदाजे २५० रूपये देऊन जाता येतं. साधारण तीन मिनिटात आपण वर पोहोचतो. तिथूनही काही लोक अजून वर चढून जातात. चंदर, ओवी, क्षितिज तिघंही गेले होते. मी गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिथेच थांबले. पण तिथूनही फार सुंदर दृश्य दिसत होतं. केप ऑफ गुड होपचं राकट सौंदर्य, तिथला भणाणता वारा अनुभवता येत होता. खाली दिसणारा उसळता समुद्र, पांढऱ्याशुभ्र वाळूने नटलेला डायस किनारा, कडे, द्वीपकल्पांची किनारपट्टी, उडणारे समुद्रपक्षी हे सगळं मिळून एक राकट, भव्य दृश्य उभं करतं. योग्य वेळी गेल्यास स्थलांतर करणारे देवमासेही दिसतात. पण आम्ही गेलो होतो मार्चमध्ये त्यामुळे आम्हाला काही दिसले नाहीत. तिथे एका बुडालेल्या जहाजाचे अवशेषही पाहता येतात. आम्ही तिथे काही काळ घालवला आणि पुन्हा कधी येता य़ेईल बरं इकडे असा विचार करीत तिथून निघालो.


मुंबई लोकलमधले किस्से
जवळपास पंचेचाळीस वर्षं मी मुंबईच्या तिन्ही रेल्वेमार्गांवर प्रवास केला. गर्दी वाढायला लागल्यावर अशक्य झाल्यावर प्रथम वर्गात, त्याआधी दुसऱ्या वर्गात. या काळात अनेक अनुभव आले, काही मजेशीर, काही करूण.
अठरापगडजणींचे माझे बरेच वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वेगवेगळे गट होते. ती सगळी आपापल्या परीने वेगवेगळी विश्वं होती प्रेमाची, लाडाकोडाची, हेव्यादाव्याची, सत्तासंघर्षाची.
सत्तेचा संघर्ष फलाटावरच सुरू होई. चालत्या गाडीत उडी मारण्यासाठी प्रत्येकाची जागा ठरलेली असे. त्या जागेवर कुणा नव्या व्यक्तीने अतिक्रमण केलं की फार जळजळीत कटाक्ष टाकून तिला ढकललं जाई. गाडी पकडतांना काहीही आधारासाठी धरत बायका. कुणाची वेणी, कुणाचा बुचडा, कुणाच्या पर्सचा पट्टा, कुणाचा पदर, कुणाची ओढणी, एकदा एकीने जीवाच्या आकांताने लटकतांना माझ्या कुर्त्याचा मानेकडचा भाग पकडला आणि तो फाटला. बसायची, उभं रहायची आपापली जागा बळकावेपर्यंत कुणी काही करीत नसे. ते आपलं ध्रुवपद प्राप्त झाल्यावर भांडणाला तोंड फुटे. समोरचा माणूस हा बाहेरून मुंबईत आलेला आहे असाच मुंबईकरांचा पक्का समज असल्याने भांडणाला सुरूवात हिंदी, इंग्रजीत होई (मेरे आंगपर पड्या ना तुम, फिर? Mind your tongue..) मग हळूहळू लोक आपल्या ‘मायबोलीवर’ येत. पुढचा सत्तासंघर्ष अर्थातच वेगवेगळ्या गटांमध्ये ‘चुकून’ बसलेल्या किंवा उभ्या राहिलेल्या लोकांवरून होई. ‘नववी सीट’ ‘चौथी सीट’ हे तर भांडणाचे हक्काचे विषय. पण एका प्रसंगात मात्र त्यांची प्रतिक्रिया एकमेकींसारखीच असे. ते म्हणजे डब्यात झुरळ, उंदीर किंवा तत्सम प्राणी आल्यावर सगळ्याजणी इतक्या कष्टाने मिळवलेली जागा सोडून चक्क पळत सुटत किंवा बाकावर उभ्या रहात. एकदा तर साप असल्याची अफवा निघाली पण प्रत्यक्षात निघाला बेडूक. कधी कधी तर एक माकडवाली डब्यात चढत असे. तिचं माकड तिच्या हातातून निसटून डब्यात उच्छाद मांडी. एकदा जरा मानसिक रित्या आजारी असलेल्या एक बाई डब्यातल्या फळीवरची प्रत्येक पर्स ओढून, “ही माझी पर्स”, “ही पण माझी पर्स” असं बडबडत पर्सेस ओढायला लागल्या, तेव्हा काही सेकंदांच्या आत प्रत्येक बाईने आपापली पर्स नेमकी काढून घेतली, शेजारी बसलेल्या बायकांनाही मदत केली आणि फळी कधी नव्हे ती रिकामी झाली. असे प्रसंग घडून गेल्यावर मात्र बायका पुन्हा भांडणं करायला मोकळ्या होत.
असं असलं तरी वेळप्रसंगी याच बायका एक होऊन अनोळखी बायकांना मदत करीत. एखादीला चक्कर आली तर अख्खा बाक खाली केला जाई, कुणी तिला वर्तमानपत्राने वारा घाली, कुणी पाण्याची बाटली काढून पाणी शिंपडी, तर कुणी पर्समधून शोधून चॉकलेट देई. एकदा माझ्याकडचा बॅटरीवर चालणारा खेळण्यातल्या पंख्यासारखा दिसणारा छोटा पंखा अशा वेळी कामी आला. आपल्या ओढण्यांचा चारी बाजूंनी आडोसा करून अचानक उद्भवलेली बाळंतपणंही निगुतीने पार पाडीत बायका. एकदा जीन्स, टीशर्ट असा पेहराव करून एक तरूण मुलगी आमच्या डब्यात चढली. तिला नोकरीसाठी मुलाखतीला जायचं होतं आणि साडी नेसता येत नव्हती. पण मुलाखतीला जातांना साडी नेसावी असं तिला कुणीतरी सांगितलं असावं. सगळा जामानिमा तिने पिशवीतून आणला होता. आम्हाला तिने साडी नेसवायची विनंती केली. मग काय, ओढण्यांचा आडोसा करून तिला साडी नेसवण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडला.
