काटकसर

आज चंदर सांगत होता, “शुभा, पूर्वी मी चहा करतांना चहाचा चमचा भरुन टाकायचो, आता सपाट चमचा टाकतो.” फाटलेल्या पायजम्याचा राखेपर्यंतचा प्रवास वाचतांना हसत असले तरी पुडीचा दोरा मीही जपून ठेवते. आमच्या पदभ्रमंतीच्या काळात एकदा उरलेल्या मीठाची आणि तिखटाची टाकून देण्यासाठी काढलेली पुडी मी ठेवून दिली आणि त्यानंतर आम्ही वाट चुकून अडकलो, भुकेने बेजार झालो, शेवटी कुठेतरी पाव आणि अंडी आणि थोडं तेल मिळालं. पण बाकी काही नव्हतं. मग मी त्या पुड्या काढल्यावर प्रकाशकडून मॅडम तुम्ही थोर आहात अशी शाबासकी मिळाली. एरव्हीही मी शिराळ्याची सालं, कोथिंबीरीच्या काड्या, पालेभाज्यांची देठं टाकून न देता वापरते. पण आतापर्यंत काय व्हायचं की दोघांसाठी वाटीभर भात शिजायला टाकतांना त्यात अर्धी मूठ नकळत पडायची, असूं दे आल्यागेल्यासाठी म्हणून. पण आता भांड्यातला तांदूळ कमी करून डब्यात पुन्हा टाकणं वाढलंय. पदार्थ अगदी ठीक्क (हा माझ्या मैत्रिणीच्या आईचा शब्द तोंडी बसलेला) व्हावा म्हणून थोडा थोडा दूधी भोपळा, लाल भोपळा, भेंड्या, तोंडल्या वगळून बाजूला ठेवून मग त्याचंच सांबार करायचं हेही ठरलेलं. पण आता काहीही वाया गेलं की आमचा क्षितिज म्हणतो तसं अगदी जीवावर येतं. पूर्वी धान्य, भाज्या धुतांना सिंकमध्ये काही सांडलं तर स्वच्छतेच्या नावाखाली टाकून देणारी मी आता सिंकमध्ये पडलेला लोण्याचा गोळा धुवून घेणाऱ्या सुनीताबाईंची शिष्या होऊन नाहीतरी शिजवायचंच आहे असं म्हणत ते टिपून घेते. माझे वडील सांगत शेतकऱ्याला धान्याचा एकेक कण पिकवायला कष्ट पडतात, त्यामुळे वाया जाऊ देऊ नका, ते आता फारच पटतंय. पण हे शहाणपण नंतरही असंच टिकेल का?