रस्ता ८

आता साखळी तोडण्याच्या नावाखाली वेगळ्या अर्थी टाळेबंदी असली तरी रोज तरुणांची टोळकी फिरत असतात. तशीच एक चौकडी समोरच्या रस्त्यावर धमाल मस्ती करीत होती. इतक्यात मागे असलेल्या फाटकाची हालचाल झाल्यावर ते जरा बाजूला सरले. आतून पायाने फाटक ढकलत एक वयस्कर जोडपं आलं. पुढे गेल्यावर त्यांच्या ध्यानी आलं की नातू मागेच राहिलाय. तो होता सायकलवर. मग पुन्हा मागे येऊन पायाने फाटक ढकललं, नातवाला सोबत घेऊन चालायला बाहेर पडले.

समोरच्या खारफुटीत राहणारं ते नोकरी करणारं जोडपं आज चक्क एकत्र आलं होतं. अर्थात तरीही नवरा पुढे आणि बायको पाच पावलं मागे, खाली मान घालून चालत होती. त्यापेक्षा मला दोन दिवसांपूर्वीचं दृश्य अधिक आवडलं. नवरा लांबून येतांना दिसल्यावर बायको उठून चालायला लागली. त्यामुळे ती पुढे नि नवरा पाठीमागून पळत येतोय. हे जरा नेहमीपेक्षा वेगळं घडलेलं बघायला मज्जा आली. पण नेहमी थोडंच होणार असं.

तेवढ्यात नेहमी साडेसहाच्या ठोक्याला चालायला बाहेर पडणारी मायलेकराची जोडी – तरुण लेक आणि वयस्कर आई- आली. हेही पायाने फाटक ढकलतात. पण काल बाहेर आल्यावर घरातलं उरलंसुरलं पुण्यकर्म म्हणून कुत्र्यांना खाऊ घालतांना मात्र खालच्या जमिनीला हात लागला होता तो पुसला नव्हता त्यांनी. कुत्र्यांना ज्या कागदाच्या पुडक्यात अन्न दिलं  ते पुडकंही सकाळी कचरा नेईपर्यंत तसंच पडलं होतं. आजही दोघं फाटक पायाने ढकलून बाहेर आले खरे, पण झालं काय की कालच्या दातृत्वामुळे कुत्रे त्यांना पाहिल्यावर आठवणीने येऊन पायात घोटाळायला लागले, मग त्यांना हाकलतांना पुरेवाट झाली. त्यात एका कुत्र्याने हात चाटला . मग बाईंनी घाईघाईने ओरडून लेकाकडून हँड सॅनिटायझरमधलं द्रव्य हातवर ओतून घेतलं.

त्यांच्या नंतर फाटकाजवळ येणारी तरुणी मात्र फाटक उघडायचंय, उघडायचंय असं मनाशी घोकत असल्यासारखी लांबूनच हात लांब करीत आली आणि तिने हाताने फाटक ढकललं.

कुत्रे अजूनही आशेने घुटमळत होते. तर एक बाई आल्या. त्यांनी हातातल्या प्लास्टिकच्या पिशवीतलं फाफड्यासारखं दिसणारं काहीतरी त्यांच्यासमोर ओतल्यावर कावळेही त्या दिशेने धावले आणि एकच झुंबड उडाल्यावर बाईंची तारांबळ उडाली.

आमच्या परिसरात काय कोण जाणे हे एक खूळ पसरलंय. पक्ष्यांना शेव, फाफडा वगैरे खाऊ घालायचं. सुरुवातीला तर गंमतच झाली. मी एक कावळा पाहिला, त्याची चोच पिवळी होती. मी मनात म्हटलं असा कसा पिवळ्या चोचीचा कावळा. मग दुर्बिणीतून पाहिल्यावर कळलं की त्या कावळ्याच्या चोचीत जाड शेवेचा मोठ्ठा तुकडा आहे. बरं हे उरलंसुरलं खाऊ घालतात असंही नाही. शेजारच्या रोहाऊसमधली बाई पिशवीभर शेव रोज पक्ष्यांसाठी ठेवते. पक्ष्यांच्या आरोग्याचा विचार हे दाते करतात की नाही काय माहीत. त्यांच्या लेखी पुण्य मिळवलं की संपलं.