अर्थात नेहमी असं चांगलं, मजेशीर काही घडत असे असं नाही. २६ जुलै, २००५ ला मुंबईवर ओढवलेल्या पूर प्रसंगाला तीनचार दिवसच उलटले होते. पावसाचा जोर अजूनही होता आणि त्यामुळे असेल पण गाडीला फार कमी गर्दी होती. अंधेरीला एक राजस्थानी पद्धतीचा पेहराव केलेली बाई दोन लहान मुलींसोबत गाडीत चढली. गाडीत चढल्यापासूनच तिने मुलींना विविध प्रकारची बिस्कीटं, वेफर्स, चॉकलेट्स खायला देऊन त्यांचे लाड करायला सुरूवात केली. पण हे सगळं करतांना तिच्या डोळ्यात पाणी होतं. आजूबाजूच्या बायकांच्या डोळ्यात प्रश्नचिन्हं होतं, पण कुणी तिला काही विचारलं नाही. कारण बहुधा मुंबईत लोक दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसायला जरा घाबरतात. वांद्रे स्थानकात गाडी थांबली. आत्ता गाडी सुटणार इतक्यात आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात यायच्या आधी विजेच्या वेगाने ती बाई दोन्ही मुलींना डब्यात सोडून गाडीतून उतरली आणि गाडी तेवढ्यात सुटली. मुली खाण्यात गर्क होत्या. त्यांच्या हे ध्यानात आलं नाही. आम्ही गाडी थांबविण्यासाठी साखळी खेचूनही उपयोग झाला नाही. सुदैवाने दादर स्थानकात रेल्वेच्या दोन महिला पोलीस गाडीत शिरल्या आणि तेव्हाच साखळी का खेचली याची विचारणा करण्यासाठी रेल्वेचे लोक आले. सगळा प्रकार त्यांना सांगितल्यावर त्या दोन्ही मुलींना घेऊन रेल्वे पोलीस निघून गेले. मुंबईसारख्या गडबजलेल्या शहरातल्या गर्दीत आपल्या घरच्यांना नकोशा झालेल्या मुलींना सोडून देणं त्या बाईला सोपं वाटलं असेल किंवा बायकांचा डबा आहे, कुणीतरी काहीतरी सोय करतीलच मुलींची असंही वाटलं असेल. पण डब्यातली प्रत्येक बाई हादरून गेली होती. त्या मुलींचं पुढे काय झालं ठाऊक नाही. डब्यातल्या बायकांना जरी त्या मुलींना पोलीसांकडे सोपवण्याची इच्छा नसली तरी आपण सांभाळ करायला घरी घेऊन गेल्यावर आमच्या मुलींना या बाईने पळवलं असं म्हणत पैसे उकळायला कुणी येऊ शकतं असे अनुभव असल्याने मुंबईतले लोक अशा फंदात सहसा पडत नाहीत. दुसरं म्हणजे पोलीस त्या मुलींच्या खऱ्या आईबापांना शोधून काढतील अशी आशाही असते.
पावसाच्या काळात गाड्या अधूनमधून थांबत, रखडत जाणं सर्वांच्या सवयीचं असलं तरी रोज काही ठराविक ठिकाणी गाड्या का थांबतात, यावर कायम चर्चा चालत. पार्ला-अंधेरीच्या मध्ये एका विशिष्ट ठिकाणी, कांदिवलीला फूड कॉर्पोरेशनच्या गोडाऊनजवळ, चर्चगेटला – माझी मैत्रीण विद्या गिंडे हिच्या भाषेत वानरवेड्याजवळ (वानखेडे स्टेडियमजवळ) गाड्या थांबत त्या बहुधा सिग्नल न मिळाल्यामुळे. पण सकाळी आणि संध्याकाळी विरार जलद गाड्या गोरेगांव स्थानकावर का थांबतात याचं कोडं काही उलगडत नसे. तर्ककुतर्क चालू असत. रेल्वेत काम करणारी आणि रेल्वेतर्फे हॉकी खेळणारी आमची एक पंजावी मैत्रीण म्हणायची, “बंदा चाय पी रिया.”. पण गाडी आपली अडून. पाच मिनिटं गेली तरी थांबलेलीच. मग ती म्हणायची, “बंदा चाय के साथ साथ पकौडे भी खा रिया.” काही बायका म्हणत की इथे बहुधा रेल्वे क्वार्टर्स आहेत, तिथून मोटरमनचा डबा येतोय घरनं, तर काही म्हणत मोटरमनची बायको असेल गाडीत तिला उतरता यावं म्हणून थांबवतात. एकदा अशी गोरेगांवला गाडी थांबल्यावर डब्यातून वाट काढत एक बाई धावत आली आणि उतरायचंय म्हणू लागली. विरार गाडी असूनही बायकांनी चक्क कुरबूर न करता तिला उतरू दिलं. तेवढ्यात गाडी हलली. आम्हाला टाटा करत ती हसत हसत म्हणाली, “तुम्हाला माहीतेय का, मोटरमन माझा नवरा आहे.”
