घर

माझी बहीण नेहमी म्हणते, “मला ना माझ्या घरीच चांगली झोप लागते गं. इतरत्र कुठे कितीही सोन्याचं असलं तरी माझ्या घरातल्या अंथरुणावर मला बरं वाटतं.” खरंच आहे.

अगदी हॉटेलमधल्यासारखी मऊ गादी, वातानुकूलन हे काही नसलं तरी आपल्या घरातल्या गोधडीवरही छान झोप लागते. त्याचं कारण बहुधा आपल्याला तिथे फार सुरक्षित वाटतं हे असावं. पण तरी ते घरही विशिष्ट असतं. आमचा क्षितिज चार दिवस हॉटेलमध्ये राहिला तरी निघतांना “बाय बाय रुम” असं म्हणतो. त्याच्यासारखंच जिथे थोड्या काळासाठीही वास्तव्य करतो त्या जागेशी आपलं नातं तयार होतं हे खरं असलं तरी एखादं विशिष्ट घर, जागा आपल्याला खास आपली वाटते. मी इतक्या घरांमध्ये आजवर राहिले. ती सगळी माझ्या मनात घर करुन असली तरी ज्या घरात माझी जाणतेपणीची वर्षं गेली ते अभ्युदयनगरातलं दोन खोल्यांचं घर हेच मला अजूनही माझं घर वाटतं. स्वप्नात मला घरी जायचं असतं तेव्हा मी त्याच घरी जायची वाट शोधत असते. अगदी चुकूनही बोरिवलीतलं जुनं किंवा नवं घर ती जागा घेत नाही.

याउलट माझ्या मुलांसाठी मात्र घर म्हणजे बोरिवलीतलं आमचं जुनं दोन खणी घर. आता ते घर इमारतीचा पुनर्विकास होतोय म्हणून पाडलं जातंय. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत ते घर नांदतं होतं. माझ्या नवऱ्याचे – चंदरचे विद्यार्थी, माझी मैत्रीण, माझा दीर अशी कित्येक कुटुंब त्यात राहून गेली. पण पाडलं जाणार म्हणून खाली केलेलं घर गेले काही वर्षं पुनर्विकास रखडल्याने तसंच पडून होतं. एकदा चंदर तिथे गेला आणि त्याची अवस्था पाहून त्याला भडभडून आलं. कधी पाडलं जाईल तेव्हा जावो पण ते असं दुरवस्थेत ठेवायचं नाही असा चंग बांधून आमच्या कुटुंबाच्या सुताराकडून – कांताकडून त्याने घराची डागडुजी,  स्वस्तात रंगकाम, साफसफाई करून घेतली आणि त्याची कळाच पालटली. ते चक्क चकचकीत झालं. मग टाळेबंदीच्या काळात गेल्या वर्षी क्षितिज द. आफ्रिकेहून आल्यावर तिथे विलगीकरणात राहिला. मग ह्या वर्षी आमची मुलगी ओवी आणि जावई अब्रारही तिथे राहिले. दोन्ही मुलांनी लहानपणीच्या सगळ्या आठवणी जागवल्या. ओवी, अब्रारने थोडक्या काळासाठी वास्तव्य केलं तरी ते घर त्यांनी आपलं नेहमीचं घर असल्यासारखं सजवलं. आनंदाने तिथे राहिले. शेवटी ऑक्टोबरमध्ये ते घर पाडलं गेलं तेव्हा दोन्ही मुलं, जावई, चंदर, कांता असे सगळे घराला निरोप देऊन आले. घर पाडलं गेलं तरी जेव्हा ते पाडलं गेलं तेव्हा आपण त्याला दुर्लक्षित, दुरवस्थेत, एकटेपणात सोडलं नाही ह्याचं समाधान सर्वांना वाटलं.

पण अशी पाडली जाणारी घरं पार पोटात खड्डा पाडतात. मी एका इस्पितळात उपचारासाठी जात असे तिथे बाजूलाच एक बैठ्या घरांची रांग अशीच पुनर्विकासासाठी अर्धवट पाडलेल्या अवस्थेत बराच काळ होती. तिथल्या एका घराच्या दर्शनी भागातल्या तीन भिंती शाबूत होत्या. त्यातल्या एका भिंतीवर एका गृहस्थांचं हार घातलेलं छायाचित्र तसंच लटकत होतं. मला नेहमी वाटे की का हे छायाचित्र तिथे तसंच ठेवलंय? त्या गृहस्थांची कधीच ते घर पाडलं जाऊ नये अशी इच्छा होती का? की घरासारखीच त्या गृहस्थांची आठवणही मनातून गेली होती? काहीही असो ते पाहून मला फार वाईट वाटे.

नवनिर्मितीसाठी “जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुरुनी टाका” असं म्हणायला आणि करायलाही लागत असलं तरी ते केल्यावरही मनातून मात्र जात नाही.