दुर्बिणीवरुन आठवलं. ह्या काळात कशाचा काय उपयोग होईल सांगता येत नाही . मी पक्षीनिरिक्षणासाठी दुर्बिण वापरत असले तरी एकदा काय झालं की आमच्या लेकाला काही कागदपत्रांसाठी नोटरी हवा होता. समोरच्या बैठ्या घरात एक गृहस्थ नोटरीचं काम करीत हे माहीत होतं. त्यांच्या फाटकावरच्या पाटीवर त्यांचा संपर्क क्रमांक लिहिलेला होता. पण इतक्या उंचावरुन तो दिसेना. आत्ताच्या काळात खाली निव्वळ त्यासाठी जाणं म्हणजे जीवावरच आलेलं. मग चक्क दुर्बिणीचा वापर करुन तो क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. हसू नका वाचून तुम्हीही करा अशी डोकॅलिटी.

छोटू

माझ्या उंचीमुळे नेहमीच ‘अटकमटक चवळी चटक, उंची वाढवायची असेल तर झाडाला लटक’ अशा प्रकारचे शेला पागोटे मिळत असत. एकदा बँकेत मी एक घोळ निस्तरल्यावर आमचा आयटीवाला मोठ्या कौतुकाने म्हणाला “But for our chhota madam, that (तो घोळ) would have never been sorted out.” हे छोटेपणही मला नेहमीच चिकटून राहिलं. पण तरीही माझ्या कधी ध्यानात हे आलंच नाही की आजूबाजूला वावरणाऱ्या अनेक ‘छोटूं’चं स्वतःचं काही वेगळं नाव असेल. दुकानावर मी छोटूमल आणि कुं. किंवा छोटेलाल ड्रेसवाला अशा प्रकारची नावं पाहिली होती. त्यामुळे ते इतर नावांसारखंच एक नाव असं मी धरून चालले होते. एकदा आमच्या बँकेतल्या एक लिफ्टमनला मी हाक मारली, “छोटू जरा थांबा हं.” तेव्हा एक सहकारी हळूच दुसरीला म्हणाली, “Look, who’s saying chhotu!” तत्क्षणी माझ्या डोक्यात वीज चमकली. नंतर मी त्याला त्याचं खरं नाव विचारलं तेव्हा ते विजय निघालं. मग मी आवर्जून नाव विचारायला लागले. आमच्याकडे वीजेची कामं करायला येणाऱ्या इलेक्ट्रीशियनला सगळे पिंटू म्हणतात, त्याचं खरं नाव अजय सिंह निघालं. पण कित्येकदा लोक खरं नाव विसरुन स्वतःची ओळख लोकांनी त्यांना दिलेल्या अशा नावानेच करुन देतात. आजही आमचा रद्दीवाला आला होता. मी दार उघडताच म्हणाला, “आंटी, मैं छोटू, छोटू रद्दीवाला.” बायकांना जसं आपल्या गुलामगिरीच्या निशाण्या अंगाखांद्यावर बाळगतांना उमगत नाही तसंच यांचं होऊन जातं.

अधोलोकाने तर हकल्या, चकण्या, टकल्या वगैरे लोकप्रिय करुन टाकलंय. त्याच्याशी गुंडगिरीतून येणाऱ्या सत्तेचा, सामर्थ्याचा प्रत्यय येत असावा बहुतेक. त्यामुळे लोकांना ते वापरायला फार आवडतं.