बायकांच्या मनातल्या या पूर्वग्रहांचा अनुभव बरेचदा येई. त्यामुळे कधीकधी वाईट वाटण्याजोगे प्रसंग अनुभवायला मिळत. मी जरा उशिराची – सात वाजल्यानंतरची- एक महिला लोकल पकडत असे. त्या गाडीच्या पहिल्या वर्गाच्या एका विशिष्ट डब्यात एक वयस्कर बाई चढल्या. कपडे उच्च अभिरूची दर्शविणारे, बाई चांगल्या घरातल्या दिसत होत्या. त्या महालक्ष्मी स्थानकाच्या आसपास चढल्याने गाडीत बसायला जागाही होती. पण बायका नाकाला ओढण्या, रूमाल, पदर लावून लांब पळायला लागल्या. कुणी त्या बाईच्या जवळ बसेना. मी एका बाईला विचारल्यावर ती कुजबुजली, “तिच्या अंगाला ना घाण वास येतो, ती महालक्ष्मीला भीक मागते रस्त्यावर.” मी म्हटलं, “काहीतरीच काय? असं असतं तर त्यांना पहिल्या वर्गाचं तिकीट कसं परवडलं असतं?” “अहो, असे लोक काय तिकीट काढून येतात थोडेच. घुसली असेल तिकीटाशिवाय.” कुजबुजत बोललो तरी त्या बाईंच्या कानी पडलं असावं. त्या म्हणाल्या, “फर्स्ट क्लास का पास है मेरे पास। चाहिए तो देख लो।“ मग सगळ्या गप्प बसल्या. पण माझ्या बाजूची परत कुजबुजायला लागली, “बघा आता पर्समधून दहाच्या नोटा काढून लोकांना सुट्टे हवेत का ते विचारील.” आणि खरोखरच त्या बाईंनी तसं केलं. बायकांनी पैसे सुट्टे करून घेतले. त्या बाईंनी बंद्या नोटा पर्समध्ये ठेवल्या. एव्हाना त्यांच्या बाजूच्या मोकळ्या जागेवर बायका नाईलाजाने बसायला लागल्या. त्या बाईंनी बाजूच्या तरूण मुलीला एक ट्रॅव्हल प्लान घ्यायला विनंती केली. त्याचे कागदपत्र दाखवले. मुलीला बहुधा रस असावा. पण आजूबाजूच्या बायका तिला नको घेऊस असं नजरेने खुणावयाला लागल्या. त्या बाई रडवेल्या होऊन सांगायला लागल्या, “लो ना बेटी। ऐसे दस लोग यह प्लान लेंगे तो मेरे बेटे को वहाँ नोकरी मिल जाएगी। फिर मुझे यह सब नहीं करना पडेगा।“ हेही खरं की मुंबईसारख्या शहरात लोकांना फसवणूकीचे बरेच अनुभव येतात त्यामुळे लोकांना अनोळखी व्यक्तीकडून असं काही घेणं नको वाटतं. पण तरीही त्या दिवशी खूप वाईट वाटलं.
१३ ऑक्टोबर, १९९३ रोजी मुंबईत महिला स्पेशल गाडीला बोरिवली आणि कांदिवलीच्या दरम्यान भीषण अपघात झाला. मी कधी त्या गाडीने प्रवास करीत नसे. पण तीन दिवसांनी एका मित्राच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता. तिला भेट द्यायला एका मैत्रिणीकडे मी एका खेळण्याची ऑर्डर दिली होती. ते घ्यायला गेले आणि ते घेऊन उतरायच्या आत गाडी सुटली. बाकीच्या मैत्रिणी गोरेगांवपर्यंत सोबत होत्या. विरार गाडी असल्याने कांदिवली स्थानक मागे प़डल्यावर मी बाहेर जायला उठले. दरवाजाजवळ यायच्या आधीच डब्यातल्या काही बायका किंचाळत ढकलत आल्या. गाडी मध्येच थांबली होती, तिथे त्यांना उडी मारून उतरायचं होतं. नक्की काय झालं ते कळलं नाही. पण त्यांच्या ढकलाढकलीत नको असतांना आपण पडू या भीतीने मी आत आले. गडबड थंडावल्यावर मी आणि एक मुलगी बाहेर आलो, तेव्हा ती मुलगी किंचाळली, “मॅडम, किती प्रेतं पडलीत पहा.” आम्ही दोघी हादरून आत पळत सुटलो. हळूहळू सगळं कळायला लागलं. पुढल्या कुठल्या तरी डब्यात आग लागली होती आणि गाडी पेट घेईल या भीतीने त्या बायकांनी उड्या मारल्या होत्या. आणि दुर्दैवाने उलट्या बाजूने जाणाऱ्या गाडीखाली येऊन त्या बायका गेल्या होत्या. डब्यात हलकल्लोळ माजला होता. विशेषतः तरूण मुली फार घाबरल्या होत्या. एका मुलीची मोठी बहीण नेहमी पुढच्या डब्यात चढत असे. ती नक्कीच त्या आग लागलेल्या डब्यात असणार आणि तीही गेली असणार या भीतीने ही मुलगी हमसाहमशी रडायला लागली. या सगळ्या मुलींना पाणी पाजून, पाठीवर, डोक्यावर थोपटून शांत करण्याचं काम आमच्यासारख्या जरा प्रौढ बायकांना करावं लागलं. काही काळाने गाडी बोरिवलीच्या फलाटाला लागली. पण नवल म्हणजे कुणी उतरायला तयार होईना . मला कळेना त्या असं का करताहेत. मी त्यांना उतरायला सांगितल्यावर त्या मला म्हणाल्य़ा, “तुम्ही फार शूरपणा दाखवताय ना मघापासून. तुम्हीच उतरा पहिल्या.” मी अर्थात लगेच उतरले. नंतर त्या बायकांना याचं कारण विचारलं. तर त्यांना म्हणे अशी भीती वाटत होती की त्या बायका या दरवाजातून उडी मारल्यामुळे मरण पावल्या, तेव्हा त्यांचे आत्मे दरवाजाजवळ घुटमळत असतील आणि ते उतरणाऱ्या माणसांवर सूड घेतील. मी उतरले आणि मला काही झालं नाही, हे पाहून, खात्री करून मग इतर बायका खाली उतरल्या. जवळच्याच भगवती इस्पितळातली एक तरूण परिचारिका सोबत होती. खरं तर परिचारिकांनी मरण इतक्यांदा पाहिलेलं असतं. पण ती मुलगी इतकी हादरून गेली होती की तिने मला विनंती केली की मी तिला इस्पितळापर्यंत सोबत करावी. मी अर्थातच वाटेत तिला सोडून घरी गेले. पण मानवी स्वभाव आणि अंधश्रद्धा यांचं काय करावं यावर विचार करता करता मी अपघाताच्या धक्क्यातून नकळत थोडी सावरलेही.
