चहाची लज्जत

माझ्या वडीलांना स्वयंपाक येत असावा. पण मी कधी त्यांना स्वयंपाक करतांना पाहिलं नाही. स्वयंपाकघरात एक गोष्ट मात्र ते फार प्रेमाने करीत आणि त्यांनी ती तितक्याच प्रेमाने आम्हाला शिकवली. ती गोष्ट म्हणजे चहा. त्यांची अशी चहा करायची विशिष्ट पद्धत होती. ती अगदी पायरीपायरीने करावी लागे. आधी कपाने नीट मोजून चहासाठी पाणी घ्यायचं. ते उकळल्यावर त्यात चमच्याने मोजून साखर टाकायची. पाणी उकळून ती विरघळली की लगेच चमच्याने मोजून त्यात चहाची पूड टाकून लगेच आच बंद करून भांड्यावर झाकण ठेवायचं. दोन मिनिटं चहा मुरू द्यायचा. दूध वेगळं उकळून घ्यायचं मधल्या काळात. चहा मुरल्यावर आधी दूध गाळून घ्यायचं कपात. मग त्यावर गाळलेल्या चहाची गरम धार धरायची. कप भरला की मजेने चव घेत रिकामा करायचा. वडीलांना जाऊन तेवीस वर्ष झाली. पण माझ्या घरी अजूनही याच पद्धतीने चहा केला जातो.

त्यानंतर अर्थात मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे चहा प्यायले. मुलामुळे ग्रीन टीचीही आवड लागली. मुंबईत चर्चगेट स्थानकाजवळच्या रेशम भवनमध्ये तळमजल्यावर टी हाऊस होतं. तिथे वेगवेगळ्या प्रकारचा चहा प्यायला तर मिळतच असे पण तिथे वेगवेगळ्या प्रकारची चहाची पूड विकतही मिळत असे. मॉरिशसला मात्र चहा पिणं नकोसं वाटे. कारण चहा फार पातळ असेच शिवाय त्यात व्हॅनिला टाकलेलं असे. पण दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनला मिळालेला रुई बोस चहा साखर, दूध न टाकताही फार छान लागे.

पण आजही वडीलांकडून जो चहा करायला शिकले तो प्यायल्यावरच चहा प्यायल्यासारखं वाटतं.

Photo by Mareefe on Pexels.com

केप टाऊन दैनंदिनी ८

केप टाऊनमधला व्हिक्टोरिया अँड अल्फ्रेड वॉटरफ्रंट हा भाग तिथल्या वास्तव्यात फिरण्यासाठी आमचा आवडता भाग. मुंबईतल्या गेट वे सारखा हा भाग आहे. तिथे समुद्राच्या जवळपास गेट वे सारखीच संग्रहालयं, जुन्या वस्तूंची दुकानं, मॉल्स, देशोदेशीचे खाद्यपदार्थ पुरवणारी मोठमोठी उपाहारगृहं आहेत. तिथेच टू ओशन्स हे १९९५ साली निर्माण केलेलं मोठं मत्स्यालय आहे. अटलांटिक महासागर आणि हिंद महासागर तिथून जवळच असल्याने त्याला हे नाव मिळालंय. टू ओशन्स अक्वेरियम आणि त्याच्या फांऊडेशनकडून कासवांचं संरक्षण, संवर्धन केलं तर जातंच पण राष्ट्रीय पातळीवर पर्यावरणासंबंधात जागरूकता, शिक्षण आणि संशोधनही केलं जातं. तीन हजाराहून अधिक समुद्री जीव इथल्या सहा गॅलऱ्यांमधून पहाता येतात.

केप टाऊन दैनंदिनी -६

केप टाऊनमधला डिस्ट्रीक्ट सिक्स हा शहराच्या मध्यभागी, बंदराजवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला भाग. केप टाऊन नगरपालिकेच्या सहा जिल्ह्यांचा भाग म्हणून तो डिस्ट्रीक्ट सिक्स या नावाने ओळखला जाई. १९३३ मध्ये गुलामांच्या मुक्तीची सुरूवात झाल्यावर या भागात वहिवाट सुरू झाली. पूर्वाश्रमीचे गुलाम, डच ईस्ट इंडिया कंपनीने आणलेले केप मलाय लोक ज्यात प्रामुख्याने मुस्लीमांचा भरणा होता, काही नेटीव, अगदी मोजके गरीब गोरे लोक आणि भारतीय अशा खालच्या वर्गातल्या लोकांनी ती वस्ती बऱ्यापैकी गजबजलेली होती. आपण जिथे वस्ती करतो तिथे जवळपास पुढच्या कित्येक पिढ्या रहातील असा आपला ‘गैरसमज’ असतो. तिथले लोकही याच समजात आनंदाने रहात होते. पण हा मोक्याचा भाग गोऱ्या सरकारला अशा लोकांच्या ताब्यात राहू द्यायचा नव्हता. तिथे बरीच गुन्हेगारी वाढली आहे. जुगार, दारूचे अड्डे, वेश्याव्यवसाय वाढतो आहे, वेगवेगळ्या वंशाच्या लोकांमधला आपसातला कलह वाढत असल्याने त्यांना वेगळे करणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे ‘विकासा’साठी ही वस्ती नष्ट करून तिथे नव्या, आधुनिक इमारती उभारल्या पाहिजेत ही कारणे दाखवत १९६६ ते १९७० च्या काळात तिथल्या जवळपास ६०,००० नागरिकांना आपल्या चीजवस्तू गोळा करण्याची संधिही न देता तिथून हुसकावून २५ किलोमीटर दूर असलेल्या रेताड, अंधाऱ्या ठिकाणी सोडण्यात आलं. १९६६ मध्ये ‘ग्रुप एरियाज’ कायद्यानुसार ही वस्ती ‘फक्त गोऱ्या लोकांसाठी’ जाहीर करण्यात आली. पुढे २००४ मध्ये नेल्सन मंडेलांनी काही मूळ रहिवाशांना तिथल्या घरांच्या किल्ल्या सुपूर्द केल्या. पण तोवर बरेच मूळ रहिवासी इतस्ततः विखरून स्थायिक झाले होते.