वजनदार लोक तर कायम हक्काचा विनोदाचा विषय. एकदा एका वाढदिवसाच्या सोहळ्यात अशा प्रकारच्या सोहळ्यांचं संयोजन करणाऱ्या माणसाने जवळ उभ्या असलेल्या एका वजनदार आणि डोक्यावर जरा कमी केस असलेल्या तरूणाला जवळ बोलावून घेतलं. मग पुढचा सगळा सोहळा संपेपर्यंत “यह भाईसाब एक बार पार्क में गये…”असं करीत वेगवेगळ्या प्रकारचे विनोद केले गेले. त्या तरुणालाही मनात नसतांना चेहऱ्यावर हसू बाळगत ते झेलायला लागलं. नंतर त्याला या सगळ्या प्रकाराने समजा नैराश्य आलं तर त्याला कोण जबाबदार हा विचार त्या सोहळ्यात अशा विनोदांवर खळखळून हसणाऱ्या कुणाच्याही मनात आला नसेल का?

एका मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात तर कायम आमच्यासारख्या बुटक्या, वजनदार, कृष्ण वर्णाच्या लोकांची टिंगल उडवली जाते. इतकंच नाही तर ते अधोरेखित करायला पात्रांची नावं किंवा आडनावंही त्यावरून ठेवली जातात. त्यावरुन आठवलं काही लोकांच्या आडनावावरूनही त्यांचा छळ मांडला जातो. आमच्या बँकेत आमच्या एका मित्राचं आडनाव खरं तर हरम असं होतं. पण आमचा एक सहकारी कायम त्याला “ए हराम इकडे ये.” असं म्हणत असे.

आपल्या समाजात आदर्श दिसणारी व्यक्ती कशी असते हे कळण्यासाठी विवाहविषयक जाहिराती पाहिल्या तरी कल्पना येईल. माझ्या परिचयातली एक मुलगी दिसायला खरं तर फार सुंदर, उंची, बांधा सगळं छान असं होतं. पण ती सावळी आहे आणि तिला चष्मा आहे हे कळल्यावरच माझ्या एका मैत्रिणीने भविष्यवाणी वर्तवली, “हिचं लग्न जमणं कठीण आहे.” प्रत्यक्षात तिला एका मुलाकडून लवकरच मागणी आली आणि तिचं लग्न झालं ही गोष्ट वेगळी, पण जणू काही अशा लोकांनी लग्नाच्या फंदात पडूच नये असाच लोकांचा आविर्भाव असतो.

मुलींच्या बाबतीत तर नुसतं रंगरुपच नव्हे तर तिच्या अंगावर किती केस आहेत, ते तिने काढलेत की नाही हेही पाहिलं जातं. आमच्या लोकलमध्ये एक तरुण मुलगी असे. तिला मिशा होत्या. तर लोक तिच्याकडे अगदी विचित्र नजरेने पाहत. कुणीही तिच्याशी बोलत नसे. त्या अनुभवामुळे कार्यकर्त्या अनीता पगारे यांनी टाळेबंदीकाळातल्या मिशांबद्दल मोकळेपणी लिहिल्यावर फार बरं वाटलं.

आमचा एक परिचित जरा नाजूक हालचाली करीत असे. तो होता खूप हुशार, कामसू, कुठलंही अवघड काम झटक्यात पार पाडणारा. पण त्याच्या ह्या सगळ्या गुणांकडे दुर्लक्ष करुन त्याच्या हालचालींवरून त्याला चिडवलं जाऊ लागलं. परिणामी तो इतरांशी बोलणं टाळायला लागला. मग त्याला शर्मिला नाव ठेवलं गेलं. पुढे काही मित्रांनी प्रयत्नपूर्वक त्याला माणसात आणलं.

जात, धर्मावरून वाईट वागवलं जाणं तर आपल्या समाजाला मुळीच नवीन नाही. ‘सरकारी जावई’ म्हणून इतरांना हिणवणारे उच्चभ्रू एके काळी वेगळ्या प्रकारे ‘सरकारी जावई’ होते हे मात्र विसरुन जातात. इतर धर्मीयांनाच काय इतर प्रांतीयांनाही नावं ठेवली जातात. ‘नगरी मापं’ ‘मावळी भुतं’ ‘कोकणाटं’ ‘वायदेशी रानदांडगे’ ‘घाटी बरबाट चाटी’ हे वानगीदाखल. एकूण काय तर आम्ही तेवढे सर्वगुणसंपन्न.