असे अपघात, बाँबस्फोट, दंगे, पावसात अडकून पडणं या सगळ्यातून जातांना मात्र मुंबईच्या बायका पुरूषांइतक्याच खंदेपणाने त्या सगळ्याला तोंड देतात. तसंच त्या वाईट अनुभवातच अडकून पडत नाहीत. दुसऱ्या दिवशी आपापल्या कामाला लागतात. वेगवेगळे सणवार साजरे करतात. लग्न ठरलेल्यांची केळवणं, गरोदर मैत्रिणींची डोहाळजेवणं हे सगळं उत्साहात पार पाडतात. आता तर मोबाईलवर सिनेमे बघतात. सेल्फी काढतात, गाणी ऐकतात. गंमत म्हणजे पूर्वी गप्पांचा फड रंगवणारे किंवा गाणी गाऊन लोकांचे कान किटवणारे गट एकाच डब्यात असूनही एकमेकींशी वॉट्स अपवर बोलतात. अर्थात तंत्रज्ञानाच्या विकासाचे काही तोटे होतात. रेल्वेने लोकांना कुठलं स्थानक आहे हे कळावं म्हणून उद्घोषणा करायला सुरूवात केली. आता प्रत्येक स्थानक यायच्या आधी कुठलं स्थानक येणार याची उद्घोषणा केली जाते. एकदा एका तरूणीला – बहुधा घरून आईकडून – फोन आला आणि विचारणा झाली असावी की ती कुठे आहे. त्या मुलीला बहुधा तिच्या मित्रासोबत किंवा मैत्रिणीसोबत घरी पोहोचायच्या आधी थोडा वेळ घालवायचा असावा. तिने उत्तर दिलं, “मी ना चर्नीरोडला आहे. अजून घरी यायला सव्वातास तरी लागेल किमान.” आणि तिच्या दुर्दैवाने तेव्हढ्यातच फोनवर पलिकडल्या व्यक्तीला ऐकू जाईल एव्हढ्या मोठ्या आवाजात उद्घोषणा झाली, “अगला स्टेशन अंधेरी” आणि त्या मुलीचं भांडं फुटलं. अर्थात तिने नंतर आपला झोप लागल्याने गैरसमज झाल्याचं सांगून सावरून घेतलं. पण डब्यातल्या बायकांची हसून हसून मुरकंडी वळली.
रेल्वेतल्या फिरत्या विक्रेत्यांचंही एक वेगळं जग आहे. घरातून भांडण झाल्याने, इतर काही कारणाने पळून आलेली अल्पवयीन मुलं इथे केसाचे चाप, टिकल्या, पेनं, कात्र्या इथपासून ते खेळणी आणि चक्क पुस्तकांपर्यंत काहीही विकतात. संध्याकाळी घरी परतणाऱ्या बायकांना कधी कधी भाजीच काय पण सोललेली कोळंबी विकणाऱ्या बायकाही असतात. नवरा वारल्यावर अनुकंपा तत्वावर त्याच्या कचेरीत चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून नोकरी मिळालेली आमची एक मैत्रीण एकटीच कमावणारी असल्याने आपल्या आईच्या वसईतल्या मळ्यातली रात्री खुडलेली ताजी भाजी विकायला आणीत असे. सकाळी विरार वसईवरून येणाऱ्या नोकरीपेशा बायकांना फार लवकरची गाडी पकडायला लागते आणि खायला वेळ मिळत नाही. आमच्या विरार गाडीत मधुबेन नांवाच्या गुजराती बाई रोजच्या नाश्त्याचे आणि उपवासाचे पदार्थ स्टीलच्या डब्यातून आणून विकत. ज्यांना कामावर गेल्यावर खायचे असे त्यांना फार व्यवस्थित बांधून देत. संध्याकाळच्या आमच्या गाडीत गिरगांवला एक खूप वयस्कर बाई थालीपीठं, लाडू, चकल्या असे घरगुती पदार्थ विकत. अर्थात सर्वांकडचे पदार्थ चांगल्या दर्जाचे असत असं नाही, पण मुंबईतल्या कामाच्या आणि प्रवासाच्या आड वेळा सांभाळतांना भुकेपोटी कधी कधी काहीही खावं लागतं. जरा आरोग्याच्या दृष्टीने आणि एरव्हीही जागरूक असलेल्या बायका सोबत घरून आणलेलं खाणं आणि पाणी जवळ बाळगतात. कारण मुंबईतल्या प्रवासात कधी काय प्रसंग येऊन अडकायला लागेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे बऱ्याच बायका खांद्यावर मोठ्या पर्समध्ये गरजेच्या गोष्टी बाळगतात. त्यात डोकेदुखीच्या, तापाच्या गोळ्या, लिमलेटच्या गोळ्या, बामपासून सुईदोरा, नाडी इथपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. काही दिवसांनी अख्खं घर सोबत घेऊन प्रवास करावा लागेल बहुधा असा विनोद करतात बायका. पण त्यांनाही ठाऊक आहे की काही झालं तरी त्या सगळ्या तडजोडी करीत, वाट्टेल ते झालं तरी हा प्रवास कसाही का होईना करीत रहाणार आहेत. त्यांना दुसरा पर्यायच नाही.