१९९४ साली डिस्ट्रीक्ट सिक्स म्युझियम तयार झालं. क्षितिज आम्हाला हे संग्रहालय पहायला घेऊन गेला. संग्रहालयातल्या तळमजल्यावर मूळ डिस्ट्रिक्ट सिक्सचा नकाशा आहे. तिथे लोकांनी आपली घरं कुठे होती हे दर्शवणाऱ्या चिठ्ठ्या लावल्या आहेत. आपल्याला उखडून टाकल्यावर काय काय ओढवलं याच्या कहाण्या मांडल्या आहेत. तिथून लोकांना हुसकावल्यावर तिथे मागे राहिलेल्या उध्वस्त चीजवस्तू, छायाचित्रं आहेत. पूर्वीच्या डिस्ट्रीक्ट सिक्सचा इतिहास, तिथलं लोकजीवन, तिथलं जॅझ संगीत, त्या संगीताचा इतिहास, तिथल्या लोकांनी आपल्या आयांच्या, आज्यांच्या दिलेल्या पाककृती या सगळ्यातून त्या लोकांविषयी कळतं. तिथे एका नेटीव मुलीचं घर तिच्या दैनंदिनीतल्या नोंदींनुसार उभं केलंय. ते पाहून तर चांगलीच कल्पना येते तिथल्या लोकांच्या आयुष्याची. साहित्यिक, चित्रकार यांनीही डिस्ट्रीक्ट सिक्सचं चित्रण केलंय. पण संग्रहालयातल्या एका खोलीच्या जमिनीवर काही कवी, लेखकांनी आपापल्या कविता फरशीवर कोरल्या आहेत. त्या कवितांमधून, मनोगतांमधून त्यांच्या वेदना आपल्यापर्यंत पोहोचतात.

केप टाऊन दैनंदिनी -५

आम्ही कुठेही गेलो की तिथल्या आठवडी बाजारात जायला फार आवडतं. अशा ठिकाणी कधी कधी फार वेगळं काही हाती लागतं. माणगांवच्या आठवडी बाजारात एकदा आम्हाला ओल्या काजूच्या टोपल्यांसोबत रानभाज्यांचे कधी न पाहिलेले प्रकार मिळाले होते. जुन्नरच्या आठवडी बाजारात आम्ही लाकडी काथवट शोधली पण नंतर आम्हाला हवी तशी काथवट आळ्याच्या जत्रेतल्या बाजारात मिळाली (हे जत्रेतले बाजारही फार मजेशीर असतात) . मध्ये वर्ध्याला गेलो असतांना तिथल्या आठवडी बाजाराच्या दिवशी तिथेच होतो, म्हणून बाजारात गेलो तर पावलोपावली रांगोळ्यांचे ठेले होते. अशा बाजारात हिंडलं की गावाबद्दल अधिक कळतं. अशीच संधि केप टाऊनमध्ये क्षितिजमुळे मिळाली. तिथेही शनिवारी आणि रविवारी आठवडी बाजार भरतो. जमिनीवर लाकडाचा भुस्सा टाकून तिथे शेतकऱ्यांना ठेले उभारून दिले होते. एका बाजूला खरेदी करून दमल्याभागल्या, भुकेल्या लोकांसाठी खाद्यपदार्थांचे ठेले आणि लोकांना आरामात बसून खाता यावं यासाठी खुर्च्या, मेजं लावली होती. तिथे चक्क शाकाहारीच नव्हे तर दुग्धउत्पादनं न खाणाऱ्या लोकांसाठीही पदार्थ होते. बाजारात तर विविध भाज्या, फळं, मांसाचे प्रकार, अंडी, घरी केलेले पाव, केक, लोणची, मुरांबे, वेगवेगळी रोपटी अशा सगळ्या गोष्टींचे ठेले होते. एका भाजीच्या ठेल्यावर मला चक्क भोपळ्याची फुलं मिळाली. त्यांची आम्ही घरी जाऊन भजी केली (क्षितिजकडे बेसन नव्हतं तर चक्क गव्हाचं पीठ वापरलं). माझ्या आवडत्या फुलांना पाहून तर डोळे निवले अगदी. या बाजारातल्या वस्तूंचे दर शेतकऱ्यांनीच ठरवलेले दिसत होते. (नक्की माहीत नाही). सगळं छान होतं, पण तिथे वर्चस्व गोऱ्या लोकांचं दिसत होतं याचं जरा वाईट वाटलं.