दिसणं, प्रांत, जातधर्म ह्या माणसाच्या जन्माआधीच ठरलेल्या, त्याच्या हातात नसलेल्या गोष्टींवरून लचके तोडणारी ही जमात कधी नष्ट होणार काय माहीत.

चालणारीची रोजनिशी-२

चालायला खाली उतरले आणि जोरात शंखनाद ऐकू आला आणि माझ्या ध्यानी आलं की आज आपल्याला उशीर झालाय. टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात लोक रात्रभर जागत दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करीत. पण आता मात्र हळूहळू का होईना पण गाडं पूर्वपदावर यायला लागलंय. सकाळी मी नेहमीच्या वेळी खाली उतरले की पहिल्या फेरीला सहाव्या मजल्यावरचा अनिल मेहता स्कूटरवर बसून कामावर जातांना दिसतो. दुसऱ्या फेरीच्या दरम्यान लांब वेणी घालणारी नेपाळी घरकामगार येते. हात स्वच्छ करता करता, नोंदवहीत नाव लिहिता लिहिता सुरक्षारक्षकांशी गप्पा मारते. मग ओघ सुरू होतो. फुटबॉलकोच असलेला मेनन आणि त्याची बहुधा बँकेत काम करणारी उत्तरेकडची बायको आपल्या मुलाला घेऊन दुचाकीवरुन निघतात. तिसऱ्या, चौथ्या फेरीच्या दरम्यान शेजारच्या बंगल्यातल्या पाटलीणबाईंनी पूजेच्या वेळी वाजवलेला शंख ऐकू येतो. त्यानंतर बाजूच्या विंगमधले काहीतरी मानसिक आजार असलेले वृद्ध गृहस्थ त्यांच्या सहायकाचा हात पकडून फिरायला निघतात.

हे सगळं डोक्यात चालू असतांनाच चिमण्यांचा एक थवा घाबरल्यासारखा चिवचिवाट करीत घाबऱ्या घाबऱ्या गतीने इथेतिथे उडत शेवटी अशोकाच्या जरा आडव्या झालेल्या फांदीवर बसला. कारखाली सुस्तावून लोळणारी मांजर लगेच सावध होऊन कारच्या आडोशाला दबा धरुन बसली. तितक्यात ओवी तिथे आल्यावर तिच्याशी खेळतांनाही मांजर चिमण्यांवर एक डोळा ठेवून होतीच. पण त्या काही तिच्या हाती लागल्या नाहीत.

या पक्ष्यांचं आणि प्राण्यांचंही एक वेळापत्रक असावं बहुधा. या दरम्यान दुसरी दांडगी मांजर बाजूच्या बंगल्याशी सामायिक असलेल्या भिंतीच्या कोपऱ्यात एका विशिष्ट जागी बसलेली असते. एक बुलबुलही असाच एका निष्पर्ण झाडाच्या खोडावर बसलेला असतो. दुसऱ्या फेरीच्या दरम्यान पूर्ण काळेभोर पंख असलेलं पांढरं कबूतर बाजूच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका विशिष्ट खिडकीत येऊन बसतं. टाळेबंदीच्या काळात त्यांचं हे नैसर्गिक वेळापत्रक बदललं होतं का याचा अभ्यास करायला हवा कुणीतरी.

चालणारीची रोजनिशी

उद्वाहनातून बाहेर पडल्यावर खाली सुरक्षारक्षकाजवळ उभारलेल्या जंतूनाशकाने हात साफ करून चालायला सुरुवात केली. एक सुरक्षारक्षक झाडांना पाणी घालत होता. दुसरा सफाई कामगारासोबत शिळोप्याच्या गप्पा हाणत येणाऱ्याजाणाऱ्यांना हात साफ करायला, वहीमध्ये नोंद करायला सांगत होता, त्यांचं तापमान मोजत होता. पाणी फारच वाया चाललंय असं मनात आलं. हात हलवत चालत राहिले. बाग जवळ आली. एक साळुंकी बागेतल्या गवतात काहीतरी शोधून खात होती. तिच्या मागे नुकतीच शिकार करायला शिकलेली मांजर तिच्यावर डोळा ठेवून दबा धरून बसली होती. तेवढ्यात पिंपळाचं एक पान पक्ष्याच्या सफाईने गिरक्या घेत खाली पडलं म्हणून मांजरीने वळून पहायला आणि साळुंकी उडून जायला एक गाठ पडली.