——————————————-
अप्पांची नाटकं
नुकतंच फेबुवर एका सहकारी मित्राने त्याच्या गांवच्या जत्रेत होणाऱ्या नाटकांविषयी लिहिलं होतं. ते वाचून माझ्या सासरच्या गांवी जत्रेत नाटक सादर करणाऱ्या माझ्या सासऱ्यांची (गणपत भाऊ थोरात) अप्पांची आठवण झाली. माझे वडीलही मालवणात नाटकात काम करीत असत. एकदा त्यांनी स्त्रीभूमिका केल्याचीही आठवण माझी आई सांगत असे. पण ते त्यांच्या तरूणपणात ते गांवी असतांना हे सर्व करीत. अप्पा मात्र त्यांची मुंबईतली फोर्टमधल्या बॉम्बे स्टेशनरी मार्टमधली नोकरी सांभाळून नाटकात काम करीत. अर्थात मी यातलं काहीच पाहिलेलं, अनुभवलेलं नाही. मला माघी पोर्णिमेला साधं गांवी जाणंही माझ्या धकाधकीच्या आयुष्यात जमलं नाही. हे सर्व मी चंदर आणि माझ्या सासुबाईंकडून वेळोवेळी ऐकलेलं.
गांवात माघी पोर्णिमेला जत्रा भरत असे. त्या जत्रेत म्हणजे वर्षातून एकदा गांवातली मंडळी नाटक सादर करीत. पण त्याचे वेध मात्र वर्षभर लागलेले असत. मुंबईत नोकरीच्या निमित्ताने कुठेतरी खानावळी म्हणून रहाणाऱ्या गांवच्या चाकरमान्यांनी ‘मार्तंड नाट्य मंडळ’ या नांवाने एक संस्था स्थापन केली होती. (बहुधा खेडोपाडी अशीच अनेक नाट्यमंडळं असावीत). आबासाहेब आचरेकर, वसंत जाधव अशा ‘भारी’ भाषेत लिहिणाऱ्या नाटककारांची कामगार रंगभूमिवर सादर केली जाणारी ही नाटकं असत. ती फार साहित्यिक मूल्य वगैरे असलेली नाटकं नसत. कामगार रंगभूमिवर सादर होणारी असली तरी कामगारांच्या प्रश्नांशी ही नाटकं निगडीत नव्हती. ऐतिहासिक किंवा इतिहाससदृश पार्श्वभूमि असलेली, तसंच काही सामाजिक आशयाची अशी नाटकं असत. यातली बरीचशी नाटकं कृतक संघर्षाने भरलेली, रंजनपर, साचेबद्ध कथानक असलेली अशी होती. ती करायला साधी आणि सोपी असत. ‘माझं कुंकू’, ‘सख्खे भाऊ, पक्के वैरी’, ‘ऐका हो ऐका’, ‘सरनौबत’ ‘सेनासागर’, ‘छत्रपती शिवाजी’, ‘छत्रपती संभाजी’, ‘खुनी सम्राट’ अशा नांवांची ही नाटकं. कधीतरी ‘बेबंदशाही’ सुद्धा सादर केलं होतं. उमाजी नाईक,, वासुदेव बळवंत फडके यांच्यावर लिहिलेली नाटकंही सादर होत.

सुरूवातीच्या काही नाटकांत केलेल्या खलनायकाच्या भूमिका सोडल्यास उंचेपुरे, चांगलं व्यक्तीमत्व लाभलेले अप्पा सहसा नायकाच्या भूमिकेत असत. सरनौबतमध्ये नेताजी, सेनासागरमध्ये संताजी, छत्रपती शिवाजीमध्ये शिवाजी अशा भूमिका ते सहसा करीत.( नायक, उपनायक, खलनायक, विनोदमूर्ती हे कोण असणार हे ठरलेले असे व तसेच होई) सेनासागर नाटकात नागोजी माने संताजीला निःशस्त्र अवस्थेत पूजा करतांना मागून वार करून मारतो हे दृश्य होतं. यात वार केल्यावर अप्पा डोक्याकडचा भाग विंगेत जावा अशा प्रकारे पडले आणि मग नागोजी माने त्यांचे मुंडके कापून ते हातात घेऊन विकट हास्य करतो असं ते दृश्य होतं. प्रेक्षकात बसलेल्या चंदरने आपल्या अप्पाला खरंच मारलं असं समजून भोकांड पसरलं. पुढे वयाच्या आठव्या नवव्य़ा वर्षी त्याने स्वतःही छत्रपती शिवाजी या नाटकात लहानग्या संभाजीची भूमिका केली आणि वाट्याला आलेले पाचसहा संवाद ऐटीत ठोकले. या नाटकाच्या जाहिरातीत त्याच्याविषयी लिहिलं होतं ‘आणि उगवता तारा – हरिश्चंद्र थोरात. पण या उगवत्या ताऱ्याने मात्र ही एकमेव भूमिका करून रंगभूमिकडे पाठ फिरवली. ( त्या ताऱ्याने चमकायचं ठरवलं असतं तर मराठी रंगभूमिचं काय झालं असतं ते माहीत नाही. पण निदान दुर्बोध लिहिणाऱ्या एका खडूस समीक्षकापासून मराठीतले लेखक आणि मराठी साहित्य तरी वाचलं असतं.)

एखाद्याच्या मालकीची खोली असेल तर तालमी तिथे होत. कधी चाळीच्या दोन्ही बाजूला असलेल्या खोल्यांच्या मधल्या बोळकंडीतही तालमी होत. आपापली कामं उरकून सगळे तालमीला जमत. कामगार रंगभूमिवर काम करणाऱ्या अभिनेत्री स्त्रीभूमिकांसाठी कंत्राटावर आणल्या जात. (सुलोचना खेडकर या आधी तमाशात व नंतर नाटकात काम करणाऱ्या अभिनेत्रीही काही नाटकात होत्या.) या स्त्रिया यातल्या बऱ्याच नाटकात काम करीत असल्याने त्यांना तालमीची विशेष गरज नसे. त्या काही ठराविक वेळा तालमी करायच्या करारावर येत. असंही जत्रेत नाटक सादर करायच्या दोन तीन दिवस आधी मंडळी गांवात पोहोचत. तेव्हा तालमीची कसर भरून काढता येईल. घरात ‘ममईची माण्सं’ आल्याने गोडाधोडाचा विशेष स्वयंपाक होई. तो या सर्वांसाठी होई. या स्त्रियांची तान्ही मुलं असली तर त्या तालमीत किंवा प्रयोगात असतांना घरातल्या बायका त्यांना अंगावर पाजत असं सासूबाईंनी सांगितल्याचं आठवतं.