केप टाऊन दैनंदिनी – ३

केप टाऊनच्या भटकंतीत एक गोष्ट ध्यानात आली की इथल्या घरांच्या बांधणीवर ब्रिटीश आणि डच शैलीचा प्रभाव आहे. इथे पूर्वी खूप पाऊस पडत असे असं म्हणतात. त्यामुळे की या प्रभावामुळे ते माहीत नाही, पण उतरत्या छपराची घरं अधिक आहेत. डच शैलीतली विशिष्ट प्रकारच्या गवताचं छप्पर उच्चभ्रू वस्तीतल्या बऱ्याच घरांवर आढळलं. घरांचे रंगही पांढरा, हस्तीदंती, फिक्कट तपकीरी असे खास अभिजात ब्रिटीश. सरकारने नेटीवांना जी घरं बांधून दिली तीही अशाच रंगांमधली होती, ती नंतर त्यांनी जरा रंगीत करून टाकली.

केप मलाय लोकांची वस्ती आम्ही पाहिली. ही वस्ती आशियाई लोकांची आहे. इथली घरं खास रंगीबेरंगी आहेत आणि वारसा म्हणून या वास्तू तशाच जतन केलेल्या आहेत.

नेटीवांच्या गरीब वस्त्यांमधली घरं जरी आपल्याकडल्या झोपडपट्ट्यांसारखी वीटा, पत्रा असं जे मिळेल ते वापरून केलेली असली तरी तिथे थोडे रंग होते. आम्ही जॅझ संगीताची मैफिल ऐकायला गेलो होतो त्या घराच्या बैठकीच्या खोलीला आतून चक्क भडक नारिंगी रंग होता.

फार उच्चभ्रू, अभिजात रंगांपेक्षा हे रंग अधिक आपले वाटतात, नाही?

केप टाऊन दैनंदिनी

दोन दिवसांपूर्वीच एका मित्राने केप टाऊनमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे आणि १९ एप्रिलपर्यंतच पाणी मिळेल अशी पोस्ट वॉट्स अपवर पाठवली. आम्ही तिथे असतांना तर तसं काही ऐकीवात आलं नव्हतं. तरीही पुन्हा क्षितिजला विचारलं तर तो म्हणाला की ते सगळं जुनंच लोक पुन्हा पाठवताहेत. इथं असं काही नाही.

आपल्या मराठवाड्यासारखं सतत तीन वर्षे पाऊस न पडल्याने २०१७ पासून तिथे पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. त्यावरून धडा घेऊन आता पाण्याचा वापर तिथे सावधपणे होऊ लागला आहे. आम्ही ज्या ‘निवारा आणि न्याहारी’ विश्रांतीगृहात उतरलो होतो, तिथे स्नानगृहात शक्यतो टब न वापरण्याची सूचना तर होतीच. त्याशिवाय आंघोळीचं गरम पाणी यायला थोडा वेळ लागतो, तोवर जे थंड पाणी येतं, ते बादलीत साठवावं असंही सांगितलं होतं. ते बादलीतलं पाणी ते झाडांना घालण्यासाठी, शौचालय स्वच्छ करण्यासाठी वापरत होते. बाहेर फिरायला गेल्यावर स्वच्छतागृहात शौचालयाच्या टाकीला पाणी होतं, पण हात धुण्यासाठी बऱ्याच ठिकाणी नळाला पाणी सोडलेलं नसे. त्याऐवजी हात निर्जंतुक करणारा द्रव वापरासाठी ठेवलेला असे. असं असलं तरी हे नमूद करायला हवं की कुठेही अस्वच्छता आढळली नाही.  घरांमध्ये स्वच्छतेचं काम करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनाही सगळी आयुधं पुरवलेली दिसली. झाडी प्रचंड प्रमाणात असूनही कुठे पालापाचोळा खाली पडलेला दिसला नाही. आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे हे जाणवलं. अर्थात आम्ही सर्वसाधारणपणे प्रवासी फिरतात अशा ठिकाणी गेलो होतो. एकदा जॅझ संगीत ऐकायला गुग्ज भागात गेलो होतो. तिथेही गलिच्छपणा आढळला नाही. पण एतद्देशीयांच्या अशा गरीब वस्त्या ‘अनधिकृत’ मानल्या गेल्याने तिथल्या लोकांना नियमित पाणीपुरवठा होतच नाही म्हणे. तरीही ते कसं काय आपलं पाणी मिळवत असतील काय जाणे.