या कोपऱ्यावर जरा भीतीच वाटते. नकळत मुलगी आणि नवरा जवळपास आहेत का पाहिलं. परवा इथेच दुसरी जरा दांडगी मांजर तीरासारखी धावत जातांना दिसली. पाठोपाठ सुरक्षारक्षकही धावत आले. मागून चालत आलेली लेक म्हणाली, “नाग होता तिथे. त्याच्यामागे लागली होती.” मला काही दिसला नाही. पण तेव्हाची भीती काही मनातून गेली नाही. दर फेरीला तिथे पोचल्यावर ती भीती वाटतेच. ती भीती मनात तशीच दडपून चालत रहाते.

फेरी पूर्ण होता होता इयनची आई दिसली. थोड्या गप्पा झाल्या. इयन कसा आहे विचारल्यावर म्हणाली, “आत्ताशी आलाय घरी. गेले सहा महिने माझ्या आईवडीलांकडे होता. आम्ही घरून काम करतो ना. त्याला कोण सांभाळणार? म्हणून तिथे ठेवलं. आता एक मुलगी मिळालीय सांभाळायला. तिची चाचणी करुन घेतलीय. आता ती चोवीस तास आमच्याबरोबर रहातेय म्हणून बरंय. पळते आता, रडत असेल तो. अजून तिची सवय नाही झालीय ना त्याला.” टाळेबंदीपूर्वी बागेत इयनसोबत घालवलेले दिवस आठवले. इयनची आजी अंधेरीहून सकाळी सुनेकडे यायची. सून संध्याकाळी घरी यायच्या आधी नातवाला घेऊन बागेत यायची. मग इयन म्हणजे आम्हा सर्वांचं खेळणंच असायचं. त्याचं ‘क्रोss’ ‘मूssन’ असं हात दाखवून ओरडणं चाले. सीसॉच्या दांडीवर बसलेल्या दयाळ पक्ष्यालाही तो क्रो म्हणायचा ते आठवून आत्ताही हसू आलं.

चौथी फेरी घालतांना कुंपणापलीकडल्या रस्त्यावरुन जाणाऱ्या जोडप्यातल्या बाईने “हौ आर यू?” अशी साद घातली. मास्कमुळे कळलंच नाही आधी कोण ते. मग ध्यानात आलं की ती आमच्या जेष्ठ नागरिकांच्या बाकाजवळ आमच्याशी गप्पा मारायला थांबणारी जेनी होती. तिने बहुधा माझ्या उंचीमुळे ओळखलं असावं.

फेऱ्या घालता घालता सहज वर लटकणाऱ्या तारेकडे लक्ष गेलं. तर ओळीने लांब शेपटीचे पोपट बसले होते. त्यांचा शेपटीकडचा भाग पिवळा होता. शिक्षक वर्गात यायच्या आधी शाळेच्या बाकावर उनाडक्या करीत बसलेल्या मुलांसारखे उनाडक्या करीत होते बराच वेळ.

तरी अजून शेजारच्या रो हाऊसमधल्या लोकांनी छपरावर पक्ष्यांना शेव खायला घातली नव्हती. नाहीतर कावळे, साळुंख्या, चिमण्या सगळेच शेव खायला गोळा होतात कलकलाट करीत.

चला आता शेवटची फेरी झाली की संपला जिवंत जगाशी संबंध.

ताणायचं किती?