पहिल्या बैठकीत नाटकाची निवड होई. नाटक पक्कं झाल्यावर नाटकाच्या पुस्तकाच्या एका प्रतिमधून आपपाले संवाद फाडून एका चोपडीत (अप्पांचा वहीसाठी शब्द) डकविले जात. याला ‘नाटक फाडणे’ म्हणत. माझे चुलत सासरे (मारूतीराव थोरात) वाचता येत नसल्याने दुसऱ्या कुणाकडून वाचून घेऊन संवाद पाठ करीत. सालाबादप्रमाणे मार्तंड नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे ऐतिहासिक नाट्यकृती..” अशी हँडबिलं छापून गांवात वाटली जात. साईनबोर्ड पेंटरकडून फलक लिहून घेऊन लोक जमत असत अशा चावडीसारख्या ठिकाणी लावले जात. ऐतिहासिक नाटकांचे पोशाख मुंबईहून भाड्याने नेले जात. रंगभूषेसाठी गांवात कुणी माणूस त्यात निष्णात असलेला मिळाला तर ठीक नाहीतर मुंबईहून सोबत आणला जाई. ऐतिहासिक नाटकातल्या महाल, रस्ता, जंगल अशा दृश्यांसाठी वर खेचायचे पडदे रंगवून घेतले जात. औटी नांवाचे राजुरीचे पेंटर ते रंगवित. (नंतर ते पुन्हा वापरण्यासाठी कुणाच्या तरी घरी माळ्यावर जपून ठेवले जात. आमच्या घरीही असे पडदे होते. तशीच नाटकांची असंख्य पुस्तकंही एका पेटीत ठेवलेली होती.) एकाच दिवाणखान्यात घडणाऱ्या सामाजिक नाटकांसाठी ‘बॉक्स’ बनवून घेतला जाई.
जत्रेच्या दिवशी नाटक पहातांना करूण प्रसंगात आयाबाया डोळ्यांना पदर लावीत. झोपाळलेली मुलं हाणामारीच्या प्रसंगी ताडकन् उठून गुडघ्यावर बसून डोळे विस्फारून पहात. लंबेचौडे ‘भारी’ संवाद ऐकतांना पुरूषमंडळी आवेशात येत. नाटक सादर करून ममईवाले परत जात आणि दुसऱ्या नाटकाची तयारी लवकरच सुरू करीत.

नंतर हा वारसा आमच्या घरात माझ्या तिन्ही धाकट्या दीरांनी – रमेश, सुरेश आणि दिलीप यांनी पुढे चालविला. त्यांच्या पिढीने ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘अश्रूंची झाली फुले’ अशी जरा रोमँटिक, शहरी नाटकं निवडली. अप्पांच्या नाटकांची छायाचित्र उपलब्ध नसल्याने माझ्या दीरांनी सादर केलेल्या नाटकांची छायाचित्रंच वर दिलीत. शाळेत वेगवेगळ्या गांवातून आलेले शिक्षकही नाटक सादर करीत. अशाच शिवाजी बारवे या चंदरला वाचनाची, साहित्याची गोडी लावणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या एका नाटकाचंही छायाचित्र आहे. (आता बारवे सर गुणवंत शेतकरी झालेत.)
मला प्रश्न पडतो तो हा की ही शहरात नोकरी करणारी माणसं हा सगळा खटाटोप पदरचे पैसे खर्च करून ( दर महिन्याला आपसात वर्गणी गोळा करून) का करीत असत. एक विरंगुळ्याचं साधन म्हणून? गांवच्या लोकांची करमणूक करून त्यांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी? मुंबईतल्या त्यांच्या एकसुरी आयुष्यात थरार आणण्यासाठी की रंगभूमीच्या प्रेमाखातर? त्यांच्याही मनात त्यांनी पाहिलेल्या नाटकांनी घर केलं होतं का?


केप टाऊन दैनंदिनी -६


केप टाऊनमधला डिस्ट्रीक्ट सिक्स हा शहराच्या मध्यभागी, बंदराजवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला भाग. केप टाऊन नगरपालिकेच्या सहा जिल्ह्यांचा भाग म्हणून तो डिस्ट्रीक्ट सिक्स या नावाने ओळखला जाई. १९३३ मध्ये गुलामांच्या मुक्तीची सुरूवात झाल्यावर या भागात वहिवाट सुरू झाली. पूर्वाश्रमीचे गुलाम, डच ईस्ट इंडिया कंपनीने आणलेले केप मलाय लोक ज्यात प्रामुख्याने मुस्लीमांचा भरणा होता, काही नेटीव, अगदी मोजके गरीब गोरे लोक आणि भारतीय अशा खालच्या वर्गातल्या लोकांनी ती वस्ती बऱ्यापैकी गजबजलेली होती. आपण जिथे वस्ती करतो तिथे जवळपास पुढच्या कित्येक पिढ्या रहातील असा आपला ‘गैरसमज’ असतो. तिथले लोकही याच समजात आनंदाने रहात होते. पण हा मोक्याचा भाग गोऱ्या सरकारला अशा लोकांच्या ताब्यात राहू द्यायचा नव्हता. तिथे बरीच गुन्हेगारी वाढली आहे. जुगार, दारूचे अड्डे, वेश्याव्यवसाय वाढतो आहे, वेगवेगळ्या वंशाच्या लोकांमधला आपसातला कलह वाढत असल्याने त्यांना वेगळे करणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे ‘विकासा’साठी ही वस्ती नष्ट करून तिथे नव्या, आधुनिक इमारती उभारल्या पाहिजेत ही कारणे दाखवत १९६६ ते १९७० च्या काळात तिथल्या जवळपास ६०,००० नागरिकांना आपल्या चीजवस्तू गोळा करण्याची संधिही न देता तिथून हुसकावून २५ किलोमीटर दूर असलेल्या रेताड, अंधाऱ्या ठिकाणी सोडण्यात आलं. १९६६ मध्ये ‘ग्रुप एरियाज’ कायद्यानुसार ही वस्ती ‘फक्त गोऱ्या लोकांसाठी’ जाहीर करण्यात आली. पुढे २००४ मध्ये नेल्सन मंडेलांनी काही मूळ रहिवाशांना तिथल्या घरांच्या किल्ल्या सुपूर्द केल्या. पण तोवर बरेच मूळ रहिवासी इतस्ततः विखरून स्थायिक झाले होते.