अलीकडे एका मालिकेत कामावर वेळेवर न पोचल्याने काही लोकांना मेमो देण्यात येतो असं पाहिलं. मला तर निवृत्त होऊन इतकी वर्षं झाली तरी अजूनही मी वेळेवर पोहोचण्यासाठी कसरत करीत चाललेय आणि वाटेत अनेक अडथळे येताहेत अशी स्वप्नं पडतात. मुंबईसारख्या शहरात वाहतूक व्यवस्थेवर इतके ताण असतात की खरंच कसरत करावी लागते. मला दहिसरवरुन कफ परेडला पोहोचायला आधी बस किंवा रिक्षा, मग लोकल, मग पुन्हा बस, शेअर टॅक्सी किंवा साधी टॅक्सी करुन जावं लागे. तेही सहजासहजी मिळत नसेच. प्रत्येक वाहनासाठी इतका आटापिटा करावा लागे की विचारुन सोय नाही. त्यातून दक्षिण मुंबईत मंत्रालय असल्याने वेगवेगळे मोर्चे, निदर्शनं, एखाद्या मंत्र्याचं, आमदाराचं निधन, सरकारने बोलावलेल्या परदेशी किंवा देशी नेत्यांचं आगमन या सगळ्यांमुळे वाहतुकीचा अर्धा तास ते तासभरही होणारा खोळंबा ही एक अडचण असे. कधी कधी घाईत आपण टॅक्सी करावी तर विचित्र अनुभव येत. एकदा लोकल काही कारणाने रखडल्यामुळे मी आणि एका सहकारी मुलीने टॅक्सी केली. जेव्हा यू टर्न घेतांना त्या चालकाने गाडी फुटपाथवर चढवली तेव्हा कुठे ध्यानात आलं की तो प्यायलेला होता. बरं तो आरडाओरडा करुनही उतरु देईना. जीव मुठीत धरुन तो प्रवास केला. त्याने लांबून नेल्याने पैसेही अधिक खर्च झाले शिवाय उशीर टळला नाहीच. एकदा असाच एक चालक सगळ्या गाड्यांना हात करुन आपल्या पुढे जाऊ देत होता. त्याला म्हटलं बाबा रे कामावर जायला उशीर होतोय म्हणून तुझी टॅक्सी घेतली. तर पठ्ठ्याने “अईसा का? हम को लगा घूमने निकली हो” असं म्हटल्यावर त्याला सांगितलं कळलं ना आता तरी नीट चल बाबा. तर साहेबांनी “हम नही चलाता हूँ” असं म्हणत स्टिअरींग व्हीलवरचे हात सोडून दिले. इतकं सगळं करुन उतरल्यावरही आम्ही पळत पळत वीसाव्या मजल्यावर पोचायला उद्वाहनाच्या रांगेत, मग तिथून विभागात पोचल्यावर संगणक सुरु करायला वेळ लागे, तो सुरु करायचा वेगळा परवलीचा शब्द, मग हजेरीच्या ठिकाणचा वेगळा परवलीचा शब्द, पुन्हा तिथे प्रत्येकाचा वेगळा कर्मचारी क्रमांक आणि पुन्हा एक परवलीचा शब्द असं सगळं करुन आपली हजेरी लागली की हुश्श करायचं.

आता  वाटतं इतका ताण घ्यायची काय गरज होती कोण जाणे. टाळेबंदीच्या काळात निदान हे तरी टळलं म्हणून अनेकांना बरं वाटलं. शिवाय कामावर वेळेवर जायचा उटारेटा न करताही वेळेवर काम संपवता येतं हेही कळलं. मग का इतकी धावपळ करतो आपण? त्या मालिकेतल्या माणसासारखा आपलाही अहंकार आड येतो का की आपण वेळेवर जातो असा आपला रेकॉर्डच आहे? कित्येक लोक मी पाहिलेत जे वेळेवर कधीच पोचत नसत तरीही त्यांचं काही बिघडलं नाही. तेही माझ्यासारखेच निवृत्त झाले, त्यांनाही पेन्शन मिळाली, थोडी कमी असेल कदाचित. पण ते रोज उशिरा जात हे आता त्यांनाही आठवत नसेल. हे तर मान्यच की वेळेवर जाणं – विशेषतः जिथे ग्राहकांशी संबंध येतो तिथे तर नक्कीच- अत्यावश्यक आहे. पण त्यासाठी किती मानसिक ताण घेतो आपण. तसंही आमच्याकडे कामावर यायची वेळ निश्चित असली तरी घरी जायची वेळ ठरलेली नसे. ती फक्त कागदोपत्रीच असायची. घरी पोचायला माझ्यासारख्या अनेकांना रात्रीचे दहा अकरा वाजत. कौटुंबिक आयुष्याचा पुरता बोजवारा उडे. जिथे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना राबवून घेतलं जातं तिथे ग्राहकांशी संबंध येत नसेल अशा विभागातल्या लोकांसाठी कामाचे तास लवचिक (flexi hours) ठेवायला काय हरकत आहे? जिथे ग्राहकांशी संबंध येतो तिथेही जास्तीचे कर्मचारी घेऊन हा प्रश्न मिटवता येऊ शकतो जेणेकरुन वेळेवर येणं आलटून पालटून बंधनकारक असेल. पण सध्या सगळीकडे कर्मचारी कपात, खर्चात कपात असं धोरण असल्याने कंत्राटी कामगार घेतले जातात आणि त्यांना फारशा सवलती न पुरवता कसंही राबवून घेता येतं. टाळेबंदीच्या काळात घरून काम करण्याचा पर्याय उपयोगी ठरतो खरं तर हे सगळ्यांच्या लक्षात आलं. शिवाय ज्यांना लोकल किंवा बसने जाण्याची परवानगी नव्हती पण कामावर जावंच लागे असे कर्मचारी एकाच परिसरात रहाणाऱ्या सहकाऱ्यांसोबत गाडीने एकत्र जात. हे दोन्ही पर्याय पुढेही उपलब्ध असले तर पर्यावरणाची हानिही टाळता येईल

आता टाळेबंदीच्या काळातल्या बदलांमुळे व्यवस्थापनाने काही धडे घेऊन या सगळ्यात बदल केले तर अनेक कर्मचाऱ्यांची मानसिक तणावातून सुटका होईल. माझ्या आठवणीप्रमाणे एक्झिम बँकेने या दशकाच्या सुरुवातीलाच फ्लेक्सी आवर्स ही संकल्पना राबवली होती. जे उशिरा कामावर दाखल होत, त्यांना तितकंच उशिरापर्यंत थांबावं लागे. जे लवकर ये त्यांना लवकर जाण्याची मुभा असे. अशा प्रकारे वेळेच्या आधी आणि वेळेवर येणारे असे दोन्ही वर्गातले लोक हजर असल्याने फारशी अडचणही होत नसे. ही व्यवस्था तिथल्या कर्मचाऱ्यांना खरंच सोयीची ठरली असं तिथं काम करणाऱ्या मैत्रिणीने सांगितलं.

दुसरेही काही ताण असतात ते आपणच निर्माण करतो कधी कधी. एकदा माझ्यावर लेखा विभागातल्या परकीय चलनात देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीसंदर्भात एक सॉफ्टवेअर तयार करुन घेऊन ते अंमलात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. माझं रोजचं काम करुन हेही काम तातडीने करायचं होतं. सॉफ्टवेअर करुन घेतलं पण अंमलात आणायचं कामही मी त्या कामासारखं एका कोपऱ्यात बसून माझं मीच करायचं ठरवलं. आधीचं काम करतानांचा ताण होताच तरीही मी कशाला दुसऱ्यांना यात ओढा, माझं मी करीन म्हटलं. पण आमच्या वरीष्ठांनी मला समजावलं. ते म्हणाले, “असंही हे काम नंतर सर्वांनी आपापल्या कंपन्यांसाठी करायचं आहे. आत्ताच सगळ्यांना या कामात गुंतवलं तर ते लवकर पुरं होईल, त्या निमित्ताने प्रत्येकाला त्यातल्या खाचाखोचा कळतील त्याची त्यांना मदतच होईल.” अर्थात इतरांनी मला मनातल्या मनात शिव्या दिल्या असल्या तरी नंतर त्यांनाही हे कळून चुकलं की हे आधी केलं ते बरं झालं. पण कधी संकोचामुळे, कधी फुकटच्या अहंकारापायी, कधी भीतीपोटी इतरांना कामात सहभागी करुन घेणं किंवा काम वाटून देणं आपण टाळतो. त्या वेळी ध्यानात येत नसलं तरी असं करुन आपण आपला ताण उगाचच वाढवित असतो हे आपल्या शरीराला, मनाला त्रास व्हायला लागला की आपल्या ध्यानात येतं.