१९९४ साली डिस्ट्रीक्ट सिक्स म्युझियम तयार झालं. क्षितिज आम्हाला हे संग्रहालय पहायला घेऊन गेला. संग्रहालयातल्या तळमजल्यावर मूळ डिस्ट्रिक्ट सिक्सचा नकाशा आहे. तिथे लोकांनी आपली घरं कुठे होती हे दर्शवणाऱ्या चिठ्ठ्या लावल्या आहेत. आपल्याला उखडून टाकल्यावर काय काय ओढवलं याच्या कहाण्या मांडल्या आहेत. तिथून लोकांना हुसकावल्यावर तिथे मागे राहिलेल्या उध्वस्त चीजवस्तू, छायाचित्रं आहेत. पूर्वीच्या डिस्ट्रीक्ट सिक्सचा इतिहास, तिथलं लोकजीवन, तिथलं जॅझ संगीत, त्या संगीताचा इतिहास, तिथल्या लोकांनी आपल्या आयांच्या, आज्यांच्या दिलेल्या पाककृती या सगळ्यातून त्या लोकांविषयी कळतं. तिथे एका नेटीव मुलीचं घर तिच्या दैनंदिनीतल्या नोंदींनुसार उभं केलंय. ते पाहून तर चांगलीच कल्पना येते तिथल्या लोकांच्या आयुष्याची. साहित्यिक, चित्रकार यांनीही डिस्ट्रीक्ट सिक्सचं चित्रण केलंय. पण संग्रहालयातल्या एका खोलीच्या जमिनीवर काही कवी, लेखकांनी आपापल्या कविता फरशीवर कोरल्या आहेत. त्या कवितांमधून, मनोगतांमधून त्यांच्या वेदना आपल्यापर्यंत पोहोचतात.



केप टाऊन दैनंदिनी -५
आम्ही कुठेही गेलो की तिथल्या आठवडी बाजारात जायला फार आवडतं. अशा ठिकाणी कधी कधी फार वेगळं काही हाती लागतं. माणगांवच्या आठवडी बाजारात एकदा आम्हाला ओल्या काजूच्या टोपल्यांसोबत रानभाज्यांचे कधी न पाहिलेले प्रकार मिळाले होते. जुन्नरच्या आठवडी बाजारात आम्ही लाकडी काथवट शोधली पण नंतर आम्हाला हवी तशी काथवट आळ्याच्या जत्रेतल्या बाजारात मिळाली (हे जत्रेतले बाजारही फार मजेशीर असतात) . मध्ये वर्ध्याला गेलो असतांना तिथल्या आठवडी बाजाराच्या दिवशी तिथेच होतो, म्हणून बाजारात गेलो तर पावलोपावली रांगोळ्यांचे ठेले होते. अशा बाजारात हिंडलं की गावाबद्दल अधिक कळतं. अशीच संधि केप टाऊनमध्ये क्षितिजमुळे मिळाली. तिथेही शनिवारी आणि रविवारी आठवडी बाजार भरतो. जमिनीवर लाकडाचा भुस्सा टाकून तिथे शेतकऱ्यांना ठेले उभारून दिले होते. एका बाजूला खरेदी करून दमल्याभागल्या, भुकेल्या लोकांसाठी खाद्यपदार्थांचे ठेले आणि लोकांना आरामात बसून खाता यावं यासाठी खुर्च्या, मेजं लावली होती. तिथे चक्क शाकाहारीच नव्हे तर दुग्धउत्पादनं न खाणाऱ्या लोकांसाठीही पदार्थ होते. बाजारात तर विविध भाज्या, फळं, मांसाचे प्रकार, अंडी, घरी केलेले पाव, केक, लोणची, मुरांबे, वेगवेगळी रोपटी अशा सगळ्या गोष्टींचे ठेले होते. एका भाजीच्या ठेल्यावर मला चक्क भोपळ्याची फुलं मिळाली. त्यांची आम्ही घरी जाऊन भजी केली (क्षितिजकडे बेसन नव्हतं तर चक्क गव्हाचं पीठ वापरलं). माझ्या आवडत्या फुलांना पाहून तर डोळे निवले अगदी. या बाजारातल्या वस्तूंचे दर शेतकऱ्यांनीच ठरवलेले दिसत होते. (नक्की माहीत नाही). सगळं छान होतं, पण तिथे वर्चस्व गोऱ्या लोकांचं दिसत होतं याचं जरा वाईट वाटलं.






केप टाऊन दैनंदिनी -४
केप टाऊनमध्ये असुरक्षितता आहे असं ऐकलं होतं. एटीएममध्ये पैसे काढतांना, रस्त्यावर वावरतांना खिसा, पाकीट सांभाळण्याच्या सूचना अनेकांनी दिल्या होत्या. रात्री अपरात्री फिरू नका असा सल्लाही मिळाला होता.