तोच प्रकार काम नाकारण्याचाही. कधी कधी तात्पुरता का होईना नकार देणं आवश्यक असतो. मराठीत एक अश्लील म्हण आहे – भीडे भीडे पोट वाढे तसं व्हायला नको. नव्वदच्या दशकातली गोष्ट आहे. संगणीकीकरण ही तशी नवी गोष्ट होती अजूनही. कित्येकांचे संगणकाविषयी मजेदार समज असत. एकदा एक चांगला बुद्धीमान सहकारी मला म्हणाला, “पण मॅडम, कॉम्प्युटर कशी काय चूक करु शकेल?” म्हणजे आपण चुकीची विदा भरली तरी संगणकाची चूक होणारच नाही. संगणक जादूने काहीतरी करतो असाच समज असे. तसंच संगणीकीकरणाचा अर्थ भल्याभल्यांना नीट माहीत नसे. मी लेखा विभागात होते आणि माझ्याकडे परकीय चलनातल्या कर्जाचं काम होतं. जवळपास पाचशे कंपन्यांना दिलेली वेगवेगळी कर्ज, प्रत्येक कर्ज फेडण्यासाठी व्याजाचे, दंडाचे वेगवेगळे दर, वेगवेगळ्या अटी असं होतं. त्या कामाचं संगणीकीकरण झालं नव्हतं. माझ्या चमूतली माणसं ते हाती करीत. मोठाल्या खातेबुकात ते मांडून ठेवीत. आमचे महाव्यवस्थापक फार कडक शिस्तीचे होते. कर्जाचे हप्ते बुडवणाऱ्या कंपन्यांवर ते सतत नजर ठेवून असत. त्यासाठी दर आठवड्याला त्यांना आकडेवारी पुरवावी लागे. मी एक्सेलशीटवर इतक्या सगळ्या कंपन्यांचं काम हाती करुन ठेवीत असे. पण ते करायला वेळ लागे. आणि सोमवार जवळ आला की पोटात गोळा उठे. कारण साहेबांना सगळा तपशील द्यायचा असे. एवढी मोठी फाईल तयार व्हायला वेळ लागे. मी रविवारी काम करुनही पूर्ण होत नसे, कारण माझं रोजचं काम करुन मला हे करावं लागायचं. शेवटी एकदा मी धीर करुन त्यांना सांगून टाकलं की सर मला हे शक्य नाही. ते म्हणाले तुला काय करायचंय त्यात संगणकला फक्त आज्ञा द्यायची ना. तेव्हा मी त्यांना ते काम संगणकीकृत नाही तर हाताने कसं केलं जातं ते दाखवलं आणि त्यांना ते पटलंच शिवाय संगणीकीकरण तातडीने करुन घेण्यासाठी त्यांनी परवानगी दिली, तशा सूचना हे काम करणाऱ्या विभागाला दिल्या तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. खरं तर हे मी सुरुवातीलाच करायला हवं होतं. पण आपण कुठे तरी कमी पडतोय असं वाटून अशा प्रकारची कृती हातून होत नाही. आपण फार कुशल आहोत हे सिद्ध करण्यासाठी ताकदीबाहेर आटापीटा करणारे कित्येक सहकारी अशा प्रकारे निराशेच्या गर्तेत गेलेले मी पाहिलेत. उपचार घेऊन ते त्यातून बाहेर पडले तरी त्यांची कारकीर्द नंतर पहिल्यासारखी होऊ शकली नाही हेही खरं. थोडासा ताण तुमच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आवश्यक असतो हे खरं. लवचिक असलं पाहिजे रबरासारखं. पण रबर फार ताणला की तुटतोच. तो किती ताणायचा हे समजून घेणं फार आवश्यक आहे.