साधारणपणे आमचं हिंडणं फिरणं दिवसा सहासात वाजेस्तोवर आटपत असे. तिथे सातआठ वाजताही चांगला प्रकाश असल्याने काही वाटत नसे. फिरतांना भीक मागणारे नेटीव दिसत असत. आपल्या इथल्यासारखी सिग्नलवरही मंडळी कोंडाळं करून उभी असलेली दिसत. कारच्या खिडकीवर टकटक केली जाई. पण बाकी काही घडलं नाही. खरं तर सरकार कुठलंही आणि कुठल्याही देशातलं असलं तरी ती उच्चवर्णीयांसाठी आणि धनिकांसाठी काम करणारंच असतं सहसा. नेटीवांच्या वस्त्यांमध्ये सोयीसुविधांचा अभाव तर जाणवलाच. पण हेही जाणवलं की काही सुशिक्षितांचा अपवाद वगळता नेटीवांसाठी नोकऱ्या या मॉलमध्ये विक्रेता, सफाई कामगार, उपाहारगृहातील कर्मचारी अशा स्वरूपाच्याच आहेत. शिक्षण फार महाग असल्याने (महाविद्यालयीन शिक्षणासाठी म्हणे एका सत्राला पस्तीस ते पन्नास हजार) ते गरीब नेटीवांच्या आटोक्यातही नाही. त्यामुळे शिक्षणाच्या अभावी नोकऱ्याही अशाच प्रकारच्या मिळतात. अजूनही घर घेतांना वर्णद्वेषाचा अनुभव अगदी थेट येत नसला तरी आडवळणाने येतो. “खायला पैसे नाहीत. वय सत्तरीच्या वर असलं तरी कुठलंही काम करायची तयारी आहे.” अशी पाटी घेऊन फिरणारे एक गृहस्थ दिसताच माईक म्हणाला, “निदान याला काम तरी करायचंय.” असा छुपा रोष मधूनच व्यक्त होत असतो. (माईकच्या न्याहारी आणि निवासमध्ये सगळ्या वर्णाचे लोक उतरतात आणि त्यांना तो सारख्याच प्रकारे मदत करतांना दिसतो, हे खरं असलं तरी)

पण असं असलं तरी ते अत्यंत आनंदाने जगायचा प्रयत्न करतात. अगदी सफाई कर्मचारीही व्यवस्थित मेकप केलेल्या, नेटका पोशाख केलेल्या, हसतमुख आणि आपलं काम अत्यंत चोख करणाऱ्या आढळल्या. मुळात इथला माणूस आनंदी वृत्तीचा आहे. गाणं नाचणं तर अगदी रक्तातच आहे. पहिल्या दिवशी आम्ही एका इथिओपियन रेस्तराँत गेलो होतो तिथला वाढपी स्वयंपाकघरात कुठलं तरी गाणं गुणगुणत नाचत होता. आम्ही जॅझ संगीत ऐकायला गेलो तिथली घरमालकीण असो, श्रोत्यांमधली छोटी मुलगी असो संगीत कानावर पडलं की त्यांचे पाय थिरकायला लागतात. आपल्याकडल्या गेट वे सारख्या वॉटरफ्रंट भागात गेलो होतो तेव्हा तिथल्या शाळकरी मुलांनी केलेला नाच तर फारच सुंदर होता.

इथला माणूसही तसा प्रेमळ. विमानतळावर माझी व्हीलचेयर सांभाळणारी मुलगी माझ्या चेहऱ्यावर जरासा जरी ताण दिसला तरी “मम्मा आर यू ओके मम्मा?” असं माझ्या गालांवर थोपटत विचारत होती. आम्ही सर्वत्र उबरने फिरलो. मला वाटलं चालक इथलेच दिसतात. पण क्षितिजने माहिती पुरवली की यातले ऐशी टक्के झिम्बाब्वेमधून नोकरीच्या शोधात आलेले आहेत, बाकीचे स्थानिक, आशियाई, नेटीव आहेत. स्थानिक लोक या बाहेरच्या लोकांवर खार खाऊन असतात. (एकूण कुठेही भायले भुतूरले चालूच असतं म्हणायचं). पण यातले बरेचजण आम्ही टॅक्सीतून उतरतांना प्रेमाने , “बाय ममा, बाय पपा, गुड इव्हिनिंग.” असं म्हणत. क्षितिज नेहमी ज्या उपाहारगृहांमध्ये जातो तिथले कर्मचारी त्याला ओळखत. तेही फार प्रेमाने आमचं स्वागत करीत. एके ठिकाणच्या दरवानाने आम्हाला भारतीय पद्धतीने वाकून नमस्कार केल्यावर आम्ही संकोचलो, तेव्हा त्याने क्षितिजला विचारलं, “धिस इज हाऊ यू ग्रीट यूवर एल्डर्स, इझण्ट इट?” कदाचित आमच्या रंगामुळे आम्ही त्यांना जवळचे वाटत असू. अर्थात भारतीय लोक हे श्रीमंत, बेपारी असा तिथल्या लोकांचा समज असलेला दिसला.

जॅझ संगीत हा गोऱ्या राजवटीच्या काळ्या दिवसांत लोकांना एकत्र आणणारा एक धागा होता. आता ‘जॅझ इन द नेटीव यार्ड’ या चळवळीच्या निमित्ताने पुन्हा हा धागा जोडला जातोय. गुगुलेथू, लांगा अशा नेटीव वस्त्यांमधल्या घरांच्या अंगणातल्या छोट्या जागेत सर्व वर्णाचे लोक एकत्र येताहेत, संगीताचा आस्वाद घेता घेता एकमेकांच्या जवळ येताहेत. क्षितिजने आम्हाला खास अशा एका मैफिलीत नेलं. सगळेजण खात पित, नाचत गात संगीताचा आस्वाद घेत होते. फरक इतकाच की पावसामुळे कार्यक्रम अंगणात न होता, घराच्या छोटेखानी बैठकीच्या खोलीत झाला. तिथल्या अंगणात एका स्थानिक कलाकाराच्या चित्रांचं प्रदर्शनही होतं. कार्यक्रम संपल्यावर अनेक लोक आम्हाला येऊन भेटले. आयोजकांनी आमचे पुन्हा पुन्हा आभार मानले. (पण एक गंमत झाली, घरमालकीणीचा कुणीतरी समज करून दिला की चंदर भारतीय राजदूत आहे).

तर अशा प्रकारे आमची एकूणच खात्री पटली की आपला मुलगा चांगल्या ठिकाणी गेलाय.